Go to full page →

अध्याय २७—“मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा” DAMar 215

मत्तय ८:२-४; ९:१-८, ३२-३४; मार्क १:४०-४५; २:१-१२; लूक ५:१२-२८.

पौर्वात्य देशात सर्व रोगामध्ये कुष्ठरोग फार भयानक समजला होता. त्याच्या असाध्य व संसर्गजन्य लक्षणाने आणि रोग्यावर होणाऱ्या भयंकर परिणामामुळे दणकटालासुद्धा त्याची भीति वाटत होती. पापामुळे हा आलेला ईश्वरी कोप अशी यहूद्यांची भावना होती म्हणून त्याला “झटका” “देवाचा हात’ म्हटले होते. खोल मूळ गेलेला, समूळ उच्चाटन करता न येणारा व प्राणघातक असल्यामुळे तो पापाचे दर्शक गणला होता. विधि संस्काराने कुष्ठरोगी अशुद्ध ठरविला होता. मृताप्रमाणे त्याला मनुष्यांच्या वस्तीतून बाहेर ठेवण्यात आले होते. त्याने स्पर्श केलेली प्रत्येक वस्तू अशुद्ध गणली. त्याच्या विश्वासाने हवा दूषित झाली होती. हा आजार असल्याचा संशय आल्यावर त्याने याजकाला भेटावे, याजक त्याची तपासणी करून त्यावर निर्णय देत असे. कोडी म्हणून निर्णय दिल्यावर त्याला कुटुंबातून बाहेर काढले जात असे, इस्राएल लोकांपासून त्याला वेगळे ठेवण्यात येत असे आणि दुसऱ्या कुष्ठरोग्याबरोबरच केवळ सहवास ठेवण्यास त्याची रवानगी होत असे. ह्या बाबतीत नियम फार कडक होता, लवचीक नव्हता. राजे व सरदार ह्यांच्या बाबतीत सुद्धा अपवाद ठेवला नव्हता. एकादा राजा ह्या रोगाने पछाडला तर त्याला राजत्याग करून समाजापासून पळून जावे लागे. DAMar 215.1

नातेवाईक व स्नेही ह्यांच्यापासून दूर राहून कुष्ठरोग्याने त्याच्यावर आलेला कोप सहन करावयाचा होता. त्याच्यावर आलेली आपत्ति जाहीर करणे, अंगावरील वस्त्रे फाडणे आणि अशुद्धतेचा संसर्ग होऊ नये म्हणून पळून जाण्याचा इशारा देणे हे त्याच्यावर बंधनकारक होते. हद्दपार केलेल्याच्या मुखातून शोकजनक आरोळी “अशुद्ध! अशुद्ध!” लोक तिरस्काराने व भीतीने ऐकत असे. DAMar 215.2

येशू ख्रिस्त काम करीत असलेल्या भागात अशा प्रकारच्या आपत्तीने पछाडलेले बरेच लोक होते. त्यांच्या कानावर त्याच्या कार्याची बातमी गेली त्यामुळे त्यांच्यामध्ये आशेचा किरण प्रकाशला. परंतु अलीशा संदेष्ट्याच्या काळापासून अशा आपत्तीने पीडलेला बरे झालेला कधी ऐकलेला नव्हता. आतापर्यंत दुसऱ्यासाठी कधी केले नाही ते तो त्यांच्यासाठी करील ह्याची अपेक्षा त्यांनी केली नाही. तथापि त्यांच्यातील एकाच्या अंतःकरणात विश्वास उसळी घेत होता. परंतु ख्रिस्ताला कसे भेटायचे हे त्याला माहीत नव्हते. दुसऱ्याला भेटण्याची मनाई असल्यामुळे तो बरे करणाऱ्याजवळ कसा जाईल? आणि ख्रिस्त त्याला बरे करील काय असा प्रश्न त्याच्या मनात आला. देवाच्या कोपाखाली हालअपेष्टा भोगत असलेल्याकडे त्याची दृष्टी जाईल काय? परूशी तसेच औषध देणारे वैद्य ह्यांच्याप्रमाणे त्याच्यावर शाप घोषीत करून लोकांपासून पळून जाण्याचा इशारा तो देणार नाही काय? येशूविषयी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा त्याने विचार केला. त्याच्याजवळ मदतीसाठी केलेली विनंती केव्हाही नाकारली नव्हती. उद्धारकाचा शोध करण्याचा दुःखी माणसाने निश्चय केला. शहरातून जरी हद्दपार केले होते तरी डोंगरावर जाणाऱ्या रस्त्यापासून जवळच असलेल्या पायवाटेवर शोध लागेल किंवा गावाच्या बाहेरच लोकांना शिकवण देताना मिळेल असे त्याला वाटले. अडचणी कठीण होत्या परंतु केवळ हीच त्याची आशा होता. DAMar 215.3

