Go to full page →

अध्याय २—निवडलेले लोक DAMar 15

हजार वर्षापेक्षा अधिक दिवस उद्धारकाच्या आगमनाची यहूदी लोक मार्गप्रतीक्षा करीत होते. ह्या घटनेवर त्यांची उज्वल आशा केंद्रित झाली होती. गाणी, भाकीते, मंदिरातील विधि, आणि गृह उपासना यांच्यामध्ये त्याचे नाव नेहमी प्रेमाने स्मरले जात होतो. असे असताना त्याच्या आगमन समयी ते अजाण राहिले. ही स्वर्गीय दिव्य व्यक्ती “त्यांच्यापुढे रोप्यासारखी, रूक्ष भूमीतील अंकुरासारखी होती; त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती; त्याजकडे पाहिले तर त्याजवर मन बसेल असे त्याच्याठायी सौंदर्य नव्हते.” “तो स्वकीयाकडे आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.” यशया ५३:२; योहान १:११. DAMar 15.1

असे असताही देवाने इस्राएल लोकांना निवडले. उद्धारकाचे स्मरण करून देणारी सांकेतिक चिन्हे, भाकीते आणि त्याच्या नियमांचे ज्ञान त्यांनी आपणामध्ये राखून ठेवावे म्हणून त्यांना सांगण्यात आले. जगाला त्यांनी मुक्तिदानाचा उफळता झरा बनावे अशी त्याची इच्छा होती. तात्पुरत्या मुक्कामामध्ये आब्राहामाने जी भूमिका पार पाडली, मिसर देशामध्ये योसेफाने जी कामगिरी उरकली आणि बाबेलोनच्या दरबारात दानीएलाने जो प्रभाव पाडला त्याचप्रमाणे आसपासच्या राष्ट्रांमध्ये यहूदी लोकांनी कार्य करायचे होते. त्यांना देवाचे प्रगटीकरण लोकापुढे करायचे होते. DAMar 15.2

आब्राहामला दिलेल्या पाचारणात देवाने म्हटले, “तुझे मी कल्याण करीन; ... तू कल्याणमूलक हो; ... तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील.” उत्पत्ति १२:२, ३. संदेष्ट्यांच्याद्वारे त्याच शिकवणीच्या, बोधाची पुनरावृत्ति केली. लढाई आणि पाडाव यांच्याद्वारे इस्राएलांची जरी हानी झाली होती तरी अभिवचन त्यांच्यासाठी होते. “जसे परमेश्वरापासून दहिवर येते व पर्जन्य गवतावर वर्षतो आणि तो मनुष्यासाठी पडण्याचा थांबत नाही, किंवा मानवजातीसाठी खोळंबून राहात नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक बहुत लोकांत पसरतील.” मीखा ५:७. यरुशलेमातील मंदिराविषयी यशया संदेष्ट्याच्याद्वारे म्हटले, “माझे मंदिर हे सर्व राष्ट्रासाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील.’ यशया ५६:७. DAMar 15.3

परंतु इस्राएल लोकांनी आपल्या आशा ऐहिक मोठेपणा आणि वैभव यावर केंद्रित केल्या होत्या. कनान देशात पदार्पण केल्यापासून ते देवाच्या नियमापासून घसरले, मार्गभ्रष्ट झाले आणि त्यांनी इतर राष्ट्रांचे मार्ग चोखाळले, अनुसरले. देवाने आपल्या संदेष्यांच्याद्वारे पाठविलेले इशारेवजा संदेश निरर्थक ठरले. विदेशी लोकांची गांजवणूक आणि छळ त्यांनी विनाकारण भोगला. प्रत्येक धर्मसुधारणेच्या चळवळीनंतर गंभीर व तिव्र धर्मभ्रष्टता येते. DAMar 16.1

