Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ७४—गेथशेमाने

    मत्तय २६:३६-५६; मार्क १४:३२-५०; लूक २२:३९-५३; योहान १८:१-१२.

    शिष्यांच्याबरोबर उद्धारकाने गेथशेमाने बागेत हळूच प्रवेश केला. मोठा आणि पूर्ण वल्हांडणाचा चंद्र निरभ्र आकाशात प्रकाशत होता. यात्रेकरूंच्या राहुट्यांनी भरलेले शहर अगदी शांत निवांत झाले होते.DAMar 597.1

    येशू आपल्या शिष्यांशी मनापासून संभाषण करून त्यांना मार्गदर्शन करीत होता, परंतु गेथशेमाने बागेजवळ आल्यानंतर तो एकाएकी शांत झाला. ह्या ठिकाणी तो वारंवार प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी येत होता; परंतु पूर्वी इतका खिन्न व अति कष्टी कधी दिसला नाही. पृथ्वीवरील सबंध आयुष्यात तो देवाच्या समक्षतेत चालत होता. सैतानाच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या लोकांच्या संघर्षात आल्यावर तो म्हणत असे, “ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करितो.” योहान ८:२९. परंतु आता आधार देणाऱ्या देवाच्या सान्निध्यापासून तो तुटला आहे असे त्याला वाटले. आता तो पापी मनुष्यात गणला होता. पापी मानवतेचा दोष त्याला आता सोसायचा होता, ज्याला पाप माहीत नव्हते त्याच्यावर आम्हा सर्वांचे पाप लादण्यात आले होते. त्याला पाप भयंकर वाटले, सहन करायचा दोष त्याला फार भारी वाटला, ते सोडण्याचा त्याला मोह झाला तर तो त्याच्या पित्याच्या प्रेमाला कायमचा दुरावेल. आज्ञाभंगाविरुद्ध देवाचा क्रोध किती भयंकर आहे हे ओळखून तो उद्गारला, “माझा जीव मरणप्राय, अति खिन्न झाला आहे.”DAMar 597.2

    बागेजवळ आल्यावर त्यांच्या गुरुजीमध्ये झालेला लक्षणीय बदल शिष्यांच्या ध्यानात आला. आतापर्यंत त्याला केव्हाही असा दुःखी व शांत पाहिला नव्हता. जसजसा तो पुढे गेला तसतसे त्याची खिन्नता वाढत गेली; तरी त्याचे कारण विचारण्यास कोणी धजला नाही. चालताना तो हेलकावे खात होता आणि तो खाली कोसळतो की काय असे वाटत होते. बागेत पोहचल्यावर गुरूजीना विश्रांती घेण्यासाठी नेहमीच्या परिचयाचे ठिकाण शिष्य पाहू लागले.DAMar 597.3

    प्रत्येक पाऊल फार कष्टाने टाकीत होता. जणू काय भारी ओझ्याखाली चिरडून जात आहे म्हणून तो मोठमोठ्याने कण्हत होता. दोन वेळा त्याच्या सोबत्यांनी त्याला आवरले नसते तर तो जमिनीवर कोसळला असता. DAMar 598.1

    बागेच्या प्रवेश द्वाराजवळ येशूने आपल्या तीन शिष्यांना सोडून सगळ्यांना थांबविले व त्यांच्यासाठी व स्वतःसाठी प्रार्थना करावयास सांगितले. पेत्र, याकोब व योहान यांना घेऊन तो एकांत ठिकाणी गेला. हे तीन शिष्य येशूचे जीवलग होते. रूपांतरच्या डोंगरावर त्यांनी त्याचे वैभव पाहिले होते; त्याच्याबरोबर मोशे व एलीया बोलतांना पाहिले होते; स्वर्गातून आलेली वाणी त्यांनी ऐकली होती; आता त्याच्या ह्या कठीण प्रसंगात ख्रिस्ताला त्यांच्या सान्निध्याची तीव्र गरज वाटली. ह्या निवांत स्थळी त्यांनी त्याच्याबरोबर वारंवार रात्र घालविली होती. अशा प्रसंगी, जागृत राहून प्रार्थना केल्यानंतर गुरूजीपासून थोड्या अंतरावर ते गाढ निद्रा घेत असत आणि सकाळीच तो त्यांना उठवून उत्साहाने काम करण्यास पाठवीत असे. परंतु ह्या वेळी त्यांनी सबंध रात्र त्याच्याबरोबर प्रार्थनेत घालवावी अशी त्याची इच्छा होती. तथापि त्याला सहन करायला लागणारे त्याचे ते प्राणांतिक दुःख त्यांच्या नजरेस येऊ नये अशी त्याची इच्छा होती.DAMar 598.2

    त्याने म्हटले, “तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”DAMar 598.3

