Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ७१—दासांचा दास

    लूक २२:७-१८, २४; योहान १३:१-१७.

    यरुशलेमातील माडीवरच्या खोलीत येशू मेजावर आपल्या शिष्याबरोबर बसला होता. वल्हांडण सण साजरा करण्यासाठी ते तेथे जमले होते. बाराजणाबरोबर हा सण पाळण्याची तारणाऱ्याची इच्छा होती. त्याची वेळ आली होती हे त्याला माहीत होते; तो वल्हांडणाचा खरा यज्ञपशू होता आणि वल्हांडण सणाच्या दिवशी त्याचा यज्ञ होणार होता. क्रोधाचा प्याला पिण्याच्या तयारीत तो होता आणि लवकरच त्याचा क्लेशाने बाप्तिस्मा होणार होता. परंतु काही तास अजून होते आणि त्यांचा उपयोग त्याच्या प्रीय शिष्यांच्या कल्याणासाठी करावा असे त्याला वाटले.DAMar 562.1

    ख्रिस्ताने संबंध आयुष्य निःस्वार्थी सेवेत घालविले. “सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास” (मत्तय २०:२८) हे ब्रीद वाक्य त्याचे प्रत्येक कृतीत व्यक्त झाले. परंतु अद्याप त्याच्या शिष्यांना हा पाठ शिकता आला नाही. ह्या शेवटच्या वल्हांडण सणाच्या भोजणाच्या वेळी येशूने हा पाठ उदाहरणाने स्पष्ट केला आणि त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर व अंतःकरणावर कायमचा पडला. DAMar 562.2

    येशू आणि शिष्य यांच्यामधील सुसंवाद सहसा आनंदाचा होता आणि सर्वांना तो कल्याणदायक वाटला. वल्हांडण सणाच्या मेजवाणीमध्ये विशेष आकर्षण होते; परंतु ह्या प्रसंगी ख्रिस्त अस्वस्थ होता. त्यांचे अंतःकरण भारावलेले होते आणि त्याच्या मुद्रेवर छाया पसरलेली होती. माडीवरील खोलीत जमल्यावर त्याच्या मनावर कशाचातरी भार असल्याचे त्यांच्या दृष्टीस आले. त्याचे कारण त्यांना समजले नाही परंतु त्याच्या दुःखाबद्दल त्यांनी सहानुभूती दर्शविली. DAMar 562.3

    मेजासभोवती जमल्यावर काकुळतीने त्याने म्हटले, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती; कारण मी तुम्हास सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही. मग प्याला हातात घेऊन व उपकार स्तुती करून तो म्हणाला, हा घ्या आणि आपणामध्ये ह्याची वाटणी करा. कारण मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.’DAMar 562.4

    हे जग सोडून पित्याकडे जाण्याची वेळ आली आहे हे ख्रिस्ताला माहीत होते. जगामध्ये असलेल्या स्वकीयावर त्याने शेवटपर्यंत प्रेम केले. तो सध्या वधस्तंभाच्या छायेत होता आणि त्याच्या अंतःकरणाला दुःखाच्या वेदना होत होत्या. त्याचा विश्वासघात होईल त्यावेळेस त्याला एकट्याला सोडून सर्वजण पळून जातील हे त्याला माहीत होते. गुन्हेगाराच्या कडक तपासणीच्या पद्धतीतून त्याला जावे लागणार आणि शेवटी त्याला मरण दंड होणार हे त्याला माहीत होते. ज्यांचे तारण करण्यास तो आला त्यांची कृतघ्नता व निर्दयता त्याला माहीत होती. किती महान यज्ञ त्याला करावा लागणार आणि कितीजनाना तो निरर्थक होणार हेही त्याला ज्ञात होते. त्याच्यासमोर असलेले हे सर्व पाहून स्वभाविकपणे तो होणारी मानहानी व व्यथा ह्या विचाराने दडपून गेला होता. परंतु त्याच्याबरोबर असलेले बाराजण त्याचे स्वतःचे आहेत आणि त्याच्या व्यथा व यातना संपुष्टात आल्यावर, त्यांना ह्या जगात झगडण्यासाठी, जीव तोडून कष्ट करण्यासाठी राहावे लागणार हे त्याला माहीत होते. त्याला जे सहन करावे लागले ते शिष्यांना सहन करावे लागणार हा विचार त्याच्यासमोर होता. त्याने स्वतःचा विचार केला नाही तर त्याच्या मनात त्यांच्या काळजीचा विचार सर्वात महत्त्वाचा होता.DAMar 563.1

