Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ५—समर्पण

    लूक २:२१-३८.

    ख्रिस्ताच्या जन्मानंतर चाळीस दिवसांनी योसेफ व मरिया यांनी त्याला प्रभूला समर्पण करण्यासाठी यरुशलेमाला नेले. यहूद्यांच्या नियमशास्त्राप्रमाणे हे होते आणि मनुष्याचा मोबदला म्हणून ख्रिस्ताने त्या नियमांचे पालन केले पाहिजे. नियमशास्त्राला आज्ञांकित राहाण्याची प्रतिज्ञा म्हणून त्याची अगोदरच सुंता झाली होती.DAMar 30.1

    यज्ञासाठी नियमशास्त्राप्रमाणे एक वर्षाचे कोकरू होमबलीसाठी आणि होला किंवा पारवा पापार्पणाच्या बलिसाठी आवश्यक होते. नियमात अशी तरतूद होती की, जर आईबाप कोकरू आणण्यास फार गरीब असेल तर त्यानी होल्याचा जोडा किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक होमबलीसाठी आणि दुसरे पापार्पणाच्या बलीसाठी आणावे.DAMar 30.2

    प्रभूला अर्पण्याचा यज्ञ निष्कलंक असावा. यज्ञ ख्रिस्ताचे दर्शक होते आणि यावरून स्पष्ट होते की, ख्रिस्त स्वतः निष्कलंक होता. “तो निष्कलंक व निर्दोष कोकरा होता.’ १ पेत्र १:१९. त्याचे शरीर डाग विरहीत होते, निकोप आणि बळकट होते. सबंध आयुष्यभर त्याने निसर्गाच्या नियमांचे पालन केले होते. शारीरिक आणि आध्यात्मिक बाबतीत तो एक नमुना होता. त्याच्या आज्ञाचे पालन करून सर्व मानवजातीने त्याच्यासारखे व्हावे अशी देवाची धारणा होती.DAMar 30.3

    प्रथम जन्मलेल्याचे समर्पण करण्याची प्रथा प्रारंभापासूनची होती. पाप्याचा उद्धार करण्यासाठी स्वर्गातील प्रथम जन्मलेला देण्याचे देवाने वचन दिले होते. प्रत्येक कुटुंबाने प्रथम जन्मलेल्या पुत्राचे समर्पण करून ह्या देणगीला मान्यता दिली पाहिजे. मानवातील ख्रिस्ताचा प्रतिनिधि म्हणून याज्ञिकी कार्यासाठी त्याला वाहून दिला पाहिजे.DAMar 30.4

    मिसर देशातून इस्राएलाची मुक्तता करते वेळेस प्रथम पुत्र अर्पण्यास पुन्हा आज्ञापिले होते. इस्राएल लोक मिसरी दास्यपणात असताना प्रभूने मोशेला मिसर देशाचा राजा फारो याच्याकडे जाऊन सांगण्यास सांगितले, “परमेश्वर म्हणतो, इस्राएल माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे; मी तुला सांगितले की माझ्या पुत्रास माझी उपासना करण्यास जाऊ दे; पण तू त्यास जाऊ देण्याचे नाकारिले तर पाहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जीवे मारीन.” निर्गम ४:२२, २३.DAMar 30.5

    मोशेने हा संदेश राजाला दिला; परंतु गर्विष्ठ राजाचे उत्तर होते की, “हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.” निर्गम ५:२. आपल्या लोकांसाठी देवाने चिन्हे व अद्भुते करून फारोला भयंकर शिक्षा दिली. शेवटी मिसर देशातील मनुष्यांचा व पशुंचा प्रथम जन्मलेल्यांचा दूताकरवी खून केला. ह्या आपत्तीतून इस्राएल लोक वाचावे म्हणून त्यांना वधलेल्या कोकऱ्याचे रक्त दाराच्या चौकटीला लावण्यास सांगितले. प्रत्येक घरावर खूण करायची होती. जेव्हा वध करणारा दूत दारावरील रक्ताची खूण पाहात असे तेव्हा तो पुढे जाई.DAMar 31.1