    मग तो थोडासा पुढे जाऊन भूमीवर पालथा पडला. पापामुळे तो पित्यापासून दुरावला आहे असे त्याला वाटले. ही दरी फार रूंद, फार खोल, फार गडद वाटली आणि त्यामुळे त्याचा थरकाप झाला. ही तीव्र व्यथा टाळण्यासाठी त्याच्या दिव्य सामर्थ्याचा उपयोग त्याने करायला नको. मानव या नात्याने माणसाच्या पापाचा परिणाम त्याने सोसलाच पाहिजे. पापाविरुद्ध असलेल्या देवाच्या क्रोधाला त्याला सामोरे गेलेच पाहिजे...DAMar 598.4

    सद्याची त्याची मनोवृत्ती आतापर्यंतच्या मनोवृत्तीपेक्षा वेगळी होती. त्याच्या तीव्र यातनेचे वर्णन संदेष्टाच्या शब्दात केले आहे, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, अगे तरवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याजवर ऊठ;” जखऱ्या १३:७. पापी मनुष्याचा मोबदला व जामीन या नात्याने ख्रिस्त देवाच्या न्यायाखाली दुःख सहन करीत होता. न्यायत्व म्हणजे काय हे त्याला कळून आले होते. आतापर्यंत तो दुसऱ्यांचा मध्यस्थ होता; आता त्याला मध्यस्थाची गरज भासत होती.DAMar 598.5

    पित्याशी असलेल्या सख्याचा-एकात्मतेचा वियोग होत आहे असे ख्रिस्ताला वाटल्यावर, अंधारी सत्येशी आगामी संघर्षात मानवी स्वभावानिशी मुकाबला करणे असमर्थनीय होईल ह्या विचाराने तो गांगरून गेला होता. अरण्यातील मोहाच्या समयी मानवजातीचे भवितव्य धोक्यात होते. त्यावेळी ख्रिस्त विजेता होता. आता भुलविणारा अखेरच्या झगड्यासाठी आला होता. त्यासाठी ख्रिस्ताच्या तीन वर्षाच्या सेवाकार्याच्या सुमारास तो तयारी करीत होता. त्याच्यादृष्टीने सर्व काही त्याला धोक्याचे दिसत होते. ह्यावेळी तो जर पराभूत झाला तर प्रभुत्व मिळविण्याची त्याची आशा-उमेद कोलमडून पडणार होती; शेवटी जगातील राज्ये ख्रिस्ताची बनणार होती; त्याचा पाडाव होऊन त्याला बाहेर टाकण्यात येणार होते. परंतु ख्रिस्तावर अपयशाची पाळी आली तर पृथ्वीवर सैतानाचे साम्राज्य येणार होते आणि मानवजात निरंतरची त्याच्या अधिकाराखाली राहाणार होती. संघर्षातील महत्त्वाचे विषय डोळ्यापुढे असल्याने, देवापासून ताटातूट होण्याचा विचार ख्रिस्ताला भयानक वाटत होता. सैतानाने त्याला समज दिली होती की, तो जर पापी जगासाठी जामीन राहिला तर ही ताटातूट कायमची राहील. त्याचा संबंध सैतानाच्या राज्याशी राहील आणि देवाशी त्याचा एकात्मतेचा संबंध पुन्हा कधी राहाणार नाही.DAMar 598.6

    ह्या स्वार्थत्यागाने-आत्मत्यागाने कोणता फायदा होणार हता? मानवाचा कृतघ्नपणा आणि अपराध फार भयानक, ज्याच्यावर इलाज नाही असा दिसत होता! अगदी कठोरपणे सैतानाने हा प्रसंग उद्धारकावर लादलेला होताः त्याने म्हटले, ऐहिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या जे प्रतिष्ठित गणले आहेत त्यांनी तुझा त्याग केला आहे. विशेष, असाधारण लोक म्हणून दिलेल्या आश्वासनांचे चिन्ह, केंद्रबिंदू व पाया एवढेच नाही तर तुझाही विध्वंश करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. तुझ्या शिष्यांतील एकजण, ज्याने तुझा संदेश ऐकला आहे आणि जो चर्च कार्यामध्ये पुढाकार घेत आहे तोच तुझा विश्वासघात करील. तुझ्या अति उत्साही अनुयायांतील एकजण तुझा नाकार करील. सर्वजण तुला सोडून पळून जातील. ख्रिस्ताला ह्या विचारांचा तिटकारा वाटला. ज्यांचा उद्धार करण्याचे त्याने ठरविलेले आहे, ज्यांच्यावर त्याने इतके प्रेम केले आहे त्यांनीच सैतानाच्या कटात सामील व्हावे काय? ह्या विचारानेच त्याचे अंतःकरण भेदून गेले. झगडा अति भयानक होता. त्याचे मोजमाप, त्याच्या राष्ट्राचा, त्याच्यावर दोष ठेवणाऱ्यांचा व त्याचा विश्वासघात करणाऱ्यांचा आणि दृष्टाईमध्ये रखडत पडलेल्या जगाचा अपराध यांच्यामध्ये आहे. लोकांच्या पापभाराने ख्रिस्त दडपून गेला होता आणि पापाविरुद्ध असलेला देवाचा क्रोध ह्या विचाराने त्याच्या जीवाचा चुराडा होत होता.DAMar 599.1