    शेवटच्या सायंकाळी येशूला त्याच्या शिष्यांना बरेचसे सांगावयाचे होते. त्याला जे सांगावयाचे ते स्वीकारण्यास ते तयार झाले असते तर ते हृदयभंग होणाऱ्या अति दुःखापासून, निराशा व अविश्वास यापासून बचावले असते. परंतु त्याचे बोलणे ते सहन करू शकत नव्हते हे येशूने पाहिले. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्याच्या मुखातून निघणारे इशाऱ्याचे व समाधानाचे शब्द बाहेर पडू शकले नव्हते. काही वेळ शांततेत गेला. येशू वाट पाहात असल्यासारखा दिसला. शिष्य स्तब्ध होते. ख्रिस्ताच्या दुःखाने निर्माण झालेली सहानुभूती व कळकळ नाहीशी झालेली दिसली. स्वतःच्या क्लेशाविषयी त्याने काढलेल्या दुःखाच्या उद्गाराचा काही जास्त परिणाम झाला नाही. परस्पराकडे पाहिलेल्या नजरेत मत्सर, हेवा व भांडण तंटा दसत होता.DAMar 563.2

    “सर्वात मोठा कोण ह्याविषयी त्यांच्यात झगडा चालला होता.” हा झगडा ख्रिस्ताच्यासमोर आला आणि त्यामुळे त्याला फार दुःख झाले. ख्रिस्त आपली सत्ता दाखवून दाविदाच्या सिंहासनावर विराजमान होईल ह्या त्यांच्या विचाराला शिष्य चिकटून राहिले होते. त्या राज्यामध्ये श्रेष्ठ स्थान पटकावण्याची प्रत्येकजन अभिलाषा करीत होता. त्यांनी स्वतःची किंमत तसेच एकमेकांची किंमत ठरविली होती आणि दुसऱ्याला अधिक महत्त्व देण्याऐवजी स्वतःलाच पहिला मान दिला होता. ख्रिस्ताच्या राजासनाच्या उजव्या व डाव्या बाजूला बसण्याची याकोब व योहान यांच्याविषयी केलेल्या विनंतीने दुसऱ्यांचा राग भडकला. दोघा भावानी उच्च स्थान पटकावण्याची विनंती केलेली पाहून दहा जणात खळबळ माजली आणि स्नेहभावाला तडा जाण्याचा धोका निर्माण झाला. त्यांच्याविषयी चुकीचा ग्रह करून घेतला आहे आणि त्याचे विशेष कौशल्य व इमानीपणा विचारात घेतला नाही असे त्यांना वाटले. याकोब व योहान यांच्यावर यहूदाने कडाडून हल्ला केला.DAMar 563.3

    शिष्यांनी मेजवानीच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा त्यांची अंतःकरणे रागाने भरलेली होती. यहूदा ख्रिस्ताच्या डाव्या बाजूला जाऊन बसला आणि योहान उजव्या बाजूला होता. यहूदाने उच्च स्थान पटकावण्याचा निश्चय केला आणि ते स्थान म्हणजे ख्रिस्ताच्या बाजूचे असे त्याला वाटले. यहूदा विश्वासघातकी होता.DAMar 564.1

    कलहासाठी दुसरे एक कारण उद्भवले. सणाच्या वेळी अतिथीचे पाय नोकराने धुण्याची प्रथा होती आणि ह्या प्रसंगी ह्या विधीची सर्व तयारी झाली होती. पाय धुण्यासाठी मोठा घडा, गंगाळ व रूमाल तेथे होते परंतु तेथे दास हजर नव्हता आणि हा भाग शिष्यांना पार पाडायचा होता. अहंकाराने भरलेल्या प्रत्येक शिष्याने दासाचा भाग न करण्याचा मनात निश्चय केला. त्यांना काही करावयाचे याविषयी अजाण राहून सर्वांनी निर्विकार अनुत्साह दाखविला. स्तब्ध राहून नम्र होण्याचे त्यांनी नाकारिले.DAMar 564.2