    मिसर देशातील लोकांना ही शिक्षा दिल्यानंतर प्रभूने मोशेला म्हटले, “इस्राएल लोकामध्ये मनुष्य व पशु या दोहोचे जे प्रथम जन्मलेले त्यास माझ्याप्रित्यर्थ पवित्र म्हणून वेगळे ठेव; ते माझे आहेत.’ “सर्व प्रथम जन्मलेले माझे, कारण ज्या दिवशी मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेले मी मारून टाकिले त्याच दिवशी इस्राएल लोकातील मनुष्य अगर पशु यांचे सर्व प्रथम जन्मलेले मी आपणासाठी पवित्र ठरविले, त्या अर्थी ते माझेच होते; मी परमेश्वर आहे.’ निर्गम १३:२; गणना ३:१३. मंदिराची सेवा प्रस्थापित केल्यावर पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी प्रभूने प्रथम-जन्माच्या जागी लेवी वंशाला निवडिले. परंतु अद्याप प्रथम जन्मलेले प्रभूचे होते असे समजण्यात आले आणि खंडणी भरून त्यांना परत आणावयाचे होते.DAMar 31.2

    अशा प्रकारे प्रथम जन्मलेल्यांचे समर्पण करण्याविषयी केलेला नियम अर्थसूचक होता. इस्राएल लोकांची, प्रभूने केलेल्या मुक्तीचे ते स्मारक जरी होते, तरी देवपुत्राने करावयाच्या महान मुक्तीचे ते दर्शकही होते. दरवाजाच्या चौकटीला लावलेल्या रक्ताने प्रथम जन्मलेल्याचा बचाव झाला तसेच जगाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य ख्रिस्त रूधिरामध्ये आहे.DAMar 31.3

    ख्रिस्ताच्या समर्पणामध्ये कोणता अर्थ सूचित केला आहे! परंतु पडद्यातून याजकाला ते दिसले नाही; त्यातील गुह्य त्याला अजमावले नाही. मुलांचे समर्पण हा नेहमीचाच प्रघात होता. बाळकांचे प्रभूला केलेल्या समर्पणाचा पैसा याजकाला दररोज मिळत असे. त्याचा हा नित्याचा परिपाठ होता. त्याने मुलांच्याकडे किंवा आईबापाकडे विशेष लक्ष दिले नाही. अधिक पैसे मिळण्याची संधि असली किंवा आईबाप गबर व दर्जेदार दिसले तरच थोडी अधिक दक्षता असे. योसेफ व मरिया गरीब होते. ते बाळकाला घेऊन आल्यावर याजकाने केवळ ते गालीली साध्या पोषाखातले पुरुष आणि स्त्री पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आकर्षक असे काहीच नव्हते आणि त्यांनी केवळ अति गरीबांना द्यावे लागणारे दान दिले.DAMar 31.4

    याजकाने विधिसंस्कार उरकला. त्याने बाळाला हातात घेतले, वेदीसमोर धरले, आणि परत मातेकडे दिले. प्रथम-जन्माच्या वहीत त्याचे नाव “येशू” असे लिहिले. हातात धरलेले बालक गौरवी राजा, स्वर्गाचे वैभव होता हा किंचितही विचार त्याच्या डोक्यात आला नव्हता. ह्या बाळाविषयी मोशेने लिहिले आहे की “प्रभु देव माझ्यासारिखा संदेष्टा तुम्हासाठी तुमच्या भावांमधून उठवील; तो जे काही सांगेल ते सर्व त्याचे ऐका.’ प्रेषित ३:२२. मोशेने ज्याचे वैभव पाहायाला सांगितले आहे ते हे बाळ आहे असे त्याला वाटले नाही. परंतु मोशेपेक्षा श्रेष्ठ असा तो याजकाच्या हातात होता. बाळाची नोंद करीत असतांना तो यहूदी राष्ट्राच्या संस्थापकाच्या नावाची नोंद करीत होता. हे नाव मृत्यूवरील लेखी अधिकारपत्र होते. यज्ञ व दान यांची पद्धति क्षय पावत होती. रूपक प्रतिरूपकाशी संलग्न होत होते आणि छायेला सत्य स्वरूप प्राप्त होत होते.DAMar 32.1

    पवित्रस्थानातून देवाची समक्षता निघून गेली होती, परंतु ज्या वैभवापुढे दूत लवून नमन करतात ते वैभव बेथलेहमच्या बालकामध्ये छपविले होते. हे बालक आश्वासित संतान होते. हे एदेनेतील पहिल्या वेदीचे दर्शक होते. तो शिलोह. शांतीदाता होता. तो मी आहे असे मोशेला जाहीर करणारा होता. इस्राएल लोकांना चालविणारा तो मेघस्तंभ व अग्निस्तंभ होता. भविष्यवाद्यांनी फार दिवसापूर्वी भाकीत केलेला तो होता. सर्व राष्ट्रांची आशा, मूळ, दाविदाचे संतान आणि चमकणारा प्रभात तारा होता. इस्राएलांच्या गुंडाळीमध्ये नमूद केलेल्या लहान बाळाचे नाव आमचा बंधु असून पतित मानवतेची आशा होता. ज्या मुलाच्या उद्धारासाठी पैसे भरण्यात आले तो जगाच्या पापासाठी खंडणी भरणार होता. “देवाच्या घराण्याचा तो खरा महायाजक’ न बदलणारे खरे याजकपण, “ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसलेला” तो मध्यस्थ होता. इब्री १०:२१; ७:२४; १:३.DAMar 32.2

