Go to full page →

अध्याय ३०—“त्याने बारा जणांची नेमणूक केली” DAMar 242

मार्क ३:१३-१९; लूक ६:१२-१६

“मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे पसंत पडले त्यांना त्याने बोलाविले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली; अशासाठी की, त्यांनी आपणाबरोबर असावे व त्यांना उपदेश करावयास पाठवावे.’ DAMar 242.1

गालीली समुद्रापासून थोड्या अंतरावर डोंगरावरील गर्ददाट झाडीच्या निवाऱ्यात बारा जणांची प्रेषित म्हणून नेमणूक केली आणि डोंगरावरील उपदेश देण्यात आला. कुरण, विस्तीर्ण मैदान, डोंगर ही येशूची आवडीची आश्रयस्थाने होती, आणि मंदिराऐवजी बहुतेक त्याचे सर्व प्रबोधन उघड्यावर होत असे. त्याच्या मागे जाणारा समुदाय कोणत्याही मंदिरात किंवा उपासनास्थानात मावला नसता; परंतु ह्याच कारणासाठी शेतात आणि उपवनात शिकविण्याचे येशूने ठरविले नाही. निसर्गातील सौंदर्य येशूला भारी आवडत होते. त्याच्या दृष्टीने अशा निसर्गातील निवांत स्थळ पवित्र मंदिर होते. DAMar 242.2

ह्या पृथ्वीवरील पहिल्या रहिवाशांनी एदेन बागेतील वृक्षाच्या छायेत आपले पवित्र स्थान केले. मानवजातीच्या पित्याशी ख्रिस्त तादात्म्य पावला. नंदनवनातून हकालपट्टी केल्यावरही आमच्या प्रथम मातापित्याने शेतात व उपवनात उपासना केली आणि त्या ठिकाणी ख्रिस्ताने त्यांना कृपेची सुवार्ता सांगितली. मने या ठिकाणी ओक नावाच्या झाडाखाली आब्राहामाबरोबर सायंकाळी इझाकाबरोबर शेतात प्रार्थना करायला गेला असताना; बेथेल येथील टेकड्यावर याकोबाबरोबर; मिद्यानाच्या डोंगराळ प्रदेशात मोशेबरोबर; आणि मेंढरे राखीत असताना दावीदाबरोबर ख्रिस्त बोलला. वर्षातून एकदा परमेश्वराप्रीत्यर्थ उत्सव करण्यासाठी इब्री लोक घर सोडून बाहेर पडत असत व सात दिवस “चांगल्या वृक्षांच्या डाहळ्या, खजुरीच्या झावळ्या, दाट पालविच्या वृक्षांच्या डाहळ्या आणि ओहाळाजवळचे वाळूज” यांच्या तात्पुरत्या झोपड्यापाल करून त्यात राहात होते व असे पंधरा शतके ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे चालले होते. लेवी २३:४०. DAMar 242.3

शहरातील घाईगर्दी व गोंधळ यापासून दूर होऊन आत्मसंयमनाचे धडे शिकण्यासाठी डोंगर व शेतीच्या प्रशांत वातावरणात शिष्यांना घेऊन जाण्याचे येशूने निवडले. निळ्या आकाशाखाली, टेकडीच्या हिरवळीवर किंवा सरोवराच्या किनाऱ्यावर आपल्या सभोवती लोकांनी जमलेले येशूला त्याच्या सेवाकार्यात आवडत होते. स्वःकृतीच्या निसर्गामध्ये असताना तो कृत्रिम गोष्टीपासून निसर्गसिद्ध वस्तूकडे लोकांची मने वळवू शकत होता. निसर्गाचा विस्तार व वाढ यांच्याद्वारे त्याच्या राज्याची मूलतत्त्वे प्रगट करण्यात आली होती. लोक जसे डोंगराकडे आपली दृष्टी लावतील आणि देवाच्या अद्भुत हस्तकृतीचे आवलोकन करतील तसे त्यांना दिव्य सत्याचे महत्त्वाचे पाठ-धडे मिळू शकतील. निसर्गातील वस्तूमध्ये ख्रिस्ताची शिकवण पुन्हा ऐकविण्यात येईल. अंतर्यामात ख्रिस्तध्यान घेऊन शेतात जाणाऱ्यांची कथा तीच आहे.त्यांच्या सभोवती पवित्र वातावरण असल्याचे त्यांना वाटेल. निसर्गातील वस्तू प्रभूचे दाखले घेऊन त्याचा सल्ला पुन्हा प्रतिपादितात. निसर्गाद्वारे देवाशी सरव्यसंबंध ठेवल्यास मानसिक उन्नति होते आणि अंतःकरणाला शांती लाभते. DAMar 243.1