कुष्ठ रोग्याला उद्धारकाचा मार्ग दाखविण्यात आला. येशू सरोवराच्या किनाऱ्यावर शिकवीत आहे आणि लोक त्याच्याभोवती जमा झाले आहेत. दूरवर उभे राहिले असता कुष्ठ रोग्याच्या कानावर उद्धारकाचे काही शब्द पडले. आजाऱ्यावर हात ठेवतांना त्याने पाहिले. पांगळे, आंधळे, लुले आणि असाध्य आजाराने मृतप्राय झालेले बरे होऊन देवाची कृतज्ञतेने स्तुती करतांना त्याने पाहिले. त्याच्या अंतःकरणातील विश्वास बळावला. जमलेल्या समुदायाजवळ तो हळूहळू आला. त्याच्यावर घातलेले बंधन, लोकांची सुरक्षितता आणि त्याच्याविषयी लोकांच्या मनात असलेली भीती हे सर्व तो विसरून गेला. तो फक्त बरे होण्याच्या धन्य आशेचा विचार करीत होता. DAMar 216.1

तो एक किळसवाणी दृश्य आहे. महारोग शेवटच्या पायरीवर होता आणि त्याचे कुजलेले अंग पाहाण्यास भयानक होते. त्याला पाहिल्याबरोबर लोक भयाने मागे सरकत असे. त्याचा स्पर्श किंवा संसर्ग होऊ नये म्हणून लोक मागे सरकतांना एकमेकावर पडत होते. येशूजवळ येण्यास त्याला काहीजण मज्जाव करीत होते, परंतु ते सगळे व्यर्थ झाले. तो त्यांचे ऐकत नव्हता किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता. त्यांच्या तिरस्काराच्या उद्गारांचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. त्याला फक्त देवपुत्र दिसतो. मरणाऱ्याला जीवन देण्याची वाणीच केवळ त्याला ऐकू येते. येशूच्या जवळ जाऊन त्याच्या चरणी पडतो व ओरडतो, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.’ DAMar 216.2

येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” मत्तय ८:३. DAMar 216.3

ताबडतोब त्याचा कुष्ठरोग जाऊन त्याच्यामध्ये बदल झाला. त्याचे शरीर निरोगी झाले, मज्जातंतु संवेदनाक्षम आणि स्नायू बळकट झाले. कुष्ठरोग्याची ओबडधोबड व खवले असलेली त्वचा जाऊन निरोगी बाळाच्या मऊ, तेजाळ व टवटवीत त्वचेसारखी झाली. DAMar 216.4

येशूने त्याला म्हटले, पाहा तुझ्या शरीरात झालेला फरक याविषयी तू कोणाला सांगू नकोस तर सरळ जाऊन मंदिरात अर्पण वाहा. याजकाने त्या माणसाची परीक्षा करून तो रोगमुक्त झाला आहे असे जाहीर केल्याशिवाय अशा अर्पणाचा स्वीकार करण्यात येत नव्हता. हा विधि पार पाडण्यास ते जरी नाखूष असले तरी परीक्षा घेऊन निर्णय जाहीर करणे ते टाळू शकत नव्हते. DAMar 217.1

गाजावाजा न करता शांतपणे जाऊन कार्य करण्याची निकड त्या मनुष्याला ख्रिस्ताने दाखविली हे शास्त्रवचनात विदित केले आहे. “त्याने त्याला ताकीद देऊन लागलेच लावून दिले आणि सांगितले, पाहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन स्वतःस याजकाला नेमलेले अर्पण कर.” कुष्ठरोग्याला बरे करण्याची सत्य माहिती याजकांना समजली असती तर ख्रिस्ताविषयीच्या त्यांच्या द्वेषमत्सरामुळे त्यांनी खोटा अहवाल दिला असता. ही चमत्काराची वार्ता कोणाच्या कानी पडण्याअगोदर त्याला मंदिरात लगेच जाण्यासाठी येशूने सांगितले. त्यामुळे निःपक्षपाती अहवाल मिळून बरे झालेल्या मनुष्याला पुन्हा आपल्या कुटुंबाला व मित्रमंडळीला मिळण्यास परवानगी मिळाली असती. DAMar 217.2