    आध्यात्मिक गोष्टीचे आकलन आध्यात्मतेनेच होते. जे काम करण्यासाठी तो आला होता त्यासाठी देवपुत्राला मंदिरामध्ये समर्पण केले होते. सर्वसाधारण मूलाप्रमाणे याजकाने त्याच्याकडे पाहिले. जरी त्याच्यामध्ये त्याला विशेष काही दिसले नाही किंवा वाटले नाही तरी जगासाठी देवाने आपल्या पुत्राला दिल्याचे मानण्यात आले. ह्या प्रसंगी प्रामुख्याने ख्रिस्ताचा उल्लेख करण्यात आला. “शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमात होता. तो धार्मिक व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहात असे व त्याजवर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्यापूर्वी तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते.”DAMar 32.3

    शिमोनाने मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आईबापाने प्रथम-पुत्राला याजकाकडे आणल्याचे त्याने पाहिले. ते गरीब असल्याचे दिसले. परंतु शिमोनाला देवाच्या आत्माचा इशारा समजला. प्रभूला समर्पण केलेला मुलगा इस्राएलाचे सांत्वन आहे आणि ज्याची तो अपेक्षा करीत होता तो आहे अशी त्याची खात्री झाली. चकीत झालेल्या याजकाला शिमोन अतिशय आनंदित झालेला दिसला. बाळाला मरीयाच्या हातात परत दिले होते. त्याने त्याला स्वतःच्या हातावर घेऊन प्रभूला समर्पण केले. त्यावेळी त्याला त्याच्या आयुष्यात पूर्वी कधी झाला नाही एवढा आनंद झाला. त्याला उचलून स्वर्गाकडे वर करून म्हटले, “हे प्रभु, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस; कारण विदेश्यास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे जे तुझे तारण तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले ते मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.”DAMar 32.4

    देवाच्या या मनुष्यावर पवित्र आत्मा होता. योसेफ आणि मरीया त्याने केलेल्या भाकीताने आश्चर्यचकित झाले. त्याने त्यास आशीर्वाद दिला व त्याची आई मरीयेला म्हटले, “पाहा, इस्राएलात बहुतांचे पतन व उत्थान यासाठी आणि ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असले चिन्ह होण्यासाठी ह्याला ठेविले आहे; आणखी पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे म्हणून (तुझ्या स्वतःच्या जीवनात तरवार भोसकून जाई).”DAMar 33.1

    ख्रिस्ताविषयी शिमोनाने दिलेल्या साक्षीला संदेष्ट्री हन्नानेसुद्धा मान्यता दिली. शिमोनाचे उद्गार ऐकून तिचे मुख देवाच्या वैभवाने प्रकाशमान झाले, आणि प्रभु ख्रिस्ताचे दर्शन झाल्याबद्दल तिने देवाचे आभार प्रदर्शन केले.DAMar 33.2

    ह्या विनम्र श्रद्धावंतांनी भाकीतांचे व्यर्थ अध्ययन केले नव्हते. परंतु इस्राएलामध्ये मोठमोठ्या हुद्यावर असलेल्यांनी आणि याजकांनी, जरी भविष्याचा अभ्यास केला होता तरी ते देवाच्या मार्गाचे अवलंबन करीत नव्हते आणि जीवनाचा प्रकाश पाहाण्यास त्यांचे नेत्र उघडे नव्हते.DAMar 33.3

    अद्यापही तसेच आहे. स्वर्गाचे लक्ष ज्या घटनावर केंद्रित झाले आहे त्याचे आकलन झाले नाही. देवाच्या मंदिरातील उपासक आणि धार्मिक पुढारी त्याना त्या घटना घडत असल्या तरी त्यांची चाहूल नाही. लोक ऐतिहासिक ख्रिस्ताला मान्यता देतात परंतु स्वःनाकाराचे, गरीब व दुःखीतांचे दुःखपरिहार करण्याद्वारे आणि धार्मिक कृतीद्वारे ख्रिस्ताने दिलेले पाचारण आठराशे वर्षाप्रमाणेच आजही ऐकण्यास किंवा स्वीकारणायास लोक तयार नाहीत.DAMar 33.4

