Go to full page →

अध्याय १०—अरण्यातील वाणी DAMar 65

लूक १:५-२३, ५७-८०; ३:१-१८; मत्तय ३:१-१२; मार्क १:१-८.

मशीहाच्या आगमनाची फार दिवसापासून अपेक्षा करणाऱ्या इस्राएलातील इमानी श्रद्धावंतातून ख्रिस्ताच्या येण्याची वर्दी देणारा उदय पावला. वयातीत असलेला याजक जखऱ्या आणि त्याची पत्नी अलीशिबा “देवाच्या दृष्टीने धार्मिक होते.” अधर्माच्या काळातील अंधारात जसा तारा चमकावा तसे ह्या जोडप्याच्या निवांत आणि पवित्र जीवनात विश्वासाची ज्योत प्रकाशली. ह्या श्रद्धावंत इमानी जोडप्याला पुत्राचे अभिवचन देण्यात आले होते. “तो प्रभूपुढे मार्ग तयार करण्यास जाणार होता.’ DAMar 65.1

जखऱ्या “यहूदाच्या डोंगराळ भागात’ राहात होता, परंतु मंदिरातील एक सप्ताहाच्या सेवेसाठी तो यरुशलेमाला गेला होता. वर्षातून दोन वेळेस याजकाना क्रमाप्रमाणे अशी सेवा करावी लागत असे. “एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे याज्ञिकी करीत असता, याज्ञिकीच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्रस्थानात जाऊन धूप जाळण्याची त्याची पाळी आली.’ DAMar 65.2

मंदिरातील पवित्रस्थानातील सुवर्ण वेदीपुढे तो उभा राहिला होता. लोकांच्या प्रार्थनेबरोबर धूपाने भरलेला ढग देवासमोर वर जात होता. एकाएकी त्याला दिव्य समक्षतेची जाणीव झाली. “प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा होता.” दूत उभा राहिलेली जागा कृपा, मर्जी याचे चिन्ह होते, परंतु जखऱ्याने त्याच्याकडे काही लक्ष दिले नाही. उद्धारकाच्या आगमनासाठी त्याने पुष्कळ वर्षे प्रार्थना केली होती; प्रार्थनेचे उत्तर देण्यात येत आहे अशी घोषणा करण्यासाठी स्वर्ग आता निरोप्या पाठवीत होता; परंतु त्याच्यावर विश्वास ठेवण्यास देवाची दया त्याला फार महान वाटली. स्वतः दोषी आहे असे वाटून तो फार घाबरला व भयभीत झाला. DAMar 65.3

परंतु त्याला हर्षाचे आश्वासन मिळाले. “देवदूताने त्याला म्हटले, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे; तुझी बायको अलीशिबा इजपासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोकास आनंद होईल. तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल, द्राक्षारस व मद्य प्रासन करणार नाही आणि तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्राएलाच्या संतानातील बहुतास त्यांचा देव प्रभु याजकडे वळवील. बापांची अंतःकरणे मुलांकडे व हट्टी लोकास धार्मिक जनांच्या ज्ञानाकडे फिरवून प्रभूसाठी योग्य प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल. तेव्हा जखऱ्या देवदूताला म्हणाला, हे कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे व माझी बायकोही वयातीत आहे.” DAMar 65.4

वृद्धावस्थेत आब्राहामाला पुत्र लाभला होता हे जखऱ्याला पूर्णपणे माहीत होते. कारण अभिवचन देणारा विश्वासू, श्रद्धावंत आहे असा विश्वास त्याने धरला होता. परंतु त्या घडीला वृद्ध याजकाचे लक्ष मानवाच्या दुबळेपणाकडे गेले. दिलेले वचन पाळणारा देव आहे हे तो विसरला. हा अविश्वास आणि मरीयाचा साधा भोळा मुलासारखा विश्वास यांच्यातील किती फरक पाहा! दूताने केलेल्या घोषणेला उत्तर देताना नासरेथ येथील कुमारिका म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे होवो.” लूक १:३८. DAMar 66.1

जखऱ्याच्या पुत्राचा जन्म, आब्राहामाच्या मुलाचा जन्म आणि मरीयाच्या मुलाचा जन्म आध्यात्मिक सत्य शिकविण्यासाठी दिलेले आहेत. ते सत्य आम्ही शिकण्यास मंद आणि विसरण्यास तत्पर असतो. स्वतःहून सत्कृत्ये करण्यास आम्ही असमर्थ आहोत; परंतु जे आम्ही करू शकत नाही ते प्रत्येक श्रद्धावंत आणि विनम्र व्यक्ती देवाच्या सामर्थ्याद्वारे करू शकते. विश्वासाद्वारे आश्वासित पुत्र देण्यात आला होता. विश्वासाद्वारे आध्यात्मिक जीवन लाभते आणि धार्मिकतेची कृत्ये करण्यास आम्ही समर्थ बनतो. DAMar 66.2