त्या मनुष्याला शांत राहाण्यास सांगण्यात ख्रिस्ताचे दुसरे काही उद्देश होते. त्याच्या कार्यावर निर्बंध आणून लोकांना त्याच्यापासून फितविण्याचा प्रयत्न त्याचे शत्रू करीत आहे हे उद्धारकाला ज्ञात होते. कुष्ठरोगी बरे झाल्याची वार्ता इतरत्र जाहीर झाली तर त्या रोगाने पछाडलेल्या लोकांची गर्दी त्याच्याभोवती होईल आणि त्यांच्या संसर्गाने लोक दूषित होतील असा आवाज उठविला जाईल हेही त्याला माहीत होते. ह्यामुळे आरोग्यदानाचा फायदा अनेक कुष्ठरोग्यांना उठवता आला नसता तसेच दुसऱ्यांना करून देता येत नव्हता. त्याच्याकडे रोगी आकर्षिले गेल्यामुळे विधिसंस्कारावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यास त्यांना तो संधि देत होता. अशा प्रकारे त्याच्या सुवार्ता प्रसाराच्या कामाला अटकाव होणार होता. DAMar 217.3

ह्या घटनेमुळे ख्रिस्ताने दिलेल्या इशाऱ्याचे समर्थन होते. कुष्ठरोग्याला बरे केलेले मोठ्या समुदायाने प्रत्यक्ष पाहिले होते, आणि याजकांचा त्यावर काय निर्णय आहे ते ऐकण्यास लोक अगदी आतुर होते. तो मनुष्य आपल्या मित्रमंडळीकडे परत गेल्यावर तेथे फार खळबळ उडाली. येशूने ताकीद दिलेली असताना सुद्धा त्या मनुष्याने बरे होण्याची सत्य कथा आणखी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. तसे करणे अशक्य होते, आणि कुष्ठरोग्याने खरी गोष्ट जाहीर केली. त्याच्यावर बंधन घालण्यात येशूने सभ्यता, विनयशीलता दाखविली आहे हे जाणून त्याने ते महान बरे करणाऱ्याचे सामर्थ्य सर्वत्र गाजविले. अशा प्रकारच्या लहान सहान घटनेने वडील व याजक यांचे पित खवळून ते ख्रिस्ताचा नाश करण्यास अधिक प्रवृत होत आहेत हे त्याला समजले नव्हते. आरोग्यदान अमूल्य आहे असे त्या बरे झालेल्या मनुष्याला वाटले. प्रौढावस्थेतील उत्साहाने कुटुंब व समाजात पुन्हा घटक होण्याचा मान मिळाल्याने त्याला फार आनंद झाला आणि त्याने त्याला आरोग्यदान दिले त्याचे गौरव व स्तुती करण्यापासून स्वतःला आवरणे त्याला अशक्य झाले. परंतु सर्वत्र ती कृती जाहीर केल्याने ख्रिस्ताच्या कार्याला अटकाव झाला. त्याच्याभोवती लोक इतके जमा होते की, काही वेळा त्याला त्याचे काम बंद करणे भाग पडत होते. DAMar 217.4

ख्रिस्त कार्यातील प्रत्येक कृती त्याचा उद्देश साध्य करण्यात दूरगामी होती. वरून दिसते त्यापेक्षा अधिक त्याद्वारे समजून आले. कुष्ठरोग्याच्या बाबतीतही तेच होते. त्याच्याकडे येणाऱ्यांची सेवा येशूने केलीच परंतु जे आले नव्हते त्यांनाही आशीर्वाद देण्यास त्याच्याठायी तळमळ होती. जकातदार, विधर्मी आणि शोमरोनी यांना त्याने आकर्षण करून घेतले त्याबरोबरच पूर्वग्रहदूषित मनाने व परंपरागत रुढीने अलग राहिलेले याजक आणि शिक्षक यांनाही भेटण्यास तो उत्कंठित होता. त्यांना पोहचण्याचा त्याने अटोकाट प्रयत्न केला. त्यांचा दूषित, दूराग्रह दूर करण्यासाठी त्याने बरे झालेल्या कुष्ठरोग्याला त्यांच्याकडे पाठविले. DAMar 218.1

देवाने मोशेला दिलेल्या निमयशास्त्राविरूद्ध ख्रिस्ताची शिकवण आहे असे परूशी ठामपणे प्रतिपादन करीत होते; परंतु त्याने त्या कुष्ठरोग्याला नियमाप्रमाणे अर्पण वाहाण्यास सांगितले होते त्यामुळे त्यांचा आरोप खोटा ठरला. खात्री करून घेण्यास राजी असलेल्यांना ती पुरेशी साक्ष होती. DAMar 218.2

