Go to full page →

अध्याय २०—“तुम्ही चिन्हें व अद्भुतें पाहिल्यावाचून” DAMar 154

योहान ४:४३-५४.

वल्हांडण सणानंतर परतलेल्या गालीलकरांनी येशूने केलेल्या अद्भुत कार्याचा अहवाल आपल्याबरोबर आणिला. यरुशलेम येथील पदाधिकाऱ्यांनी त्याच्या कृतीवर मारलेल्या शेऱ्यामुळे गालीलातील त्याचा मार्ग खुला झाला. याजक लोकांचा लोभ व उद्धटपणा आणि मंदिराचा दुरूपयोग पाहून पुष्कळ लोक शोकाकूल झाले होते. पदाधिकाऱ्यांना पळून जाण्यास भाग पाडणारा हा मनुष्य मुक्तिदाता असावा असे त्यांना वाटले होते. आता आलेल्या वार्तेने त्यांची अपेक्षीत मनीषा खरी ठरण्यास बळकटी मिळाली. संदेष्ट्याने स्वतः मशीहा असल्याने जाहीर केले आहे असा निरोप त्यांना देण्यात आला होता. DAMar 154.1

परंतु नासरेथ येतील लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेविला नव्हता. ह्या कारणास्तव कानाला जाताना येशूने नासरेथला भेट दिली नव्हती. येशूने स्वतः आपल्या शिष्यांना सांगितले की, संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही. गुणमोल ओळखण्याच्या स्वतःच्या पात्रतेवरून ते शीलस्वभावाविषयी अनुमान काढतात. संकुचित व जगिक विचाराच्या लोकांनी त्याचा गरीबीतील जन्म, साधा पेहेराव व दररोजचे कष्टाचे काम यावरून ख्रिस्ताचे मोल ठरविले होते. पापाचा कलंक नसलेल्या पावित्र्याचे ते मोल ठरवू शकले नव्हते. DAMar 154.2

काना गावात ख्रिस्त आल्याची बातमी सबंध गालील प्रांतात पसरली व त्यामुळे आपदग्रस्तांची व दुःखणाईतांची आशा दुणावली. कपर्णहूम येथे राजाच्या पदरी एक अंमलदार होता त्याचे लक्ष ह्या वार्तेकडे वेधले. असाध्य, दुर्धर आजाराने त्याचा मुलगा आजारी होता. डॉक्टर लोकांनी त्याच्या जगण्याची आशा सोडली होती, परंतु जेव्हा बापाने येशूविषयी ऐकिले तेव्हा त्याने त्याचे सहाय्य घेण्याचे ठरविले. मूल फारच आजारी होते आणि तो येईल तोपर्यत ते जीवंत राहील किंवा नाही याबद्दल शंकाच होती; तरीपण ही गोष्ट स्वतः प्रत्यक्ष सादर केली पाहिजे असे अंमलदाराने ठरविले. त्याला वाटले पित्याने केलेल्या विनवणीने महान डॉक्टराच्या मनात सहानुभूती जागृत होईल. DAMar 154.3

काना येथे पोहंचल्यावर येशूभोवती लोकांचा गराडा पडलेला त्याने पाहिला. चिंतातूर होऊन उद्धारकाच्या जवळ जाण्याचा त्याने प्रयत्न केला. साध्या पोषाख्यातील, प्रवासाने थकलेला व धुळीने माखलेला साधा माणूस पाहून त्याचा विश्वास लटपटला. ज्या उद्देशासाठी तो त्या ठिकाणी आला होता तो उद्देश त्याच्याद्वारे साध्य होईल याविषयी तो साशंक झाला; तथापि येशूची भेट त्याने घेतली व घाईने येण्याविषयीचे कारण सांगितले व त्याच्याबरोबर त्याच्या घरी येण्यास विनंती केली. येशूला त्याचे दु:ख अगोदरच समजले होते. अंमलदाराने घर सोडण्यापूर्वीच उद्धारकाने त्याचे क्लेश पाहिले होते. DAMar 154.4

येशूवर विश्वास ठेवण्यासाठी बापाने मनात काही अटी ठरवून ठेवल्या होत्या हेही येशूला माहीत होते. त्याची विनंती मान्य केल्याशिवाय तो त्याचा मशीहा म्हणून स्वीकार करणार नव्हता. तीव्र दुःखाने अंमलदार वाट पाहात उभा राहिला असताना येशूने त्याला म्हटले, “तुम्ही चिन्हें व अद्भुते पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारच नाही.’ DAMar 155.1

येशू हा ख्रिस्त होता याचे भरपूर पुरावे असूनसुद्धा अंमलदाराने आपली वैयक्तिक विनंती मान्य केल्याशिवाय तो त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही ही अट कायम ठेवली. प्रश्न करणारा हा अविश्वास आणि विश्वास ठेवण्यासाठी कसल्याही चिन्हांची किंवा चमत्कारांची मागणी न करणाऱ्या शोमरोनी लोकांची उद्धारकाने तुलना केली. त्याचे बोल-शब्द त्याच्या देवत्वाचे पुरावे होते आणि त्यामध्ये खात्री करून देण्याचे सामर्थ्य होते ते त्याच्या अंतःकरणाला भिडले होते. स्वतःच्या लोकांसाठी देवाचे पवित्र वचन देण्यात आलेले असतांना त्यांच्या पुत्राच्याद्वारे देवाची वाणी ऐकण्यात ते अपयशी ठरलेले पाहून ख्रिस्ताला फार यातना झाल्या होत्या. DAMar 155.2

तथापि अंमलदाराच्या ठायी काही अंशी विश्वास होता, कारण त्याच्या दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ कृपाप्रसादाची याचना करण्यासाठी तो आला होता. देण्यासाठी ख्रिस्ताजवळ अधिक मोल्यवान दान होते. मुलालाच केवळ बरे करावे असे नाही तर अंमलदार व त्याचे घराणे यांनी तारण प्राप्तीच्या कृपाप्रसादाचे वाटेकरी व्हावे, व कपर्णहूमामध्ये प्रकाशाची ज्योत पेटवावी अशी त्याची इच्छा होती, कारण लवकरच त्याच्या सेवेचे ते कार्यक्षेत्र होणार होते. परंतु अंमलदाराने येशूचा कृपाप्रसाद अपेक्षण्याच्या अगोदर स्वतःची गरज पूर्णपणे जाणली पाहिजे. हा राजदरबारी मनुष्य राष्ट्रातील पुष्कळांचे प्रतिनिधीत्व करीत होता. स्वार्थी हेतूने ते ख्रिस्तावरील आपली गोडी प्रदर्शित करीत होते. त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे त्यांना विशेष फायदा लाभावा अशी त्यांची इच्छा होती आणि तात्पुरत्या ह्या फायद्यासाठी त्यांनी विश्वास दर्शविला; परंतु ते स्वतःच्या आध्यात्मिक रोगाविषयी अजाण होते म्हणून त्यांना दिव्य कृपाप्रसादाची गरज जाणवली नाही, किंवा दिसली नाही. DAMar 155.3

प्रकाशाच्या चकाकण्याप्रमाणे उद्धारकाच्या उद्गाराने अंमलदाराचे अंतःकरण उघडे पडले. येशूचा शोध घेण्यात त्याचा हेतू स्वार्थी होता हे त्याने पाहिले. त्याच्या डळमळीत विश्वासाचे खरे स्वरूप त्याला समजून आले. अति दुःखीत मनाने त्याला समजून आले की त्याच्या संशयाची भारी किंमत म्हणजे मुलाच्या जीवाचा नाश होईल. जो मनातील विचार जाणतो व ज्याला सर्व काही शक्य आहे अशाच्या समक्षतेत तो आहे हे त्याला माहीत होते. दुःखाने व्याकूळ होऊन अंमलदार म्हणाला, “प्रभुजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा.” याकोबाने दूताबरोबर झगडताना जे उद्गार काढिले, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही.” उत्पत्ति ३२:२६. अशाच प्रकारचा ख्रिस्तावरील विश्वास अंमलदाराने व्यक्त केला. DAMar 155.4

याकोबाप्रमाणे तो वर्चस्व पावला. गरज सादर करून विनंती करणाऱ्या व त्याला चिकटून राहाणाऱ्या आत्म्यापासून उद्धारक माघार घेऊ शकत नाही. त्याने म्हटले, “जा, तुझा मुलगा वाचला आहे.’ त्याच्या आयुष्यात कधी एवढा आनंद झाला नव्हता अशा आनंदी मनस्थितीत तो अंमलदार निघून गेला. त्याचा मुलगा जीवंत राहील एवढेच नाही तर ख्रिस्त उद्धारक आहे असा दृढ विश्वास त्याचा झाला. DAMar 156.1

त्याच समयी कफर्णहूमात मरणाच्या पंथास लागलेल्या मुलाच्या जीवनात आकस्मात गूढार्थ बदल झाल्याचे दिसले. मुलाच्या चेहऱ्यावरील मरणाची अवकळा दूर झाली. अंगातील ताप नाहीसा होऊन अंगावर आरोग्याचा टवटवीतपणा दिसला. मंद डोळे अक्कल हुशारीने तेजस्वी झाले, दुर्बल व कृश शरीर निकोप व बळकट बनले. होणारा त्रास समूळ नाहीसा झाला. फणफणणाऱ्या तापाचे शरीर मऊ व ओलसर झाले होते आणि त्याला आता गाढ निद्रा लागली होती. कडक उन्हाच्या वेळी त्याचा ताप गेला होता. कुटुंबातील सर्वांना आचंबा वाटला व सर्वांनी अति हर्ष केला. DAMar 156.2

काना कफर्णहूमपासून फार दूर नव्हते आणि अंमलदार येशूला भेटल्यानंतर संध्याकाळपर्यंत घरी पोहंचला असता; परंतु परत घरी येताना त्याने घाई केली नाही. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोहंचला. त्याचे हे घरी परतणे किती आनंदाचे! येशूला भेटण्यास जात असतांना त्याचे अंतःकरण दु:खाने भरलेले होते. सूर्यप्रकाश निष्ठूर झाल्याचे व पक्षाचे मंजूळ गाणे चेष्टा, उपहास भासले होते, परंतु त्याच्या भावना आता किती वेगल्या होत्या! निसर्गावर नवीन छटा दिसली. नवीन दृष्टी आली. प्रातःकाळाच्या प्रशांत वातावरणात प्रवास करताना सबंध सृष्टी त्याच्याबरोबर स्तुतीगान गात असल्याचे भासले. घरापासून दूर आहे तो पर्यंतच त्याचे दास त्याला भेटण्यासाठी व चिंतातूर अंतःकरणाला दिलासा देण्यासाठी आले. त्यांनी दिलेल्या माहितीने त्याला एवढे आश्चर्य वाटले नाही, परंतु त्यांना ज्ञात नसलेल्या विचाराने त्याने विचारले त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला. त्यावर त्यांनी म्हटले, “काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला.” “तुझा मुलगा वाचला आहे’ हे काढलेले उद्गार पित्याच्या विश्वासाने ज्या क्षणी घट्ट पकडले, समजून घेतले, खात्री करून घेतली त्याच वेळी, दिव्य प्रेमाने मुलाला स्पर्श केला. DAMar 156.3

पुत्राला भेटण्यासाठी पिता घाई करितो. मरणातून जीवंत झालेला समजून मनापासून त्याला तो प्रेमाचे अलिंगन देतो आणि देवाचे पुन्हा पुन्हा ह्या अद्भुत जीवदानाबद्दल अभार प्रदर्शन करितो. DAMar 157.1

ख्रिस्ताविषयी अधिक माहिती मिळविण्यास अंमलदार आतुर झाला. अधिक माहिती मिळाल्यावर, शिक्षण घेतल्यावर अंमलदार व त्याचे घराणे शिष्य झाले. त्यांच्या क्लेशाचे पवित्रिकरण सबंध घराण्याचा पालट होण्यामध्ये झाले. ही बातमी सर्वत्र पसरली. कपर्णहूम येथे त्याची महान कार्ये घडून आली आणि अशा रीतीने ख्रिस्ताच्या वैयक्तिक सेवाकार्याचा मार्ग सुकर झाला. DAMar 157.2

कपर्णहूमातील अंमलदाराला ज्याने आशीर्वादीत केले तो आम्हाला कृपाप्रसाद द्यायला आतुर आहे. परंतु त्या दुःखी पित्याप्रमाणे आम्ही जगीक लाभासासाठी व आमची विनवनी मान्य झाल्यावर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार होतो. आमच्या विनंतीपेक्षा अधिक आशीर्वाद देण्यास आमचा उद्धारक तयार आहे; आमच्या अंतःकरणातील दुष्ट हेतू आमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व त्याच्या कृपेची आमची अति निकड दाखविण्यासाठी तो आमच्या प्रार्थनेचे उत्तर देण्यास विलंब करितो. त्याचा शोध करताना आम्ही स्वार्थी हेतू सोडून द्यावा अशी त्याची इच्छा आहे. आमची असहाय्यता व मोठी उणीवता आम्ही मान्य केली पाहिजे आणि त्याच्या प्रेमास्तव आम्ही स्वतःवर विश्वास ठेविला पाहिजे. DAMar 157.3

विश्वास ठेवण्याअगोदर त्याची विनवणी मान्य झाली पाहिजे असे अंमलदाराला वाटत होते; परंतु त्याची विनंती ऐकली व ती मान्य करण्यात आली ह्या येशूच्या शब्दाचा स्वीकार त्याला प्रथम करावा लागला. हा पाठ आम्हीही शिकला पाहिजे. देव आमचे ऐकतो हे पाहिल्यावर किंवा अनुभव घेतल्यावर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असे नाही. त्याच्या आश्वासनावर आमचा विश्वास असला पाहिजे. विश्वासाने जेव्हा आम्ही त्याच्याजवळ जातो तेव्हा प्रत्येक विनवणी देवाच्या अंतःकरणात भिडते. जेव्हा आशीर्वादाची याचना करितो तेव्हा तो आशीर्वाद लाभणार असा विश्वास धरला पाहिजे, आणि मिळाल्याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजे. त्यानंतर नित्याच्या कामाला आम्हाला लागले पाहिजे आणि अत्यावश्यकतेप्रमाणे ते आशीर्वाद मिळतील ही खात्री बाळगली पाहिजे. हे आमच्या हातून घडल्यानंतर आमच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या आहेत हे आम्हाला समजेल. देव आमच्यासाठी “फारच फार” “आपल्या ऐश्वर्याच्या संपतीप्रमाणे” आणि “त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीप्रमाणे करील.” इफिस ३:२०, १६; १:१९. DAMar 157.4