इस्राएल लोक देवाशी एकनिष्ठ राहिले असते तर त्याने त्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा याद्वारे आपला उद्देश साध्य करून घेतला असता. त्यांनी प्रामाणिकपणे आज्ञापालन केले असते तर त्याने त्यांना “प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान याबाबतीत श्रेष्ठ केले असते.” मोशेने म्हटले, “परमेश्वराचे नाम तुला दिले आहे हे पृथ्वीवरील राष्ट्रे पाहातील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल.” “हे सर्व विधि ऐकणारी राष्ट्रे म्हणतील की हे मोठे राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.” अनुवाद २६:१९; २८:१०; ४:६. परंतु त्यांच्या बेइमानीपणामुळे देवाचा उद्देश सतत चाललेल्या विपत्तीतून आणि पाणउतारा व मानभंग यांतून घडवून आणावा लागला. DAMar 16.2

बाबेलोनच्या कबज्यात आल्यावर ते सर्व इतर देशात पसरले. पीडा, दुःख यामध्ये असतांना पुष्कळांनी त्याच्याबरोबर केलेल्या कराराशी एकनिष्ठ राहाण्याविषयी पुनश्च निग्रह केला. वाळुजाच्या झाडावर आपले विणे लटकत ठेवून उध्वस्त झालेल्या पवित्र मंदिराबद्दल शोक करीत असताना त्यांच्याद्वारे सत्य प्रकाश चमकत होता आणि देवाचे ज्ञान राष्ट्रांच्यामध्ये पसरत होते. विदेशी लोकांनी चालवलेली विधि संस्कारातील यज्ञार्पणाची पद्धत देवाने घालून दिलेल्या पद्धतीचा विपर्यास होता; मनापासून विधि संस्काराचे पालन करणाऱ्या विदेशी लोकांनी इब्री लोकापासून देवाने लावून दिलेला त्यातील अर्थ जाणून घेतला आणि विश्वासाने उद्धारकाच्या आश्वासनाचे आकलन करून घेतले. DAMar 16.3

पाडाव करून नेलेल्या पैकी पुष्कळांना छळाला तोंड द्यावे लागले. त्यातील बहुतेक लोकांना शब्बाथाची पायमल्ली करण्याचे नाकारल्याबद्दल आणि इतर राष्ट्राचे सण साजरे न केल्याबद्दल आपले प्राण गमावावे लागले. सत्य दडपून टाकण्यासाठी मूर्तिपूजक उठले होते, त्याच समयी प्रभूने आपल्या भक्तांना राजे आणि अधिकारी, सत्ताधारी यांच्यासमोर येऊ दिले अशासाठी की, त्यांना आणि त्यांच्या लोकांना प्रकाश मिळावा. ज्या देवाची इब्री गुलामानी पूजा, आराधना केली त्या देवाचे श्रेष्ठत्व वेळोवेळी थोर बादशहानी घोषीत केले होते. DAMar 16.4

बाबेलोनच्या गुलामगिरीने इस्राएल लोकांना मूर्तिपूजेपासून सुरक्षीत राखले होते. त्यानंतर काही शतकात त्यांच्या शत्रूपासून त्यांना जूलूम सहन करावा लागला. शेवटी त्यांची खात्री झाली की, त्यांची उन्नती देवाची आज्ञा पाळण्यावर अवलंबून आहे. परंतु बहुतेक लोकांचे आज्ञापालन प्रेमप्रेरित नव्हते. हेतु स्वार्थी होता. राष्ट्रीय श्रेष्ठत्व प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी देवाची मुखस्तुती केली. ते जगाचा प्रकाश बनू शकले नाहीत. परंतु मूर्तिपूजक बनण्याच्या मोहापासून निसटण्यासाठी ते जगापासून अलिप्त राहिले. मोशेद्वारे दिलेल्या शिकवणीमध्ये मूर्तिपूजक लोकाबरोबर सहभाग करण्यावर देवाने निबंध घातले होते; परंतु ह्या शिकवणीचा गैर अर्थ केलेला होता. विधर्मी लोकांच्या आचरणाशी एकरूप न होण्याचा त्यामध्ये मुख्य उद्देश होता. परंतु त्याद्वारे इस्राएल आणि इतर राष्ट्रे विभक्त ठेवण्यासाठी मोठी भींत बांधण्याचा प्रयत्न झाला. यहूदी लोक यरुशलेम नगरीकडे स्वर्ग या नात्याने पाहू लागले आणि कदाचित प्रभु इतर राष्ट्रावर दया दाखवील याबद्दल त्यांना हेवा वाटत होता. DAMar 16.5