येशूचा वध करण्यास कारण होणारे निमित्त शोधण्यास यरुशलेम येथील पुढाऱ्यांनी हेर पाठविले होते. मानवतेवरील त्याचे प्रेम, नियमशास्त्राविषयी आदर आणि पाप व मरण यापासून मुक्त करणारे त्याचे सामर्थ्य यांच्याविषयी पुरावा देऊन त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्याविषयी त्याची साक्ष ही आहे: “मी केलेल्या बऱ्याची फेड त्यांनी वाईटाने केली, व माझ्या प्रेमाची फेड द्वेषाने केली.” स्तोत्र. १०९:५. डोंगरावर असतांना त्याने आज्ञा दिली, “आपल्या वैऱ्यावर प्रीती करा,” आणि “वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या.’ हे त्याने उदाहरणाने दाखवून दिले. मत्तय ५:४४; १ पेत्र ३:९. DAMar 218.3

ज्या याजकांनी कुष्ठरोग्याला हद्दपार केले होते त्यांनीच आता बरे झाल्याचा दाखला दिला. जाहीर करून नमूद केलेले हे विधान ख्रिस्ताविषयीची कायमची ठळक साक्ष होती. याजकाच्या शिफारशीवरून बरे झालेल्या माणसाला इस्राएल लोकांत पुन्हा सामील केल्यावरून तो सुद्धा आपल्या उपकारकर्त्याची जीवंत साक्ष होता. आनंदाने त्याने आपले अर्पण वाहिले आणि येशूच्या नावाची प्रतिष्ठा केली. उद्धारकाच्या दिव्य सामर्थ्याविषयी याजकांची खात्री झाली होती. सत्य जाणून घेण्याची व मिळालेल्या प्रकाशाचा लाभ करून घेण्याची नामी संधि त्यांना देण्यात आली होती. धिक्कारली तर ती निघून जाईल, पुन्हा माघारी येणार नाही. अनेकांनी प्रकाशाचा धिक्कार केला होता तरी पण तो निरर्थक दिला नव्हता. अनेकाच्या मनावर परिणाम झाला होता परंतु काही काळ तो दृश्यमान नव्हता. येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील जीवनकाळी याजक आणि धर्मगुरू यांच्याकडून त्याच्या कार्यावर साजेशी प्रतिक्रिया फारशी दिसली नाही; परंतु त्याच्या पुनरुत्थानंतर “याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.” प्रेषित. ६:७. DAMar 218.4

महारोग्याला कुष्ठरोगापासून शुद्ध करणे म्हणजे ख्रिस्ताच्या कार्याद्वारे पाप्याला त्याच्या पापापासून शुद्ध करण्याचा दाखला आहे. ख्रिस्ताकडे आलेला मनुष्य “कोडाने भरलेला’ होता. त्याचे प्राणघातक विष त्याच्या सर्व अंगात भिनून गेले होते. आपल्या गुरूजीनी त्याला स्पर्श करू नये म्हणून शिष्य प्रयत्न करीत होते कारण स्पर्श केल्याने ते स्वतः अशुद्ध होतील. परंतु त्या कुष्ठरोग्यावर हात ठेवल्याने येशू अशुद्ध झाला नाही. त्याच्या स्पर्शाने जीवदानाचे सामर्थ्य मिळाले. महारोगाची शुद्धी झाली. अशा प्रकारेच खोल मूळ धरलेल्या, प्राणघातक आणि मानवी सामर्थ्याने बरे होणे अशक्य असलेल्या पापाच्या महारोगाची कथा आहे. “हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय म्लान झाले आहे. पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही; जखमा, चेचरलेले व पुवळलेले घाय आहेत.” यशया १:५, ६. परंतु येशू मानवतेमध्ये वस्ती करण्यासाठी येतो आणि तो अशुद्ध होत नाही. जो कोणी त्याचे चरण धरून म्हणेल, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण शक्तीमान आहा.” त्यावर तो असे उत्तर ऐकेल, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” मत्तय ८:२. ३. DAMar 219.1

बरे करण्याच्या काही प्रकरणात येशूने सादर केलेली विनंती ताबडतोब मान्य केली नाही. परंतु कुष्ठरोग्याच्या बाबतीत विनंती केल्याबरोबर मान्य केली गेली. जगातील आशीर्वादासाठी प्रार्थना केल्यास प्रार्थनेच्या उत्तरास कदाचित विलंब लागेल, किंवा देव न मागितलेली गोष्ट देईल, परंतु पापमुक्ततेसाठी केलेल्या प्रार्थनेची कथा अशी असणार नाही. आम्हास पापासून शुद्ध करावे, त्याची मुले बनवावे व पवित्र जीवन जगण्यास आम्हास समर्थ करावे अशी त्याची इच्छा आहे. “आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून येशूने आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले.’ गलती १:४. “त्याविषयी आपल्याला जो भरवसा आहे तो हा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल; आपण मागतो त्याविषयी तो आपले ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ मागितल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे.” १ योहान ५:१४, १५. “जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करील.” १ योहान १:९. DAMar 219.2

