Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १८—“त्याची वृद्धि व्हावी”

    योहान ३:२२-३६.

    काही काळ अधिकारी, राजे व याजक यांच्यापेक्षा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा राष्ट्रावरील प्रभाव अधिक होता. त्याने स्वतःला मशीहा म्हणून जाहीर केले असते व रोमी साम्राज्याविरूद्ध बंद पुकारले असते तर याजक व लोक यांनी त्याच्या निशाणाखाली गर्दी केली असती. जगातील विजेत्यांना आकर्षक वाटणारी प्रत्येक गोष्ट योहानाच्या पुढे निकडीने सादर करण्यात सैतान तयारी करीत होता. परंतु त्याच्या सामर्थ्याचे चिन्ह पुढे ठेवून त्याने ही उत्तम लाच घेण्याचे साफ नाकारले. त्याने त्याच्यावर केंद्रित केलेले लक्ष दुसऱ्याकडे वळविले.DAMar 137.1

    त्याच्यावर केंद्रित झालेली लोकप्रियता आता हळूहळू उद्धारकाकडे झुकत होती हे त्याने पाहिले. त्याच्या भोवती गोळा होणारा जमाव दिवसेंदिवस रोड होऊ लागला. जेव्हा येशू यरुशलेमहून यार्देन भागात आला तेव्हा त्याचे ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली. दिवसेंदिवस शिष्यांची संख्या वाढत गेली; पुष्कळजण बाप्तिस्मा घेण्यासाठी आले. ख्रिस्ताने स्वतः बाप्तिस्मा केला नाही. हा विधि करण्यास त्याने शिष्यांना अधिकार दिला. अशा प्रकारे त्याच्यापुढे तो पाठविलेला आहे हे त्याने सिद्ध करून दिले. येशूची लोकप्रियता वाढत असलेली पाहन योहानाच्या शिष्यांना हेवा वाटला. त्याच्या कामावर टीका करण्यास ते तयारीत होते आणि तो प्रसंग त्यांना लवकरच मिळाला. बाप्तिस्म्याद्वारे व्यक्तीची पापासून शुद्धी होते का या बाबतीत यहूदी व त्यांच्यामध्ये प्रश्न उद्भवला. योहानाचा बाप्तिस्मा व येशूचा बाप्तिस्मा यांच्यामध्ये महत्त्वाचा फरक आहे अशी त्यांची विचारसणी होती. बाप्तिस्म्याच्या समयी कोणते शब्द वापरावे व शेवटी येशूच्या शिष्यांचा बाप्तिस्मा करण्याचा हक्क यांच्यासंबधी त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला.DAMar 137.2

    योहानाचे शिष्य आपले गाहाणे घेऊन त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी, पाहा, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे तो बाप्तिस्मा करितो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात. ह्या शब्दाद्वारे सैतानाने योहानावर मोह आणिला. योहानाचे कार्य संपुष्टात येत आहे असे वाटत होते तरी ख्रिस्ताच्या कार्याला तो अटकाव करू शकत होता. जर त्याने स्वतःवर सहानुभूती दाखविली असती व आपली जागा त्याने घेतल्याबद्दल अति दुःख किंवा निराशा व्यक्त केली असती तर त्याने कलहाचे बीज पेरले असते, हेवा व मत्सर यांना उत्तेजन दिले असते, आणि सुवार्ता कार्याच्या प्रगतीत खीळ घातली असती. DAMar 137.3

    मानव या नात्याने स्वाभाविकपणे योहानाचे काही दोष व उणीवा होत्या, परंतु दिव्य प्रेमस्पर्शाने त्याचे परिवर्तन झाले होते. स्वार्थीपणा, महत्त्वाकांक्षा व द्वेषबुद्धी यांनी दूषित न झालेल्या वातावरणात तो निवास करीत होता. शिष्यांनी व्यक्त केलेल्या असंतोषाला त्याने किंचितही सहानुभूती दर्शविली नाही, परंतु मशीहाबद्दल असलेला सख्यसंबंध व ज्याच्यासाठी तो मार्ग तयार करीत होता त्याचे त्याने सौहार्द स्वागत कसे केले हे त्याने दर्शविले.DAMar 138.1

    त्याने म्हटले, “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर पाठविलाला आहे असे मी म्हणालो होतो, ह्याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहा. वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जे ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो.” विवाहाच्या वचनाने बद्ध झालेल्या वधूवर पक्षाचा स्नेही असल्याचे योहान स्वतः दर्शवितो आणि दोन्ही पक्षामध्ये मध्यस्थी करून विवाह सोहाळ्याचा मार्ग तो तयार करीत होता. वराने जेव्हा नवरीचा स्वीकार केला तेव्हा मित्राचे कार्य पूर्णपणे पार पडले. ज्यांच्या संघटनाला त्याने हातभार लावला, उत्तेजन दिले त्यांचे सुखसमाधान पाहून त्याला अति हर्ष झाला. येशूकडचा मार्ग दाखविण्याच्या कामासाठी योहानाला पाचारण झाले होते आणि उद्धारकाच्या कार्यातील होत असलेली उन्नती पाहून त्याला अत्यानंद होत होता. त्याने म्हटले, “तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धि व्हावी व माझा हास व्हावा हे अवश्य आहे.”DAMar 138.2

