Go to full page →

अध्याय ४३—प्रतिबंध निकामी झाले DAMar 345

मत्तय १५:२१-२८; मार्क ७:२४-३६.

परूश्यांच्याबरोबर सामना झाल्यावर येशू कपर्णहूम सोडून गालीली प्रांत ओलांडून फुनीकीच्या सरहद्दीवरील डोंगराळ प्रदेशांत गेला. तेथून पश्चिमेच्या बाजूला पाहिल्यावर खाली पठारावर सोर व सीदोन शहरात मंदिरे, भव्य राजवाडे, व्यापारांची पेठ आणि मालवाह जहाजांनी भरलेली बंदरे दिसत होती. त्याच्या पलीकडे विस्तारलेला भूमध्य समुद्र होता. तेथे जगातील महान साम्राज्यात स्वार्ता प्रसारक आनंदाचा संदेश देणार होते. परंतु वेळ अजून आली नव्हती. ह्या सेवाकार्यासाठी आपल्या शिष्यांना सज्ज करण्याचे मोठे कार्य त्याच्यासमोर आता होते. बेथसैदा या ठिकाणी त्याला विसावा घेता आला नाही म्हणून येथे विसावा घेण्यास तो आला होता. तथापि केवळ त्याच कारणासाठी त्याने ही सफर केली नव्हती. DAMar 345.1

“आणि पाहा, त्या प्रांतातून एक केनानी बायको येऊन मोठ्याने म्हणाली, प्रभु, दावीदाच्या पुत्रा, मजवर दया कर. माझी कन्या भूताने फार पीडलेली आहे.’ मत्तय १५:२२. ह्या जील्ह्यातील लोक केनानी वंशातील होते. ते मूर्तिपूजक असून यहूदी लोक त्यांचा उपहास व मत्सर करीत होते. येशूला भेटण्यास आलेली ही बाई ह्या वर्गातील होती. ती हेल्लेणी असल्यामुळे यहुद्यांना होणाऱ्या आनंदाच्या लाभाला ती पारखी झाली होती. सुरफुनीकीच्या लोकामध्ये पुष्कळ यहूदी लोक राहात होते आणि ख्रिस्ताच्या कार्याच्या सुवार्तेने ह्या भागात शिरकाव केला होता. काही लोकांनी त्याचे वचन ऐकले होते आणि त्याचे अद्भुत कार्यही पाहिले होते. ह्या बाईने ह्या संदेष्ट्याविषयी व त्याच्या रोग बरे करण्याच्या कामाविषयी ऐकिले होते. त्याच्या सामर्थ्याविषयी ऐकल्यावर तिच्या अंतःकरणात आशा जागृत झाली. मातेच्या प्रेमाने प्रेरित होऊन आपल्या मुलीची परिस्थिती त्याला सांगण्याचा तिने निर्धार केला. तिची व्यथा ख्रिस्तापुढे आणण्याचा तिचा दृढ निश्चय होता. तिच्या मुलीला त्याने बरे केलेच पाहिजे. हेल्लेणी लोकांच्या देवाकडून मदत घेण्याचा तिने फार प्रयत्न केला परंतु काही फायदा झाला नव्हता. तिला असेही वाटत होते की हा यहूदी शिक्षक माझ्यासाठी काय करू शकतो? त्याच्याकडे येणारे श्रीमंत असो किंवा गरीब असो त्या सर्वांचे सर्व प्रकारचे आजार तो बरे करितो असा निरोप तिला मिळाला. आलेली संधि गमावयाची नाही असा तिने निग्रह केला. DAMar 345.2

ख्रिस्ताला तिची परिस्थिती माहीत होती. त्याला पाहाण्यास ती फार उत्कंठित होती हे त्याला माहीत होते म्हणून तो तिच्या वाटेवर आला. तिची व्यथा दूर करून त्याला इच्छित धडा शिकवायचा होता. ह्या कारणासाठी त्याने शिष्यांना त्या भागात आणिले होते. इस्राएल लोकांच्या प्रदेशाच्या आसपास असलेल्या शहरात आणि खेड्यापाड्यात असलेले अज्ञान त्यांनी पाहावे अशी त्याची इच्छा होती. सत्यज्ञान प्राप्त करून घेण्याच्या सर्व संधि उपलब्ध असणाऱ्यांनी आसपासच्या लोकांच्या गरजेकडे दुर्लक्ष केले होते. अंधारात असलेल्या लोकांना मदत देण्याचा प्रयत्न केला नव्हता. अहंकारी यहूदी लोकांनी आडभीत उभारली होती, त्यामुळे शिष्यांनासुद्धा हेल्लेणी जगतास सहानुभूती दाखविण्यास प्रतिबंध करण्यास आला होता. परंतु हे प्रतिबंध निकामी केले पाहिजेत. DAMar 346.1

त्या बाईच्या विनंतीला ख्रिस्ताने ताबडतोब उत्तर दिले नव्हते. यहूदी लोकांनी जसे कले असते तसे त्याने ह्या तुच्छ लेखलेल्या जातीकडे पाहिले. यहूदी लोक अशा लोकांना निष्ठूर व उदासीन वागणूक कशी देतात हे शिष्यांच्या मनावर ठसविण्यासाठी त्याने तिला तसे वागविले. तसेच अशा व्यथित लोकांना करुणा दाखवून समाचार घ्यावा हे शिकविण्यासाठी त्याने शेवटी तिची विनवणी मान्य केली. DAMar 346.2

येशूने जरी उत्तर दिले नव्हते तरी त्या बाईची श्रद्धा ढळली नव्हती. ऐकले नसल्यासारखे करून तो पुढे चालला असता ती त्याच्या मागून गेली आणि एकसारखी विनंती करू लागली. तिची आग्रही विनंती तापदायक वाटून तिला पाठवून द्यायला शिष्यांनी सांगितले. त्यांच्या प्रभूने तिला बेपर्वाईने वागविले आणि त्यांना वाटले की सुरफुनीकी लोकाविरूद्ध असलेला यहूद्यांचा दुराग्रह येशूला मान्य होता. परंतु कनवाळु उद्धारकाकडे त्या बाईने विनंती केली होती. शिष्यांनी केलेल्या विनंतीच्या उत्तरार्थ येशूने म्हटले, “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठविले नाही.” हे उत्तर सकृतदर्शनी यहूद्यांच्या दुराग्रहाशी संमत असलेले दिसेल परंतु ते शिष्यांच्या निषेधार्थ असल्याचे सूचवीत होते. त्याचा स्वीकार करणाऱ्या सर्वांच्यासाठी तो जगात आला ह्याचे स्मरण करून दिल्यावर त्यांना त्याचा अर्थबोध झाला. DAMar 346.3

अगदी गयवया करून ती बाई आस्थेने त्याच्या पाया पडून म्हणाली, “मला साहाय्य करा.” अजून तिची विनंती मान्य केली नाही असे वरकरणी दाखवून येशूने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नाही.” खरे पाहाता येथे ठासून सांगण्यात आले आहे की, जे कृपाप्रसाद देवाच्या मर्जीतल्या लोकावर पाठविलेले आहेत त्यांची उधळपट्टी इस्राएलाला जे परके व अपरिचीत आहेत त्यांच्यावर करू नये. ह्या उत्तराने कमी उत्सुक आणि आस्थेवाईक असणाऱ्यांची पूर्णपणे निराशा होईल. परंतु ह्यामध्ये त्या बाईने सुसंधि पाहिली. वरकरणी दिसणाऱ्या येशूच्या नकारामध्ये दृष्टीआड करू न शकणारी त्याची करुणा तिने पाहिली. तिने म्हटले, “खरेच, प्रभुजी; तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात.” घरातील मुले पित्याच्या मेजावर बसून खात असताना, कुत्र्यांनासुद्धा खाण्यास देण्यात येते. मेजावरून पडणारा विपुल चुरा खाण्याचा त्यांचा हक्क आहे. इस्राएल लोकांना अनेक कृपाप्रसादांनी भरून टाकिले आहे त्याचवेळी तिच्यासाठी काही नाही काय? कुत्र्यासारिखे तिच्याकडे पाहिले होते, मग त्याच्या समृद्धीतून तिने कुत्र्याच्या चुऱ्याचा हक्क सांगू नये काय? DAMar 346.4

परूशी आणि शास्त्री त्याचा प्राण घेण्यास पाहात होते म्हणून येशूने आपले काम करण्याचे ठिकाण सोडिले होते. ते कुरकुर करून गाहाणे करीत होते. त्यांनी अश्रद्धा आणि तिरस्कार व्यक्त करून मोकळेपणाने दिलेल्या तारणाचा नाकार केला. आता ख्रिस्त तुच्छ लेखलेल्या आणि दुर्दैवी वंशातील एका व्यक्तीला भेटतो. त्यांना देवाच्या वचनाचा प्रकाश मिळाला नव्हता; तथापि ती ताबडतोब ख्रिस्ताच्या दिव्य प्रभावाला शरण गेली आणि केलेली विनंती मान्य करण्यास तो समर्थ आहे असा विश्वास प्रगट केला. प्रभूच्या मेजावरून पडणाऱ्या चुऱ्यासाठी ती विनंती करिते. कुत्र्याला मिळणारी सवलत (हक्क) तिला जर मिळाली तर कुत्रा होण्यास ती राजी होती. स्वतःच्या मार्गाचा प्रभाव पाडाण्यासाठी तिला राष्ट्रीय किंवा धार्मिक अभिमान नाही आणि ती ताबडतोब येशू उद्धारक असून तिने केलेली विनंती मान्य करण्यास समर्थ असल्याचे मान्य करिते. DAMar 347.1

येशूचे समाधान झाले. त्याच्यावरील तिच्या विश्वासाची कसोटी त्याने केली. तिच्या बरोबरच्या वागणुकीवरून त्याला समजून आले की ती इस्राएलातून जातीभ्रष्ट केलेली नसून ती देवाच्या कुटुंबातील एक कन्या आहे. तिच्याकडे प्रेमाने व दयेने पाहून तो म्हणतो, “बाई, तुझा विश्वास मोठा, तुझा मनोरथ सिद्धीस जावो.” त्याच घटकेस तिची कन्या बरी झाली. भूताने तिला आणखी त्रास दिला नाही. तिची प्रार्थना मान्य केल्याबद्दल आनंद करीत आणि येशूला उद्धारक म्हणून मान्य करून ती बाई निघून गेली. DAMar 347.2

ह्या प्रवासात येशूने केवळ हाच चमत्कार केला. हा चमत्कार करण्यासाठी तो सोर व सीदोन यांच्या सरहद्दीकडे गेला. दुःखाने त्रस्त झालेल्या बाईला मुक्त करण्यासाठी आणि त्याच वेळी तुच्छ लेखलेल्या लोकामध्ये दयेच्या कामाचे उदाहरण त्याच्या अनुपस्थित शिष्यांच्या फायद्यासाठी ठेवण्याची त्याची दाट इच्छा होती. वेचक लोकासाठी काम करण्याची यहूदी लोकांची पद्धत सोडून त्यांनी स्वतःच्या लोकांच्यासाठी व इतरासाठीही काम करावे अशी त्याची इच्छा होती. DAMar 347.3

अनेक कालखंडात दृष्टीआड राहिलेले सत्याचे गहन रहस्य उघड करून सांगण्यास येशू अति उत्सुक होता. ते सत्य म्हणजे हेल्लेणी लोक यहूदी लोकाबरोबर सहवारसदार आणि “ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने अभिवचनाचे वाटेकरी होणे,’ हे होय. इफिस. ३:६. हे सत्य शिकण्यास शिष्य मंद होते आणि दिव्य शिक्षक त्यांना त्याविषयी पाठावर पाठ देत होता. कफर्णहूम येथील सुभेदाराच्या विश्वासाचे फळ, सीकर येथील रहिवाशांना सुवार्तेची घोषणा करणे ह्या उदाहरणावरून यहूदी लोकांची असहिष्णुता त्याने मान्य केली नाही हे दाखविले होते. परंतु शोमरोनीना देवाविषयी थोडे ज्ञान होते; आणि शतपतीने इस्राएलावर दया दाखविली होती. आता येशूने आपल्या शिष्यांना यहूदी नसलेल्या लोकांच्या संबंधात आणिले होते, आणि आपल्या लोकांना सोडून त्यांच्यावर त्याने मेहरेनजर करण्याचे काही कारण नाही असे त्यांना वाटत होते. अशांना कसे वागविले पाहिजे याचे उदाहरण तो देईल. आपल्या कृपेच्या देणग्या तो सढळ हाताने देतो असे शिष्यांना वाटत होते. त्याचे प्रेम एकादा वंश, जात किंवा राष्ट्र यांच्या भोवती मर्यादित ठेविले नव्हते हे तो दाखवीत होता. DAMar 347.4

त्याने जेव्हा म्हटले, “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही.” त्यावेळी त्याने खरे सत्य विदित केले आणि सुरफुनीकी जातीच्या बाईसाठी केलेल्या कामात तो आपले सेवाकार्य पूर्ण करीत होता. ती बाई एक हरवलेले मेंढरू होते आणि इस्राएल लोकांनी तिची सुटका करायला पाहिजे होते. ते त्यांचे नेमून दिलेले काम होते. त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ख्रिस्त ते काम करीत होता. DAMar 348.1