कफर्णहमात पक्षघाताने पीडित झालेल्या मनुष्याला बरे करण्यामध्ये येशूने पुन्हा तेच सत्य शिकविले. पापक्षमा करण्याचे त्याचे सामर्थ्य प्रदर्शित करण्यासाठी त्याने चमत्कार केला. पक्षघाती मनुष्याला बरे करण्याद्वारे दुसरी महत्त्वाची सत्ये स्पष्ट केली. ते प्रोत्साहन व आशा यांच्या समर्थनासाठी होते. कारणावाचून दोष देणाऱ्या पुरुषाशी त्यांचा संबंध असल्यामुळे त्यामध्ये इशाऱ्याचा धडाही आहे. DAMar 220.1

कुष्ठरोग्याप्रमाणे पक्षघाती माणसानेही बरे होण्याची संपूर्ण आशा सोडली होती. पापी जीवनामुळे तो आजारी झाला होता. सदसद्विवेकबुद्धीच्या टोचणीमुळे त्याचे दुखणे तीव्र झाले होते. शारीरिक दुखणे व मानसिक व्यथा यापासून आराम मिळण्यासाठी त्याने परूशी आणि वैद्य यांच्याकडे अगोदरच विनवणी केली होती. परंतु त्यांनी ते दुर्धर आहे असे घोषीत करून त्याला देवाच्या कोपावर सोपवून दिले होते. देवाच्या कोपामुळे क्लेश येतात अशी परूशांची समजूत होती आणि आजारी व गरजू यांच्यापासून ते दूर राहात होते. तथापि स्वतःला पवित्र समजणारे व्यथित घोषीत केलेल्या लोकांपेक्षा अधिक दोषी होते. DAMar 220.2

पक्षघाती मनुष्य अगदीच लाचार झाला होता आणि दुसरीकडून सहाय्याची अपेक्षा नसल्यामुळे तो हतभागी झाला होता. नंतर त्याने येशूच्या कार्याविषयी ऐकले. त्याच्यासारखेच पापी व लाचार असलेल्यांना बरे करण्यात आले, कुष्ठरोग्यांनासुद्धा शुद्ध करण्यात आले असे त्याला सांगण्यात आले होते. ज्या मित्रांनी त्याला ही माहिती दिली त्यांनी त्याला बरे होण्यासाठी येशूकडे नेऊन उत्तेजन दिले. परंतु ज्या कारणामुळे तो ह्या आजाराला बळी पडला त्याची त्याला आठवण झाल्यावर त्याची आशा मावळली. पवित्र असलेला वैद्य आपल्या जवळ येऊ देणार नाही अशी त्याला भीती वाटली. DAMar 220.3

त्याला शारीरिक जीर्णोद्धारापेक्षा पापापासून मुक्ती मिळण्यास तो फार आतुर होता. ख्रिस्ताचे दर्शन घेऊन पापक्षमेची व दिव्य शांतीची खात्री मिळाल्यावर देवाच्या इच्छेप्रमाणे तो जगण्यास किंवा मरण्यास तयार होता. मरणोन्मुख माणसाचा आकांत होता की, मी त्याच्या समक्षतेत येईन! गमावण्यासाठी अधिक अवधि नव्हता; कारण त्याच्या अंगावरील पीडित मांस कुजायला लागले होते. आपल्या मित्रांना विनंती करून त्याच्या खाटेवरून येशूकडे घेऊन जाण्यास सांगितले. ते करण्यास ते राजी होते. ज्या घरात येशू होता तेथे लोकांची इतकी गर्दी होती की त्याच्या मित्रांना येशूनजीक जाणे अगदी अशक्य होते. त्याचा आवाज ऐकता येईल इतक्या जवळसुद्धा जाणे कठीण होते. DAMar 220.4