    उद्धारकावरील विश्वासाने योहान स्वपरित्याग करण्यास प्रवृत झाला. लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा तो प्रयत्न करीत नव्हता परंतु त्यांचे विचार उन्नत करून ख्रिस्तावरदेवाच्या कोकऱ्यावर-स्थिरावण्याचा तो प्रयत्न करीत होता. तो स्वतः केवळ मार्ग तयार करणारा अरण्यातील वाणी होता. आता त्याने आनंदाने मौन व अप्रसिद्धी स्वीकारली होती अशासाठी की सर्वांची नेत्रे जीवन प्रकाशाकडे आकर्षिली जावी.DAMar 138.3

    पाचारणाशी एकनिष्ठ राहाणारे देवाचे संदेशवाहक स्वतःचा मानसन्मान करून घेण्यात गर्क होणार नाहीत. आत्मप्रेम ख्रिस्तप्रेमामध्ये मुरविले जाईल. कोणत्याही स्पर्धेचा दुष्परिणाम सुवार्तेच्या पवित्र कार्यावर होणार नाही. घोषणा करणे त्यांचे काम आहे हे त्यांना समजून येईल. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने म्हटले, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.” योहान १:२९. ते ख्रिस्ताला उंचावतील आणि त्याच्याबरोबर मानवता उंचावली जाईल. “जो उच्च, परम थोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करितो, ज्याचे नाम पवित्र प्रभु आहे, तो असे म्हणतोः मी उच्च व पवित्र स्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्रजनांच्या आत्म्याचे मी संजीवन करितो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करितो.” यशया ५७:१५. DAMar 138.4

    अंतःकरणातील मीपणा काढून टाकल्यावर संदेष्ट्याचा आत्मा दिव्य प्रकाशाने भरला होता. उद्धारकाच्या वैभवाविषयी साक्ष देत असताना निकेदमाची ख्रिस्ताशी झालेल्या मुलाखतीच्या समयी ख्रिस्ताने काढलेल्या उद्गाराप्रमाणेच त्याचे उद्गार होते. योहानाने म्हटले, “जो वरून येतो तो सर्वांच्यावर आहे; जो पृथ्वीपासून झाला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो; जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्यावर आहे... कारण ज्याला देवाने पाठविले तो देवाची वचने बोलतो; कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.’ ख्रिस्त म्हणू शकतो, “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहातो.’ योहान ५:३०. त्याच्याविषयी हे उद्गार काढिले आहेतः “तुला न्यायाची आवड व अधर्माचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यापेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.” इब्री १:९. पिता “त्याला मोजून मापून आत्मा देत नाही.”DAMar 139.1

    ख्रिस्ताच्या अनुयायांची गोष्ट तीच आहे. आत्मनिष्ठा सोडण्यास राजी झाल्याशिवाय स्वर्गीय प्रकाश आम्हास मिळणार नाही. ख्रिस्ताच्या आज्ञा पाळण्यामध्ये आमचा प्रत्येक विचार आम्ही जोपर्यंत सामील करीत नाही तोपर्यंत आम्हाला ख्रिस्ताचा स्वभाव समजणार नाही किंवा विश्वासाने ख्रिस्ताचा स्वीकार करू शकत नाही. असे करणाऱ्या सर्वांना पवित्र आत्मा अमाप देण्यात येतो. “कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते, आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहा.” कलस्सै. २:९, १०.DAMar 139.2

    ख्रिस्ताकडे सर्व लोक येत आहेत असे योहानाच्या शिष्यांनी म्हटले; परंतु अंतरंगाच्या यथार्थ ज्ञानाने योहानाने म्हटले, “त्याची साक्ष कोणी मानीत नाही;’ पापापासून मुक्ती देणारा म्हणून त्याचा स्वीकार करण्यास फार थोडे तयार होते. परंतु “ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे.” योहान ३:३३. “जो पुत्रावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.’ ख्रिस्ताचा बाप्तिस्मा किंवा योहानाचे पापक्षालन याविषयी वादविवाद करण्यात काही अर्थ नाही. देवाची कृपा आत्म्याला जीवन देते. ख्रिस्ताविना इतर विधीप्रमाणे बाप्तिस्मा विधीसुद्धा बिनमोलाचा आहे. “जो पुत्रावर विश्वास ठेवीत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही.”DAMar 139.3

