Go to full page →

अध्याय ३—“काळाची पूर्णता” DAMar 19

“परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले... ह्यांत उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांस त्याने खंडणी देऊन सोडवावे, आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. गलती ४:४, ५. DAMar 19.1

तारणाऱ्या (येशूच्या) जन्माविषयीचे भाकीत एदेन-बागेतच करण्यात आले होते. आदाम हव्वेने जेव्हा हे भाकीत प्रथम ऐकले तेव्हाच, लवकरात लवकर त्याची पूर्तता होण्याची ते वाट पाहू लागले. म्हणूनच त्यांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचे, तोच तारणारा असावा असे समजून सहर्षे स्वागत केले. परंतु त्या अभिवचनाची पूर्तता होण्यास खोळंबा झाला. ज्यांना हे अभिवचन देण्यात आले होते ते त्याची पूर्तता होण्यापूर्वीच गतप्राण झाले. त्याच्या जन्माची आशा जागृत ठेवूनच, अगदी हनोखाच्या काळापासून ते कुलपुरुष व संदेष्टे यांच्या काळापर्यंत अभिवचनाची पुनरावृति करण्यात आली होती, परंतु त्याचा जन्म झाला नाही. दानीएलाच्या भाकीताद्वारे त्याच्या आगमनाचा समय प्रगट केला होता, परंतु सर्वांनाच त्याचे स्पष्टीकरण करता आले नव्हते. शतकामागून शतके मागे पडली; संदेष्ट्यांचे भाकीत करणे बंद पडले. जुलमी राजे इस्राएल लोकांचा अनन्वीत छळ करूं लागले, यामुळे अनेक इस्राएल लोकांच्या मुखातून, “दिवस लांबत चालले आहेत; प्रत्येक दृष्टांत निष्फळ होत आहे.” यहेज्के. १२:२२. असे उद्गार बाहेर पडू लागले. DAMar 19.2

तथापि, विराट आकाशगंगेतील नेमस्त मार्गात भ्रमण करणाऱ्या ताऱ्याप्रमाणे दैवी योजनांच्या कालचक्राला ‘ना घाई-गडबड वा दिरंगाई!’ गडद अंधार व तप्त भट्टी या रूपकाद्वारे देवाने अब्राहामाला इस्राएल लोकांच्या दास्य कालाचे प्रगटीकरण केले होते. त्यांच्या दास्याचा कालावधी चारशे वर्षांचा असेल असेहि विदित केले होते. त्याचप्रमाणे तो असेहि म्हणाला होता की, “त्यानंतर ते बहुत धन घेऊन तेथून निघतील.” उत्पत्ति १५:१४. देवाच्या या शब्दाविरूद्ध फारोच्या ताठर साम्राज्याने व्यर्थ लढाई केली, कारण देवाच्या अभिवचनाबरहुकूम, “बरोबर त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशांतून बाहेर निघाल्या.” निर्गम १२:४१. तद्वत स्वर्गीय सल्लामसलतीच्या सभेमध्ये येशूच्या आगमनाचा (जन्माचा) समय निश्चित करण्यात आला होता आणि महान कालचक्राने निर्दिष्ट केलेल्या घटकेलाच बेथलेहेमात येशूचा जन्म झाला. DAMar 19.3

“परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले.” तारकाच्या जन्मासाठी जगाची तयारी होईपर्यंत, दैवी साहाय्याद्वारे राष्ट्रांच्या हालचाली, मानवाचा आवेश व सत्ता यांना योग्य मार्ग दाखविण्याचे कार्य चालू ठेवण्यात आले होते. सर्व राष्ट्रे एकछत्री अंमलाखाली एकवटली होती. दूरपर्यंत एकच बोली भाषा वापरात येत होती, आणि त्याच भाषेला वाङमयीन भाषा म्हणून मान्यता देण्यात आली होती. जगभर पांगलेले यहूदी लोक वार्षिक सणाच्या निमित्ताने यरुशलेमांत एकत्र जमत असत. तेथून आपापल्या मुक्कामी परतल्यानंतर ते सर्व जगभर मशीहाच्या आगमनाची (जन्माची) बातमी देत असत. DAMar 20.1