पेत्राच्या घरात येशू प्रबोधन करीत होता. त्याच्या रीतिरीवाजाप्रमाणे त्याचे शिष्य जवळ सभोवती बसले होते. “तेथे गालील प्रांत, यहूदा व यरुशलेम येथून आलेले परूशी, कायदे पंडितही बसलेले होते.” येशूच्या विरूद्ध दोष शोधण्यासाठी आलेले ते हेर होते. ह्या अधिकाऱ्यांच्या बाहेरच्या बाजूस भेदभाव न मानणारे, उत्सुक, पूज्यबुद्धीचे, चौकशी करणारे आणि अश्रद्धावंत यांचा अफाट समुदाय जमला होता. विविध राष्ट्रे व समाजातील सर्व पातळीवरील लोक तेथे हजर होते. “आणि निरोगी करण्याचे प्रभूचे सामर्थ्य तेथे हजर होते.’ समुदायावर जीवनाचा आत्मा घिरट्या घालीत होता परंतु परूशी आणि कायदेपंडित यांना त्यांचा गंध नव्हता. त्यांना कसलीच गरज भासली नाही आणि बरे होणे त्यांच्यासाठी नव्हते. “त्याने भुकेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानांस रिकामे लावून दिले आहे.’ लूक १:५३. DAMar 220.5

पक्षघात्याला वाहून नेणारे गर्दीतून पुढे सरकण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा करीत होते पण सर्व काही व्यर्थ झाले. रोगी चिंतातूर होऊन सभोवती पाहात होता. अपेक्षीत मदत नजीक आली असताना आशाहीन कसा बनू शकतो? त्याच्या सूचनेवरून त्यांनी त्याला घराच्या छप्परावर नेले, ते उस्तरून त्याला खाली येशूच्या चरणी सोडले. प्रबोधनात अडथळा झाला. येशने व्याकूळ झालेला चेहरा व त्याच्यावर खिळलेले विनवणी वजा नेत्र पाहिले. त्याला परिस्थिती समजली. गोंधळलेला व साशंक आत्मा त्याने आपणाकडे आकर्षण करून घेतला. पक्षघाती घरी असतांनाच उद्धारकाने त्याच्या विवेकबुद्धीला खात्री करून दिली होती. पापाबद्दल पश्चात्ताप करून त्याला बरे करण्याच्या येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवल्यावर उद्धारकाच्या जीवनदान देण्याच्या करुणेने त्याच्यावर कृपाप्रसाद झाला. पाप्याचा केवळ तोच सहाय्यक आहे अशा अंधुक विश्वासाचा किरण येशूने प्रथमतः त्याच्यामध्ये पाहिला, तो पुढे अधिक प्रकाशीत होऊन त्याद्वारे तो त्याच्या समक्षतेत येण्यास प्रवृत झाला. DAMar 221.1

आता व्याधीने त्रस्त झालेल्याच्या कानावर जणू काय संगीत वाणी झाली. उद्धारकाने म्हटले, “उल्हास कर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” DAMar 221.2

रोगी माणसाच्या शीरावरील दुःखाचे ओझे दूर करण्यात आले, पापक्षमेची शांती त्याच्या अंतर्यामात विराजमान झाली आणि तिची झलक चेहऱ्यावर दृश्यमान झाली. त्याचे शारीरिक दुखणे निपटून गेले आणि त्याचे सबंध अस्तित्व परावर्तीत झाले. लाचार पक्षघाती बरा झाला! अपराधी पाप्याला पापक्षमा लाभली! DAMar 221.3

साध्या श्रद्धेने येशूचे वचन नवजीवनाचे दान म्हणून त्याने स्वीकारले. त्याने आणखी विनंतीची मागणी केली नाही, स्तब्ध राहून आनंद उपभोगला. दिव्य प्रकाशाने त्याचा चेहरा तेजस्वी झाला आणि लोकांनी ते दृश्य आश्चर्याने पाहिले. DAMar 221.4

ह्या घडलेल्या उदाहरणामध्ये येशू कोणती भूमिका घेतो हे पाहाण्यासाठी धर्मगुरू चिंतातूर होऊन वाट पाहात होते. मदतीसाठी तो त्यांच्याकडे कसा गयावया करीत होता आणि त्यांनी त्याला सहानुभूती दाखविण्याचे कसे नाकारले होते याचे त्यांना स्मरण झाले. ह्यातच त्यांचे समाधान झाले नव्हते तर तो आपल्या पापाबद्दल देवाचा कोप भोगीत आहे असे त्यांनी जाहीर केले होते. ह्या आजारी माणसाला पाहिल्यावर ह्या सर्व गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होत्या. सर्व लोक ते पाहात होते आणि त्यातील त्यांची गोडी पाहून आणि लोकावरील आपले वजन कमी झाल्याचे जाणून त्यांच्या मनात भय निर्माण झाले. DAMar 221.5