जखऱ्याच्या प्रश्नाला दूताने उत्तर दिले, “मी देवाच्यापुढे उभा राहाणारा गबीएल आहे आणि तुजबरोबर बोलावयास व ही सुवार्ता तुला कळवावयास मला पाठविण्यात आले आहे.” पाचशे वर्षापूर्वी दानीएलाला भविष्यात्मक काल ख्रिस्ताच्या आगमनापर्यत पोहंचतो असे गब्रीएलाने सांगितले होते. ह्या कालावधीचा शेवट अगदी समीप आहे ह्या ज्ञानामुळे मशीहाच्या आगमनासाठी याचना करण्यास जखऱ्या प्रवृत झाला होता. ज्या दूताद्वारे भाकीत कथन करण्यात आले होते तोच दूत त्याची परिपूर्ती घोषीत करण्यास आला आहे. DAMar 66.3

“मी देवाच्यापुढे उभा राहाणारा गबीएल आहे’ हे देवदूताचे शब्द तो स्वर्गीय दरबारात उच्च पदावर असल्याचे दर्शविते. दानीएलसाठी संदेश आणिला तेव्हा त्याने म्हटले, “त्याचबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपति मीखाएल (ख्रिस्त) याशिवाय दुसऱ्या कोणाचे मला सहाय्य नाही.” दानी. १०:२१. उद्धारक गबीएलविषयी प्रगटीकरणामध्ये म्हणतो, “हे त्याने आपल्या दूताला पाठवून निजदास योहान ह्याला कळविले.” प्रगटी. १:१. आणि योहानाला दुताने म्हटले, “मी तुझा, तुझे बंधु संदेष्टे... यांचा सोबतीचा दास आहे.’ प्रगटी. २२:९. पापी मनुष्याला देवाचे उद्देश स्पष्ट करण्यासाठी देवपूत्राच्या खालोखाल सन्मान असलेल्या देवदूताची निवड केली. - आश्चर्यकारक उदात विचार. DAMar 66.4

दूताच्या शब्दावर जखऱ्याने शंका व्यक्त केली. त्याची पूर्ती होईपर्यंत तो बोलू शकला नाही. दूताने म्हटले, “पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहाशील... कारण यथाकाली पूर्ण होणाऱ्या माझ्या वचनावर तू विश्वास ठेविला नाही.” याज्ञिकी सेवेमध्ये लोकांना पापक्षमा मिळण्यासाठी, राष्ट्राच्या पापासाठी, आणि मशीहाच्या आगमनासाठी प्रार्थना करणे याजकाचे कर्तव्य होते; परंतु जखऱ्या हे करण्याचा प्रयत्न करताना त्याच्या मुखातून शब्द निघेना. DAMar 67.1

लोकांना आशीर्वाद देण्यासाठी “त्यांना त्याने खूण करून येण्यास सांगितले आणि तो मुका राहिला.’ लोक जखऱ्याची फार वेळ वाट पाहात होते. तो बाहेर आला नाही आणि देवाचा कोप भडकून त्याला ताडण झाले असावे या विचाराने त्यांना भीती वाटली. परंतु पवित्र मंदिरातून तो बाहेर पडल्यावर त्याच्या मुखावर दिव्य गौरवी तेज चमकत होते, “तेव्हा त्याला पवित्रस्थानात दर्शन झाले आहे असे ते समजले.” जे पाहिले आणि ऐकले होते ते त्याने लोकापुढे सादर केले; आणि “त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला.” DAMar 67.2

आश्वासित मुलाचा जन्म झाल्यानंतर बापाची वाचा फुटली, “आणि तो देवाचा धन्यवाद करीत बोलू लागला. ह्यावरून त्याच्या सभोवती राहाणाऱ्या सर्वास भय प्राप्त झाले; आणि यहूदाच्या अवघ्या डोंगराळ प्रदेशात या सर्व गोष्टीविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी अंतःकरणात ठेवून म्हटले हा बालक होणार तरी कसा?” ह्या सर्व गोष्टी मशीहाच्या आगमनाकडे लक्ष वेधून घेत होत्या; त्यासाठी योहानाला मार्ग तयार करायचा होता. DAMar 67.3

पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन जखऱ्याने आपल्या पुत्राच्या कार्याविषयी खालील शब्दात भाकीत केले: DAMar 67.4

“हे बाळका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील
कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्यासाठी तू त्याजपुढे चालशील
यासाठी की त्याच्या लोकास त्याच्या पापक्षमेने
तारणाचे ज्ञान द्यावे.
आमच्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे;
त्याच्या योगे उदयप्रभा वरून आमची भेट होईल:
यासाठी की अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यास
प्रकाश देण्यात यावा आणि
आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे.” DAMar 67.5

“तो बाळक वाढून आत्म्याने बलवान होत गेला, आणि इस्राएलास प्रगट व्हावयाच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.” योहानाचा जन्म होण्याच्या अगोदर दूताने म्हटले, “तो प्रभूच्या दिसण्यात महान होईल, द्राक्षारस व मद्य प्राशन करणार नाही, आणि तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल.’ जखऱ्याच्या पुत्राला देवाने महान कार्यासाठी बोलाविले. हे कार्य साध्य होण्यासाठी त्याच्या कामात प्रभूचा सहभाग हवा आहे. दूताने दिलेला सल्ला त्याने मानला तर देवाचा आत्मा त्याच्याबरोबर राहील. DAMar 67.6