अगदी याच काळांत लोकांवरील विदेशी पद्धतीची (रुढीची) पक्कड ढिली होत होती. नक्कली (असत्य) कथा आणि भपकेदार वाच्यता या गोष्टींना लोक कंटाळून गेले होते. मानसिक समाधान प्राप्त करून देणाऱ्या धर्मासाठी ते भूकेले झाले होते. लोकांतून सत्याचा प्रकाश नाहींसा झाला असतांना काही लोक त्या प्रकाशाची वाट पाहात होते, तर काही लोक दुःखाने व गोंधळाने ग्रासले होते. ते जीवंत देवाच्या ज्ञानासाठी व मरणापलीकडच्या अनंतकालीक जीवनाच्या आश्वासनासाठी तहानेने व्याकूळ झाले होते. DAMar 20.2

यहूदी लोक देवापासून दुरावले, तेव्हा विश्वास मंदावला, भविष्यकाळावर प्रकाशझोत टाकणारी आशा जवळ जवळ नाहीशी झाली. संदेष्ट्यांची संदेशवचने अनाकालनिय ठरली गेली. बहुसंख्य लोकांना मृत्यू एक भयानक गूढच ठरले गेले; त्याच्यापलीकडे अनिश्चितता व औदासीन्य या शिवाय दुसरे काही दिसत नव्हते. “राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे, आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.’ मत्तय २:१८. हा रामा येथील आकांत म्हणजे बेथलहेमातील मातांचा केवळ विलाप नव्हता, तर मानवजातीचा आक्रोश होता - शेकडो वर्षापासून हा संदेश संदेष्ट्यांना दिलेला होता. सांत्वन न पावलेले लोक “मृत्यूच्या प्रदेशांत व छायेत होते. ते उत्कट आशाळभूत नजरेने तारकाच्या आगमनाची वाट पाहात होते, कारण त्या नंतरच निबिड अंधार नाहीसा होणार होता आणि भविष्यकाळातील गूढ स्पष्ट होणार होते. DAMar 20.3

यहूदी राष्ट्राच्या बाहेरही असे काही लोक होते की ज्यांनी स्वर्गीय गुरूच्या आगमनाविषयी भाकीत केले होते. ते सत्याचा शोध करणारे लोक होते, आणि त्यांना दैवी प्रेरणा देण्यात आली होती. असले गुरू, अधारांत तेजस्वीपणे आकाशांत चमकणाऱ्या ताऱ्यासारखे एकामागून एक उदयास येत होते. त्यांच्या भाकीतांकित शब्दांनी हजारो विदेशी लोकांच्या अतःकरणांत आशेचा प्रकाश प्रज्वालित करण्यात आला होता. DAMar 20.4

शेकडो वर्षापासून पवित्र वचनाचे भाषान्तर समग्र रोमी साम्राज्यात बोलल्या जाणाऱ्या ग्रीक भाषेत केले होते. यहूदी लोक सर्वत्र पसरले असल्यामुळे मशीहाच्या आगमनाच्या त्यांच्या अपेक्षेमध्ये विदेशीही काही प्रमाणांत भागीदार झाले होते. यहूदी सारखेच दिसणाऱ्या विदेशी लोकांत असे काही लोक होते की ज्यांना मशीहाविषयी इस्राएलातील गुरूपेक्षाही अधिक ज्ञान होते. पापापासून तारणारा म्हणून तो येणार आहे या दृष्टिकोणातून त्याच्या आगमनाची वाट पाहाणारेही त्याच्यांत काही लोक होते. तत्वज्ञान्यानी इस्राएलाच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यहूद्याच्या धर्मवडेपणामुळे सत्य प्रकाशाच्या प्रसाराला अडसर निर्माण केला गेला. स्वतःमध्ये व इतर राष्टांमध्ये अलगपणा जतन करण्याच्या हेतूने, ते त्यांच्याजवळ असलेल्या रुपकात्मक सेवेचे ज्ञान इतरांना देण्यास अनैच्छुक होते. त्यासाठी रूपकांचा अर्थ माहीती असणारा अवतरणे आवश्यक होते. ही रूपके ज्याचे प्रतीक होती त्यानेच त्या सर्वांचा अर्थ स्पष्ट करायला हवा होता. DAMar 21.1