ह्या प्रतिष्ठित लोकांनी ह्याविषयी जरी परस्परामध्ये उहापोह केला नाही तरी एकमेकांच्या चेहऱ्यावरून दिसत होते की ह्याला पायबंद घालण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे असे सर्वांना वाटत होते. पक्षघाती माणसाच्या पापांची क्षमा झाली आहे असे येशूने घोषीत केले होते. हे शब्द ईश्वरनिंदा असून ते मरणास पात्र असलेले पाप आहे असे परूशांना वाटले होते. त्यांनी मनात म्हटले, “हा दुर्भाषण करितो; एकावाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?” मार्क २:७. DAMar 222.1

भयाने माघार घेणाऱ्यांवर येशूने आपली दृष्टी रोखली आणि म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले वाईट विचार का आणिता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे सोपे किंवा ऊठ, आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे हे तुम्हास समजावे म्हणून” तो पक्षघाती मनुष्याकडे वळून म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा.” DAMar 222.2

नंतर येशूकडे बाजेवरून आणलेला मनुष्य तत्काळ आपल्या पायावर तरुणाप्रमाणे उभे राहिला. जीवन देणारे रक्त त्याच्या रक्त वाहिन्यातून वाहू लागले. शरीरातील प्रत्येक अवयव कार्यक्षम झाला. येणाऱ्या मृत्यूवर आरोग्याच्या तेजस्वीतेने मात केली. “मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला; ह्यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.” DAMar 222.3

अहाहा, आश्चर्यकारक ख्रिस्ताचे प्रेम, अपराध्याला व पीडलेल्याला ओणवून बरे करणे! व्यथित मानवतेच्या दुःखाबद्दल वाईट वाटून आराम देणारे देवत्व! मानवाच्या संतानावर प्रगट केलेले अद्भुत सामर्थ्य! तारणदायी संदेशाविषयी कोणाच्या मनात संदेह निर्माण होतो? कनवाळू उद्धारकाची करुणा कोण तुच्छ लेखितो? DAMar 222.4

सडत असलेल्या शरीराला पूर्ववत आरोग्य प्राप्त करून देण्यास सर्जनशील (उत्पादनशील) सामर्थ्याशिवाय शक्य नाही. मातीपासून निर्माण केलेल्या मनुष्याला ज्या वाणीने जीवदान दिले त्याच वाणीने पक्षघाती मनुष्याला जीवदान दिले आणि त्याच सामर्थ्याने मनाचे नवीकरण झाले. सृष्टी उत्पन्न करण्याच्या वेळेस “तो बोलला आणि अवघे झाले; त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले.” (स्तोत्र ३३:९) हे ज्या वाणीने घडले त्याच वाणीने पापाने व दुराचाराने मरणोन्मुख झालेल्या व्यक्तीला जीवदान मिळाले. बरे होऊन शरीराला आरोग्य लाभणे हे मनाचे नवीकरण झाल्याचा पुरावा आहे. “मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे हे तुम्हास समजावे म्हणून” ख्रिस्ताने पक्षघाती मनुष्याला सांगितले “ऊठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा.” DAMar 222.5

शरीर आणि आत्मा ख्रिस्तामध्ये बरे झाल्याचे पक्षघाती मनुष्याला दिसून आले. आध्यात्मिक आरोग्यसंवर्धनानंतर शारीरिक आरोग्य लाभते. ह्या मुद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज हजारो शारीरिक व्याधीने तडफडत आहेत आणि त्या पक्षघाती मनुष्याप्रमाणे “तुझ्या पापाची क्षमा झाली आहे’ हे शब्द ऐकण्याची अपेक्षा करीत आहेत. अस्थैर्य व असमाधानी इच्छा असलेले पापाचे ओझे त्यांच्या रोगाचे मूळ कारण आहे. आत्म्याला बरे करणाऱ्याकडे आल्याशिवाय त्यांना आराम पडणार नाही. केवळ त्याच्याचद्वारे लाभलेल्या शांतीद्वारे मनाला उत्साह व शरीराला आरोग्य लाभेल. DAMar 223.1

“सैतानाचे कार्य नष्ट करण्यास’ येशू आला. “त्याच्याठायी जीवन होते,” आणि तो म्हणतो, “मी तर त्यांना जीवनप्राप्ति व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.’ तो “जीवंत करणारा आत्मा” आहे. १ योहान ३:८; योहान १:४; १०:१०; १ करिंथ. १५:४५. पृथ्वीवर असताना त्याने आजाऱ्यांना बरे केले आणि पाप्यांना पापक्षमा केली आणि आजसुद्धा त्याच्याठायी जीवदान देणारे सामर्थ्य आहे. “तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करितो; तो तुझे सर्व रोग बरे करितो.” स्तोत्र. १०३:३. DAMar 223.2