देवाचा प्रकाश मानवाकडे आणण्यासाठी योहानाला यहोवाहाचा जासूद म्हणून कामाला लागावयाचे होते. लोकांच्या विचाराला नवीन दिशा द्यावयाची होती. देवाच्या अपेक्षित गोष्टींचे पावित्र्य आणि त्यांच्या परिपूर्ण धार्मिकतेची त्यांची गरज त्यांच्या मनावर ठसवायची होती. अशा प्रकारचा जासूद पवित्र असला पाहिजे. देवाच्या आत्म्याचा निवास होण्यासाठी तो मंदिर असला पाहिजे. ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याची शरीर प्रकृति निकोप असून मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती सुदृढ असली पाहिजे. त्यासाठी त्याने भूक, वासना, मनोविकार यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अरण्यातील डोंगर आणि खडक जसे खंबीर, स्थीर असतात तसेच लोकांच्या भिन्न चालीरीतीच्या प्रभावाने हेलकावे खाणार नाही असा तो बळकट, करारी व निग्रही असला पाहिजे. DAMar 68.1

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळात द्रव्य संपत्तीची हाव, लोभ आणि ख्यालीखुशाली व भबका यांचा ध्यास सर्वत्र प्रचलित होता. इंद्रियोद्दीपक चैन, ऐषआराम, मेजवानीवर ताव मारणे, मद्यपान करणे यामुळे आजार आणि निकृष्टावस्था दिसत होती आणि आध्यात्मिक ग्रहणशक्ती, समजशक्ती, सुन्न, निरुपयोगी होऊन पाप जाणण्यासाठी शक्ती कमकुवत झाली होती. अशा परिस्थितीत योहान सुधारक म्हणून राहाणार होता. मिताहार, संयमन आणि साधा पोषाख आणि राहाणी यामुळे त्या काळच्या सर्व बाबीतील अतिरेकाला तो धमकावणी, दबाव होता. यासाठीच योहानाच्या मातापित्याला मार्गदर्शन केले होते, - स्वर्गीय दरबारातून आलेल्या दूताने दिलेला तो नेमस्तपणाचा पाठ, धडा होता. DAMar 68.2

बालपणात आणि तारुण्यात स्वभाव, वृत्ती आणि शील मनावर अधिक ठसविणारी असतात. त्यासाठी आत्मसंयमन, आत्मनिग्रहाची गरज होती. कुटुंबातील व्यक्तीनी एकत्रीत येण्याद्वारे आणि प्रार्थनेद्वारे जो मनावर ठसा उमटला जातो त्याचा परिणाम निरंतरचा टिकाऊ असतो. उपजत शक्ती किंवा देणगीपेक्षा आयुष्यातील लढा यशस्वी होईल किंवा पराभूत होईल हे लहान वयात लागलेल्या संवयीवर अवलंबून आहे. त्याद्वारे ह्या आयुष्यात आणि येणाऱ्या आयुष्यात कोणत्या प्रकारचा हंगाम असेल ते ठरविले जाते. DAMar 68.3

संदेष्टा या नात्याने योहानाला “बापांची अंतःकरणे मुलांकडे व हट्टी लोकास धार्मिक जनांच्या ज्ञानाकडे फिरवून प्रभूसाठी योग्य प्रजा तयार करायची होती.’ ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची तो तयारी करीत होता. म्हणून तो ख्रिस्ताच्या द्वितियागमनाची तयारी करणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी होता. जग मनसोक्त वागत आहे, अनावर लाड पुरवीत आहे. कल्पित कथा, चुका, अतिक्रम यांनी धुडगूस घातला आहे, रेलचेल केली आहे. आत्म्यांचा विध्वस करणारे सैतानी जाळे अधिक पसरले जात आहे. देवाच्या भयात पावित्र्याची पूर्णता ज्यांना करून घ्यायची आहे त्यांनी नेमस्तपणाचे आणि आत्मसयंमनाचे पाठ गिरविले पाहिजे. भुकेचे चोचले आणि तीव्र मनोविकार, तीव्र भावना मनाच्या उच्च सामर्थ्याखाली नियंत्रित ठेवले पाहिजेत. स्वतःला शिस्त लावून घेणे आवश्यक आहे, अशासाठी की मानसिक सामर्थ्य आणि आध्यात्मिक अभिज्ञान देवाचे पवित्र सत्य समजण्यास व ते कृतीत आणण्यास आम्हास समर्थ करील. ह्या कारणास्वत ख्रिस्ताच्या दितियागमनाच्या तयारीच्या कामात नेमस्तपणाचा भाग महत्त्वाचा आहे. DAMar 68.4