निसर्ग, प्रतिके आणि चिन्हें, त्याचप्रमाणे कुलाधिपती (मूळपुरुष), व संदेष्टे यांच्याद्वारे देवाने जगाला सर्व काही निवेदन केले होते. या सर्व बाबी मानवाला मानवाच्या भाषेतच शिकविण्याची गरज होती. करारनामा घेऊन येणाऱ्या दूतानेच त्याचा अर्थ समजून सांगितला पाहिजे. त्याचा आवाज त्यांच्याच मंदीरात ऐकला गेला पाहिजे. त्याच्या वचनाचा स्पष्टपणे व निश्चितार्थाने उलघडा होण्यासाठी ख्रिस्ताने येऊन स्वतःच समजून देणे आवश्यक आहे. जो सत्याचा जनक आहे त्यानेच मानवी निष्फळ वाच्यतेपासून सत्याला अलग केले पाहिजे. देवाच्या राज्यकारभाराची भूलभूत तत्त्वे आणि तारणाची योजना यांचे यथार्थ स्पष्टिकरण होणे आवश्यक आहे. जुन्या करारातील सर्व विषय लोकांच्यापुढे सविस्तरपणे मांडले गेले पाहिजेत. DAMar 21.2

ज्याच्याद्वारे देवाविषयीचे ज्ञान जतन करून ठेवण्यात आले होते असे, नीतिमान वंशावळीतील संतानापैकी यहूदी लोकांत अजूनही काही खंबीर लोक होते, ते त्यांच्या वाडवडीलांना देण्यात आलेल्या अभिवचनाची अजूनही आशेने वाट पाहात होते. “प्रभु देव माझ्यासारिखा संदेष्टा तुम्हांसाठी तुमच्या भावामधून उठवील; तो जे काही तुम्हांला सांगेल ते सर्व त्याचे ऐका.’ प्रेषित. ३:२२. असे मोशेने जे आश्वासन दिले होते त्यावर लक्ष ठेवून त्यांनी त्यांचा विश्वास बळकट केला. या शिवाय, “दीनांस शुभवृत्त सांगण्यास,’ ‘भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांस मुक्तता,” “परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष,’ यशया ६१:१, २, विदित करावे यासाठी परमेश्वर एकाचा कसा अभिषेक करणार होता हे सुद्धा त्यांच्या वाचण्यात आले होते. त्याचप्रमाणे परमेश्वर “पृथ्वीवर न्याय,” कसा स्थापन करील, “द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतिक्षा,” कशी करतील, “राष्ट्र,” त्याच्या “प्रकाशाकडे,” व “राजे उदयप्रभेकडे,” कसे येतील अशी विधानेही त्यांनी वाचली होती. (यशया ४२:४; ६०:३). DAMar 21.3