पक्षघाती मनुष्याला बरे केल्याने लोकावर त्याचा जो परिणाम झाला तो म्हणजे जणू काय स्वर्गाचे द्वार उघडे ठेवून अधिक उत्तम जगाचे वैभव प्रगट करण्यात आले. बरे झालेला मनुष्य लोकसमुदायातून जात असताना पावलो पावली देवाला धन्यवाद देत होता. वाहून नेत असलेले ओझे कस्पटाप्रमाणे त्याला हलके वाटत होते. जाण्यास वाट करून देण्यासाठी लोक मागे सरकत होते. सर्वजण थक्क होऊन आश्चर्याने त्याला निरखून पाहात होते आणि आपआपसात हळूच कुजबुजत होते, “आज आम्ही विलक्षण गोष्टी पाहिल्या.” DAMar 223.3

परूशी आश्चर्याने निःशब्द झाले होते व पराजयाने अगदी जेरीस आले होते. आपल्या द्वेषमत्सरामुळे लोकसमुदायाला चेतवून देण्यास त्यांना संधि मिळत नव्हती असे वाटले. देवाच्या कोपाच्या अधीन केलेल्या माणसाच्या जीवनांत संपूर्ण परिवर्तन झाल्याचा लोकावरील परिणाम इतका भारी होता की त्या वेळेला लोकांनी धर्मगुरूंकडे एकदम दुर्लक्ष केले. ख्रिस्ताच्याठायी असलेले सामर्थ्य केवळ देवापासून आहे अशी त्यांनी ग्वाही दिली; तथापि कार्यातील त्याची सभ्यता त्यांच्यापेक्षा वाखाणण्यासारखी होती. ते गोंधळून गेले होते, ओशाळले होते. तेथे वरिष्ठ व्यक्तींची उपस्थिती होती हे त्यांच्या ध्यानात आले होते परंतु कबूल करीत नव्हते. पृथ्वीवर पापक्षमा करण्याचे सामर्थ्य येशूठायी आहे याचा भक्कम पुरावा होता त्याचवेळी त्यांचा अविश्वास अधिक दृढ झाला. पक्षघाती मनुष्याला त्याच्या शब्दाद्वारे बरे केलेल्या ठिकाणापासून म्हणजे पेत्राच्या घरापासून ते निघून गेले आणि देवपुत्राची वाणी एकदाची गप्प करण्याचा त्यांनी कट रचला. DAMar 223.4

कितीही गंभीर दुर्धर शारीरिक रोग असला तर तो ख्रिस्ताच्या सामर्थ्याने बरा झाला; परंतु आलेल्या प्रकाशाकडे ज्यांनी आपले नेत्र बंद करून घेतले त्यांच्या आत्म्याचा आजार भारी बळावला. कुष्ठरोग व पक्षघात यांच्यापेक्षा अश्रद्धा, अविश्वास आणि फाजील धर्माभिमान व हटवादीपणा भारी भयानक आहेत. DAMar 224.1

बरे झालेला पक्षघाती मनुष्य हातात बाज घेऊन स्वगृही परतला तेव्हा त्या कुटुंबात आनंदाचा जल्होष झाला. हर्षाने ते त्याच्याभोवती जमले. त्यांच्या डोळ्यावर त्यांचा विश्वास बसेना. त्याच्यापुढे तो प्रौढावस्थेतील उत्साहाने उभे होता. त्यांनी पाहिलेले लुले, निर्जीव हात DAMar 224.2

आता मनाप्रमाणे काम करीत होते. अर्धांगवायूने शुष्क झालेले शरीर आता टवटवीत व ताजेतवाने दिसत होते. त्याचे चालणे मोकळेपणाचे व जोमाचे होते. त्याच्या तोंडावळ्यावर सर्वत्र आनंद व आशा दृगोचर होत होत्या; आणि क्लेश व पाप यांच्या खुणांच्या जागी शांती व पावित्र्य दिसत होते. त्या गृहातून आभारप्रदर्शनाची वाणी परमेश्वर चरणी सादर करण्यात आली. आशाहीनाला आशा देणाऱ्या व निर्जीवाला शक्ती देणाऱ्या देवपुत्राच्याद्वारे देवाचे गौरव करण्यात आले होते. हा मनुष्य व त्याचे कुटुंब येशूसाठी आपला प्राण देण्यास तयार होते. अंधकाराने भरलेल्या गृहात ज्याने प्रकाश आणिला त्याच्यावरील विश्वास कोणत्याही शंकेने मंदावला नाही व कोणत्याही अश्रद्धेने त्याच्याविषयीची स्वामीनिष्ठा खराब झाली नाही. DAMar 224.3