    सैतानाने त्यांच्यावर मात करू नये म्हणून ह्या बिचाऱ्या शिष्यांच्यासाठी ख्रिस्ताने काय करायचे होते? केवळ शिष्यत्व जाहीर केल्याने शिष्य बनू शकत नाही आणि त्याच्या राज्यात स्थान मिळू शकत नाही हे तो त्यांना कसे दाखवू शकत होता? प्रेमळ सेवाभाव, खरी विनम्रता यामध्ये खरे मोठेपणा आहे हे तो कसे दाखवू शकला? सांगावयाचे ते सांगताना त्याचे आकलन होण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात प्रेम ज्योत तो कशी प्रदीप्त करील?DAMar 564.3

    परस्परांची सेवा करण्यासाठी शिष्यांनी काही हालचाल केली नाही. ते काय करतात हे पाहाण्यासाठी ख्रिस्त थोडा वेळ थांबला. नंतर दिव्य गुरूजीने टेबलावरून उठून, हालचालीला व्यत्यय येऊ नये म्हणून बाह्य वस्त्रे काढून ठेविली आणि रूमाल घेऊन कमरेस बांधिला. आश्चर्यचकित होऊन शिष्यांनी त्याच्याकडे टक लावून पाहिले आणि पुढे काय होणार ह्याची प्रतिक्षा करू लागले. “मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाप धुऊ लागला आणि कमरेस बांधिलेल्या रूमालाने ते पुसू लागला.” ह्या कृतीने शिष्यांचे डोळे उघडिले. शरमेने आणि अपमानाने त्यांनी मान खाली घातली. न उच्चारलेली धमकी त्यांना समजली आणि त्यांच्याठायी नवा दृष्टिकोन आला.DAMar 564.4

    ख्रिस्ताने शिष्यावरील आपले प्रेम व्यक्त केले. त्यांच्या स्वार्थी मनोवृत्तीने त्याला दुःख झाले परंतु त्याबाबतीत तो त्यांच्याशी वादविवाद करीत बसला नाही. त्याऐवजी विस्मरण न होणारा पाठ त्याने त्यांना दिला. त्याचे त्यांच्यावरील प्रेम थंडावले नव्हते. पित्याने त्याच्या स्वाधीन सर्व काही केले आहे आणि तो देवाकडून आला आहे आणि देवाकडे जातो हे त्याला माहीत होते. त्याच्या देवत्वाची त्याला पूर्ण जाणीव होती; परंतु त्याने त्याचा राजाचा मुकुट व पेहराव काढून बाजूला ठेविला होता आणि दासाचे रूप घेतले होते. पृथ्वीवरील त्याच्या आयुष्यातील शेवटच्या कृतीतील एक म्हणजे दासाचे काम करणे हे होते.DAMar 564.5

    वल्हांडण सणाच्या अगोदर यहूदाने याजक व शास्त्री यांना दुसऱ्यांदा भेटून येशूला त्यांच्या हातात सुपूर्त करण्याचा करार मुकरर केला होता. तथापि तो कोणत्याही गुन्ह्यापासून निर्दोष असल्यासारखे शिष्यांच्याबरोबर मिळून मिसळून वागत होता आणि मेजवानीची तयारी करण्यात गोडी दाखवीत होता. यहूदाच्या हेतूविषयी शिष्य अजाण होते. केवळ ख्रिस्तालाच त्याचे गुपीत माहीत होते. तरी त्याने ते उघड केले नाही. त्याच्या आत्म्याची येशूला आस्था होती. यरुशलेमाला पाहून अश्रु ढाळिले होते. त्याप्रमाणे त्याच्याविषयी त्याला फार आस्था वाटत होती. मी ह्याला कसे सोडू असे त्याच्या मनाला वाटत होते. प्रेमाच्या निग्रही शक्तीचा स्पर्श यहूदाला झाला होता. तारणारा त्याचे पाय धुवून रूमालाने पुसत असताना यहूदाचे अंतःकरण भावनेने उचंबळून गेले होते आणि त्याला पाप कबूल करण्याचा प्रबळ इच्छा झाली होती. परंतु विनम्र होण्यास तो तयार नव्हता. अनुतापाविरुद्ध त्याने आपले अंतःकरण कठीण केले आणि काही काळ दाबून ठेवलेल्या मनोविकाराने एकदम उचल खाली आणि त्याने त्याचा ताबा घेतला. ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतल्यामुळे यहूदाचे मन दुखावले होते. त्याला वाटले येशू अशी क्षुद्र कामे जर करू शकतो तर तो इस्राएलांचा राजा होऊ शकणार नाही. कालाबाधित सरकारामधील ऐहिक मानसन्माच्या आशा धुळीस मिळाल्या. ख्रिस्ताच्या मागे जाऊन काही फायदा होणार नाही ह्या विचाराने यहूदाचे समाधान झाले होते. त्याच्या विचाराप्रमाणे ख्रिस्ताने स्वतःला खालच्या पायरीवर आणलेले पाहून त्याचा त्याग करण्याचे त्याने निश्चित केले. त्याला पिशाचाने पच्छाडले होते आणि प्रभूला विश्वासघाताने धरून देण्याचे काम समाप्त करण्याचा त्याने इरादा केला.DAMar 565.1

    मेजावर बसताना यहूदाने प्रथम स्थान पटकावण्याचा प्रयत्न केला आणि दास या नात्याने ख्रिस्ताने त्याची प्रथम सेवा केली. योहानाविषयी यहूदाच्या मनात कडवटपणा होता त्याची सेवा शेवटी केली. परंतु त्या विषयी योहानाला हा अनादर किंवा उपेक्षा वाटली नाही. शिष्यांनी ख्रिस्ताची कृती पाहिल्यावर त्यांच्या भावना उद्दीपित झाल्या. पेत्राची पाळी आल्यावर आश्चर्यचकित होऊन तो उद्गारला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?’ ख्रिस्ताची लीनता पाहून त्याचे अंतःकरण भग्न झाले. ते पाहून त्याला लाज वाटली कारण ती सेवा एकादा शिष्य उरकून काढीत नव्हता. येशूने उत्तर दिले, “मी करितो ते तुला आता कळत नाही; ते तुला पुढे कळेल.’ देवपुत्र म्हणून स्वीकार केलेला त्याचा प्रभु दासाचे काम करीत असलेला पाहाणे पेत्राला पसंत पडले नाही. ह्या मानहानीच्या विरुद्ध तो उठला. ह्यासाठी ख्रिस्त ह्या जगात आला होता हे त्याच्या लक्षात आले नव्हते. जोराने ठामपणे उद्गारून तो म्हणाला, “तुम्हाला माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.’DAMar 565.2

    गांभीर्याने येशू पेत्राला म्हणाला, “मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही.” पेत्र नाकरीत असलेली सेवा उच्च पापक्षालनाचे प्रतीक होते. पापकलंकाने दूषित झालेले अंतःकरण शुचिर्भूत करण्यासाठी ख्रिस्त आला होता. ख्रिस्ताला पाय धुण्याचे नाकारून पेत्र उच्च व पापक्षालनाला मुकणार होता कारण त्याचा संदर्भ पाय धुण्याशी होता. खऱ्या अर्थाने तो प्रभूचा नाकार करीत होता. आमच्या शुद्धिकरणासाठी काम करण्यास त्याला मोकळीक दिल्याने त्याची मानखंडना होत नव्हती. आमच्यासाठी केलेल्या कोणत्याही तरतूदीचा स्वीकार कृतज्ञापूर्वक अंतःकरणाने करणे आणि कळकळीने ख्रिस्तासाठी सेवा करणे ही खरी विनयशीलता आहे.DAMar 566.1