    मानवासाठी भरावयाची किंमत ह्याच्यावर विचार करण्यात मग्न झालेल्या ख्रिस्ताला पाहा. जणू काय देवापासून अधिक दुरावला जाऊ नये म्हणून तो थंडगार जमीनीला कवटाळतो. रात्रीचे थंडगार दंव त्याच्या पालथे पडलेल्या शरीरावर पडत होते पण त्याने त्याची पर्वा केली नाही. त्याच्या फिक्या ओठातून दुःखदायक उद्गार निघतात, “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला मजवरून टळून जावो.” पुढे तो म्हणतो, “तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” DAMar 599.2

    दुःखामध्ये असतांना मनुष्य सहानुभूतीची अपेक्षा करीतो. ही अपेक्षा ख्रिस्ताने अगदी मनापासून केली. ज्या शिष्यांना त्यांच्या दुःखात सहानुभूती दाखवून धीर देण्याचा त्याने प्रयत्न केला त्यांच्याकडे तो अगदी प्राणांतिक दुःखाने समाधानाचे दोन शब्द ऐकण्यास आतुर झाला होता. ज्याने त्यांच्यासाठी नेहमीच तळमळ दाखविली होती तोच आता प्राणांतिक व्यथेने पछाडला होता आणि तो त्याच्यासाठी व स्वतःसाठी प्रार्थना करीत आहेत हे जाणून घेण्यास फार उत्सुक होता. पापाचा घातकीपणा किती उदासीन होता! आपण देवासमोर निरापराधी राहून स्वतःच्या अपराधाचा परिणाम मानवजातीने निस्तारावा असे म्हणणे किती भयंकर आहे! त्याच्या शिष्यांना हे समजले आहे व त्याचे महत्त्व ओळखले आहे असे जर केवळ त्याला कळले तर त्याला हुशारी वाटेल. DAMar 600.1

    अगदी कष्टाने उभे राहून झोकांड्या खात कसातरी त्याचे सोबती जेथे होते तेथे तो गेला. परंतु “ते झोपलेले” त्याने पाहिले. प्रार्थना करताना ते दिसले असते तर त्याला बरे वाटले असते. देवाचा आश्रय घेण्यास त्यांनी प्रयत्न केला असता तर सैतानाच्या हस्तकांना त्याच्यावर मात करता आली नसती. त्यांच्या अचल, न डळमळणाऱ्या विश्वासाने त्याचे समाधान झाले असते. परंतु “जागृत राहा व प्रार्थना करा’ असे म्हणून वारंवार दिलेल्या इशाऱ्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. नेहमीच शांत व इतमामाने वागणारा गुरूजी अजमावता येणार नाही अशा तीव्र व्यथेने ग्रस्त झालेला पाहून त्यांचा मनस्ताप झाला होता. व्यथित झालेल्याचा आक्रोश ऐकून त्यांनी प्रार्थना केली होती. प्रभूला सोडून जाण्याची त्यांची भावना नव्हती परंतु ते गुंगीने हतबल झाले होते. जर ते देवाची प्रार्थना करीत राहिले असते तर ते त्या गुंगीला बळी पडले नसते. मोहाला तोंड देण्यासाठी जागृत राहून प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे ह्याचा उमज त्यांना झाला नाही. DAMar 600.2

    बागेत पाय ठेवण्याच्या अगोदर येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्ही सर्व याच रात्री मजविषयी अडखळाल.’ ते त्याच्याबरोबर तुरुगांत जातील किंवा त्याच्याबरोबर मरण पत्करतील असे त्यांनी त्याला जोरदार आश्वासन दिले होते. पेत्राने तर असे म्हटले की, “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.” मार्क १४:२७, २९. परंतु शिष्य स्वतःच्या हिमतीवर अवलंबून राहिले. ख्रिस्ताने सल्ला दिल्याप्रमाणे त्यांनी सहाय्यकर्त्याची अपेक्षा केली नाही. त्यामुळेच जेव्हा उद्धारकाला त्यांच्या सहानुभूतीची अत्यावश्यकता वाटली त्यावेळी ते गाढ निद्रावस्थेत आढळले. पेत्रसुद्धा झोपला होता.DAMar 600.3

    जीवलग शिष्य योहान जो येशूच्या उरावर कललेला होता तो सुद्धा झोपला होता. गरूजीसाठी असलेल्या प्रेमभावनेमुळे योहान जागे राहायाला पाहिजे होता. त्यांचा विश्वास ढळू नये म्हणून उद्धारकाने आपल्या शिष्यांसाठी सबंध रात्र प्रार्थना केली होती. पूर्वी विचारलेला प्रश्न येशूने पुन्हा याकोब व योहान यांना विचारावा काय? “जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? आणि ज्या बाप्तिस्म्याने माझा बाप्तिस्मा झाला त्याने तुमचा बाप्तिस्मा होईल काय?” “आम्ही समर्थ आहोत’ असे उत्तर कदाचित त्यांच्या मुखातून निघेल. मत्तय २०:२२.DAMar 600.4

    येशूचा आवाज ऐकून त्याचे शिष्य जागे झाले परंतु त्याला ते ओळखू शकले नाहीत कारण अपरिमित यातनेने त्याचा चेहरा बदलला होता. पेत्राकडे वळून त्याने म्हटले, “काय! शिमोना, झोपलास काय? घटकाभरही माझ्याबरोबर तुझ्याने जागृत राहावले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.’ शिष्यांच्या दुबळेपणामुळे येशूची सहानुभूती जागृत झाली. त्याच्यावरील विश्वासघात आणि मरण या संदर्भात त्यांच्यावर येणाऱ्या कसोटीला ते तोंड देऊ शकणार नाहीत याची त्याला धास्ती होती. त्याबद्दल त्याने त्यांची खरडपट्टी काढली नाही परंतु म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” स्वतःच्या अति दुःखाच्या प्रसंगीसुद्धा त्यांच्या दुर्बलतेकडे त्याने कठोर रीतीने पाहिले नाही. त्याने म्हटले, “आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.”DAMar 601.1

    पुन्हा देवपुत्र अति दुःखाने ग्रस्त झाला, आणि खिन्न व कष्टी होऊन झोकांड्या देत पूर्वीच्या ठिकाणी गेला. त्याच्या वेदना पूर्वीपेक्षा अधिक वाढल्या. ह्या अपरिमित यातनेच्या प्रसंगी “त्याचा घाम रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा पडत होता.” सुरूची व ताडामाडाची झाडे त्याच्या ह्या मनोवेदनाचे स्तब्ध साक्षीदार होते. त्यांचा निर्माणकर्ता अंधकार शक्तीशी एकटाच सामना करीत आहे हे पाहून निसर्गसुद्धा अश्रु ढाळून हळहळत आहे हे दर्शविण्यासाठी त्यांच्या पानावरून मोठमोठे थेंब त्याच्या दुःखी शरीरावर पडत होते.DAMar 601.2

    काही काळ ह्या अगोदर शत्रूच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी येशू शक्तिवान देवदार वृक्षाप्रमाणे उभा होता. त्याच्या मनाचा गोंधळ करून त्याच्यावर मात करण्यास द्वेष व मत्सर यांनी भरलेली हृदये व दुराग्रही मनेसुद्ध निष्फळ ठरली होती. देवपुत्र या नात्याने दिव्य वैभवाने त्याने लढा दिला होता. परंतु तो आता सोसाट्याच्या वाऱ्याने वाकलेल्या बोरूप्रमाणे हेलकावे खात होता. प्रत्येक प्रसंगी त्याने अंधकाराच्या सत्तेवर विजय मिळवून तो आता विजेता या नात्याने आपल्या कार्याच्या सिद्धतेप्रत-पूर्णतेप्रत आलेला होता. अगोदरच त्याचे गौरव झाल्याने देवाशी त्याचा ऐक्यभाव असल्याचे त्याने अधिकाराने सांगितले होते. न अडखळता त्याने स्तुति स्तोत्रे गाईली होती. आपल्या शिष्यांशी तो धैर्याने व ममतेने बोलला होता. आता अंधकाराच्या शक्तीची वेळ आली होती. आता त्याची वाणी विजयश्रीची नव्हती तर मलूल होती, कारण तिच्यामध्ये मानवी यातना, मनोवेदना भरलेल्या होत्या. झोपाळू शिष्यांच्या कानावर उद्धारकाचे शब्द पडले, “हे माझ्या बापा, हे प्याल्यावाचून टळून जात नसले तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”DAMar 601.3