ख्रिस्त गेल्यानंतर मंडळीची स्थापना करण्यातील पहिले पाऊल म्हणजे या पृथ्वीवर त्याचे प्रतिनिधीत्व करणे होय. त्याच्याजवळ भारी किमतीचे उपासना मंदिर नव्हते. कारण उद्धारकाने आपल्या शिष्यांना आपल्या आवडीच्या निवांत आश्रयस्थळी नेले होते आणि त्या दिवशी त्यांना आलेला पवित्र अनुभव डोंगर, दरी आणि समुद्र यांच्या सौंदर्याशी निरंतरचा जोडलेला होता. DAMar 243.2

येशूने आपल्या शिष्यांना बोलाविलेले होते अशासाठी की त्याने त्यांना साक्षीदार म्हणून पाठवावे व त्यांनी जे ऐकले व पाहिले ते जगापुढे घोषीत करावे. त्यांची जबाबदारी फार महत्त्वाची असून ती केवळ ख्रिस्ताच्या खालोखाल होती. जगाचा उद्धार करण्यासाठी ते देवाचे सहकामदार होणार होते. जुना करारातल्याप्रमाणे जसे बारा मूळ पुरुष इस्राएलाचे प्रतिनिधी होते तसेच बारा प्रेषित मंडळीच्या सुवार्ता कार्यात प्रतिनिधीत्व करणार होते. DAMar 243.3

त्याने निवडलेल्या माणसांचा स्वभाव उद्धारकाला माहीत होता; त्यांची दुर्बलता व त्यांचे प्रमाद त्याच्यासमोर उघडे होते; त्यांना कोणत्या अनर्थाला तोंड द्यावे लागणार आणि त्याची जबाबदारी त्यांच्यावर पडणार हेही त्याला माहीत होते आणि त्यांच्याबद्दल त्याचे अंतःकरण तळमळत होते. गालीली समुद्राजवळील डोंगरावर त्यांच्यासाठी त्याने रात्रभर प्रार्थना केली. त्याच समयी त्याचे प्रेषित डोंगराच्या पायथ्याशी झोपलेले होते. सकाळी पहाटेसच, सूर्योदय होण्याच्या वेळी त्याने त्यांना भेटण्यास बोलाविले; कारण काही महत्त्वाचे त्यांना सांगायचे होते. DAMar 243.4

काही दिवस ख्रिस्ताबरोबर हे शिष्य कामात गुंतलेले होते. इतर शिष्यापेक्षा योहान आणि याकोब, आंद्रिया व पेत्र, फिलिप्प, नथानियल व मत्तय हे येशूच्या अधिक सलगीचे होते, आणि त्याचे बहुत चमत्कार त्यांनी जवळून पाहिले होते. पेत्र, याकोब आणि योहान यांचा त्यांच्याहीपेक्षा अधिक सलोखा होता. त्याचे चमत्कार पाहात व त्याने उद्गारलेले शब्द ऐकण्यासाठी सतत ते त्याच्याबरोबर होते. त्यांच्यात योहान जीवश्च कंठश्च होता म्हणून त्याच्यावर येशूची फार प्रीती होती असे त्याला ओळखण्यात आले. उद्धारक सर्वावर प्रेम करीत होता परंतु योहान ग्रहणशील होता. तो सर्वात लहान असून लहान बाळाप्रमाणे निष्ठा ठेवून त्याने आपले अंतःकरण ख्रिस्तासमोर मोकळे केले होते. अशा प्रकारे त्याला ख्रिस्ताची सहानुभूती अधिक लाभली आणि त्याच्याद्वारे उद्धारकाची आध्यात्मिक प्रवचने त्याच्या लोकांना विदित करण्यात आली. DAMar 243.5

