Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ५८—“लाजारस बाहेर ये”

    लूक १०:३८-४२; योहान ११:१-४४.

    ख्रिस्ताच्या शिष्यांमध्ये बेथानीचा लाजारस फार खंबीर व स्थिर होता. त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच ख्रिस्तावरील त्याचा विश्वास भक्कम झाला होता; त्याच्यावरील त्याचे प्रेम गाढ होते आणि उद्धारकाचा तो अत्यंत प्रिय होता. लाजारसासाठी ख्रिस्ताने सर्वश्रेष्ठ चमत्कार केला होता. मदतीची याचना करणाऱ्यांना त्याने आशीर्वाद दिला; मनुष्यमात्रावर तो प्रीती करितो परंतु काहीच्या बरोबर तो विशेष मैत्रीने निगडित होतो. बेथानी येथील एका कुटुंबाशी तो आपुलकीने फार बांधिला गेला होता आणि त्यांच्यातील एकासाठी त्याने हा अद्भुत चमत्कार केला होता.DAMar 457.1

    लाजारसाच्या घरी येशू वारंवार आराम करीत असे. उद्धारकाला स्वतःचे घर नव्हते; पाहुणचारासाठी तो आपले शिष्य आणि स्नेही यांच्यावर अवलंबून राहात असे. जेव्हा तो थकून जात असे आणि माणसांच्या सहवासाची अपेक्षा करीत असे तेव्हा तो ह्या निवांत गृहाकडे धाव घेत असे आणि साशंक व संतापलेल्या परूश्यांच्यापासून दूर राहात असे. ह्या ठिकाणी मनापासून त्याचे स्वागत होत असे आणि त्याला खरा आणि निर्मळ स्नेहभाव मिळत असे. त्याचे बोललेले शब्द ह्या ठिकाणी समजून घेऊन संग्रही ठेवले जातात म्हणून तो मोकळ्या मनाने स्पष्ट आणि साधेपणाने बोलत असे. DAMar 457.2

    उद्धारकाला निवांत गृह आणि गोडी घेणारे श्रोतेजन आवडत होते. माणसांचा मायाळूपणा, शिष्टाचार, सभ्यता आणि ममता यांची तो उत्कट इच्छा करीत होता. त्याचे स्वर्गीय प्रबोधन ज्यांनी स्वीकारिले ते विपूल आशीर्वादित झाले. रानातून त्याच्यामागून जाणाऱ्या घोळक्यांना त्याने निसर्गातील सौंदर्य उघड केले. देवाचा हस्त जगाला कसा आधार देतो हे समजण्यासाठी त्यांची ग्रहणशक्ती तो तलख करितो. देवाचा चांगुलपणा आणि परोपकारबुद्धी यांचे गुणग्रहण करण्यासाठी, हळूवार पडणारे दंव आणि दुष्टांना आणि धार्मिकांना सारखाच देण्यात येणारा झिमझिम पडणारा पाऊस व तेजस्वी सूर्यप्रकाश याच्याकडे श्रोतेजनांचे लक्ष त्याने वेधून घेतले. त्याने निर्माण केलेल्या मानवी साधनांचा देव आदर करितो हे मनुष्याने जाणावे अशी त्याची अपेक्षा होती. परंतु समुदाय ऐकायला मंद होता आणि सार्वजनिक जीवनातील झगड्याचा ताण घालविण्यासाठी बेथानीतील गृहात येशू विश्राम पावत होता. येथे गुणग्रहण करणाऱ्या श्रोतृसमाजापुढे तो ईश्वरी कृपा विपुलतेने उघड करीत असे. मिश्र समुदायापुढे जे उघडपणे सादर करू शकत नव्हता ते तो ह्या खाजगी मुलाखतीत श्रोतेजनापुढे मांडत होता. मित्रांच्यासमोर दाखल्याद्वारे बोलण्याची त्याला गरज नव्हती.DAMar 457.3