    त्याच्याकडे जावे अशी शिष्यांची प्रबळ इच्छा होती परंतु जागृत राहून प्रार्थना करीत तेथेच थांबायला येशूने त्यांना सांगितले होते. येशू त्यांच्याकडे आल्यावर त्याने त्यांना झोपलेले पाहिले. शिष्यांचा आपुलकीचा सहवास लाभावा, त्यांचे समाधानाचे दोन शब्द कानी पडावे व गडद काळोखी शक्तीने त्याला हतबल केले होते त्यातून सुटकेचा श्वास लाभावा अशी त्याची उत्कट इच्छा होती. परंतु त्यांचे डोळे झोपेने जड झाले होते आणि “त्याला काय उत्तर द्यावे हे कोणालाच सुचेना.” तो आलेला पाहन ते जागे झाले. तो अति विव्हळ झालेला व त्याचा चेहरा रक्ताच्या मोठमोठ्या थेंबाप्रमाणे घामाने भरलेला पाहून ते भयभीत झाले. त्याच्या मनाची तीव्र व्यथा त्यांना उमजून आली नाही. “त्याचा चेहरा मनुष्यांच्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्यासारखे नव्हते इतका तो विरुप होता.” यशया ५२:१४.DAMar 602.1

    नंतर पुन्हा त्या नियमित ठिकाणी तो गेला व जमिनीवर पालथा पडला. गडद अंधाराच्या भीतीने तो गांगरून गेला. ह्या कसोटीच्या घटकेला देवपुत्राचे मानवत्व कंपायमान झाले. शिष्यांचा विश्वास ढळू नये म्हणून त्याने यावेळेस प्रार्थना केली नाही तर स्वतःच्या प्राणांतिक दुःखाने हतबल झालेल्या आत्म्यासाठी प्रार्थना केली. प्रचंड भयानक घटिका आली होती. ह्या घटकेस जगाचे भवितव्य निश्चित ठरणार होते. मानवजातीचे भवितव्य अनिश्चित होते. अपराधी मनुष्याने प्यावयाचा कप घेण्याचे ख्रिस्त कदाचित आता नाकारू शकतो. त्यासाठी अजून काही उशीर झाला नव्हता. कपाळावरील रक्ताचा घाम पुसून टाकून स्वतःच्या दुष्टाईत मरण्यास माणसाला तेथेच तो सोडू शकतो. कदाचित तो असेही म्हणून शकतो की, पापी मनुष्य आपल्या पापाची शिक्षा भोगू दे आणि मी माझ्या पित्याकडे परत जाईन. मानखंडना करणारा अपमानाचा व प्रखर दुःखाचा कडू प्याला देवपुत्र पिईल काय? दोषी अपराधी लोकांचा उद्धार करण्यासाठी पापाच्या शापाचा परिणाम निष्कलंक, निष्पापी सहन करील काय? येशूच्या फिक्या ओठातून कंप पावत उद्गार निघतात, “हे माझ्या बापा, हे मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”DAMar 602.2

    तीन वेळेस त्याने ही प्रार्थना केली. तीन वेळेस मानवता महान आत्मत्यागापासून चपापून मागेमागे राहात होती. परंतु आता जगाच्या उद्धारकासमोर मानवजातीचा इतिहास आला. आज्ञाभंग करणाऱ्यांना तसेच त्यांच्यावर सोडले तर ते नाश पावतील असे त्याने पाहिले. मानवाची असहाय्यता त्याला दिसली. पापसता त्याने पाहिली. नाशवंत जगाचा विलाप दुःख, शोक त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. त्याने त्यांचे भवितव्य न्याहाळले आणि त्याने आपला निर्णय ठाम केला. कितीही भारी किंमत भरावी लागली तरी मनुष्याचा उद्धार तो करीलच. त्याने रुधिराचा बाप्तिस्मा स्वीकारला. त्याच्या मरणाद्वारे नाशवंत लोक अनंतकालिक जीवन जगतील. गौरव, आनंद व शुद्धता यांनी भरलेला स्वर्गीय दरबार त्याने सोडला आणि पापामुळे नाशवंत झालेल्या ह्या जगाला, एका हरवलेल्या मेंढराला वाचविण्यासाठी आला. तो आपल्या विशिष्ट कामगिरीपासून माघार घेणार नाही. पापात पडलेल्यासाठी तो प्रायश्चित होईल. त्याच्या प्रार्थनेमध्ये केवळ नम्रता भरलेली दिसते. “हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” DAMar 602.3

    हा निर्णय घेतल्यावर तो जमिनीवर मरणप्राय होऊन पडला आणि त्यातून तो अंशतः कसाबसा उठला. मूर्छित होऊन पडलेल्या त्यांच्या गुरूजीच्या डोक्याखाली कळकळीने हात घालून उठविण्यासाठी व घामाने माखलेले कपाळ स्वच्छ करण्यासाठी आता शिष्य कोठे होते? आलेल्या संकटाला त्याने एकट्यानेच तोंड दिले आणि त्याच्याबरोबर माणसातले दुसरे कोणी नव्हते.DAMar 603.1

