Go to full page →

अध्याय ६३—“तुझा राजा येत आहे” DAMar 495

मत्तय २१:१-११; मार्क ११:१-१०; लूक १९:२९-४४; योहान १२:१२-१९.

“सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा तुझा राजा तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; तो गाढवावर, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.” जखऱ्या ९:९. DAMar 495.1

ख्रिस्त जन्माच्या पाचशे वर्षे अगोदर इस्राएलाच्या राजाच्या आगमनाविषयी जखऱ्या संदेष्ट्याने भाकीत केले होते. हे भाकीत आता पूर्ण होणार होते. आतापर्यंत हा सन्मान ज्याने नाकारिला होता तो आता दाविदाच्या सिंहासनाचा आश्वासित वारस म्हणून यरुशलेमाला येत होता. DAMar 495.2

आठवड्याच्या पहिल्या दिवशी ख्रिस्ताने जयोत्साहाने यरुशलेमात प्रवेश केला. त्याचे दर्शन घेण्यासाठी बेथानीमध्ये जमलेला मोठा जमाव त्याच्याबरोबर त्याचा स्वागत समारंभ पाहाण्यास आला. पुष्कळ लोक वल्हांडण सण पाळण्यासाठी शहराच्या मार्गावर होते ते त्या जमावात सामील झाले. निसर्ग हर्षाने खुलून गेला होता. वृक्ष हिरव्यागार पानांनी नटलेले होते. त्यांच्या मोहरांचा मधुर सुगंध वातावरणात दरवळत होता. आनंद व नवजीवन लोकांना सचेतन करीत होते, प्रोत्साहन देत होते. नव राज्याची आशा पुन्हा उसळी मारून येत होती. DAMar 495.3

गाढवीवर बसून यरुशलेमात प्रवेश करण्याच्या उद्देशाने येशूने आपल्या दोघा शिष्यांना गाढव व शिंगरू आणण्यास पाठविले. जन्माच्या समयी उद्धारक पाहणचारासाठी, आदरातिथ्यासाठी परक्यावर अवलंबून होता. ज्या गोठ्यात तो होता तो विसाव्यासाठी उसना घेतला होता. डोंगर माथ्यावरील आणि टेकडीच्या उतारावरील हजारो गुरेढोरे त्याच्या मालकीची आहेत आणि राजा म्हणून यरुशलेमात प्रवेश करण्यासाठी वाहून नेण्यासाठी त्याला जनावरासाठी परक्याच्या दयाळूपणावर अवलंबून राहावे लागले. शिष्यांना कामावर पाठवितांना बारीक सारीक सूचना देण्यामध्ये पुन्हा त्याचे देवत्व प्रगट झाले. अगोदरच भाकीत केल्याप्रमाणे “प्रभूला याची गरज आहे’ ही विनंती ताबडतोब मान्य केली. आतापर्यंत केव्हाही मनुष्य शिंगरावर बसला नाही असे शिंगरू आपल्या कामासाठी वापरण्याचा विचार येशूने केला. आनंदी उत्साहाने शिष्यांनी आपली वस्त्रे त्या पशूवर घातली आणि प्रभूला त्यावर बसविले. आतापर्यंत येशू नेहमी पायी चालत असे आणि आता तो शिंगरावर बसणार हे पाहून शिष्यांना प्रथम आश्चर्य वाटले. परंतु तो राजधानी नगरात प्रवेश करून राजा म्हणून घोषित करील आणि राजाच्या सत्तेचे समर्थन करील ह्या हर्षभरित विचाराने त्यांच्या आशा उजाळून निघाल्या. दिलेले काम करण्यास जात असतांना त्यांची उज्वल अपेक्षा येशूच्या मित्रमंडळीना सांगितली आणि ही आनंदाची वार्ता आसमंतात व दूरवर पसरली आणि लोकांच्या अपेक्षा कळसाला पोहंचल्या. DAMar 495.4