    ख्रिस्त कार्यातील विजयामुळे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला फार आनंद झाला व त्या विजयाची बातमी यरुशलेमातील अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. धर्मसभा सोडून अरण्यामध्ये योहानाच्या भोवती लोकांच्या झुंडी जमत होत्या हे पाहून याजक व धर्मगुरू यांना योहानाचा हेवा मत्सर वाटत होता; परंतु लोकांना आकर्षित करणारा दुसरा एक अधिक सामर्थ्यवान होता. इस्राएल लोकातील पुढारी “त्याची वृद्धि व्हावी व माझा हास व्हावा’ असे योहानाबरोबर म्हणण्यास खुषी नव्हते. त्यांच्यापासून लोकांना दूर आकर्षित करणाऱ्या कामाचा शेवट लावण्याचा त्यांनी नवीन निश्चय केला.DAMar 139.4

    त्याचे शिष्य व योहानाचे शिष्य यांच्यामध्ये फाटाफूट करण्यात ते प्रयत्नांची शिकस्त करणार हे येशूला माहीत होते. जगामध्ये उदयास आलेल्या सर्वश्रेष्ठ संदेष्ट्याला झटकून बाजूला सारण्याची मोठी चळवळ तयारीस लागलेली आहे हे ही त्याला माहीत होते. गैरसमज किंवा कलह निर्माण करणारे प्रत्येक प्रसंग टाळण्यासाठी त्याने तेथील काम बंद करून तो गुपचूपपणे गालील प्रांतात गेला. सत्याशी एकनिष्ठ असताना आम्हीसुद्धा बेबनाव व गैरसमज निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळाव्या. जेव्हा जेव्हा असे घडते तेव्हा तेव्हा आत्म्यांच्या संख्येत घट होते. फाटाफूट होण्याचा जेव्हा प्रसंग उद्भवतो तेव्हा येशू व बाप्तिस्मा करणारा योहान यानी घालून दिलेला पाठ आम्ही गिरवावा.DAMar 140.1

    सुधारणा करण्यासाठी योहानाला पाचारण करण्यात आले होते. ह्या कारणामुळे, त्याच्या कामावर यश अवलंबून आहे असे वाटून आणि कार्यसिद्धीसाठी देवाने निवडलेले तो एक साधन आहे याकडे कानाडोळा करून सर्व लक्ष त्याच्यामध्ये केंद्रित करण्यात त्याच्या शिष्यांनी धोका पत्करला होता. ख्रिस्ती मंडळीचा भक्कम पाया रचण्यात योहानाचे कार्य पुरेसे नव्हते. त्याने आपले नेमलेले कार्य पूर्ण केल्यावर त्याला दुसरे कार्य करायचे होते परंतु तो ते करू शकला नाही. त्याच्या शिष्यांना ते समजले नाही. ते काम करण्यासाठी जेव्हा ख्रिस्त आला तेव्हा त्यांच्याठायी मत्सर निर्माण होऊन ते असमाधानी बनले.DAMar 140.2

    तोच धोका आजही अस्तित्वात आहे. ठराविक काम करण्यासाठी देव एकाद्या व्यक्तीला पाचारण करितो; त्याच्या शक्तीप्रमाणे त्याला ते काम जितके करता येईल तितके तो करितो; अशा वेळी कार्य पुढे नेण्यासाठी देव दुसऱ्यांची नेमणूक करितो. परंतु योहानाच्या शिष्याप्रमाणे अनेकांना वाटते की कामाचे यश पहिल्या व्यक्तीवर अवलंबून आहे. दैवी शक्तीऐवजी माणसावर जेव्हा लक्ष केंद्रित करण्यात येते तेव्हा हेवा मत्सर डोके वर काढितो आणि परिणामी कामात बिघाड निर्माण होतो. जेव्हा अशी एकाद्याची फाजील प्रतिष्ठा करण्यात येते तेव्हा त्याच्याठायी आत्मविश्वास धारण करण्याचा मोह बळावतो. देवाच्या आश्रयावर अवलंबून राहाण्याचे त्याला समजत नाही. मार्गदर्शनासाठी मनुष्यावर अवलंबून राहाण्यास लोकांना शिकविण्यात येते आणि त्यामुळे ते चुका करतात, पापात पडतात व देवापासून बहकतात.DAMar 140.3

    मनुष्याची प्रतिमा आणि त्याचा मायना धारण करण्याचा देवाच्या कामाचा उद्देश नाही. वेळोवेळी विविध साधनांचा वापर करून प्रभु आपला उद्देश साध्य करून घेईल. स्वार्थाचा त्याग करून विनम्र होऊन बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबरोबर “त्याची वृद्धि व्हावी व माझा हास व्हावा हे अवश्य आहे’ असे उद्गार काढणारे धन्य आहेत.DAMar 140.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents