Go to full page →

अध्याय ४—तुम्हासाठी उद्धारक DAMar 25

लूक २:१-२०.

गौरवी राजाने नम्र होऊन मानवी स्वभाव (मानवता) धारण केला. पृथ्वीवरील त्याचा सभोवार निर्दय आणि टाकाऊ, निषिद्ध होता. त्याचे बाह्य ऐश्वर्य आकर्षक विषय (वस्तु) बनू नये म्हणून त्याचे वैभव आच्छादिले होते. त्याने वरचा भपका, थाटमाट टाळिला. धन, जगिक लौकिक, मानसन्मान मृत्यूपासून मानवाला कदापीही वाचवू शकत नव्हते. येशूने निश्चय केला होता की पृथ्वीवरील कोणत्याही आकर्षणाने त्याच्याकडे कोणी वळू नये. केवळ स्वर्गीय दिव्य सत्याद्वारेच अनुयायांनी त्याच्याकडे आकर्षिले जावे. फार दिवसापूर्वी येशूच्या स्वभावाविषयी भाकीत करण्यात आले होते, आणि शास्त्रवचनाच्या साक्षीवरून लोकांनी त्याचा स्वीकार करावा अशी त्याची इच्छा होती. DAMar 25.1

तारणाच्या विख्यात योजनेबद्दल देवदूतांना आश्चर्य वाटले. मानवी स्वभाव धारण केलेल्या देवपुत्राचा स्वीकार देवाचे लोक कसा करितात ह्याचे ते निरीक्षण करीत होते. निवडलेल्या लोकांच्या प्रदेशात दूत आले. इतर राष्टांचा दंतकथेवर विश्वास होता आणि ते खोट्या देवाची भक्ती करीत असे. देवाचे वैभव ज्या राष्ट्रात प्रगट झाले होते आणि भाकीतांचा प्रकाश जेथे प्रकाशत होता तेथे दूत आले. यरुशलेमातील देवाच्या मंदिरात सेवा करून वचनाचा अर्थ सांगणाऱ्या धर्मगुरूकडे ते अदृश्यरित्या आले. वेदीपुढे याज्ञिकी करणाऱ्या जखऱ्या याजकाला ख्रिस्ताच्या लवकर होणाऱ्या आगमनाविषयी अगोदरच सांगण्यात आले होते. ह्या अगोदरच घोषणा करणारा जन्मास आला होता. चमत्कार आणि भाकीत याद्वारे त्याच्या कार्याविषयी साक्ष दिली. त्याच्या जन्माची वार्ता आणि अद्भुतजन्य कार्याचे महत्त्व परदेशात प्रसार पावले होते. तथापि उद्धारकाचे स्वागत करण्यासाठी यरुशलेम नगरी तयारीत नव्हती. DAMar 25.2

पवित्र सत्य प्रकाश जगापुढे प्रकाशीत करण्यासाठी पाचारण केलेल्या देवाच्या लोकांची उदासीनता, बेपर्वाई पाहून स्वर्गातील दिव्यदूत अतिशय आश्चर्य करीत होते. आब्राहामाच्या संतानातून दावीदाच्या कुळात ख्रिस्ताचा जन्म होणार होता ह्याची साक्ष देण्यासाठी यहूदी राष्ट्र राखून ठेवण्यात आले होते, तथापि ख्रिस्ताचे येणे अगदी नजीक आहे हे त्यांना माहीत नव्हते. मंदिरात सकाळ व सांयकाळी अर्पिलेले यज्ञबली देवाच्या कोकऱ्याचे दर्शक होते, तरीसुद्धा त्याचा स्वीकार करण्यास कसलीच तयारी नव्हती. यूगातील महान घटना घडणार होती ह्या विषयी याजकगण आणि धर्मगुरू यांना किंचितही कल्पना नव्हती. अर्थहीन प्रार्थना ते गुणगुणत होते, लोकांनी पाहावे म्हणून विधि संस्कार पार पाडत होते, परंतु धनदौलत आणि ऐहिक मानमरातब मिळविण्याच्या खटपटीत मशीहाच्या प्रगटीकरणासाठी त्यांची तयारी नव्हती. तेच औदासिन्य आणि बेपर्वाई सर्व इस्राएल प्रदेशात पसरलेली होती. स्वार्थी अंतःकरणे आणि जगात तल्लीन झालेली मने यांना स्वर्गात होणाऱ्या आनंदाच्या उत्साहाचा स्पर्श झाला नव्हता. त्याला पाहाण्यासाठी थोडकेच आतुर होते. त्यांच्यासाठी स्वर्गाचा वकील पाठविला होता. DAMar 25.3

नासरेथ ते दावीदाच्या गावापर्यंतच्या प्रवासात योसेफ आणि मरीया यांना दूतांनी सहाय्य केले. आपल्या अफाट विस्तारलेल्या साम्राज्यातील लोकांची नावनिशी करण्याचा हुकूम रोमी राजाने दिला होता, आणि हा हुकूम गालीलातील डोंगराळ भागात राहाणाऱ्यासाठीही होता. प्राचीन काळात कोरेसला जागतिक बादशाहाचे पद मिळाले होते आणि तो देवाच्या लोकांना पाडावपणातून मुक्त करणार होता. त्याचप्रमाणे कैसर औगुस्त याच्या अधिकाराने देवाच्या योजनेप्रमाणे येशूच्या मातेला बेथलहेम येथे आणिले. ती दाविदाच्या घराण्यातली व गोत्रातली होती आणि दाविदाचे गोत्र दावीद नगरीत जन्माला आले पाहिजे. संदेष्ट्याने म्हटले, “हे बेथेलहेम, तुजमधून एकजण निघेल, तो मजसाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादि काळापासून आहे.’ मीखा ५:२. परंतु त्या गावातील राज घराण्यात योसेफ आणि मरीया यांना मानसन्मान आणि मान्यता नव्हती. घरदार नसलेले आणि थकलेले भागलेले अशा स्थीतीत गावाच्या वेशीपासून ते पूर्वेच्या टोकापर्यंत सबंध गाव त्यांनी पायाखाली घातला परंतु रात्रभर डोके ठेवायला त्यांना जागा मिळाली नाही. उतारशाळा गच्च भरलेल्या असल्यामुळे त्यांना तेथे जागा मिळाली नाही. शेवटी ओबड धोबड इमारतीत जनावरे बांधण्याच्या गोठ्यात त्यांना आसरा मिळाला आणि तेथे जगाचा उद्धारक जन्मास आला. DAMar 26.1

मनुष्याला हे माहीत नाही, परंतु ह्या वार्तेने स्वर्ग हर्षाने भरून जातो. प्रकाशाच्या जगातून पवित्र गण अधिक कुतूहलाने पृथ्वीकडे आकर्षिले गेले. बेथलेहमच्या टेकड्यावर असंख्य देवदूत जमा झाले. जगाला आनंदी वार्ता घोषीत करण्याच्या खूणेची वाट पाहात होते. इस्राएलातील पुढारी त्यांच्या निष्ठेशी इमानी राहिले असते तर येशूच्या जन्माच्या वार्तेची घोषणा करण्यामध्ये भाग घेऊन आनंद लुटला असता. परंतु आता त्यांना वगळण्यात आले होते. DAMar 26.2

देवाने जाहीर केले, “मी तृषित भूमीवर पाणी आणि रूक्ष भूमीवर जलधारा ओतीन.” “सात्त्विक जनांस अंधकारात सूर्यप्रकाश प्राप्त होतो.” यशया ४४:३; स्तोत्र ११२:४. प्रकाशाचा शोध करून त्याचा स्वीकार आनंदाने करणाऱ्यावर देवाच्या राजासनापासून लखलखीत प्रकाश चमकेल. DAMar 26.3