राजाच्या प्रवेशाबाबत ख्रिस्त यहूदी लोकांची प्रथा पाळीत होता. इस्राएलातील राजे प्रवेश करण्यासाठी असल्या पशुंचा उपयोग करीत होते, आणि मशिहा आपल्या राज्यात अशा प्रकारे येईल असे भाकीतात सांगितले होते. शिंगराव बसल्याबरोबर विजयोस्तवाच्या मोठ्या गर्जनेने वातावरण दुमदुमले. तो मशिहा, राजा आहे असे लोकसमुदायाने गजर केला. येशूने हा मानाचा सत्कार स्वीकारला. पूर्वी अशा सत्काराला त्याने केव्हाही मान्यता दिली नव्हती. तो राजासनावर बसणार ही शिष्यांच्या मनातली आशा लवकरच मूर्त स्वरूप धारण करणार ह्याचा हा पुरावा आहे असे शिष्यांना वाटले. त्यांच्या मुक्ततेचा क्षण नजीक आला आहे अशी लोकसमुदायाची खात्री झाली होती. त्यांच्या कल्पनेत त्यांनी पाहिले की, यरुशलेमातून रोमी सैन्याला हाकलून लाविले आहे आणि इस्राएल पुन्हा एकदा स्वतंत्र राष्ट्र बनले आहे. सर्वांच्या भावना उद्दिपित झाल्या होत्या, सर्वजण आनंदित होते. त्याचा सत्कार करण्यास लोकामध्ये चुरस निर्माण होऊन स्पर्धा चालली होती. बाह्यात्कारी थाट, डामडौल, शोभा ते दाखवू शकले नाहीत परंतु आनंदी अंतःकरणाने त्यांनी त्याची आराधना केली. मोल्यवान भेट ते त्याला देऊ शकत नव्हते परंतु त्यांनी आपली वस्त्रे आणि जैतूनाच्या व ताडाच्या डहाळ्या तोडून वाटेवर पसरल्या. राजाला शोभेल अशी ते विजयाची मिरवणूक काढू शकले नाहीत परंतु लांब पसरलेल्या डहाळ्या तोडून, निसर्गातील विजयाची खूण हालवीत होते व दावीदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित असा ते गजर करीत होते. DAMar 496.1

जस जसे ते पुढे जाऊ लागले तस तसे जमाव फुगत चालला होता, येशूच्या येण्याविषयी ज्यांनी ऐकिले ते लगबगीने येऊन मिरवणुकीत सामील होत होते. प्रेक्षक एकसारखे जमावात सामील होऊन हा कोण आहे? असा प्रश्न विचारित होते. ही सगळी गडबड कशाची? त्या सगळ्यांनी येशूविषयी ऐकिले होते आणि तो यरुशलेमाला जाणार ह्याची त्यांनी अपेक्षा केली होती. राजासनारूढ होण्यास तो आतापर्यंत नाखूष होता परंतु आता तो आहे हे ऐकून त्या सर्वांना आश्चर्य वाटले. त्याचे राज्य ह्या जगाचे नाही असे म्हणणाऱ्याच्या मनात हा बद्दल कशाने झाला याबद्दल त्यांना कुतूहल वाटले. DAMar 496.2

विजयाच्या गर्जनेमध्ये त्यांच्या प्रश्नांचा आवाज दडपून गेला. उत्सुकतेने भरलेल्या जमावाने पुन्हा पुन्हा त्या प्रश्नाची पुनरावृत्ती केली. दूर असलेल्या लोकांनी आणि टेकड्या व दऱ्याखोऱ्यातून त्याचा प्रतिध्वनी होत होता. यरुशलेम रहिवासी त्या मिरवणुकाला मिळाले. वल्हाडण सण साजरा करण्यासाठी आलेल्या मोठ्या लोकसमुदायातून हजारो लोक येशूचे सुस्वागत करण्यासाठी पुढे सरसावले. हातात डहाळ्या घेऊन हालवीत व पवित्र स्त्रोत्रे गात लोक त्याला भेटत होते. मंदिरामध्ये याजक सायंकाळच्या उपासनेसाठी तुतारी वाजवीत होते परंतु त्याला फार थोडक्यांचा प्रतिसाद मिळाला, आणि अधिकारी धास्तीने आपापसात म्हणत होते “सर्व जग त्याच्यामागून गेले.” DAMar 496.3

पृथ्वीवरील आपल्या आयुष्यात पूर्वी कधी असले प्रत्यक्ष प्रदर्शन करण्यास येशूने परवानगी दिली नव्हती. त्याचा परिणाम त्याने आगाऊ स्पष्ट पाहिला. ते त्याला वधस्तभाकडे नेऊ शकेल. परंतु जाहीरतित्या स्वतःला उद्धारक म्हणून सादर करण्याचा त्याचा उद्देश होता. त्याच्या सेवाकार्यातील कळस म्हणजे त्याचा यज्ञ ह्या घटनेकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याची त्याची इच्छा होती. वल्हांडण सण साजरा करण्यासाठी लोक यरुशलेमांत जमा होत होते तेव्हा त्याने स्वतःला स्वखुषीने अर्पिलेला कोकरा म्हणून राखून ठेविले होते. अखिल जगाच्या पापासाठी पत्करलेले त्याचे मरण त्याच्या मंडळीने सर्व युगामध्ये खोलवर विचाराचा आणि अभ्यासाचा विषय ठरविला पाहिजे. त्याच्याशी संबंधीत असलेल्या प्रत्येक गोष्टीची यथार्थता ताडून पाहिली पाहिजे. सर्वांचे लक्ष त्याच्यावर वेधून घेणे त्यावेळेस आवश्यक होते. महान यज्ञाच्या अगोदर घडणाऱ्या घटनेद्वारे लोकांचे लक्ष यज्ञामध्येच केंद्रित करणे उचित होते. यरुशलेममध्ये प्रवेश करण्याच्या प्रत्यक्ष प्रदर्शनानंतर अखेरच्या दृश्याकडे त्याची होत असलेली जलद प्रगती सर्वांच्या लक्षात येईल. DAMar 497.1

ह्या विजयाच्या मिरवणुकीचा सर्वांच्या मुखातून बोलबाला होत होता आणि त्यामुळे येशूचे नाव सर्वांच्यासमोर उभे राहिले. त्याच्या मरणानंतर त्याची चौकशी व मृत्यू यांच्या संदर्भात अनेकांना ह्या घटनांचे स्मरण होईल. ते भाकितावर संशोधन करतील व येशू मशिहा असल्याची त्यांची खात्री होईल; आणि सर्व देशात बहुसंख्य लोकांचे परिवर्तन झाल्याचे दिसून येईल. DAMar 497.2

त्याच्या आयुष्यातील ह्या विजयी मिरवणुकीच्या एका घटनेत उद्धारकाला स्वर्गीय दुतांनी संरक्षण दिले होते आणि देवाच्या तुतारीने पुकारा केला होता; परंतु असले प्रदर्शन त्याच्या कार्याशी आणि त्याच्या जीवनाचे नियमन करण्याऱ्या नियमाशी विसंगत होते. स्वीकार केलेल्या नम्र लोकाशी तो एकनिष्ठ राहिला. जगासाठी प्राण देईल तोपर्यंत मानवतेचे ओझे त्याला वाहायाचे होते. DAMar 497.3

हा आनंदाचा देखावा त्याच्या व्यथा व मरण यांचा प्रस्तावनावजा प्राथमिक भाग आहे हे जर समजले असते तर त्याच्या आयुष्यातील ह्या विजयदीनाला उदासीनतेच्या अभ्रांनी काळोखी आली असती. आपल्या यज्ञाविषयी त्याने वारंवार उल्लेख केला होता तरी ह्या हर्षाच्या भरात त्याचे दुःखाचे बोल ते विसरून गेले आणि दाविदाच्या सिंहासनावर बसून उरकण्यात येणाऱ्या प्रगतीपर राज्यकारभाराकडे त्यांचे लक्ष लागले. DAMar 497.4

एकसारखी मिरवणूक वाढून भव्य होत होती. काही अपवाद वगळल्यास त्यात सामील झालेले सर्वजन स्फूर्तीने भरून गेले व त्यांच्या होसान्ना गजराचा ध्वनी, प्रतिध्वनी टेकड्या, दऱ्याखोरे यांच्यामध्ये निनादू लागला होता. गर्जना एकसारखी होत होती, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना; परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित! ऊर्ध्वलोकी होसान्ना.” DAMar 498.1

विजयी मिरवणुकीचा असा अपूर्व सोहळा पूर्वी कधी पाहिला नव्हता. पृथ्वीवरील प्रसिद्ध नामांकित विजेत्यासारखा हा नव्हता. धरून आणलेल्या दुःखी कैद्याची रांग हे विजयाचे चिन्ह तेथे नव्हते. परंतु उद्धारकाविषयी म्हटले तर ते पापी मनुष्यासाठी त्याने केलेले प्रेमपूर्ण वैभवी कष्टाचे विजयस्मारक होते. सैतानाच्या कचाट्यातून सोडवलेले ते बंदिवान होते आणि त्यांच्या मुक्तीबद्दल ते देवाची स्तुती करीत होते. दृष्टी मिळालेले अंध पुढे चालले होते. मुक्यांची जीभ मोठमोठ्याने होसान्नाचा गजर करीत होती. लंगडे हरीणाप्रमाणे उड्या मारून आनंद व्यक्त करीत होते आणि झाडांच्या डहाळ्या मोडून उद्धारकापुढे हालविण्यात ते फार उत्साही होते. त्यांना दाखविलेल्या दयेच्या कृतीबद्दल विधवा व पोरके येशूच्या नावाची प्रशंसा करीत होते. शुद्ध केलेल्या कुष्टरोग्यांनी रस्त्यावर निष्कंलक वस्त्रे त्याच्या मार्गावर पसरली आणि वैभवी राजा असा गजर केला. मरणाच्या निद्रेतून जागे झालेले त्यामध्ये होते. कबरेतून वर आलेला लाजारस आता प्रौढ होऊन येशू बसलेल्या शिंगराला धरून तो पुढे चालला होता. DAMar 498.2

पुष्कळ परूश्यांनी हे भव्य दृश्य पाहिले आणि मनातील द्वेषबुद्धी व आकस यांनी ते जळत होते आणि ह्या लोकप्रिय भावना उधळून टाकण्याचा त्यांनी इरादा केला. स्वतःच्या अधिकाराखाली त्यांची तोंडे बंध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु त्यांची धमकी व विनवणी याद्वारे त्यांचा उत्साह अधिकच वाढला. हा मोठा जमाव येशूला राजा बनवतील याची त्यांना धास्ती वाटत होती. शेवटचा उपाय म्हणून गर्दीतून वाट काढून ते येशूजवळ गेले व त्याला दोष देऊन म्हटले: “गुरूजी, आपल्या शिष्यांना दटवा.” असे गोंगाटाचे व गडबडीचे प्रदर्शन बेकायदेशीर आहे आणि अधिकारी ह्याला परवानगी देणार नाही. परंतु येशूच्या उत्तराने ते मुग्ध झाले. त्याने म्हटले, “मी तुम्हास सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.’ विजयश्रीचा तो देखावा देवाने स्वतः नेमलेला होता. त्याविषयी संदेष्ट्याने भाकीत केले होते आणि देवाचा उद्देश हाणून पाडण्यास मनुष्य असमर्थ होता. देवाची योजना पार पाडण्यात मनुष्य अपयशी ठरला असता तर अचेतन निर्जिव धोंड्याना त्याने वाणी दिली असती आणि त्यांनी त्याच्या पुत्राची प्रशंसा करून जयजयकार केला असता. गप्प राहिलेले परूशी मागे हटल्यावर शेकडोंनी जखऱ्याचे शब्द घेऊन गर्जना केलीः “सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा तुझा राजा तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.” DAMar 498.3

मिरवणूक टेकडीच्या माथ्यावर पोहंचली आणि खाली उतरून शहरात प्रवेश करण्याच्या तयारीत होती तोच येशू थांबला आणि त्याच्याबरोबर मोठा जमावही थांबला. त्यांच्यासमोर गौरवाने नटलेले यरुशलेम नगरी होती आणि त्याच्यावर सूर्यास्ताचा प्रकाश पडला होता. मंदिराकडे सर्वांचे लक्ष वेधले. भव्य, उदात्त मंदिर सर्वांपेक्षा उठून दिसत होते आणि जणू काय स्वर्गातील सत्य व जिवंत देवाकडचा मार्ग लोकांना दाखवीत होते. मंदिर फार काळापासून यहूदी राष्ट्राचे भूषण होते. त्याच्या शोभेमध्ये, भव्यतेमध्ये रोमी लोकांनीसुद्धा अभिमान बाळगिला होता. रोमी साम्राज्याने नेमलेला राजा यहूदी लोकाबरोबर मंदिर पुन्हा बांधून सुशोभित करण्यात सामील झाला आणि रोमच्या बादशाहाने त्याच्या देणग्यांनी ते संपन्न केले. त्याचा मजबूतपणा, संपन्नता आणि भव्यता यामुळे ते जगातील एक आश्चर्य झाले होते. DAMar 499.1