बाबेलोनवरून परतल्यावर धार्मिक शिकवणीकडे अधिक लक्ष पुरविले. देशभर प्रार्थना मंदिरे उभारली. याजक आणि धर्मपुढारी नियमावर सविस्तर स्पष्टीकरण करू लागले. प्रशाळांच्या स्थापना करण्यात आल्या. तेथे कला व विज्ञान याबरोबर धार्मिक तत्त्वांचा अभ्यास सुरू केला. परंतु ही साधने भ्रष्ट झाली. पाडावपणाच्या काळात पुष्कळांनी विदेशी कल्पना आणि रूढी स्वीकारल्या आणि त्यांच्या धार्मिक विधीमध्ये त्या घुसडल्या. अनेक बाबतीत त्यांनी मूर्तिपूजक रुढींना आणि चालीरितींना पुष्टी दिली. DAMar 17.1

देवापासून बहकल्यावर बहुतेक यहूदी लोकांना त्यांच्या धार्मिक विधि संस्काराचा विसर पडला. हा विधिसंस्कार ख्रिस्ताने स्वतः प्रस्थापीत केला होता. त्यातील प्रत्येक अंग ख्रिस्तीविषयीचे चिन्ह होते; आणि ते चेतनात्मक असून त्यामध्ये जीवंतपणा होता आणि आध्यात्मिक सौंदर्याने ते नटले होते. परंतु या विधीतील आध्यात्मिक जीवनाला यहूदी लोक पारखे झाले आणि त्यातील मृत औपोचारीकतेला त्यांनी कवटाळले. हे विधिसंस्कार आणि अर्पणे ज्याचे दर्शक होते त्याच्यावर भरवसा ठेवण्याच्या ऐवजी स्वतःचेच हीत पाहाण्याचा त्यांनी विचार केला. ह्या कृतीद्वारे त्यांची झालेली हानी भरून काढण्यासाठी याजक आणि धर्मपुढाऱ्यांनी स्वतःच्याच भरमसाठ हक्काच्या मागण्या घुसडून टाकल्या. त्यामध्ये जशी त्यांनी कडक ताटर भूमिका घेतली तसे देवाच्या प्रेमाचे प्रगटीकरण विरळ झाले. किती विधिसंस्कार उरकले यावर त्यांनी आपल्या पावित्र्याचे मूल्यमापन केले. त्याच वेळी त्यांची अंतःकरणे गर्व आणि ढोंगीपणा यांनी भरलेली होती. DAMar 17.2

अगदी बारीक सारीक जाचक मनाई हुकूमामुळे विधि नियम पाळणे अगदि अशक्य होते. देवाची सेवा करणारे इच्छूक, आणि पुढाऱ्यांचे तंतोतत हुकूमनामे पाळणारे यांना जड ओझ्याखाली रखडावे लागले, यामध्ये त्यांचा सदसदविवेक त्यांच्या मनाला शांती देत नव्हता. अशा रीतीने सैतान लोकांची निराशा करण्यात, देवाच्या स्वभावाविषयी क्षुद्र विचार पुढे मांडण्यात आणि त्याद्वारे इस्राएलाच्या विश्वासाला विकृत स्वरूप देण्यात गुंतलेला होता. बंडाच्यावेळी स्वर्गामध्ये त्याने जी वल्गना केली तिची प्रतिस्थापना करण्याचा त्याचा विचार होता, - देवाची हक्काची मागणी अन्यायी असून तिचे पालन करू शकत नाही. इस्राएलानेसुद्धा आज्ञापालन केले नाही असे त्याने म्हटले. DAMar 17.3

यहूदी लोकांनी मशीहाच्या आगमनाची अपेक्षा केली परंतु त्यांना त्याच्या कार्याविषयी खरी कल्पना नव्हती. पापापासून मुक्ती मिळण्याची त्यांनी याचना केली नाही तर रोमी साम्राज्यापासून सुटका करून घेण्यास ते फार आतूर होते. विजेता या नात्याने मशीहाने यावे, जुलमी सत्ता उधळून टाकावी, आणि इस्राएलाला सर्वव्यापक राज्यपद मिळवून द्यावे अशी त्यांची दाट इच्छा, अपेक्षा होती. अशा प्रकारे उद्धारकाला नाकार करण्याचा मार्ग त्यांना मोकळा झाला होता. DAMar 18.1

ख्रिस्त जन्माच्या वेळी राष्ट्र विदेशी सत्ताधिकाऱ्याखाली संतापून गेले होते आणि अंतर्गत झगड्यामुळे सतावून गेले होते. वेगळा राज्य कारभार चालविण्यास यहूदी लोकांना परवानगी दिली होती; परंतु ते रोमी जोखडाखाली होते याविषयी संशय नव्हता. कारण त्यांच्या सत्तेशी त्यांना समेट करून घ्यावे लागे. महायाजकाला पदावर नियुक्त करण्याचा किंवा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार रोमचा आहे असे ते प्रतिपादन करीत असे. हा अधिकार बहुदा दगलबाजी, लाचलुचपत आणि खून याद्वारे सुद्धा सुरक्षित ठेवण्यात आला होता. तरी सुद्धा याजकांना फार मोठा अधिकार होता आणि त्याचा उपयोग स्वार्थासाठी ते करून घेत असे. त्यांनी निष्ठुरतेने केलेली मागणी लोकांना पूरी करावी लागे आणि तसेच रोमी अधिकाऱ्यांना जाचक कर भरावा लागे. ह्या परिस्थितीमुळे सर्वत्र असंतोष निर्माण झाला होता. वारंवार लोकांचा उद्रेक स्फोट होत असे. हांव आणि जुलूम-दांडगाई, अविश्वास आणि आध्यात्मिक उदासीनता राष्ट्राचे हृदय कुरतडून टाकीत होते. DAMar 18.2

रोमी साम्राज्याविषयी द्वेष आणि राष्ट्रीय आणि धार्मिक अभिमान यामुळे यहूदी लोक आपल्या उपासनेतील पद्धत-शिष्टाचार काटेकोरपणे पाळत होते. धार्मिक विधिसंस्कार कडक रीतीने पाळून याजक पावित्र्याची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करीत होते. अज्ञानात आणि जुलमाखाली असलेले लोक, आणि सत्तेसाठी हपापलेले अधिकारी, राजे येणाऱ्याची आतुरतेने अपेक्षा करीत होते. तो येऊन शत्रूचा विध्वंश करून इस्राएलांना त्यांचे राज्य त्यांना परत देईल, असे त्यांना वाटत असे. त्यांनी भाकीतांचा अभ्यास केला होता परंतु त्यांना आध्यात्मिक अर्थबोध झाला नव्हता. अशा प्रकारे त्यांनी ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या विनम्रपणाचा उल्लेख केलेल्या शास्त्रवचनाकडे दुर्लक्ष करून त्याच्या द्वितियागमनाच्या गौरवाचा गैरअर्थ लावला. अहंकाराने त्यांची दूरदृष्टि मंदावली. आपमतलबी इच्छेनुसार त्यांनी भाकितांचा अर्थ लाविला. DAMar 18.3