    शिमोनाने केलेल्या विशाल आणि दूरगामी भाकीतावर मरीया विचार करीत होती. हातातील बाळाला पाहून आणि बेथलेहमच्या मेंढपाळांचे शब्द आठवून तिने कृतज्ञापूर्वक आनंदाने व उज्वल आशेने देवाचे आभार मानले. शिमोनाने काढलेल्या उद्गाराने तिला यशयाने केलेल्या भाकीताची आठवण झाली: “इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल; त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल; परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील; ... धार्मिकता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल.” “अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यावर प्रकाश पडला आहे... कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील; त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील.’ यशया ११:१-५; ९:२-६.DAMar 33.5

    तथापि मरीयेला ख्रिस्ताच्या कार्याचा उमज झाला नाही. विदेश्यांना प्रकाशीत करणारा प्रकाश आणि इस्राएलांचे गौरव असे ख्रिस्ताविषयी भाकीत शिमोनाने केले होते. म्हणून दूतांनी उद्धारकाच्या जन्माविषयी घोषीत केले होते की, ही सर्व लोकांना आनंदाची वार्ता आहे. मशिहाच्या कार्याविषयी यहूद्यांच्या संकुचित विचारसरणीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न देव करीत होता. केवळ इस्राएलांचाच तो उद्धारक आहे असे नाही तर सर्व जगाचा उद्धारक म्हणून त्याचा लोकांनी स्वीकार करावा अशी त्याची इच्छा होती. परंतु खऱ्या अर्थाने मातेलासुद्धा त्याच्या कार्याचा खरा समज येण्यासाठी पुष्कळ वर्षे जावी लागली.DAMar 33.6

    दाविदाच्या सिंहासनावर राज्य करणारा मशीहा याकडे मरीयेचे लक्ष लागले, परंतु ते क्लेशाने जिंकले पाहिजे हे तिला दिसले नाही. मशीहाला ह्या जगात हाल अपेष्टा व दुःख भोगावे लागणार हे शिमोनाच्या भाकीतावरून प्रगट केले आहे. मरीयेला बोललेले शब्द, “तुझ्या स्वतःच्या जीवात तरवार भोसकून जाईल” याद्वारे अगोदरच येशूविषयी तिच्या मनात होत असलेल्या मनोवेदना, अपरिमित दु:ख यांचे वृत देव मरीयेला अगदी सदयतेने देत होता.DAMar 34.1

    शिमोनाने म्हटले, “पाहा, इस्राएलात बहुतांचे पतन व उत्थान यासाठी आणि ज्याच्याविरूद्ध लोक बोलतील असले चिन्ह होण्यासाठी ह्याला ठेविले आहे.” त्याचे पतन व पुन्हा उत्थान होईल. ख्रिस्तामध्ये उत्थान होण्याअगोदर आम्ही खडकावर पडून प्रथम भग्न झालो पाहिजे. आध्यात्मिक राज्याचे वैभव समजून घेण्यासाठी स्वार्थाची हकालपट्टी झाली पाहिजे आणि अहंपणाची जागा नम्रतेने घेतली पाहिजे. विनम्रतेने मिळालेला मान यहूद्यांना मान्य नव्हता. म्हणून ते उद्धारकाचा स्वीकार करीत नव्हते. ज्या चिन्हाविरूद्ध बोलले जात होते तो ते होता.DAMar 34.2

    “पुष्कळांच्या मनातील विचार प्रगट करण्यात येतील.’ उद्धारकाच्या जीवनाच्या संदर्भात, सर्वांची अंतःकरणे, निर्माणकर्त्यापासून तो अंधकाराच्या अधिपतीपर्यंत, प्रगट करण्यात आली. स्वार्थी, जुलमी, सर्वावर हक्क सांगणारा, काहीच न देणारा, स्वतःच्या दिमाखासाठी सर्वांनी त्याची पूजा करावी परंतु त्यांच्या कल्याणासाठी काहीही न करणारा असले देवाचे चित्र सैतानाने रेखाटले आहे. परंतु ख्रिस्ताद्वारे पित्याचे अंतःकरण प्रगट केले आहे. तो म्हणतो तुम्हाविषयी परमेश्वराचे “संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत.” यिर्मया २९:११. पापाविषयी देवाचा द्वेष मृत्यूसारखा भारी उग्र आहे; पण पाप्यावरील त्याचे प्रेम फार भारी आहे. आमचे उद्धारकार्य साध्य होईपर्यंत कोणत्याही इतर निकडीच्या गोष्टींनी त्याचे मन विचलीत होणार नाही. आमच्या उद्धाराला आवश्यक असलेली कोणतीही गोष्ट मागे राखून ठेविली नाही, करुणेचा कोणताही चमत्कार दुर्लक्षलेला नाही, कोणतेही दिव्य माध्यम उपयोगात आणिले नाही असे नाही. उपकारांची रेलचेल करण्यात आली आणि देणगींची रास घातली. ज्यांचा उद्धार करायचा त्यांच्यासाठी स्वर्गातील सर्व खजिना, भांडार खुले आहे. विश्वातील सर्व संपत्ति गोळा केल्यावर आणि अनिर्बंधित शक्ती उपलब्ध करून दिल्यावर ते सर्व तो ख्रिस्ताकडे सोपवितो आणि म्हणतो हे सर्व मनुष्यासाठी आहे. ह्या देणगींचा उपयोग कर आणि पृथ्वीवर किंवा स्वर्गात माझ्या प्रेमापेक्षा दुसरे काही सरस नाही अशी त्यांची खात्री कर. माझ्यावर (ख्रिस्तावर) प्रेम करण्यात त्याला (पित्याला) अत्यानंद होतो.DAMar 34.3