पश्चिमेकडे कललेल्या सूर्याने आकाशात रंगाच्या छटा व सोनेरी मुलामा दिसत होता त्याचवेळी त्याच्या तेजस्वी वैभवाच्या प्रकाशाने मंदिराच्या भीतीवरील शुभ्र संगमरवरी दगड प्रकाशत होते आणि सोनेरी पत्र्याने मढविलेले स्तंभ चमकत होते. जेथे येशू आणि त्याचे अनुयायी उभे होते त्या टेकडीच्या माथ्यावरून ते बर्फाच्या भरीव इमारतीसारखे आणि त्याच्यावर सोनेरी कळस ठेवल्यासारखे दिसत होते. मंदिराच्या प्रवेशद्वारात सोन्या चांदीची द्राक्षांची वेल होती आणि त्यावर हिरवीगार पाने आणि द्राक्षांचे मोठे घड निष्णात कलाकाराने काढिलेले होते. त्या आराखड्यात द्राक्षवेलीप्रमाणे इस्राएल लोक संपन्न असल्याचे दाखविले होते. सोने, चांदी आणि हुबेहुब हिरवारंग यांची दुर्लभ रुचि आणि सर्वोत्कृष्ट कसब यांचा संयोग झाला होता. शुभ्र सफेत स्तंभाभोवती वळसे देत आणि सोनेरी चकाकणाऱ्या अलंकराला तंतूने चिकटून राहिल्याने सूर्यास्त सौंदर्याची छटा त्यावर पडली आणि जणू काय स्वर्गातून वैभव लाभल्याप्रमाणे ते चमकू लागले. DAMar 499.2

येशू हा देखावा टक लावून पाहातो, आणि आकस्मिक सौंदर्याच्या दृश्याने मोठा जमाव गर्जना करण्याचे सोडून शांत होतो. सर्व लक्ष उद्धारकाकडे लागते. त्याच्या मुद्रेमध्ये त्यांना वाटणारे नवल ते पाहाण्याची अपेक्षा करितात. परंतु त्याऐवजी दुःखाचे ढग त्यांना दिसतात. त्याच्या डोळ्यांत भरलेले अश्रु, त्याचे शरीर वादळाने हालणाऱ्या झाडासारखे पुढे मागे हालत होते, जणू काय भग्न झालेल्या अंतःकरणामुळे थरथर कापणाऱ्या ओठातून प्राणांतिक दुःखाचा विलाप तो करीत होता, हे सर्व पाहून त्यांना आश्चर्य वाटले व निराशा झाली. देवदूतांना पाहाण्यासाठी काय हे दृश्य होते! त्यांचा प्रिय सेनापती दुःखाने व्याकूळ होऊन अश्रु ढाळीत होता! तो लवकरच राज्यपद स्वीकारील म्हणून विजयोत्सवाने गर्जना करीत आणि वृक्षाच्या डाहाळ्या आनंद व्यक्त करणाऱ्या मोठ्या समुदायाना पाहाण्यास मिळणारे काय हे दृश्य! तो लवकरच राजपदावर विराजमान होणार असे त्यांना वाटत होते. लाजारसाच्या कबरेवर येशू रडला, परंतु ते रडणे मानवी दुःखाला सहानुभूती दाखविणारे दैवी दुःख होते. हर्षभरित दृश्यात, सर्वजण त्याचा सत्कार करीत असताना इस्राएलाचा राजा अश्रु ढाळीत होता; ते आनंदाश्रु नव्हते तर दाबून न टाकता येणाऱ्या दुःखाचे ते कण्हणे व विव्हळणे यातून बाहेर पडलेले ते अश्रु होते. अचानक दुःखाची छटा समुदायावर पसरली. त्यांचा गजर व गर्जना शांत झाल्या. त्यांना समजून न आलेल्या दुःखाला सहानुभूती दाखवून पुष्कळांनी विलाप केला. DAMar 499.3