“यहूदाकडचे राजवेत्र ज्यांचे आहे तो येईतोवर ते त्याजकडून जाणार नाही, शासनदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही;” उत्पत्ति ४९:१०. याकोबाच्या या शेवटल्या शब्दामुळे ते उत्साहाने पूर्णपणे भारावून गेले. इस्राएल सत्तेचा हास मशीहाच्या नजीकच्या काळांत होणाऱ्या आगमनाची साक्ष पटवीत होता. “दानीएलाच्या भाकीताने देवाच्या राज्याचे शब्दचित्र असे रेखाटले आहे की जगांत स्थापिल्या जाणाऱ्या सर्व साम्राज्यापेक्षां देवाच्या राज्याचे वैभव अधिक असेल. हे विदित करताना संदेष्टा म्हणाला. “देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही;” दानी. २:४४. तथापि, येशूच्या सेवाकार्याचे स्वरूप फारच थोडक्या लोकांना समजून आले होते, इस्राएल राष्ट्राची मुक्तता करणाऱ्या पराक्रमी राजाची सर्वत्र आणि जास्तीत जास्त अपेक्षा केली जात होती. DAMar 22.1

काळाची पूर्णता झाली. वर्षावर्षीच्या पापाच्या पगड्यामुळे संपूर्ण मानवजातीच्या नैतिक अधःपाताची निच्च्यावस्था तारकाच्या आगमनाला आमंत्रणच ठरले गेले. सैतान स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये दुर्गम व अति खोल दरी खोदण्याच्या कामी कार्यरत राहिला होता. त्याच्या बनावट मार्गाने त्याने मानवाला पाप करण्यास उत्तेजित केले होते. सैतान हेतुपुरस्सर देवाची सहनशीलता कमी करण्याच्या आणि प्रेमज्योत विझविण्याच्या कामी लागला होता, यासाठी की, सर्व जग त्याच्या (सैतानाच्या) अंमलाखाली सोडून देण्यास देवाला भाग पडेल. DAMar 22.2

सैतानाला लोकांचे लक्ष पवित्रस्थानापासून इतरत्र फिरवता यावे, व त्याचे राज्य त्याला प्रस्थापित करता यावे म्हणून तो लोकांसाठी देवाच्या ज्ञानाचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न करीत होता, आणि वर्चस्वप्राप्तीचा त्याचा लढा जवळ जवळ पूर्णपणे यशस्वी झाल्यासारखे वाटत होते. प्रत्येक पिढीत देवाने त्याचे कार्यकर्ते ठेवले आहेत हे मात्र सत्य आहे. विदेशी लोकांतसुद्धा अशी काही माणसे होती की ज्याच्याद्वारे ख्रिस्त लोकांना त्याच्या पापातून व अवनतितून वर काढण्याचे कार्य करीत होता. परंतु अशा लोकांचा तिरस्कार व द्वेष करण्यात आला. सैतानाने जगावर पसरलेली अंधाराची छाया अधिक गडद बनली. DAMar 22.3

अनेक वर्षापासून सैतान लोकांना इतर मार्गाद्वारे देवापासून दूर करीत होता, परंतु तसे पाहिले तर इस्राएल लोकांच्या विश्वासाला मुरड घालण्याबाबत त्याने मोठा विजय मिळवला होता. स्वतःच्या कल्पनावर सर्व लक्ष केद्रीत करून व त्यांनाच पूज्य मानून हे इतर लोक सत्य देवाच्या ज्ञानापासून वंचित राहिले, आणि त्यामुळे ते अधिकच भ्रष्ट बनले. अगदी तेच इस्राएल लोकांबाबत घडले. मनुष्य स्वतःचे तारण स्वतःच्या कर्मकांडाद्वारे साध्य करू शकतो हे तत्त्व इतर सर्व धर्माचा पाया बनले होते, आणि आता यहूदी धर्माचेही तेच मूलतत्व बनले होते. सैतानाने या तत्वाचे रोपण केले होते. जेथे कोठे या तत्वाचा पुरस्कार केला जातो, तेथे मानवाला पापाविरूद्ध आडभिंत उभी करता येत नाही. DAMar 22.4