प्रेषितांच्या टोळीतील एका टोळीचा पुढारी फिलिप्प होता. “माझ्या मागे ये’ येशूने अशी आज्ञा दिलेला हा पहिलाच शिष्य होता. पेत्र व आंद्रिया ज्या शहरातले होते त्या बेथसैदा शहरातला फिलिप्प होता. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा संदेश त्याने ऐकला होता तसेच ख्रिस्त हा देवाच्या कोकरा आहे ही त्याची घोषणाही त्याने ऐकली होती. फिलिप्प मनापासूनचा सत्य शोधक होता, परंतु विश्वास ठेवण्यास तो थोडासा मंद होता. ख्रिस्ताला जरी तो सामील झाला होता तरी नथानेल जवळ ख्रिस्ताविषयी काढलेल्या उद्गारावरून येशूच्या देवत्वाविषयी त्याची पूर्ण खात्री नसलेला दिसला. तो देवपुत्र आहे अशी स्वर्गातून वाणी झाली होती परंतु फिलिप्पाला वाटले होते की “तो योसेफाचा मुलगा येशू नासरेथकर आहे.” योहान १:४५. पुन्हा पाच हजारांना जेवण दिले तेव्हा फिलिप्पाचा अल्प विश्वास दिसून आला होता. त्याची कसोटी घेण्याकरिता येशूने विचारिले “ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या?” फिलिप्पाचे उत्तर अविश्वासाचे होते: “ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत.” योहान ६:५, ७. येशूला दुःख झाले. फिलिप्पाने त्याचे काम पाहिले होते आणि त्याचे सामर्थ्य अनुभवले होते तरी त्याच्यावर विश्वास नव्हता. ग्रीक लोक येशूविषयी फिलिप्पाजवळ विचारणा करीत असतांना उद्धारकाची ओळख करून देण्याची संधि साधून घेतली नाही, परंतु आंद्रियाला सांगण्यास तो गेला. वधस्तंभाच्या अगोदर शेवटच्या तासातील फिलिप्पाचे शब्द निराशेचे होते. थोमाने येशूला म्हटले, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास ठाऊक नाही; मग मार्ग आम्हास कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे... मी कोण आहे हे तुम्ही ओळखिले असते तर माझ्या पित्यालाही ओळखिले असते.” फिलिप्पाने अविश्वास व्यक्त केलाः “प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे.” योहान १४:५-८. येशूबरोबर तीन वर्षे राहिलेला हा शिष्य अंतःकरणाचा मंद आणि विश्वासात दुबळा होता. DAMar 244.1

फिलिप्पाच्या अविश्वासाच्या तुलनेत नथनेलचा लहान बालकासारखा विश्वास मनाला उल्हास देणारा होता. त्याचा स्वभाव कडक शिस्तीचा, मनापासूनचा होता, अदृश्य वास्तवतेवर निष्ठा व्यक्त करणारा होता. तथापि फिलिप्प ख्रिस्ताच्या शाळेत विद्यार्थी होता आणि त्याचा मंदपणा आणि अश्रद्धा दिव्य शिक्षकाने सहन केला होता. परंतु जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव शिष्यावर झाला तेव्हा दिव्य धोरणाप्रमाणे फिलिप्प शिक्षक बनला. कोणत्या बाबतीत कशाविषयी तो बोलला ते त्याला माहीत होते, आणि खात्रीपूर्वक त्याने शिकविले व त्याचा विश्वसनीय परिणाम श्रोतेजनावर झाला. DAMar 244.2

शिष्यांची नेमणूक करण्यासाठी येशू त्यांची तयारी करीत असताना, पाचारण न झालेला एकजण त्यांच्यामध्ये स्वतःच घुसला. तो यहूदा इस्कार्योत होता. तो ख्रिस्ताचा अनुयायी असे स्वतःला समजत होता. शिष्यांच्या अंतस्थ मंडळीमध्ये स्थान पटकावण्यासाठी तो पुढे सरसावला. कळकळीने व संभाव्य मनापासून त्याने प्रतिपादिले, “गुरूजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” येशूने त्याला झिडकारले नाही आणि त्याचे स्वागतही केले नाही, परंतु शोकग्रस्त शब्द उद्गारले: “खोकडास बिळे व आकाशातील पाखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्रास डोके टेकावयास ठिकाण नाही.” मत्तय ८:१९, २०. येशू मशीहा आहे असा यहूदाचा विश्वास होता; आणि प्रेषितामध्ये सामील झाल्याने नवीन राज्यात त्याला मानाची उच्च जागा मिळविण्याची त्याची इच्छा होती. आपल्या दारिद्राविषयीच्या विधानाने येशूने त्याची ती इच्छा खोडून टाकिली. DAMar 245.1