    “मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही’ ह्या शब्दामुळे पेत्राने त्याचा अहंकार व स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा निर्धार सोडून दिला. ख्रिस्तापासून दूर होण्याचा विचार त्याला सहन झाला नाही; तो त्याला मृत्यू वाटला. त्याने म्हटले, “प्रभूजी, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आहे.”DAMar 566.2

    शरीराच्या स्वच्छतेपेक्षा त्या वचनात अधिक अर्थ भरलेला आहे. ख्रिस्त उच्च पापक्षालनाविषयी बोलत आहे. स्नान केलेला स्वच्छ असतो परंतु पादत्राणे घालून चालणाऱ्याचे पाय धुळीने घाण होतात आणि ते पुन्हा धुण्याची गरज आहे. पाप व अशुद्धता यांच्यासाठी खुला केलेल्या मोठ्या झऱ्यात पेत्र व त्याच्या सोबत्यांना, बांधवांना धुण्यात आले होते. ते त्याचे आहेत हे ख्रिस्ताने मान्य केले. परंतु मोहामुळे ते पापात पडले आणि त्यांना शुद्ध करण्याच्या अनुग्रहाची आवश्यकता होती. पायावरील धुळ धुऊन टाकण्याच्या कृतीने त्यांच्या अंतःकरणातील दूजाभाव, द्वेषबुद्धी आणि अहंकार देखील धुऊन टाकण्याचा त्याचा विचार होता. त्यावेळी असलेल्या मनोवृत्तीमुळे त्यांच्यातील एकजणही ख्रिस्ताबरोबर प्रभू भोजन घेण्यास तयार नव्हता. त्यांच्या अंतःकरणात प्रीती आणि विनयशीलता दिसल्याशिवाय ते वल्हांडण सणाच्या मेजवानीत किंवा ख्रिस्त प्रस्थापित करीत असलेल्या प्रभु भोजनाच्या विधीत भाग घेण्यास पात्र नव्हते. त्यांची अंतःकरणे शुद्ध झाली पाहिजेत. अहंकार व स्वार्थ यांच्यामुळे दुजाभाव आणि द्वेषबुद्धी निर्माण होते परंतु त्यांचे पाय धुण्याद्वारे येशूने हे सर्व अवगुण धुऊन टाकिले. त्यांच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्यांच्याकडे पाहून “तुम्ही शुद्ध आहा’ असे येशू म्हणू शकला. आता त्यांच्यामध्ये अंतःकरणाचे एकीकरण व परस्पर प्रेम दिसले. ते नम्र शिकविण्याजोगे बनले. यहूदाला सोडून बाकी प्रत्येकजन दुसऱ्याला उच्च स्थान देण्यास तयार होते. आता ते नम्रतेने व कृतज्ञतेने येशूचे वचन स्वीकारण्यास तयार होते.DAMar 566.3

    पेत्र व त्याच्या बांधवाप्रमाणे आम्हीही ख्रिस्ताच्या रुधिराने शुचिर्भूत झालो आहोत, तथापि पापाचा संबंध आल्याने अंतःकरणाची शुद्धता मलिण होते. आम्ही ख्रिस्ताकडे शुद्ध करणाऱ्या कृपेसाठी आले पाहिजे. आपले मळकट पाय त्याचा प्रभु व गुरू यांच्यासमोर आणण्यास पेत्र कसूर करीत होता; परंतु आम्ही आमचे दूषित, अमंगल अंतःकरण ख्रिस्तापुढे कितीदा सादर करितो! आमचा दुष्ट स्वभाव, आमचा पोकळ डौल, दिमाख आणि अहंकार ह्यामुळे त्याला कसे दुःख होते! तथापि आपल्या सर्व उणीवा आणि अमंगळता त्याच्याकडे आणल्या पाहिजेत. केवळ तोच आपले पापक्षालन करू शकतो. त्याच्या सामर्थ्याने आमचे शुद्धिकरण झाल्याशिवाय त्याच्याबरोबर सख्यसंबंध ठेवण्यास व प्रभूभोजन घेण्यास आम्ही सिद्ध होऊ शकत नाही.DAMar 567.1

    येशूने शिष्यांना म्हटले, “तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.” त्याने यहूदाचे पाय धुतले परंतु त्याने अंतःकरण त्याला दिले नव्हते. त्याची शुद्धी झाली नव्हती. यहूदा ख्रिस्ताला शरण गेला नव्हता.DAMar 567.2

    शिष्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यास म्हटले, “मी तुम्हास काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरू व प्रभु संबोधिता आणि ते ठीक बोलता; कारण मी तसा आहेच. ह्यास्तव मी प्रभु व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठविलेला पाठविणाऱ्यापेक्षा थोर नाही.’ DAMar 567.3

    त्याने त्यांचे पाय धुतल्यामुळे त्याच्या प्रतिष्ठेवर काही दुष्परिणाम झाला नाही हे शिष्यांना समजून यावे ही ख्रिस्ताची अपेक्षा होती. “तुम्ही मला गुरू व प्रभु संबोधिता आणि ते ठीक बोलता; कारण मी तसा आहे.” तो अपरिमित श्रेष्ठ असल्यामुळे त्याने सेवेला अनुग्रहाने आशीर्वादित करून महत्त्व दिले. ख्रिस्तासारखा कोणीही नव्हता तरीपण ते हलके काम करण्यास तो नम्र झाला. स्वाभाविकरित्या मनुष्याच्या अंतःकरणात स्वार्थ वास करितो आणि त्यामुळे आपमतलबी, स्वार्थी सेवा त्यांच्या हातून घडू नये म्हणून ख्रिस्ताने नम्रतेचे उदाहरण घालून दिले. हा महत्त्वाचा विषय त्याने मनुष्याच्या कक्षेत ठेविला नाही. त्याने त्याला इतके महत्त्व दिले होते की, तो देवासम असून दासाप्रमाणे त्याने शिष्यांचे पाय धुतले. त्यांच्यामध्ये उच्च स्थान पटकावण्याची ईर्षा चालली असताना ज्याच्यासमोर प्रत्येक गुडघा टेकला जातो, ज्याची सेवा करण्यास दिव्यदूतांना सन्मानाचे वाटते तो त्याला प्रभु म्हणणाऱ्यांचे पाय धुण्यास नम्र झाला. त्याचा विश्वासघात करणाऱ्याचे पाय त्याने धुतले.DAMar 567.4

    ज्या सेवेचा उगम देवामध्ये आहे त्याचे परिपूर्ण उदाहरण ख्रिस्ताने आपल्या जीवनात आणि शिकविलेल्या धड्यामध्ये दिले आहे. देवाचे अस्तित्व स्वतःसाठीच नाही. जग निर्माण करून आणि सर्व सृष्ट वस्तूंना आधार देऊन तो सतत दुसऱ्याची सेवा करीत आहे. “तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानावर व अनीतिमानावर पाऊस पाडितो.” मत्तय ५:४५. सेवाकार्यातील हा उत्कृष्ट नमुना देवाने पुत्राला दिलेला आहे. येशू मानवतेचा प्रमुख होता आणि त्याच्या उदाहरणाने तो सेवाभावी कार्य शिकविणार होता. त्याचे सबंध जीवन सेवाकार्याला निगडीत होते. त्याने सर्वांची सेवा केली, सर्वांची गरज भागविली. अशी रीतीने त्याने देवाचे नियम पाळिले आणि स्वतःच्या उदाहरणाने त्याचे पालन कसे करायचे ते दाखविले. DAMar 568.1

    हे तत्त्व शिष्यांच्यामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ख्रिस्ताने वारंवार केला. याकोब व योहान यांनी श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी विनंती केली तेव्हा त्याने म्हटले होते, “जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहातो, तो तुमचा सेवक होईल.’ मत्तय २०:१६. माझ्या राज्यात पसंति (हक्क) व सर्वश्रेष्ठतेचे तत्त्व यांना थारा नाही. केवळ नम्रतेचा मोठेपणा तेथे असणार. भक्तिपूर्वक दुसऱ्यांची सेवा करणे केवळ हेच वैशिष्य तेथे दिसेल.DAMar 568.2

    शिष्यांचे पाय धुतल्यावर त्याने म्हटले, “जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.” ह्या उद्गाराद्वारे पाहुणचार व आदरातिथ्य करण्याच्या प्रथेचा नियम ख्रिस्त घालून देत नव्हता. अतिथीचे प्रवासात धुळीने मलीन झालेले पाय धुऊन स्वच्छ करणे यापेक्षा अधिक अर्थ ह्यामध्ये आलेला आहे. ख्रिस्त धार्मिक सेवेची स्थापना करीत होता. प्रभूच्या कृतीने हा नम्रतेचा विधि पवित्र कार्यासाठी वाहून दिलेला अनुष्ठान (धार्मिक विधि) बनला. नम्रता व सेवाभाव हे धडे नित्याचे मनात ठेवण्यासाठी हा विधि शिष्यांनी पाळावयाचा होता.DAMar 568.3

    प्रभु भोजनाच्या विधीसाठी ख्रिस्ताने नेमून दिलेला हा तयारीचा अनुष्ठान आहे. मनामध्ये गर्व, दुजाभाव आणि मोठेपणासाठी कलह राखून ठेवल्यास अंतःकरण ख्रिस्ताबरोबर संगत सोबत करू शकत नाही. प्रभूभोजन विधीतील त्याचे शरीर व त्याचे रक्त यामध्ये आम्ही भाग घेऊ शकत नाही. म्हणून नम्रतेचे स्मारक म्हणून प्रथम भाग घेण्यास येशूने हा विधि स्थापिला.DAMar 568.4

    ह्या विधीमध्ये भाग घेण्यास आल्यावर देवाच्या लोकांनी जीवन व वैभव यांनी समृद्ध असलेल्या प्रभूच्या वचनाची आठवण ठेवावीः “मी तुम्हास काय केले आहे हे तुम्हास समजले काय? तुम्ही मला गुरू व प्रभु संबोधिता आणि हे ठीक बोलता; कारण मी तसा आहेच. ह्यास्त्व मी प्रभु व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठविलेला पाठविणाऱ्यापेक्षाही थोर नाही; जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.” एक मनुष्य स्वतःला आपल्या बंधुपेक्षा श्रेष्ठ समजतो, स्वतःसाठी काम करितो, उच्च स्थान मिळवायचा प्रयत्न करितो अशाचा परिणाम दुष्ट तर्क करण्यात व कडवट मनोवृतीत होतो. प्रभूभोजन घेण्याच्या अगोदरच्या विधीद्वारे असले विपरीत ग्रह दूर करण्याचा, स्वार्थी विचारसरणीतून मनुष्याला बाहेर काढण्याचा, उच्च स्थानापासून भावाची सेवा करण्यास तयार होणाऱ्या नम्रतेप्रत आणण्याचा उद्देश आहे.DAMar 568.5

    ह्या विधीच्या प्रसंगी अंतःकरणाचा शोध घेण्यासाठी, पापाची आणि पापक्षमेची खात्री करून देण्यासाठी स्वर्गातील पवित्र आत्मा तेथे हजर असतो. स्वार्थी अंतःकरणात चाललेल्या विचारसरणीचे परिवर्तन करण्यासाठी कृपावंत ख्रिस्त तेथे हजर असतो. ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करणाऱ्यांची चेतनाशक्ती पवित्र आत्मा प्रज्वलित करितो. ख्रिस्ताला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे स्मरण केल्यावर विचार विचाराला जुळतो; स्मरण शृंखला आठवणीत येते आणि देवाचा चांगुलपणा आणि जगातील स्नेह्यांचा सद्भाव व मनाचा कोमलपणा यांचे स्मरण होते. विसरलेले कृपाप्रसाद, करुणेचा अपव्यय, दयाळूपणाची उपेक्षा ह्या सर्वांची आठवण होते. प्रेम रोपट्याचे निर्मूलन करणाऱ्या कडवट मुळ्या उघड केल्या जातात. शीलस्वभावातील उणीवता, कर्तव्यातील कसूर, देवाशी कृतघ्न, बांधवाशी वागण्यातील रुक्षपणा, उदासीनता ह्याचे स्मरण होते. देवाच्या दृष्टीकोनातून पाप पाहाण्यात येते. आमचे विचार आनंदाचे विचार नाहीत तर स्वतःची निर्भर्त्सना करणारे व अपमानास्पद आहेत. दुजाभावाला खतपाणी घालणारा प्रत्येक अटकाव मोडून काढण्यास मन जागृत केले जाते. दुष्ट विचारसरणी आणि अभद्र बोली सोडून देण्यात येते. पापे कबूल करण्यात येतात व पापक्षमा मिळते. ख्रिस्ताची कृपा अंतःकरणात येते आणि ख्रिस्ताची प्रीती एकात्मतेमध्ये अंतःकरणे संलग्न करिते.DAMar 569.1

    तयारीच्या विधीपासून धडे शिकल्यानंतर उच्च आध्यात्मिक जीवनासाठी इच्छा जागृत होते. ह्या इच्छेला दिव्य साक्षीदार प्रतिसाद देईल. आत्म्याची उन्नती होईल. पापांची क्षमा झाली आहे ह्या विचाराने आम्ही प्रभूभोजनामध्ये भाग घेऊ शकतो. ख्रिस्ताच्या धार्मिकतेच्या प्रकाशाने मन व आत्म्याचे मंदिर भरून जाईल. “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!” आम्ही पाहातो. योहान १:२९.DAMar 569.2

    ह्या सेवेद्वारे ज्यांना चैतन्य लाभते त्यांना तो केवळ विधि संस्कार राहात नाही. त्यातून शिकलेला नित्याचा पाठ म्हणजे, “प्रीतीने एकमेकांची सेवा करा.’ गलती ५:१३. शिष्यांचे पाय धुण्याद्वारे ख्रिस्ताने दर्शविले की, स्वर्गीय खजीन्यांतील शाश्वत संपत्तीचे त्याच्याबरोबर त्यांना वारसदार करण्यासाठी कोणतीही सेवा, कितीही हलकी असली तर तो करील. त्याचे शिष्य हा विधि पाळत असताना त्याच्या प्रमाणेच त्याच्या बांधवांची सेवा करण्याची प्रतिज्ञा करितात. जेव्हा जेव्हा हा विधि योग्यरित्या पाळण्यात येतो तेव्हा तेव्हा देवाच्या लोकांचे नाते पवित्र होते आणि ते एकमेकाला मदत करतात व शुभेच्छा इच्छितात. जीवन निस्वार्थी सेवाकार्याला वाहून देण्याचा ते करार करितात. हे केवळ एकमेकासाठीच नाही कारण त्याचे कार्यक्षेत्र त्याच्या प्रभूसारखे आहे. आमच्या सेवेची गरज असणाऱ्यांनी जग भरून गेले आहे. दरिद्री, लाचार, अडाणी सर्वत्र आहेत. माडीवरच्या खोलीत ख्रिस्ताशी तादात्म्य पावलेले त्याच्याप्रमाणे सेवा करण्यास बाहेर पडतील.DAMar 569.3

    सर्वांनी ज्याची सेवा केली तो येशू सर्वांची सेवा करावयास आला. त्याने सर्वांची सेवा केली म्हणून सर्वजण त्याचा पुन्हा सन्मान व सेवा करतील. जे त्याच्या दिव्य स्वभावगुणांचे भागीदार होतील आणि उद्धार पावलेल्यांना पाहून झालेल्या आनंदात त्याच्याबरोबर सामील होतील त्यांनी त्याच्या निस्वार्थी सेवेच्या उदाहरणाचे अनुकरण करावे.DAMar 570.1

    ख्रिस्ताच्या वचनाद्वारे ह्या सर्वांचे पूर्णपणे आकलन होते, “जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास कित्ता घालून दिला आहे.” ही सेवा प्रस्थापित करण्यात त्याचा हा उद्देश होता. तो म्हणतो, “जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात,” त्याने दिलेल्या पाठांचा उद्देश तुम्हाला समजला तर, “त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.”DAMar 570.2