    वधस्तंभावर प्रेम आणि स्वार्थीपणा समोरासमोर ठाकले होते. येथे त्याचे उच्चतम प्रगटीकरण होते. समाधान करण्यात आणि आशीर्वाद देण्यात ख्रिस्ताने आपले आयुष्य वेचले होते आणि त्याला वधस्तंभी खिळून सैतानाने देवाविरूद्ध तीव्र मत्सर प्रगट केला होता. देवाला सत्ताभ्रष्ट करण्याचा आणि ज्याच्याद्वारे त्याने अपरिमित प्रेम प्रगट केले आहे त्याचा नाश करण्याचा मुख्य उद्देश त्याच्या बंडाळीमध्ये होता हे त्याने स्पष्ट केले.DAMar 35.1

    ख्रिस्ताचे जीवन व मरण यांच्याद्वारे मनुष्यांचे विचारही स्पष्ट करण्यात आले आहेत. शरण जाण्याचे आणि दुःखीतांचा वाली होण्याचे पाचारण केल्याचे गोठ्यापासून ते वधस्तंभापर्यंतच्या ख्रिस्ताच्या जीवनात दिसते. मानवाचे उद्देश त्याद्वारे उघडकीस आणिले होते. ख्रिस्ताने दिव्य सत्य आणिले होते आणि पवित्र आत्म्याचे ऐकणारे सर्वजण त्याच्याकडे आकर्षिले होते. स्वतःची पूजा करणारे सैतानाच्या राज्यातील होते. ख्रिस्ताविषयी असलेल्या त्यांच्या वृत्तीवरून ते कोणत्या अधिपत्याखाली येतात हे दर्शविले जाते. अशा प्रकारे प्रत्येकजन स्वतःचा न्याय करितो. DAMar 35.2

    अखेरच्या न्यायनिवाड्याच्या वेळी नाश पावलेल्या प्रत्येक व्यक्तीला सत्याचा नाकार केलेल्या पद्धतीचे ज्ञान होईल. वधस्तंभ सादर करण्यात येईल आणि पापामुळे अंध झालेल्या मनाला त्याचा परिणाम दृगोचर होईल. वधस्तंभावरील गूढ बळीच्या समोर पाप्यांना दोषी ठरविले जाईल. प्रत्येक लबाडीचे निमित्त बाजूला झटकून टाकण्यात येईल. मानवी धर्मभ्रष्टतेचे अति ओंगळ स्वरूप दिसेल. त्यांच्या निवडी कोणत्या होत्या त्या मनुष्यांना दिसतील. प्रदीर्घकाळ चाललेल्या संघर्षातील खरे व खोटे यांच्यावरील प्रश्नांचा खुलास करण्यात येईल. दुष्टाईच्या वास्तव्याच्या बाबतीत विश्वाच्या नायसमयी देव दोषमुक्त राहील . पाप करण्यासाठी दैवी कायद्याची आवश्यकता नाही हे दर्शविले जाईल. देवाच्या कारभारात काही उणीवता नव्हती किंवा असंतोषाला काही कारण नव्हते. सर्वांच्या अंतःकरणातील विचार प्रगट करण्यात येतील तेव्हा एकनिष्ठ आणि बंडखोर एकत्रीतरित्या घोषीत करतील, “हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत, हे प्रभो, तुला कोण भिणार नाही आणि तुझ्या नामाचा महिमा कोण करणार नाही?... तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत.” प्रगटी १५:३, ४.DAMar 35.3