खरे पाहिले तर स्वाभाविकरित्या जखऱ्याच्या पुत्राने याजक बनण्याचे शिक्षण घेतले असते. परंतु यहूदी धर्मशास्त्र विद्यालयातील शिक्षण त्याच्या कामासाठी उपयोगी पडले नसते. पवित्र शास्त्र वचनाचा अर्थ कसा सांगावा म्हणून देवाने त्याला ईश्वरविषयक ज्ञान देणाऱ्या शिक्षकाकडे पाठविले नाही. निसर्ग आणि सृष्टिसौंदर्य व निसर्गाचा उत्पन्नकर्ता देव यांच्याविषयी शिकण्यास त्याने त्याला अरण्यात बोलाविले. DAMar 69.1

ओसाड टेकड्या, खोल अरुंद दरी आणि खडकातील गुहा यांच्यामध्ये निवात स्थळी त्याला घर मिळाले. अरण्यातील कडक शिस्तीसाठी जीवनातील ख्यालीखुशाली आणि आनंद यांचा त्याग करण्याचे त्याने निवडले. येथे साधी राहाणी आणि स्वार्थत्याग यांच्या संवयीसाठी सभोवतालचे वातावरण पोषक होते. जगातला गलबला आणि गोंगाट यांच्या उपद्रवापासून अलिप्त राहिल्यामुळे या ठिकाणी तो निसर्ग, प्रकटीकरण आणि ईश्वरी साहाय्य यांच्यावरील धड्यांचे तो अध्ययन करू शकला. जखऱ्याला देवदूताने बोललेले शब्द देवभिरू मातापित्याने योहानाच्या कानावर पुन्हा न पुन्हा घातले. बालपणापासून त्याचे सेवाकार्य सतत त्याच्या डोळ्यापुढे ठेवले होते, आणि त्याने ती पवित्र ठेव स्वीकारली होती. समजात सर्वत्र भिनलेला संशय, अविश्वास आणि अशुद्धता यांच्यापासून सुटका घेऊन अरण्यातील एकांतवास पत्करला. मोहाला तोंड देण्यासाठी तो स्वतःच्या शक्तीवर विसंबून नव्हता, आणि सतत होणाऱ्या पापाच्या संपर्कापासून तो कचरला, नाहीतर पापाच्या दुष्परिणामाचा समज त्याला झाला नसता. DAMar 69.2

जन्मापासूनच देवाला अर्पण केलेला असल्यामुळे त्याने हे व्रत, नवस सबंध आयुष्याचे समर्पण म्हणून स्वीकारले. त्याचा पोषाख प्राचीन संदेष्ट्यांचा होता, उंटाच्या केसाचा झगा आणि चामड्याचा कमरपट्टा होता. अरण्यामध्ये मिळालेला “मध व टोळ’ त्याचे खाणे होते आणि डोंगरातील झऱ्याचे स्वच्छ पाणी त्याचे पेय होते. DAMar 69.3

परंतु योहानाचे जीवन आळसामध्ये, विरक्तीच्या औदासिन्यात किंवा अलग राहाण्यात गेले नाही. वारंवार तो लोकांत मिसळत असे; आणि जगात जे चाललेले आहे त्याचे तो सतत निरिक्षण करीत असे. निवांत ठिकाणातून उघड होत असलेल्या घटनाविषयी तो जागृत होता. दैवी आत्म्याद्वारे प्रकाशीत झालेल्या दृष्टीने त्याने लोकांच्या स्वभावाचे अवलोकन केले. त्याद्वारे त्यांना ईश्वरी संदेश देण्यास मदत झाली असती. कार्याची जबाबदारी त्याच्यावर होती. एकांतात, चिंतन मनन व प्रार्थना याद्वारे त्याने आयुष्यातील कार्यासाठी जय्यत तयारी केली. DAMar 69.4

जरी तो अरण्यात होता तरी मोहापासून त्याला मोकळीक नव्हती. शक्य तो सैतानाचे प्रत्येक प्रवेशद्वार त्याने बंद करून टाकले होते, तरी सुद्धा भुरळ घालणारा त्याच्यावर हल्ला करीत होता. त्याची आध्यात्मिक ज्ञानशक्ती शुद्ध स्वच्छ होती; त्याने समर्थ होऊन निर्णयशक्ती विकासित केली होती, आणि पवित्र आत्म्याच्या साहाय्यद्वारे सैतानाचा शिरकाव शोधून काढून त्याच्या शक्तीला तो तिव्र विरोध करीत असे. DAMar 70.1