येशूच्या डोळ्यात आलेले अश्रुत्याच्या स्वतःच्या दुःख वेदनामुळे आले नव्हते. गेथशेमानी बागेतील भयानक अंधारी छाया त्याच्यासमोर उभी ठाकली होती. ज्या वेशीतून यज्ञासाठी पशू हजारो वर्षे नेण्यात आले होते ती मेंढाराची वेशी समोरच होती. जगाच्या पापासाठी ज्या महान यज्ञाचे दर्शक म्हणून हे विधी पाळण्यात येत होते त्याच्यासाठी ही वेश उघडी राहाणार होती. जवळच कॅलव्हरी होती, ते त्याच्या अति दुःखाचे दृश्य होते. ह्या येणाऱ्या दुःखद मरणाच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात अश्रु भरले नव्हते. त्याचे दुःख स्वार्थी नव्हते. स्वतःच्या दुःख यातनेच्या विचाराने स्वार्थत्यागी व उमद्या स्वभावाच्या आत्म्याला धास्ती वाटत नव्हती. यरुशलेमाच्या दृश्याने येशूचे अंतःकरण भोसकले गेले होते. यरुशलेमाने देवपुत्राचा त्याग केला होता, त्याच्या प्रेमाचा उपहास केला, चमत्काराने खात्री करून घेण्यास नकार दिला आणि आता त्याचा प्राण घेण्याच्या तयारीत ते होते. उद्धारकाचा त्याग केल्यामुळे स्वतःवर ओढवलेला अपराध त्याने पाहिला आणि त्याचा स्वीकार केला असता तर काय घडले असते हेही त्याने पाहिले कारण केवळ तोच एकटा त्यांचे दुःखणे बरे करू शकत होता. त्यांचा उद्धार करण्यासाठी तो आला होता मग तसेच त्यांना तो कसे सोडील? DAMar 500.1

इस्राएल देवाचे निवडलेले लोक होते. त्यांचे मंदिर देवाने स्वतःचे निवासस्थान बनविले होते. “ते उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे.” स्तोत्र. ४८:२. पिता पुत्राची जशी काळजी घेतो तसे हजारो वर्ष ख्रिस्ताने घेतलेल्या काळजीची व प्रेमाची नोंद तेथे होती. मंदिरामध्ये संदेष्ट्यांनी गंभीर इशारे दिले होते. धुपारतीमध्ये धूप जळत होता आणि भक्तांच्या प्रार्थनेत धूपगंध मिसळून तो देवाकडे वर जात होता. ख्रिस्त रुधिराचे दर्शक म्हणून तेथे पशुंचे रक्त वाहात होते. दयासनावर यहोवाने आपले गौरव प्रगट केले होते. याजक आपले याज्ञिकेचे कार्य करीत होते आणि वर्षानुवर्ष तेथे मोठ्या थाटामाटाचे चिन्ह व विधि चालले होते. परंतु ह्या सर्वांचा एकदा शेवट झाला पाहिजे. DAMar 500.2

येशूने वारंवार हात वर करून आजाऱ्यांना व पिडीतांना आशीर्वाद दिला. परंतु या वेळेस अगदी कष्टी होऊन दुःखीत अंतःकरणाने नाशवंत शहराकडे हात करून येशू उद्गारलाः “जर तू, होय तूच, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते!” येथे येशू थांबला आणि देव देत असलेली मदत स्वीकारली असती तर यरुशलेमाची परिस्थिति काय झाली असती हे बोलण्याचे त्याने सोडून दिले होते - तो त्यांना स्वतःच्या पुत्राची देणगी देणार होता. यरुशलेमाने आवश्यक ते ज्ञान संपादन केले असते आणि स्वर्गाने दिलेला प्रकाश स्वीकारला असता तर त्याचा उत्कर्ष व समृद्धि राहिली असती, राज्यांच्यामध्ये श्रेष्ठ राणी व देवाने दिलेल्या सामर्थ्यामध्ये ते स्वतंत्र राहिले असते. त्याच्या वेशीत लष्करी सैनिक उभे राहिले नसते आणि त्याच्या तटावरून रोमी ध्वज फडकला नसता. त्याने देवपुत्र उद्दारकाचा स्वीकार केला असता तर यरुशलेमाचे भवितव्य वैभवशाली झाले असते. त्याच्याद्वारे त्याचे भयंकर त्रास, दुःखणे बरे झाले असते, बंदीतून मुक्त होऊन ते पृथ्वीवर मुख्य शहर म्हणून स्थापीत झाले असते. त्याच्या तटावरून शांतीचा संदेश सर्व राष्ट्रांना मिळाला असता. ते जगामध्ये वैभवाचा मुगुट बनले असते. DAMar 500.3