यहूदाने त्यांच्यामध्ये सामील व्हावे अशी शिष्यांची उत्कट इच्छा होती. त्याचा चेहरा छाप पाडणारा होता, तो तीक्ष्ण विवेक दृष्टीचा आणि कायद्याची अंमलबजावणी करणारा होता. तो त्यांच्या कामात चांगले सहाय्य करील म्हणून त्यांनी येशूजवळ त्याची शिफारस केली. परंतु येशूने त्याला अधिक महत्त्व दिले नाही म्हणून त्यांना आचंबा वाटला. DAMar 245.2

इस्राएलमधील पुढाऱ्यांचे सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न येशूने केला नाही म्हणून शिष्यांची फार निराशा झाली होती. ह्या प्रतिष्ठीत, वजनदार माणसांचे सहकार्य मिळवून आपले काम भक्कम करून न घेण्यामध्ये फार मोठी चुकी झाली असे त्यांना वाटले. यहूदाला बाजूला टाकल्याबद्दल आपल्या प्रभूच्या शहाणपणाबद्दल त्यांच्या मनात संदेह निर्माण झाला असेल. यहूदाच्या जीवनाचा पुढील इतिहास समजल्यावर त्यांना समजून येईल की देवाचे कार्य करणाऱ्या लोकांची गुणवता जगिक शिफारशीवरून घेण्यात मोठा धोका आहे. अशा लोकांचे सहकार्य घेण्यास शिष्य अति उत्सुक होते परंतु त्याद्वारे कार्य कट्टर शत्रूच्या हातात पडले असते. DAMar 245.3

यहूदा शिष्यांमध्ये सामील झाला त्यावेळी तो ख्रिस्त स्वभावाच्या सौंदर्याविषयी अजाण नव्हता. दिव्य सामर्थ्याच्या प्रभावामुळे लोक उद्धारकाकडे आकृष्ट होत आहेत असे त्याला वाटले. चेपलेला बोरू मोडण्यासाठी नाही व मिणमिणीत वात विझविण्यासाठी नाही असा जो आलेला होता तो ज्याच्या मनामध्ये प्रकाशाकडे जाण्याची थोडीशीही इच्छा असली तर तो त्याला झिडकारून टाकणार नाही. उद्धारकाने यहूदाचे मन ओळखले. कृपेने त्याची मुक्ती झाली नाही तर यहूदा पापगर्तेत किती खोल जाईल हेही त्याला माहीत होते. ह्या मनुष्याला स्वतःच्या संबंधात आणून त्याच्या दररोजच्या प्रेममय त्यागी जीवनाचा संपर्क होऊ दिला. जर त्याने आपले अंतःकरण ख्रिस्तासमोर खुले केले असते तर दिव्य अनुग्रहाने त्याच्यातील स्वार्थरूपी राक्षसाची हकालपट्टी केली असती आणि यहूदासुद्धा देवराज्याचा रहिवाशी बनला असता. DAMar 245.4

देव त्यांच्या स्वभावदोषासहित माणसांना घेतो आणि त्यांच्या शिस्त पालनाद्वारे त्यांना शिक्षण देऊन त्याच्या सेवाकार्यासाठी त्यांची तयारी करितो. ते पूर्ण आहेत म्हणून त्याची निवड करण्यात येत नाही. ते अपूर्ण असूनसुद्धा सत्याचे ज्ञान व त्याचे पालन याद्वारे आणि ख्रिस्तकृपेने त्यांचे रूपांतर त्याच्या प्रतिमेत होऊ शकते. DAMar 246.1