अरण्यामध्ये योहानाला त्याचे विद्यालय आणि देवालय मिळाले, सापडले. मिद्यानी डोंगरावरील मोशेप्रमाणे योहान ईश्वराच्या समक्षतेत कोंडला होता आणि त्याच्या सामर्थ्याच्या प्रमाणाने गराडा घातला होता. इस्राएलाच्या महान पुढाऱ्याप्रमाणे डोंगराच्या प्रशांत स्थळी राहाण्याचा त्याचा मानस नव्हता; परंतु त्याच्यापुढे यार्देन नदीच्या पलीकडे मोआबचे शिखर होते. अरण्यातील घरात इस्राएल लोकांची परिस्थिती उदास, निस्तेज आणि भयंकर असल्याचे दर्शविले होते. प्रभूचा फलदायी द्राक्षमळा ओसाड झाला होता. परंतु ओसाड अरण्य किंवा वाळवंट यावर स्वर्गातून प्रकाश आणि सौंदर्य चमकत होते, जमलेल्या काळ्याकुट्ट वादळी ढगांनी आश्वासित इंद्रधनुष्याप्रमाणे कमान केली होती. इस्राएलाची अवनति, मानहानी यावर मशीहाच्या राजवटीतील आश्वासित त्याच्या करारनामाच्या करुणेच्या इंद्रधनुष्याने कमान केली होती, पूल बांधला होता. DAMar 70.2

तुझे संतान आकाशातील अगणित ताऱ्याप्रमाणे होईल हे आब्राहामाला दिलेले देवाचे अभिवचन याविषयी त्याने निवांत रात्री वाचले. “सूर्योदयाच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल.’ २ शमुवेल २३:४. येथे प्रभातचा प्रकाश कोण आहे हे सांगितले आहे आणि भर दुपारच्या प्रकाशात त्याने त्याचे सौंदर्य, प्रखर तेज पाहिले. तेव्हा “परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजात एकत्र मिळून ते पाहील.” यशया ४०:५. DAMar 70.3

थोडे कचरतच परंतु आनंदाच्या भरात भाकीताच्या गुंडाळीमध्ये त्याने मशीहाच्या आगमनाविषयी शोधले, - सापाचे डोके ठेचणारा आश्वासित संतान; दाविदाच्या गादीवर राज्य करणारा “शांतीदाता” याचे आगमन होणार. आता वेळ आली होती. सियोन डोंगरावरील राजवाड्यात रोमन सम्राट बसला होता. प्रभूच्या खात्रीदायक वचनाप्रमाणे अगोदरच ख्रिस्ताचा जन्म झाला होता. DAMar 70.4

यशयाने मशीहाच्या गौरवाचे रेखाटलेले हुबेहूब चित्र त्याच्या रात्रंदिवस केलेल्या विचारमग्न अभ्यासाचा तो आविष्कार आहे. तो म्हणतोः इशायाच्या मुळातून फुटलेली शाखा, धार्मिकतेने राज्य करणारा राजा, “तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील;” “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा, ... तप्त भूमीत विशाल खडकाची छाया,’ यापुढे इस्राएलाला “सोडलेली म्हणणार नाहीत, यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत; तर तुला हेफसीचा (ती माझा आनंद) व तुझ्या भूमीला बऊल (विवाहित) म्हणतील.’ यशया ११:४; ३२:२; ६२:४. हद्दपार केलेल्या एकट्याचे अंतःकरण गौरवी दृष्टांताने भरून गेले होते. DAMar 70.5

सौंदर्ययुक्त राजाचे दर्शन त्याने घेतले आणि तो स्वतःला विसरून गेला. त्याने पावित्र्याचे वैभव पाहिले आणि तो स्वतः किती अक्षम आणि टाकाऊ आहे हे त्याला जाणवले. मानवी दुर्बलतेचा वचक नसलेला असा तो स्वर्गीय जासूद म्हणून जाण्यास तयार होता कारण त्याला दिव्य दर्शन झाले होते. राज्यांचा राजा याच्यापुढे नम्र झाल्यामुळे तो जगातील सम्राटापुढे धैर्याने मान वर करून राहू शकत होता. DAMar 71.1

मशीहाच्या राज्याचे स्वरूप योहानाला अजून पूर्णपणे समजले नाही. राष्ट्रीय शत्रूपासून इस्राएलाची सुटका होण्याची तो प्रतिक्षा करीत होता; परंतु धार्मिकतेने राजाचे आगमन व्हावे, आणि पवित्र राष्ट्र म्हणून इस्राएलाची स्थापना व्हावी हा त्याच्या आशेचा उद्देश होता. त्याच्या जन्माच्या वेळी केलेले भाकीत पूर्ण होईल असा त्याचा विश्वास होता, - DAMar 71.2

“आम्ही त्याचा पवित्र करार स्मरावा; ...
ती अशी की तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सुटून
माझ्यासमोर पवित्रतेने आणि धार्मिकतेने आयुष्यभर
माझी सेवा निर्भयपणे कराल.” DAMar 71.3

लोकाची फसगत झालेली, आत्मसंतोषी आणि आपल्या पापात मृत्यू पावलेले असे आपले लोक त्याने पाहिले. त्यांची पवित्र जीवनात वृद्धि व्हावी ही त्याची अपेक्षा होती. त्यांना देण्यासाठी देवाने दिलेल्या संदेशाद्वारे ते सुस्तीतून खडबडून जागे होतील आणि महान दुष्टाईमुळे भयाने लटपटतील. सुवार्तेचे बीज रुजण्याआधी हृदयाच्या भूमीची मशागत केली पाहिजे. ख्रिस्तापासून आरोग्यस्वास्थासाठी विनंती करण्याआधी पापजखमेच्या धोक्यापासून त्यांना जागृत केले पाहिजे. DAMar 71.4

पाप्यांची खुशामत करण्यासाठी देव जासूद पाठवीत नाही. अधार्मिकांना घातकी संरक्षणात सांत्वन करण्यासाठी तो शांती संदेश देत नाही. चुकणाऱ्यांच्या सद्सदविवेकावर तो मोठी जबाबदारी टाकितो आणि खात्रीच्या बाणाने आत्म्याला छेदितो. देवदूत देवाच्या भयप्रद न्यायाचा संदेश देऊन अधीक गरज असल्याचे सुनावतो आणि त्यानंतर मुखातून उद्गार निघतात, “तारण होण्यासाठी मी काय करावे?error नंतर नम्र झालेल्या पश्चाताप्याला वर काढतो. ज्या वाणीने पापाचा धिक्कार केला आणि गर्व व महत्कांक्षा यांची मानहानी केली तो सहानुभूतीने विचारतो, “मी तुमच्यासाठी काय करावे?’ DAMar 71.5

योहानाने सेवेला सुरूवात केली तेव्हा राष्ट्र प्रक्षुब्ध आणि असंतुष्ट, असमाधानी असून क्रांतीच्या उंबरठ्यावर होते. आर्केलॉसची हक्कालपट्टी करून यहूदाला रोमच्या सत्तेखाली आणले होते. रोमी अधिकाऱ्याचा जुलूम आणि पिवळणूक, आणि विधर्मी रूढी, चालारिती प्रचारांत आणण्याचा निर्धार यामुळे बंडाची ठिणगी उडली. परंतु ते काबूत आणीत असताना इस्राएलातील हजारोनी रक्ताच्या थारोळ्यात आहुती दिली. ह्यामुळे रोमविरुद्ध द्वेष बळावला आणि त्यांच्या अधिपत्यातून मुक्ती मिळण्याची इच्छा अनावर झाली. DAMar 72.1

बेबनाव व झगडा यांच्यामध्ये अरण्यातून वाणी ऐकली. ती वाणी कठोर आणि चकीत करणारी असून आज्ञादायी होती. ती म्हणाली, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आहे.” नवीन आणि चमत्कारिक सामर्थ्याने लोकांची अंतःकरणे हालवून सोडली. संदेष्ट्यांनी भाकीत केले होते की ख्रिस्ताचे येणे पुढे भविष्यकाळात होईल; परंतु ते जवळ असल्याची घोषणा झाली. योहानाच्या ह्या दर्शनाने ऐकणाऱ्यांची मने प्राचीन भविष्यवाद्याकडे झुकली. त्याचा पोषाख आणि अविर्भाव एलीयासारखा वाटला. एलीयाच्या सामर्थ्याने राष्ट्रीय भ्रष्टाचाराबद्दल त्याने दोषारोप केला आणि अस्तित्वात असलेल्या पापाबद्दल धमकावले. भाषा सरळ, मुद्देसूद आणि खात्री करून देणारी होती. पुनरुत्थित झालेल्या संदेष्ट्यापैकी हा एक आहे असे अनेकांना वाटले. सर्व राष्ट्र जागृत झाले. लोकांच्या झुडी अरण्यात जमा झाल्या. DAMar 72.2

योहानाने मशीहाच्या आगमनाची घोषणा केली, आणि लोकांना पश्चात्ताप करण्यास सांगितले. पापापासून शुद्ध करण्याची निशाणी म्हणून यार्देन नदीतील पाण्यात त्याने त्यांचा बाप्तिस्मा केला. पापाने भ्रष्ट झालेले निवडलेल्या लोकांनी अंतःकरणाची आणि जीवनाची शुद्धी करून घेतल्याशिवाय त्यांना मशीहाच्या राज्यात वाटा नाही. DAMar 72.3

सरदार, अधिपति, धार्मिक पुढारी, जकातदार, सैनिक आणि शेतकरी संदेष्ट्याची वाणी ऐकण्यास आले. देवापासून आलेल्या गंभीर इशाऱ्याने त्यांना काही काळ धास्ती बसली. पुष्कळांनी पश्चात्ताप केला आणि बाप्तिस्मा घेतला. सर्व थरातील लोकांनी त्याने घोषीत केलेल्या राज्याचे भागीदार होण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी मान्य केल्या. पाळिल्या. DAMar 72.4

पापांगिकार करून बाप्तिस्मा घेण्यासाठी पृष्कळ शास्त्री आणि परूशी पुढे आले. इतरापेक्षा आपण स्वतः अधिक चांगले आहोत असे समजून लोकांनी त्यांच्या पावित्र्याचा मान करावा अशी लोकांची समजूत ते करून देत होते; परंतु आता त्यांचे गुप्त दोष उघड करण्यात आले. ह्यापैकी पुष्कळजनाचे खरे परिवर्तन झालेले नव्हते अशी पवित्र आत्म्याच्याद्वारे योहानाची खात्री झाली होती. ते रंग पाहून चालणारे संधिसाधू होते. संदेष्ट्याचे स्नेही ह्या नात्याने येणाऱ्या अधिपतीची मेहरबानी त्यांच्यावर होईल असे त्यांना वाटत होते. गाजलेल्या नामवंत तरुण शिक्षकाच्याद्वारे बाप्तिस्मा घेतल्यास त्यांचे वजन लोकावर पडेल अशी त्यांची धारणा होती. DAMar 72.5

खरमरीत टीका करून योहानाने त्यांना विचारले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सुचविले? आता पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या; आणि आब्राहाम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. मी तुम्हास सांगतो देव आब्राहामासाठी या दगडापासून संतति उत्पन्न करावयास समर्थ आहे.” DAMar 73.1

इस्राएलावरील देवाच्या आशीर्वादाच्या वचनाचा गैर अर्थ यहूदी लोकांनी लावलाः “जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवितो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की, यदाकदाचित मजसमोरून हे नियम ढळलेच तर इस्राएलाचा वंश माझ्यासमक्ष राष्ट्र या पदापासून अक्षय ढळेल. परमेश्वर म्हणतो, वर आकाशाचे मापन करणे व खाली पृथ्वीच्या पायांचा थांग लावणे हे साध्य असले तरच इस्राएलाच्या वंशाने जे काही केले त्या सर्वामुळे मी त्या सगळ्या वंशाचा त्याग करीन, असे परमेश्वर म्हणतो.” यिर्मया ३१:३५३७. यहूदी आब्राहामाचे स्वाभाविक संतान असल्यामुळे त्या आश्वासनावर त्यांचा हक्क आहे असे त्यांना वाटत होते. परंतु देवाने दिलेल्या अटीकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. आश्वासन देण्याआधी त्याने म्हटले, “मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील... मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.’ यिर्मया ३१:३३, ३४. DAMar 73.2

ज्यांच्या हृदयपटावर देवाच्या आज्ञा लिहिलेल्या आहेत त्यांना देवाच्या आशीर्वादाची खात्री आहे. ते त्याच्याशी एकचित आहेत. परंतु यहुदी लोक देवापासून विभक्त झाले होते. त्यांच्या अधर्मामुळे त्याच्या न्यायदंडाखाली ते दुःख भोगीत होते. त्या कारणामुळेच विधर्मी राष्ट्राच्या गुलामगिरीत ते पडले होते. स्वैरवर्तनामुळे त्यांची मने अंधुक झाली होती, आणि गत काळात परमेश्वराने त्यांच्यावर विपुल आशीर्वादाचा वर्षाव केला होता म्हणून त्यांनी आपल्या पापाबद्दल सबब सांगितली. ते स्वतःची खुशामत करून म्हणत होते की ते इतरापेक्षा अधिक चांगले आहेत म्हणून ते आशीर्वादास लायक आहेत. DAMar 73.3

ह्या गोष्टी “ज्या आपल्यावर युगांचा शेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी लिहिल्या आहेत.” १ करिंथ. १०:११. पुष्कळ वेळा आम्ही देवाच्या आशीर्वादाचा गैर अर्थ लावून घेतो. स्वतःची फुशारकी मारून म्हणतो की आमच्या चांगुलपणामुळे देव आमच्यावर मेहरबानी करतो, प्रसन्न होतो! देवाला आमच्यासाठी करावे असे जे वाटते ते तो करू शकत नाही. आत्मसंतुष्टतेमध्ये वाढ करण्यासाठी आणि पाप व अश्रद्धा याद्वारे अंतःकरणे कठीण करण्यासाठी देवाच्या दानांचा उपयोग करण्यात येतो. DAMar 73.4

धर्माचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना योहानाने सांगितले की त्यांचा अहंमपणा, स्वार्थीपणा आणि निर्दयता यामुळे ते न्यायी, आज्ञाधारक आब्राहामाची मुले होण्याऐवजी लोकांना शापग्रस्त झालेल्या सापांची प्रजा बनले आहेत. देवापासून त्यांना प्रकाश मिळूनही ते विधापेक्षा अधिक वाईट बनले होते. ज्या खडकातून त्यांना खोदून काढून आकार दिला आणि खड्ड्यातून बाहेर काढिले त्याचा त्यांना विसर पडला. आपले उद्दिष्ट साध्य होण्यासाठी देव त्यांच्यावर अवलंबून राहिला नाही. विधातून आब्राहामाला जसे बाहेर बोलाविले तसेच तो दुसऱ्यांना आपल्या सेवेसाठी बोलावू शकतो. प्रारंभी त्यांचे अंतःकरण जंगलातील दगडाप्रमाणे निर्जीव वाटेल पण त्याच्या आत्म्याच्याद्वारे त्यांच्यात चैतन्य सरसावेल आणि त्याची सेवा करून त्याच्या आश्वासनाची परिपूर्ती होईल. DAMar 74.1

संदेष्ट्याने म्हटले, “आताच झाडाच्या मुळाशी कु-हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकण्यात येईल.’ नावावरून नाही परंतु त्याच्या फळावरून त्याची किंमत ठरविण्यात येते. फळ निरूपयोगी असल्यास नावामुळे नाश टाळला जात नाही. त्यांच्या जीवनावरून आणि स्वभावावरून त्यांचे देवासमोरील मूल्य ठरविण्यात येईल असे योहानाने यहूद्यांना सांगितले. पेशा, व्यवसाय निरूपयोगी गुणहीन आहे. त्यांचे जीवन, त्यांचा स्वभाव देवाच्या नियमाशी सुसंगत, जुळणारे नाही तर ते त्याचे लोक नव्हेत. DAMar 74.2

अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या बोलाने श्रोतृजनाची खात्री झाली होती. ते त्याच्याकडे येऊन विचारू लागले, “आम्ही काय करावे?” त्याने उत्तर दिले, “ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्याने ज्याला तो नाही त्याला तो द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने तसेच करावे.” त्याने अधिक जुलमाने घेतल्याबद्दल जकातदाराना आणि बलात्कार दांडगाई केल्याबद्दल शिपायांना खडसावले. DAMar 74.3

त्याने म्हटले, ख्रिस्त राज्याची प्रजा होणाऱ्यांनी श्रद्धा आणि पश्चात्ताप यांचा पुरावा दिला पाहिजे. करुणा, प्रामाणिकपणा आणि निःसीम भक्ती त्यांच्या जीवनात दिसली पाहिजे. गरजूंची ते काळजी घेतील आणि देवाच्या कार्यासाठी दानार्पणे देतील. अनाथाला संरक्षण देतील आणि धर्माचरण आणि दया यांच्यामध्ये ते आदर्श असतील. अशा रीतीने ख्रिस्तानुयायी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने रूपांतर झाल्याची साक्ष देतील. दररोजच्या जीवनात न्याय, दया आणि देवाची प्रीती दिसेल. नाहीतर अग्नीत टाकण्यात येणाऱ्या भुसासारखी त्यांची स्थिती होईल. DAMar 74.4

योहानाने म्हटले, “मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी करितो; परंतु जो माझ्यामागून येतो तो मजपेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा घेऊन चालावयास मी योग्य नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील.’ मत्तय ३:११. यशया संदेष्ट्याने प्रतिपादीले की, “प्रभु न्याय करणाऱ्या व दहन करणाऱ्या आत्म्याच्याद्वारे’ लोकांचा मळ काढून टाकील. यशया ४:४. “मी आपला हात लावून क्षार घातल्यासारखा तुझे कीट गाळून नाहीसे करीन, तुझ्यातील सर्व शिसे काढून टाकीन.” यशया १:२५. ज्या ठिकाणी पाप असते तेथे “आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.” इब्री १२:२९. संपूर्ण शरण येणाऱ्यांची पापे देवाचा आत्मा भस्म करून टाकतो. परंतु पापाला चिकटून राहाणारे पापाशी समरस होतात. नंतर पाप हरण करणारे देवाचे गौरव त्यांचा नाश करते. याकोबाने दुताबरोबर रात्रभर झगडा केल्यावर म्हटले, “मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला.’ उत्पत्ति ३२:३०. एसावाच्या बाबतीत याकोबाने मोठे पाप केले होते; परंतु तो पश्चात्तापी झाला. त्याची पापक्षमा होऊन शुद्धी, क्षालन झाले होते. त्यामुळे तो देवाच्या समक्षतेत तरून राहू शकला. परंतु दुषित अंतःकरणाने देवाच्या समक्षतेत जाणाऱ्यांचा नाश झाला. ख्रिस्ताच्या द्वितियागमनाच्यावेळी “प्रभूच्या मुखातील श्वासाने दुष्टांना मारून टाकील आणि आपण येताच स्वदर्शनानेच त्यांना नाहीसे करील.” २ थेस्स. २:८. धार्मिकांना जीवन देणाऱ्या देवाच्या गौरवाने दुष्टांचा नाश होईल. DAMar 74.5

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळात देवाचे गुण स्वभाव प्रगट करण्यासाठी ख्रिस्त येणारच होता. त्याच्या समक्षतेने लोकांची पापे त्यांना प्रगट झाली असती. पापक्षालनासाठी त्यांच्या मनाची तयारी झाल्यावरच ते त्याच्याशी संगत सोबत करू शकत होते. अंतःकरणाचे शुद्ध तेच केवळ त्याच्या समक्षतेत राहू शकले. DAMar 75.1

अशा प्रकारे योहानाने देवाचा संदेश इस्राएल लोकांना घोषीत केला. पुष्कळांनी हा संदेश मानला. आज्ञापालनासाठी पुष्कळांना स्वार्थत्याग करावा लागला. मोठा घोळका ह्या नवीन शिक्षकाच्यामागे ठिकठिकाणी जाऊ लागला. परंतु तो मशीहा असेल असे थोडक्यांनासुद्धा वाटले नाही. परंतु त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा विश्वास येणाऱ्या अधिपतीवर वेधण्याचा हरएक प्रयत्न योहानाने केला. DAMar 75.2