ह्या कृतीने यहूदेतर लोकांमध्ये काम करण्यासाठी शिष्यांची मने अधिक प्रगल्भ झाली. यहूदाच्या बाहेर काम करण्यास अफाट विस्तारलेले क्षेत्र त्यांना दिसले. अधिक मेहेरनजर असलेल्या लोकांना अपरिचित असलेले दुःख हे लोक भोगत असलेले त्यांनी पाहिले. ज्यांचा उपहास व तिरस्कार करण्यास त्यांना शिकविले होते त्यांच्या मध्ये येशूच्या मदतीची अपेक्षा करणारे, सत्य प्रकाशासाठी भूक लागलेले आत्मे होते. हेच आशीर्वाद विपुलतेने यहूद्यांना दिले होते. DAMar 348.2

त्यानंतर जेव्हा शिष्यांनी येशूला जगताचा उद्धारक म्हणून घोषीत केले तेव्हा यहूदी लोक शिष्यांच्यापासून दूर राहिले आणि ख्रिस्ताच्या मृत्यूने यहूदी व इतर विधर्मी यांच्यामधील आडभिंत जेव्हा निकामी करण्यात आली तेव्हा राष्ट्रीयत्व संस्कृती आणि रिवाज यांनी निर्बंधित नसलेल्या सुवार्तेकडे बोट दाखविणारा हा धडा आणि इतर सारखेच धडे, याचा प्रचंड प्रभाव, कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी ख्रिस्ताच्या प्रतिनिधीवर पडला होता. DAMar 348.3

उद्धारकाची फुनीकीला दिलेली भेट आणि तेथे केलेला चमत्कार यांच्यामध्ये विशाल हेतू होता. पीडित बाईसाठीच नाही, आणि शिष्यांच्यासाठी व त्यांच्या कामाचा लाभ झालेल्यांच्यासाठीच हे काम फायद्याचे झाले नाही; परंतु “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे,” योहान २०:३१. हाही त्यातला एक भाग होता. आठराशे वर्षापूर्वी ख्रिस्तापासून लोकांना दूर ठेवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांचा प्रयत्न आजही चालू आहे. ज्या प्रवृतीद्वारे यहूदी आणि परधर्मीय यांच्यामध्ये आडभींत उभारण्यात आली होती ती आजही कार्यक्षम आहे. अंहकार आणि कलुषित मन किंवा दुराग्रह यांच्यामुळे विविध थरातील लोकामध्ये दुजाभाव निर्माण करण्यात आला आहे. ख्रिस्त व त्याचे सेवाकार्य याविषयी गैरसमज निर्माण करण्यात येऊन शुभ संदेशापासून त्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे असे मोठ्या समुदायाला वाटते. परंतु ख्रिस्तापासून त्यांना अटकाव करण्यात आला आहे असे त्यांना वाटू नये. विश्वास जेथे शिरकाव करू शकतो तेथे मनुष्य किंवा सैतान अटकाव उभारू शकत नाही. DAMar 348.4

फुनीकेच्या बाईच्या विश्वासाने यहूदी आणि परदेशी यांच्यामध्ये उभारलेल्या प्रतिबंधाने रचलेला ढीग उधळून टाकिला. ख्रिस्ताचे वचन वरकरणी साशंक वाटत असताना आणि निराशा पुढे दिसत असताना तिने उद्धारकाच्या प्रेमावर दृढ विश्वास दाखविला. आम्ही त्याच्यावर दृढ विश्वास, ठेवावा हीच त्याची अपेक्षा आहे. उद्धाराचा कृपाप्रसाद सर्वांच्यासाठी आहे. ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने त्याच्या वचनाचे सहभागी होण्यास प्रतिबंध केवळ व्यक्तीच्या स्वःनिर्णायामुळे होऊ शकतो. DAMar 349.1

जात, वर्ण देवाला तिरस्कारणीय आहे. अशा प्रकारच्या हरएक गोष्टीकडे तो दुर्लक्ष करितो. त्याच्या दृष्टीने सर्वांचे मोल सारखेच आहे. “त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत; अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासून दूर नाही.’ वय, सामाजिक दर्जा, राष्ट्रीयत्व आणि धर्म यांच्यामध्ये भेदभाव न करता जीवन प्राप्तीसाठी सर्वांना आमंत्रण करण्यात आले आहे. “त्याच्यावर जो विश्वास ठेवितो तो फजित होणार नाही. कारण तेथे भेदभाव नाही.” “यहदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र हा भेदच नाही.” “सधन व निर्धन यांचा एकमेकाशी व्यवहार असतो, त्या सर्वांचा निमार्णकर्ता परमेश्वर आहे.” “कारण सर्वांचा प्रभु तोच आणि जे त्याचा धावा करितात त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.’ प्रेषित. १७:२६, २७; गलती. ३:२८; नीति. २२:२; रोम. १०:११-१३. DAMar 349.2