    परंतु देव आपल्या पुत्राबरोबर व्यथा सहन करीत होता, दुःख सोसीत होता. दुतांनी उद्धारकाचे प्राणांतिक दुःख पाहिले. त्यांच्या प्रभूला सैतानी सत्तेने घेरलेले त्यांनी पाहिले. रहस्यमय दहशतीने थरथर कापून त्याचा स्वभाव दडपणाखाली आला होता. स्वर्गात शांतता होती. कोणतेही तंतूवाद्य वाजले नाही. पित्याने आपल्या पत्रापासून त्याचे प्रेम, गौरव व त्याच्या प्रकाशाचे किरण दूर केलेले पाहून दिव्यदूतांना वाटलेल्या आश्चर्याचे दृष्य मर्त्य मानवाने पाहिले असते तर देवाला पाप किती तीरस्कारणीय व अपमानाचे आहे हे त्यांनी समजून घ्यावे.DAMar 603.2

    अपतित जगांनी आणि स्वर्गीय दिव्यदूतांनी लढ्याचा शेवट होताना अगदी गोडी घेऊन पाहाणी केली. सैतान व त्याच्या दुष्टाईचा संघ, आणि धर्मत्याग केलेल्यांची मोठी फौज यांनी उद्धारकार्यातील मोठा पेचप्रसंग अगदी तीव्रतेने पाहिला. त्रीवार केलेल्या ख्रिस्ताच्या प्रार्थनेला कोणते उत्तर येते याची आतुरतेने वाट बरे आणि वाईट यांच्या शक्ती पाहात होत्या. दुःख वेदनांनी व्याकूळ झालेल्या दैवी व्यक्तीला आराम देण्याचा इरादा दिव्यदूत करीत होते, परंतु तसे होणे शक्य नाही. देवपुत्राला सुटकेचा मार्गच उरला नव्हता. ह्या भयंकर पेचप्रसंगी, सर्व काही धोक्याच्या वेळी, वेदना सहन करणाऱ्याच्या हातात गूढ प्याला थरथर कंप पावू लागला अशा वेळी स्वर्ग खुला झाला आणि गडद अंधकाराच्या प्रसंगी प्रकाश चमकला आणि ज्या पदावरून सैतानाला खाली टाकण्यात आले ते पद भूषवित असलेला व देवाच्या समक्षतेत वावरणारा महान दिव्यदूत ख्रिस्ताच्या बाजूला उभे राहाण्यास आला. ख्रिस्ताच्या हातातील प्याला घेण्यासाठी दिव्यदूत आला नव्हता तर तो घेण्यास उत्तेजन देण्यासाठी व पित्याच्या प्रेमाची खात्री देण्यासाठी आला होता. दैवी व मानवी नम्र व्यक्तीला शक्तीसामर्थ्य देण्यासाठी आला होता. त्याने त्याला उघडा केलेला स्वर्ग दाखविला व त्याच्या ह्या दुःख सहन करण्याद्वारे उद्धार पावणाऱ्याविषयी त्याने माहिती दिली. त्याचा पिता सैतानापेक्षा महान प्रबळ असल्याचे त्याने सांगितले, त्याच्या मरणाने सैतानाची दाणादाण होईल आणि ह्या जगाचे राज्य महान देवाच्या संताना देण्यात येईल असे सांगितले. त्याला त्याच्या आत्म्याच्या कष्ट यातना दिसतील व त्याबद्दल तो समाधान पावेल असेही सांगितले कारण मानवजातीचा मोठा समुदाय तारण पावलेला, निरंतरचा तारलेला तो पाहील.DAMar 603.3

    ख्रिस्ताचे दु:ख थांबले नाही परंतु त्याचे औदासिन्य व नाउमेद नाहिसा झाला. कोणत्याहीरीत्या तुफानाचा जोर कमी झाला नव्हता परंतु त्याला तोंड देण्यास तो आता बलवान झाला होता. तो शांत व प्रसन्नचित झाला. रक्ताळलेल्या चेहऱ्यावर स्वर्गीय शांतता स्थिरावली होती. कोणतीही मानवी व्यक्ती सहन करू शकणार नाही ते त्याने सहन केले होते. कारण प्रत्येक मनुष्याच्या मरणाच्या यातना त्याने भोगल्या होत्या.DAMar 604.1

    उद्धारकाच्या सभोवती चमकत असलेला प्रकाश पाहून झोपेच्या गुंगीत असलेले शिष्य खडबडून जागे झाले. पालथा पडलेल्या गुरूजीवर ओणावलेला दिव्यदूत त्यांनी पाहिला. त्याने त्याचे मस्तक उचलून उराशी धरून स्वर्गाकडे रोखले. आशेचे व समाधानाचे शब्द मंजूळ वाणीत बोलताना त्यांनी ऐकले. रूपांतराच्या डोंगरावरील देखावा शिष्यांच्या डोळ्यासमोर आला. मंदिरामध्ये येशूच्या सभोवती गौरवाचे असलेले कडे व ढगातून आलेली देवाची वाणी यांचे स्मरण त्यांना झाले. तेच गौरव आता पुन्हा प्रगट झाले होते आणि त्यांच्या प्रभूच्या बाबतीत त्यांना आता भीती राहिली नाही. तो देवाच्या संरक्षणाखाली होता; बलवान दूत त्याच्या संरक्षणासाठी पाठविला होता. पुन्हा शिष्य थकल्या भागल्यामुळे गुंगीने अति त्रस्त झाले होते. येशूला पुन्हा ते झोपलेल्या स्थितीत आढळले.DAMar 604.2