दावीद तरुण असताना ज्या शेतात मेंढरे राखीत होता तेथे मेंढपाळ अद्याप रात्रीच्या वेळी मेंढराची राखण करीत होते. निवांत आणि प्रशांत प्रहरी ते उद्धारकाच्या आश्वासनावर एकत्रीत बसून बोलत होते आणि दाविदाच्या सिंहासनावर आरूढ होणाऱ्या राज्यासाठी प्रार्थना करीत होते. “तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला; प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो; ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभु आहे.” DAMar 27.1

ह्या शब्दांनी ऐकणाऱ्या मेंढपाळांची मने गौरवाच्या दृश्याने भरून गेली. मुक्तिदाता इस्राएलामध्ये उदय पावला आहे! सामर्थ्य, उदातत्ता आणि विजय यांची त्याच्या आगमनाबरोबर सांगड सोबत झाली आहे. परंतु दारिद्य आणि नम्रता यामध्ये असलेल्या उद्धारकाची ओळख पटण्यास दूताने त्याची तयारी केली पाहिजे. तो म्हणतो, “तुम्हास खूण हीच की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बाळक तुम्हास आढळेल.” DAMar 27.2

स्वर्गीय जासूदाने त्यांची भीती घालवून दिली. येशूचा शोध कसा करायचा ते त्यांना सांगितले. मानवी दुबळेपणा जाणून त्याने सहानुभूतीने दिव्य तेजस्वीतेशी परिचीत होण्यासाठी त्यांना वेळ दिली. त्यानंतर आनंद आणि वैभव कदापीही हरण पावले नाही. देवाच्या सैन्याच्या चकचकीत प्रकाशाने सर्व पठार प्रकाशून गेले होते. पृथ्वी शांत झाली होती आणि गीत ऐकण्यासाठी स्वर्ग खालच्या पातळीवर आला, DAMar 27.3

“ऊर्ध्वलोकी देवाला गौरव
आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती
त्याजवर त्याचा प्रसाद झाला आहे.” DAMar 27.4

आज मानवजात ते गीत ओळखू शकतील! त्यावेळेस केलेली घोषणा अंतकाळापर्यंत प्रसार पावेल, दुमदुमत राहील आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत आवाजाने भरून जाईल. धार्मिकतेचा सूर्य जेव्हा उदय पावेल तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, बहुत जलप्रवाहाची वाणी व प्रचंड गर्जनांची वाणी ऐकिली जाईल, ती म्हणाली, “हालेल्या, कारण सर्व सत्ताधारी प्रभु देव याने राज्य हाती घेतले आहे.’ प्रगटी १९:६. DAMar 27.5

देवदूत निघून गेल्यावर प्रकाश दिसेनासा झाला आणि पुन्हा एकदा रात्रीचा काळोख बेथलेहमच्या टेकड्यावर पसरला. परंतु मानवी डोळ्यापुढे आलेले अति तेजस्वी चित्र मेंढपाळाच्या स्मरणात सतत घर करून राहिले, टिकून राहिले. “मग असे झाले की देवदूत त्यांजपासून स्वर्गास गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणाले, चला, आपण बेथलेहमास जाऊ, व झालेली जी ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले तो मरीया, योसेफ व गव्हाणीत निजविलेले बाळक ही त्यास आढळली.’ DAMar 27.6

आनंदाने तेथून ते निघाले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि ऐकिल्या त्या इतरांना सांगितल्या. “मग सर्व ऐकणाऱ्यांनी त्या मेंढपाळानी सांगितलेल्या गोष्टीविषयी आश्चर्य केले; परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. आणि मेंढपाळ देवाचे गौरव व स्तुती करीत माघारे गेले.” DAMar 28.1