लोकांना मानव या माध्यमातून तारणाचा संदेश दिला जातो. परंतु यहूदी लोकांनी सत्याची म्हणजे सार्वकालीक जीवनाची मक्तेदारी स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी जीवनी मान्न्याचा साठा करून ठेवला होता, आणि तो संचित साठा विटला (भ्रष्ट झाला) होता. त्यांनी जो धर्म स्वतःपुरता बंदिस्थ करून ठेवला होता तो त्यांच्यासाठीच अपायकारक ठरला. देवाच्या गौरवाबाबत त्यांनी देवाला ठकविले होते, आणि बनावट सुवार्तेद्वारे त्यांनी जगालाही ठकविले होते. जगाच्या तारणासाठी स्वतः देवाला समर्पित होण्यास त्यांनी नाकार दिला आणि ते त्यांच्या नाशासाठी सैतानाचे सैनिक बनले. DAMar 23.1

देवाने, ज्या लोकांना सत्याचे स्तंभ व पाया होण्यासाठी पाचारण केले होते तेच लोक सैतानाचे प्रतिनिधी बनले होते. ते त्याला अभिप्रेत असलेली म्हणजे देवाच्या शीलाचा विपर्यास करणारी कृत्ये करणे, आणि देव हा एक जुलमी राजा आहे असे जगाला भासविणे अशी कामे करीत होते. पवित्रस्थानांत सेवा करणारे खुद्द याजकच ते करीत असलेल्या सेवेचा मतितार्थ विसरून गेले होते. रूपकाच्या (प्रतिकाच्या) पलीकडे असलेल्या प्रतिकाच्या अर्थाचा शोध करणे त्यांनी थांबविले होते. यज्ञार्पणाच्या क्रियेमध्ये ते रंगभूमिवरच्या अभिनेत्यासारखेच होते. खुद्द देवाने लावून दिलेल्या धार्मिक विधींना, मनाला अंधळे करणारे आणि हृदयाला ताठर बनविणारे साधन करण्यात आले होते. म्हणून या मार्गाद्वारे मानवासाठी देवाला काहीच करता येणे शक्य नव्हते. ती सर्व पद्धत स्वच्छ करणे आवश्यक होते. DAMar 23.2

पापाने त्याचे उच्च शिखर गाठले होते. मानवाला नैतिक दृष्ट्या अवनत (भ्रष्ट) करणाऱ्या सर्व हस्तकांना कार्याला लावण्यात आले होते. देवाच्या पुत्राने जगावर नजर फिरविली तेव्हा कष्टमय क्लेश व भयानक विपत्ति त्याच्या दृष्टीस पडली. लोक सैतानी क्रौर्याला कसे बळी पडले हे त्याच्या करुणामय दृष्टीस पडले. ज्यांना कलंकित करण्यात आले होते, ज्यांचे खून पाडण्यात आले होते आणि ज्यांना परागंदा करण्यात आले होते अशाकडे त्याने केविलवाण्या नजरेने पाहिले. ज्याने त्यांना त्याच्या रथाला गुलाम म्हणून जुंपले होते त्यालाच त्यांनी त्यांचा राजा म्हणून निवड केली होती. गोंधळामुळे गांगरलले फसवणूकीमुळे हताश झालेले ते सर्व, सार्वकालिक नाशाकडेजीवनाची आशा नसलेल्या मृत्यूकडे आणि प्रभात नसलेल्या संधेकडे म्लान मुखाने मिरवत चालले होते. देवाच्या वस्तीसाठी उत्पन्न केलेले मानवी देह भूतांचा अड्डा बनले होते. मानवाची ज्ञानेंद्रिय, मज्जातन्तु, भावना, व इंद्रिये ही (सैतानी) महाशक्तीद्वारे, अधर्म व वासनांचा नको तेवढा लाड करण्याच्या कामी लावण्यात आली होती. मानवाचे चेहरे मानवाला पच्छाडलेल्या भूतांचेच परावर्तन करीत होते. मानवाच्या चेहऱ्यावर भूतांचा ठसा मारण्यात आला होता, असले हे जगाचे चित्र जगाच्या तारकाच्या दृष्टीस पडले होते. पवित्र देवाच्या दृष्टीस पडलेला काय हा भंयकर देखावा! DAMar 23.3