    दुःखाने त्यांच्याकडे पाहून त्याने म्हटले, “आता झोप व विसावा घ्या; पाहा, घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे.”DAMar 604.3

    हे शब्द बोलतो न बोलतो तोच त्याच्या शोधार्थ असलेल्या जमावाची चाहूल त्याने ऐकली आणि म्हटले, “उठा, आपण जाऊ; पाहा मला धरून देणारा जवळ आला आहे.”DAMar 604.4

    धरून देणाऱ्याला भेटण्यासाठी येशू पुढे गेला तेव्हा त्याला होत असलेल्या दुःखाचा मागमूस त्याच्याठायी दिसला नाही. त्याने म्हटले, “तुम्ही कोणाचा शोध करता?” त्यांनी उत्तर दिले, “नासरेथकर येशूचा.” येशूने उत्तर दिले, “तो मी आहे.” हे उद्गार काढताच ज्या दिव्यदूताने त्याची सेवा केली होती तो जमाव व त्याच्यामध्ये आला. दैवी प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर प्रकाशला आणि कबुतरासारखा आकार असलेल्याने त्याच्यावर आवरण घातले किंवा सावली पाडली. ह्या दैवी गौरवाच्या उपस्थितीत मारेकरी क्षणभरही राहू शकले नाहीत. ते मागे सरकले. याजक, वडील, शिपाई आणि यहूदासुद्धा जमिनीवर मेल्याप्रमाणे कोसळले.DAMar 604.5

    दिव्यदूताने माघार घेतली आणि प्रकाश मंदावला. तेथून पळून जाण्याची येशूला चांगली संधि होती परंतु तो तेथेच शांत व गंभीर असा उभे राहिला. त्याच्या चरणाजवळ पडलेल्या असहाय्य निष्ठूर मारेकरांच्यामध्ये तो गौरवशील असा उभे राहिला. स्तब्ध राहून आश्चर्याने हे सर्व शिष्य पाहात होते.DAMar 604.6

    परंतु चटकन ह्या देखाव्यात बदल झाला. मोठा जमाव उठला. रोमी शिपाई, याजक व यहदा यांनी येशूभोवती गराडा केला. त्यांना त्यांच्या दुर्बलतेची लाज वाटली आणि तो निसटून जाईल म्हणून भीतीही वाटली. उद्धारकाने पुन्हा प्रश्न विचारला, “तुम्ही कोणाला शोधता?” त्यांच्यासमोर उभे असलेला देवपुत्र आहे याचा पुरावा त्यांच्याजवळ होता परंतु त्याबद्दल त्यांची खात्री होत नव्हती. “तुम्ही कोणाचा शोध करता?” ह्या प्रश्नाला त्यांनी पुन्हा उत्तर दिले, “नासरेथकर येशूचा.” त्यानंतर येशूने म्हटले, “तो मी आहे असे तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही माझा जर शोध करता, तर त्यांना जाऊ द्या’ (शिष्यांना उद्देशून). त्यांचा विश्वास किती दुर्बल आहे हे त्याला माहीत होते आणि मोह व कसोटी यापासून त्यांना सांभाळण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्यांच्यामते तो स्वतःचा आत्मत्याग करण्यास तयार होता.DAMar 605.1

    यहूदाला त्याच्या कार्यभागाचा विसर पडला नव्हता. मोठा जमाव बागेत शिरल्यावर तो सर्वांच्या पुढे चालला व त्याच्या मागोमाग मुख्य याजक होता. त्याच्यामागे लागणाऱ्यांना त्याने खूण सांगून ठेविली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा.’ मत्तय २६:४८. त्यांच्याशी त्याचा काही संबंध नव्हता असा तो आता बहाणा करीत होता. येशूजवळ येऊन ओळखीचा मित्र म्हणून तो त्याचा हात धरितो, “गुरूजी, प्रणाम’ असे म्हणून पुन्हा न पुन्हा त्याचे चुंबन घेतो आणि ह्या संकटात त्याला सहानुभूती दाखवून अश्रु ढाळत आहे असे भासवितो.DAMar 605.2

    येशूने त्याला म्हटले, “मित्रा तू कशासाठी आला आहेस?” पुढे बोलताना त्याचे ओठ थरथर कंप पावत होते. तो म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय?” ह्या उद्गाराने विश्वासघातक्याचा विवेक जागृत होऊन दुराग्रही अंतःकरण द्रवले पाहिजे होते; परंतु मानसन्मान, इमानीपणा आणि मानवी प्रेमळपणा त्याच्यापासून दूर होता. तो तेथे फाजील विश्वासाने, बेपर्वाईने वृत्तीने, कसलीही सौम्यता धारण न केलेला असा उभा होता. सैतानाला तो सर्वस्वी वश झालेला होता आणि त्याला विरोध करण्याचे त्राण त्याच्यात काहीच राहिले नव्हते. येशूने विश्वासघातक्याच्या चुंबनाचा अव्हेर केला नाही. DAMar 605.3

    आतापर्यंत ज्यांच्यासमोर गौरव होत होता त्याला यहूदाने स्पर्श केलेला पाहिल्यावर जमाव धाडसी बनला. त्यांनी येशूला पकडले आणि सत्कृत्ये करण्यात सतत गुतलेले त्याचे हात बांधू लागले. DAMar 605.4

    त्यांचा गुरूजी पकडला जाऊ शकणार नाही असे शिष्यांना वाटले होते. ज्या सामर्थ्याने जमाव मेल्यासारखा जमीनीवर पडला होता त्याच सामर्थ्याने ते असहाय, लाचार होतील आणि येशू व त्याचे सोबती सुटका करून पळून जातील. ज्यांच्यावर त्यांचे प्रेम होते त्याचे हात बांधण्यासाठी आणलेला दोर पाहून त्यांची मोठी निराशा झाली व रागही आला. रागाच्या भरात पेत्राने म्यानातून तरवार उपसली आणि गुरूजीला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी त्याने मुख्य याजकाच्या सेवकाचा कान छाटून टाकला. येशूने हे पाहिल्यावर जरी रोमी शिपायांनी त्याचे हात धरले होते तरी त्याने आपले हात पुढे करून कानाला स्पर्श केला व ताबडतोब त्याचा कान बरा झाला. मग त्याने पेत्राला म्हटले, “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्वजण तरवारीने नाश पावतील. तुला असे वाटते की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यापेक्षा अधिक पाठवून देणार नाही?’ शिष्यांना वाटले हे असे का, तो स्वतःचा व आमचा बचाव करू शकत नाही काय? त्यांच्या मनात घोळत असलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने म्हटले, “पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे असे म्हणणारा शास्त्रलेख कसा पूर्ण होईल?” “माझ्या पित्याने दिलेला हा प्याला मी पिऊ नये काय?”DAMar 605.5

    येशूचा पाठलाग करणाऱ्यामध्ये सामील होण्यात यहूदी अधिकाऱ्यांचा मानसन्मान त्यांच्या आड आला नाही. त्याला अटक करणे त्यांच्यामते फार महत्त्वाची बाब होती. कावेबाज याजक व वडील मंदिरातील शिपायांना व गर्दी करणाऱ्या लोकांना मिळाले आणि यहूदाच्या मागे गेथशेमाने बागेत गेले. कसल्या जमावाबरोबर हे अधिकारी मिळाले-खळबळ, गोंधळ उडविण्यास उत्सुक असलेला जमाव, जणू काय जंगली जनावरावर हल्ला करण्यासाठी तरवारी व सोटे घेऊन आलेला समुदाय!DAMar 606.1

    याजक व वडील यांच्याकडे वळून ख्रिस्ताने आपली सूक्ष्मभेदक नजर त्यांच्यावर रोखली. त्याने उद्गारलेल्या शब्दांचा विसर त्यांना आयुष्यभर पडणार नव्हता. ते परात्पराच्या बाणाप्रमाणे तीक्ष्ण होते. सभ्यपणाने त्याने म्हटले: एकाद्या लुटारूला धरावे तसे मला धरावायस तुम्ही तरवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहा काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरिले नाही. ती तुम्हाला फार चांगली संधि होती. तुमच्या कामासाठी रात्रीची वेळ तुम्हाला बरी वाटली. “ही घटिका तुमची आणि अंधकारमय सत्तेची आहे.”DAMar 606.2

    येशूने स्वतःला अटक करून दिल्याचे पाहून शिष्य अगदी गर्भगळीत झाले. त्याचा व त्यांचा असा अपमान झालेला पाहून त्यांची मानहानी झाली असे त्यांना वाटले. त्याची वागणूक त्यांना समजली नाही आणि जमावापुढे वश झाल्याबद्दल त्याला ते दोष देऊ लागले. क्रोधाविष्ट होऊन व घाबरून जाऊन स्वतःचा जीव वाचवण्यास पेत्राने सूचीत केले. त्या सूचनेनुसार “सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.” ह्या परित्यागाविषयी ख्रिस्ताने अगोदरच भाकीत केले होते. त्याने म्हटले, “पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.” योहान १६:३२.DAMar 606.3