मेंढपाळांनी दूतांचे गीत ऐकले त्यावेळेपेक्षा आता स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये अधिक अंतर नाही. साधा व्यवसाय करणारे साधी माणसे दूतांना दुपारच्या वेळी भेटली आणि बागेत व शेतात स्वर्गीय निरोप्याबरोबर बोलली त्याप्रमाणेच आजही मानवतेबद्दल स्वर्गाला कळकळ वाटते. साधे जीवन जगणाऱ्यांना स्वर्ग अगदी नजीक असू शकेल. देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणाऱ्यांच्या जाणे येण्यावर स्वर्गातील दूत नजर ठेवतात. DAMar 28.2

बेथलेहमची गोष्ट संपुष्टात न येणारा विषय आहे. त्याच्यामध्ये “देवाची संपत्ति, बुद्धि व ज्ञान” लपलेली आहेत. रोम १९:३३. स्वर्गातील राजासनाच्या ऐवजी जनावराचा गोठा आणि स्तुतीस्तोत्रे गाणाऱ्या दूतांच्या ऐवजी गोठ्यातील जनावरांची सोबत उद्धारकाने स्वीकारून केलेल्या त्यागाबद्दल आम्ही आश्चर्य करितो. त्याच्या समक्षतेत मानवी गर्व, अहंमपणा आणि स्वयंपूर्ण वृत्ती दोषी ठरतात. तथापि ही त्याच्या अद्भूत अनुग्रहाची - कृपेची सुरूवात होती. एदेन बागेत आदाम जरी निष्कलंक राहिला असता तरी मानवाचा स्वभाव धारण केल्याने देवपुत्राची अमर्याद मानखंडना झाली असती. चार हजार वर्षाच्या पापाच्या परिणामाने निकृष्ठ झालेली मानवता येशूने स्वीकारली. आदामाच्या प्रत्येक मुलाप्रमाणे अनुवंशिक नियमाने होणारे परिणामही त्याने स्वीकारले. परिणाम कोणते होते हे त्याच्या पृथ्वीवरील पूर्वजांच्या इतिहासात दाखविले आहे. अशा प्रकारची आनुवंशिकता घेऊन आमचे क्लेश आणि मोह यामध्ये वाटेकरी होण्यास आणि पापविरहीत निष्कलंक जीवनाचे उदाहरण घालून देण्यास तो आला. DAMar 28.3

स्वर्गातील देवाच्या दरबारात सैतान ख्रिस्ताच्या दर्जाचा, पदाचा द्वेष करीत होता. त्याचा पदभ्रष्ट झाल्यावर तो अधिक द्वेष करू लागला. कलंकित मानवजातीचा उद्धार करण्याची त्याने प्रतिज्ञा केल्याबद्दल त्याचा अधिकच तो द्वेष करू लागला. हे जग माझ्या अधिकाराखाली आहे असे सैतान प्रतिपादीत होता. अशा जगात लहान असहाय्य दुर्बल बालक म्हणून येण्यास देवाने मान्यता दिली. प्रत्येक मानवावर येणारे अरिष्ट आणि झगडावा लागणारा लढा यांना तोंड देण्यासाठी देवाने त्याला संमति दिली. त्यामध्ये अपजय आणि कायमचा नाश याचा धोका होता. DAMar 28.4

मानवी पित्याला पुत्राबद्दल उत्कंठा लागते. तो लहान बालकाच्या गोजीरवाण्या चेहऱ्याकडे पाहातो आणि जीवनातील येणाऱ्या अरिष्टांचा विचार करून हादरून जातो. सैतानाची शक्ती, मोह आणि झगडा यापासून त्याचा बचाव करण्यास तो आतुर होतो. कडवट लढा लढण्यासाठी आणि तीव्र धोक्याला तोंड देण्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याद्वारे आमच्या चिमुकल्यांना जीवनाचा मार्ग खात्रीदायक केला जाईल. “ह्यातच परम प्रेम आहे.” स्वर्गानो, कुतुहल, विस्मय करा! आणि पृथ्वी, आश्चर्य कर, चकित हो! DAMar 29.1