पाप हे विज्ञानशाखा बनले होते, आणि अवगुण हा धर्माचा पवित्र भाग बनला होता. बंडखोर प्रवृत्तीने मानवी हृदयांत आपली मूळे खोलवर पसरविली होती. मानवाचे जबरदस्त शत्रूत्व देवाच्या विरोधात उभे ठाकले होते. सर्व विश्वाला सिद्ध करून दाखवण्यात आले होते की, मानवाला देवाशिवाय इतर कोणालाही वर काढता येणार नाही. जीवनाचा व सामर्थ्याचा नवा घटक (अंश) ज्याने हे जग निर्माण केले त्यानेच दिला पाहिजे. DAMar 24.1

परमेश्वर पुढे व्हावा व अखिल पृथ्वीवरील रहिवाशांचा नाश करावा अशा अति उत्सुक भावनेने, अपतित ग्रहावरील रहिवाशी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. परमेश्वराने तसे केले असते तर, सैतान स्वर्गवाशीयांची निष्ठाप्राप्ती साध्य करून घेण्याची योजना अमलात आणण्याच्या तयारीतच होता. त्याने जाहीर केले होते की, देवराज्याच्या मुलभूत तत्वांचा हेतू असा आहे की त्यामुळे पापक्षमा होणे अगदीच अशक्य आहे. जगाचा नाश करण्यात आला असता तर, त्याने (देवावर) केलेले दोषारोप खरे ठरल्याचा दावा केला असता. देवावर दोष लादण्यास व त्याचे बंड आकाशातील इतर ग्रहावर पसरविण्यास तो सज्ज झाला होता. परंतु देवाने मात्र जगाचा विध्वंश करण्याऐवजी ते वाचविण्यासाठी स्वतःच्या पुत्राला जगांत पाठविले. अवज्ञा व भ्रष्टता सर्वत्र पसरल्यामुळे जरी हे जग विकृत झाले असले तरी त्याला पूर्वावस्था मिळवून देण्यासाठी एक मार्ग उपलब्ध होता. सैतान विजयी होणार, असे भासणाऱ्या कठीण प्रसंगीच देवाचा पुत्र देवाच्या कृपेची सनद घेऊन जगांत अवतरला. सर्व काळांत, सर्व वेळी, पतित मानवांवर देवाच्या प्रीतीची पाखर घालण्यात आली होती. लोक हेकट स्वभावी बनले होते तरीसुद्धा (देवाच्या) कृपेचा इशारेवजा संदेश सतत दिला जात होता. जेव्हा काळाची पूर्तता झाली, तेव्हा, कधीही प्रतिबंधित करता न येणाऱ्या किंवा तारणाची योजना पूर्ण होईपर्यंत मागे न घेता येणाऱ्या गुणकारी कृपावृष्टीद्वारे देवाचे गौरव करण्यात आले. DAMar 24.2

मानवजातीत देवाच्या प्रतिमेचा दर्जा कमी करण्यात सैतान यशस्वी झाला होता. म्हणून तो अत्यानंदी होता. अगदी त्याच वेळी मानवामध्ये त्याच्या उत्प्नकर्त्याची पुनर्स्थापना करण्याकरिता येशू आला. पापामुळे विध्वंश केले गेलेले शील येशू शिवाय इतर कोणीही पुन्हा नव्याने घडवू शकणार नाही. बुद्धिवर ताबा मिळविलेल्या भूतांना काढून टाकण्यास तो आला. तो आम्हांला धूळीतून वर काढण्यासाठी, कलंकित शील त्याच्या दैवी शीलाप्रमाणे निष्कलंकित करण्यासाठी, आणि ते (शील) त्याच्या वैभवमंडीत शीलाप्रमाणे मनोरम करण्यासाठी आला. DAMar 24.3