इतर शिष्यासारखीच यहूदाला सुसंधि होती. महत्त्वाचे सारखेच धडे त्याच्या कानावर पडत होते. परंतु ख्रिस्ताची सत्यपालनाची अपेक्षा यहूदाची मनीषा व हेतू यापेक्षा वेगळी होती; आणि स्वर्गीय ज्ञानार्जनासाठी आपल्या कल्पना सोडण्यास तो तयार नव्हता. DAMar 246.2

स्वतःचा विश्वासघात करणाऱ्याबरोबर उद्धारक किती मायाळूपणे वागला! आपल्या शिकवणीत येशूने दानशीलपणाचे तत्त्व यावर विवेचन केले आणि लोभवृत्तीच्या मूळावरच घाव घातला. त्याने यहूदासमोर अधाशीपणाची घोर लक्षणे सादर केली आणि अनेक वेळा त्याला त्याचे चित्र रेखाटून त्याचे पाप दर्शविले असे समजून आले होते; परंतु ते कबूल करून तो अधर्म सोडू शकला नाही. तो स्वयंपूर्ण, स्वावलंबी होता, आणि मोहाचा प्रतिकार करण्याऐवजी स्वतःच्या फसव्या संवयीना तो चिकटून राहिला. दिव्य मध्यस्थी व सेवाकार्य यांचा फायदा घेतला असता तर त्याच्या समोर असलेल्या ख्रिस्ताच्या जीवंत उदाहरणाने तो पाहिजे तो बनला असता; परंतु यहूदाच्या कानावर पडलेले सर्व धडे दुर्लक्षिले गेले. DAMar 246.3

त्याच्या लोभाबद्दल येशूने त्याला कठोर ताडन केले नाही, परंतु दैवी सहनशीलता दाखविली, त्याच वेळी त्याचे अंतःकरण उघड्या पुस्तकाप्रमाणे वाचले याचा पुरावा त्याने त्याला दिला. सात्विक गोष्टी केल्याने उत्तेजनपर मिळणाऱ्या उत्कृष्ट गोष्टी त्याच्यापुढे सादर केल्या; आणि स्वर्गीय प्रकाशाचा प्रतिकार केल्याने यहदाजवळ काही निमित्त राहाणार नव्हते. DAMar 246.4

प्रकाशात चालण्याऐवजी यहूदाने आपल्या उणीवा संग्रही ठेवल्या, अधम इच्छा, खुनशी, सूडबुद्धी, दुःखी व उदास विचार यांची जोपासना केली आणि शेवटी सैतानाने त्याचा पूर्ण ताबा घेतला. यहूदा ख्रिस्ताच्या शत्रूचा प्रतिनिधी बनला. DAMar 246.5

ख्रिस्ताच्या सहवासात येण्याच्या वेळी त्याच्या ठायी जे स्वभाव गुण होते, ते मंडळीला कृपाप्रसाद ठरले असते. ख्रिस्ताचे जू वाहाण्यास तयार झाला असता तर तो प्रेषितामध्ये मुख्य झाला असता; परंतु त्याच्या उणीवा त्याच्या नजरेस आणून दिल्यावर त्याने आपले मन कठीण केले, आणि बंडखोरी व अहंकार यामुळे त्याने स्वतःची स्वार्थी महत्वाकांक्षा निवडली. त्यामुळे तो देवाच्या कार्याला अपात्र ठरला. DAMar 246.6

कार्यासाठी आमंत्रण देते वेळेस सर्व शिष्यांच्या ठायी गंभीर दोष होते. येशूच्या निकट सहवासात आला तेव्हा योहानसुद्धा सौम्य आणि नम्र नव्हता. तो व त्याचा भाऊ यांना “गर्जनेचे पुत्र’ म्हटले होते. येशूच्या सहवासात असताना त्याला थोडासाही अनादर दाखविल्यास त्वेषाने चीड येऊन ते लढाईसाठी तयार होत असे. चिडखोरपणा, सूडबुद्धी, खुनशीपणा, टीका करणे हे सर्व दुर्गुण ह्या प्रीय शिष्यांच्याठायी होते. तो अंहकारी असून देवाच्या राज्यात प्रथम जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगीत होता. परंतु दिवसेंदिवस, त्याच्या जहाल तापट स्वभावाच्या तुलनेत त्याने येशूचा मायाळूपणा व संयम यांचे दर्शन घेतले आणि नम्रता, विनशीलता व सहनशीलता यांचे धडे श्रवण केले. त्याने दैवी परिणामाला, दबावाला आपले अंतःकरण खुले केले आणि त्यानंतर तो देववचनाचा श्रोताच राहिला नाही तर कृती कर्ता बनला. स्वत्व ख्रिस्तामध्ये लुप्तप्राय झाले होते. ख्रिस्ताचे जोखड वाहण्यास व ओझे सहन करण्यास तो शिकला. DAMar 247.1

येशूने आपल्या शिष्यांना दोष दिला, समज दिली आणि संभाव्य संकटाचा इशारा दिला; परंतु योहान व त्याचे भाऊ यांनी त्याला सोडले नाही; जरी त्यांना तंबी देण्यात आली होती तरी त्यांनी येशूचीच निवड केली. त्यांच्या चुका आणि त्यांची दुर्बलता पाहून येशूने त्यांच्यापासून काढता पाय घेतला नाही. त्याच्या कसोटीचे भागीदार होण्यास व त्याच्या जीवनापासून धडे शिकण्यास शेवटपर्यंत ते त्याच्याबरोबर राहिले. येशूला निरखून पाहिल्याने त्यांच्या स्वभावाचे परिवर्तन झाले. DAMar 247.2

स्वभाव व संवयी या बाबतीत प्रेषित परस्परापासून फार भिन्न होते. त्यांच्यात जकातदार लेवी-मत्तय, तापट स्वभावाचा आवेशी आणि रोमी सत्तेचा कटर द्वेष्टा शिमोन; थोर मनाचा, भावनाविवश पेत्र आणि क्षुद्र वृत्तीचा यहूदा; इमानदार परंतु भित्रा व लाजाळू थोमा; अंतःकरणाचा मंद व संशयी वृत्तीचा फिलिप्प; महत्त्वाकांक्षी व स्पष्टवक्ते जब्दीचे पुत्र आणि त्यांचे सोबती असे होते. भिन्न उणीवा असलेल्या ह्या सर्वांना एकत्र आणलेले होते, सर्वांचा झोक, अनुवंशिक आणि संपादित, दुष्टाईकडे झुकलेला होता; परंतु ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताद्वारे त्यांना देवाच्या कुटुंबात राहायाचे होते, आणि विश्वास, मूलतत्त्व व भाव यांच्यात ऐक्य साधण्यास त्यांना शिकायचे होते. त्यांना त्यांच्या कसोटीला व संकटाला तोंड द्यावे लागले असते, त्यांच्यात मतभेदाची शक्यता होती परंतु अंतःकरणात ख्रिस्त वस्ती करीत असल्यामुळे त्यांच्यात कलह फाटाफूट नव्हती. त्याचे प्रेम त्यांना इतरावर प्रेम करण्यास प्रेरित करीत होते. प्रभूने शिकविलेल्या पाठामुळे सर्व मतभेद नाहीसे होऊन ऐक्य प्रस्थापित झाले असते आणि सर्व शिष्य एकाच विचाराचे व मनाचे बनले असते. ख्रिस्त केंद्रबिंदू होता आणि ज्या प्रमाणात त्यांचा केंद्राशी संबंध होता त्या प्रमाणात ते परस्पराशी संबंध ठेवू शकत होते. DAMar 247.3

शिष्यांना शिक्षण देण्याचे संपल्यावर त्या लहानशा टोळीला त्याने आपल्या जवळ घेतले आणि त्यांच्यामध्ये गुडघे टेकून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून पवित्र कार्याला त्यांना वाहून देऊन समर्पणाची प्रार्थना केली. अशा प्रकारे प्रभूच्या शिष्यांची सुवार्ता सेवेसाठी दीक्षा झाली. DAMar 248.1

लोकांमध्ये त्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी ख्रिस्ताने अपतित दिव्यदूतांची निवड केली नाही परंतु मानवाची निवड केली. कारण सारख्याच विचारांच्या आणि भावनेच्या लोकांमध्ये हे उद्धाराचे काम करणार होते. मानवतेचा संसर्ग साधण्यासाठी ख्रिस्ताने मानवता परिधान केली. देवत्वाला मानवतेची आवश्यकता होती; कारण जगात मुक्ती, तारण आणण्यासाठी देव व मानव या दोहोंची जरूरी होती. देव व मानव यांच्यामधील संधान-दुवा साधण्यासाठी देवत्वाला मानवतेची गरज होती. तीच गोष्ट ख्रिस्ताचे दास आणि संदेशवाहक यांची आहे. देवाच्या प्रतिमेप्रमाणे प्रस्थापित होण्यासाठी आणि देवाचे कार्य करण्यासाठी मनुष्याला बाह्य सामर्थ्याची गरज आहे; त्याचा अर्थ मानवी साधन अनावश्यक आहे असा होत नाही. मानवता संपूर्णतः दैवी शक्तीवर अवलंबून राहाते, विश्वासाने ख्रिस्त अंतःकरणात वसती करितो; आणि दैवी सहकार्याने मानवाचे सामर्थ्य सात्विकतेसाठी कार्यक्षम होते. DAMar 248.2

गालीली प्रांतातील कोळ्यांना ज्याने पाचारण केले तोच आज त्याच्या सेवाकार्यासाठी बोलावीत आहे. पहिल्या शिष्यांच्याद्वारे जे सामर्थ्य त्याने प्रगट केले तेच सामर्थ्य आमच्याद्वारे प्रगट करण्यास तो राजी आहे. आम्ही कितीही अपूर्ण व पापी असलो तरी प्रभु आम्हाला त्याचा भागीदार करण्यास, ख्रिस्ताचा उमेदवार करण्यास तयार आहे. दैवी शिक्षण घेण्यास तो आम्हास आमंत्रण देत आहे, त्यामुळे ख्रिस्ताशी संलग्न होऊन आम्ही देवाचे कार्य करू. DAMar 248.3

“ही आमची संपत्ति मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.” २ करिथ ४:७. ह्यामुळेच सुवार्ताप्रसाराचे काम देवदूतांच्या ऐवजी चुका करणाऱ्या मनुष्यावर सोपविले होते. मानवाच्या दुर्बलतेमध्ये कार्य करणारे सामर्थ्य देवाचे आहे असे दर्शविले आहे. म्हणून आमच्यासारखे दुर्बल असणाऱ्यांना ज्या सामर्थ्याचे साहाय्य लाभते ते आम्हालाही लाभते असा विश्वास ठेवण्यास उत्तेजन येते. “जे स्वतः दुर्बलतेने वेष्टिलेले आहेत ते अज्ञानी व बहकलेले ह्यांच्याबरोबर सौम्यतेने वागू शकतील.” इब्री ५:२. धोक्यात, संकटात पडल्यामुळे मार्गावरील अडचणी व धोके परिचीत होतात म्हणूनच त्यांना सारख्याच अडचणीत पडलेल्यांना बाहेर काढण्यास आमंत्रण देण्यात येते. पुष्कळजण संशयाने गोंधळून गेले आहेत, नैतिक दुर्बलतेने घायाळ झाले आहेत, विश्वासात कमजोर झाले आहेत आणि अदृश्य सामर्थ्य ग्रहण करण्यास असमर्थ ठरले आहेत; परंतु ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांच्याकडे येणारा त्यांना एक मित्र दिसतो आणि तो त्यांचा ख्रिस्तावरील विश्वास भक्कम करण्यास, संबंध जोडण्यास दुवा ठरू शकतो. DAMar 248.4

जगासमोर येशूला सादर करण्यासाठी आम्ही दिव्यदूताबरोबर सहकामगार म्हणून काम केले पाहिजे. देवदूत आमच्या सहकार्याची उत्सुकतेने वाट पाहातात; कारण मनुष्याने मनुष्याशी दळणवळण केले पाहिजे. जेव्हा आम्ही मनापासून भक्तीभावाने ख्रिस्ताला वाहून देतो तेव्हा दूत उल्हासीत होतात कारण आमच्या वाणीद्वारे ते देवाचे प्रेम प्रगट करू शकतात. DAMar 249.1