यरुशलेमाचे हे उत्कर्षाचे चित्र तारणाऱ्याच्या दृष्टीतून लयास गेले होते. ते आता रोमी जोखडाखाली आहे, देवाची नापसंती त्याच्याबद्दल आहे आणि त्याच्या योग्य शिक्षेच्या नाशास ते राहिले आहे हे त्याने पाहिले. तो विलाप करून म्हणतोः “परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढितील, तुझा चहूकडून कोंडमारा करितील, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये दगडावर दगड राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखिला नाहीस.” DAMar 501.1

यरुशलेम व त्याचे लोक यांचा उद्धार करण्यासाठी ख्रिस्त आला; परंतु परूश्यांचा अहंकार, ढोंगी, द्वेष आणि आकस यामुळे तो आपले उद्दिष्ट साध्य करू शकला नाही. ह्या नाशवंत शहरावर कोणती भयंकर शिक्षा येणार हे येशूला माहीत होते. शहराला सैन्याने वेढा दिलेला आणि वेढ्यात अडकलेले लोक उपासमारीने मरणाच्या पंथास लागले होते, माता स्वतःच्या मृत बालकाच्या शरीरावर आपले उपजीवन करीत होते आणि आईबाप व मुले शेवटचा अन्नाचा घास एकमेकांच्या हातातून हिसकावून घेत होते. भूकेच्या तीव्र तिडीकीमुळे स्वाभाविक प्रेमाचा हास झाला होता. त्याच्या तारणाचा त्याग करण्यास कारणीभूत दिसून आलेला त्यांचा हट्टीपणाच स्वारी केलेल्या सैन्याला शरण न जाण्याचे कारण होते हे त्याने पाहिले. जेथे त्याला वधस्तंभावर देणार होते ती कॅलव्हरी त्याने पाहिली तेथे जंगलातील वृक्षाप्रमाणे अनेक वधस्तंभ उभारले होते. खोड्यात अडकवून व वधस्तंभावर छळ होत असलेले दरिद्री रहिवासी, नाश पावलेले, भव्य राजवाडे, विध्वंस झालेले मंदिर, दगडावर दगड न राहिलेल्या प्रचंड भीती, नांगरलेल्या शेतासारखे झालेले शहर त्याने पाहिले. हे भयंकर दृश्य पाडून उद्धारक कदाचित रडत असेल. DAMar 501.2

येशू लहान मुलाप्रमाणे यरुशलेम शहराची काळजी घेत होता आणि उनाड पुत्रासाठी कनवाळू पिता शोक करितो तसे येशू प्रिय शहराकडे पाहून रडला. मी तुला कसे सोडू? तुझा नाश होताना मी तुला कसे पाहू? तुझ्या पापाचा घडा भरण्यासाठी तुला सोडून देऊ काय? तुलनात्मक दृष्ट्या एक व्यक्ती मोल्यवान आहे आणि येथे सबंध राष्ट्र नाश पावणार होते. आकाशात पश्चिमेकडील सूर्याचा अस्त होणार होता तेव्हा यरुशलेमाचा कृपेचा दिवस अस्त पावणार होता. जैतून डोंगराच्या माथ्यावर मिरवणूक थांबली होती तेव्हा यरुशलेमाला अनुताप करण्यास विलंब झाला नव्हता. न्याय व दंड यांना जागा करून देण्यासाठी सुवर्ण राजासनावरून खाली उतरून दयेचा दूत आपली पंखे दुमडून घेत होता. ज्या यरुशलेमाने त्याच्या दयेचा उपहास केला, इशाऱ्यांचा तिरस्कार केला आणि त्याच्या रक्तात हात माखून घेण्याच्या तयारीत होते त्यांच्यासाठी ख्रिस्ताचे महान प्रेमळ अंतःकरण कळकळीची विनंती करीत होते. यरुशलेमाला पश्चात्ताप करण्यास अजून विलंब झाला नव्हता. सूर्यास्ताचे किरण अजून मंदिर, बुरूज आणि कळस यांच्यावर रेंगाळत होते तोवर एकादा दूत येऊन उद्धारकाच्या प्रेमाकडे त्याला वळवून येणाऱ्या नाशापासून सावरू शकणार नाही का? सुंदर आणि अधार्मिक शहराने संदेष्ट्यांवर धोंडमार केला, देवपुत्राचा नाकार केला, पश्चात्ताप वृत्ती न दाखविल्याने स्वतःलाच प्रतिबंधक बेड्यांनी जखडून घेतले होते. त्याचा दयेचा दिवस जवळ जवळ संपुष्टात आला होता. DAMar 501.3

तरीसुद्धा देवाचा आत्मा यरुशलेमाशी पुन्हा बोलतो. दिवस मावळण्याच्या अगोदर ख्रिस्ताविषयी दुसरी साक्ष देण्यात आली. पूर्व भाकिताला प्रतिसाद म्हणून साक्षीचा आवाज उचलून धरला. जर यरुशलेम वाणी ऐकून वेशीतून आत प्रवेश करणाऱ्या उद्धारकाचा स्वीकार करील तर त्याचे तारण होऊ शकेल. DAMar 502.1

लोकांच्या मोठ्या समुदायाबरोबर येशू यरुशलेमाकडे येत आहे ही बातमी शहरातील अधिकाऱ्यांच्या कानावर आली. परंतु त्यांनी देवपुत्राचे स्वागत केले नाही. जमावाला पांगविण्याच्या हेतूने भयभीत होऊन ते त्याला भेटण्यासाठी गेले. मिरवणूक जैतूनाच्या डोंगरावरून खाली उतरत असताना अधिकाऱ्यांनी तिला अटकाव केला. त्यांनी ह्या गलबल्याचे व आनंदाचे कारण विचारिले. त्यांनी प्रश्न केला, “हा कोण आहे?’ ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यास शिष्य आत्म्याच्या प्रेरणेने भरून गेले होते. परिणामकारक भाषण करिताना ख्रिस्ताविषयीची भाकीते त्यांनी पुन्हा सांगितलीः DAMar 502.2

स्त्रीची संतति सर्पाचे डोके फोडील हे तुम्हाला आदाम सांगेल. DAMar 502.3

आब्राहामाला विचारा आणि तो तुम्हाला सांगेल की, तो “शालेमाचा राजा मलकीसदेक,” शांतीचा राजा आहे. उत्पत्ति १४:१८. DAMar 502.4

तो यहूदा वंशाचा शिलोह आहे असे याकोब तुम्हाला सांगेल. DAMar 502.5

यशया तुम्हाला सांगले की तो “इम्मानुएल” “अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति” आहे. यशया ७:१४; ९:६. DAMar 502.6

यिर्मया तुम्हाला म्हणेल की तो दाविदाचा अंकुर, “परमेश्वर आमची धार्मिकता’ आहे. यिर्मया २३:६. DAMar 503.1

दानीएल तुम्हाल सांगेल की तो मशिहा आहे. DAMar 503.2

होशेय म्हणतो की, “परमेश्वर, सेनाधीश देव परमेश्वर, हे नाम त्याचे स्मारक आहे.” होशेय १२:५. DAMar 503.3

बाप्तिस्मा करणारा योहान प्रतिपदितो की, “जगाचे पाप हरण करणारा, देवाचा कोकरा.” तो आहे. योहान १:२९. DAMar 503.4

सामर्थ्यवान यहोवा राजासनावरून घोषणा करितो की, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे.’ मत्तय ३:१७. DAMar 503.5

आम्ही त्याचे शिष्य प्रतिज्ञेने घोषित करितो की, हा येशू मशिहा, जीवनाचा अधिपती, जगताचा उद्धारक आहे. DAMar 503.6

आणि अंधाराच्या शक्तींचा अधिपती कबूल करून प्रतिपदितो की, “तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच.’ मार्क १:२४. DAMar 503.7