    ख्रिस्त प्रबोधन करीत असताना मरीया त्याच्या चरणाजवळ बसून ती भक्तीभावाने ऐकण्यात निमग्न झाली होती. एका प्रसंगी मार्थेला फार काम पडल्याने तिची तारांबळ उडाली आणि ख्रिस्ताकडे येऊन म्हणाली, “प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकिला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करावयास तिला सांगा.” बेथानीला ही येशूची पहिलीच भेट होती. उद्धारक व त्याचे शिष्य यांनी यरिहोहून हा खडतर प्रवास पायी केला होता. त्यांच्या सुखसमाधानाची व्यवस्था करण्यास मार्था फार उत्सुक होती आणि ह्या अवस्थतेमुळे पाहुण्याशी वागण्याचा सभ्यपणा ती विसरून गेली होती. येशूने तिला शांतपणे सौम्य शब्दात म्हटले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करितसे; परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहूना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वांटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून घेतला जाणार नाही.’ उद्धारकाच्या मुखातून पडणारे मोल्यवान शब्द मरीया आपल्या मनात संग्रह करून ठेवत होती. जगातील भारी किमतीच्या रत्नापेक्षा हे शब्द उजळ होते. DAMar 458.1

    निवांत, भक्तीभाव, भावी अमर जीवन प्राप्तीची तीव्र काळजी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असलेली ईश्वरी कृपा ह्या “एकाच गोष्टीचे” मार्थाला अगत्य होते. नाशवंत गोष्टीविषयी साधारण चिंता आणि चिरकाल टिकणाऱ्या गोष्टीविषयी अधिक काळजीची तिला गरज होती. ज्या ज्ञानाद्वारे ते तारणासाठी समंजस होतील ते साध्य करून घेण्यास येशू आपल्या लोकांना शिक्षण देईल. ख्रिस्ताच्या कार्यासाठी आस्थेवाईक, दक्ष आणि उत्साही कामदारांची गरज आहे. धार्मिक कार्यात मार्थासारख्या उत्साहाने काम करणाऱ्यांना विस्तीर्ण कार्यक्षेत्र आहे. परंतु प्रथम त्यांनी मरीयेबरोबर ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसले पाहिजे. अचाट परिश्रम, तत्परता व सामर्थ्य यांचे पावित्र्य ख्रिस्ताच्या कृपेने होऊ द्या; मग सात्त्विकतेसाठी जीवन अजिंक्य शक्तीने समृद्ध होईल.DAMar 458.2

    ज्या निवांत गृहामध्ये येशू आराम करीत असे तेथे दुःखाने प्रवेश केला. लाजारस एकाएकी आजारी पडला आणि त्याच्या बहिणीनी उद्धारकाकडे निरोप पाठविला आणि म्हटले, “प्रभूजी ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.” भावाच्या आजाराची तीव्रता त्यांनी पाहिली परंतु सर्व प्रकारचे रोग बरे करण्याची ख्रिस्ताची पात्रता त्यांना माहीत होती. त्यांच्या दुःखात तो सहानुभूती दाखवील असा त्यांचा विश्वास होता म्हणून त्याने त्वरित येण्याविषयी त्यांनी आग्रह धरिला नव्हता, परंतु “ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे’ अशा विश्वासाने निरोप पाठविला. ह्या निरोपाचा प्रतिसाद त्याच्याकडून ताबडतोब मिळेल आणि तो बेथानीला येऊन त्यांच्याबरोबर राहील असे त्यांना वाटले होते.DAMar 458.3

    ते आतुरतेने येशूच्या उत्तराची वाट पाहात होते. जोपर्यंत त्यांच्या भावाच्या कुडीत प्राण होता तो पर्यंत ते प्रार्थना करून येशूच्या येण्याची वाट पाहात होते. परंतु निरोप्या त्यांच्याविना एकटाच परतला. तथापि त्याने निरोप आणिला की, “हा आजार मरणासाठी नाही’ आणि लाजारस जीवंत राहील अशी त्यांची आशा होती. जवळ जवळ बेशुद्धावस्थेत असलेल्या दुःखिताला ते आशेचे व धीराचे शब्द प्रेमाने बोलत होते. लाजारस मेल्यावर त्यांची फार मोठी निराशा झाली; परंतु उचलून धरणाऱ्या कृपेचा स्पर्श त्यांना झाला आणि त्यामुळे ते उद्धारकाला दोष देण्यापासून आवरले गेले.DAMar 459.1

    ख्रिस्ताला संदेश मिळाल्यावर त्याने ते फार मनावर घेतले नाही असे शिष्यांना वाटले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्याने त्याबद्दल दुःख प्रदर्शन केले नाही. त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योग्य देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी आहे.” कारण आणखी दोन दिवस होता त्याच ठिकाणी तो राहिला. त्याचा हा विलंब शिष्यांना गूढ वाटले. त्याच्या उपस्थितीने त्या दुःखित कुटुंबाला किती बरे वाटले असते! असे ते विचार करीत होते. बेथानी येथील ह्या कुटुंबाशी त्याचा स्नेहसंबंध फार दाट होता हे शिष्यांना माहीत होते आणि “ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे” ह्या दुःखाच्या निरोपाला त्याने प्रतिसाद दिला नाही हे पाहून त्यांना आचंबा वाटला.DAMar 459.2

    ह्या दोन दिवसात ख्रिस्ताने तो दुःखी संदेश आपल्या मनातून काढून टाकिला असे वाटले कारण लाजरसाविषयी त्याने चकार शब्द काढिला नव्हता. मागाहून येणाऱ्या येशूची वर्दी देणारा जासूद बाप्तिस्मा करणारा योहान याची आठवण शिष्यांनी केली. इतके मोठमोठे अचाट चमत्कार करणाऱ्या येशूने योहानाला तुरुंगात राहून भीषण मरण सोसायला का लावले ह्या विषयी शिष्य आश्चर्य करीत होते. इतका शक्तिमान असून योहानाला त्याने का वाचविले नाही? परूश्यांनी वारंवार हा प्रश्न विचारिला आणि तो देवपुत्र आहे ह्या ख्रिस्ताच्या विधानाविरुद्ध बिनतोड युक्तिवाद मांडिला. कसोटी, छळ आणि नुकसान ह्याविषयी उद्धारकाने शिष्यांना इशारा दिला होता. कसोटीच्या वेळी त्यांना तो सोडून जाईल काय? त्याच्या कार्याविषयी त्यांची गफलत तर झाली नाही ना असे काहीना प्रश्न पडला. सगळे बेचैन होऊन गेले होते.DAMar 459.3

    दोन दिवसानंतर येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहूदीयात जाऊ या.” जर येशूला यहूदीयाला जायाचे होते तर दोन दिवस का थांबला असा प्रश्न शिष्यांनी काढिला. ख्रिस्त आणि शिष्य यांच्या मनात अति तीव्र आतुरता होती. त्यांच्यापुढे दुसरे काही नाही, परंतु मोठा धोका त्यांना दिसत होता. ते म्हणाले, “गुरूजी, यहूदी नुकतेच तुम्हाला धोंडमार करावयास पाहात होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय? येशूने उत्तर दिले, दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत?’ मी पित्याच्या मार्गदर्शनाखाली आहे, जोपर्यंत त्याची इच्छा मी पाळितो तोपर्यंत माझे जीवित सुरक्षित आहे. दिवसातील माझे बारा तास अजून संपले नाहीत. दिवसाच्या शेवटच्या घटकेत मी प्रवेश केला आहे; परंतु जोपर्यंत ते शिल्लक आहे तोपर्यंत मी सुरक्षित आहे.DAMar 459.4

    तो पुढे म्हणाला, “दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो.” जो देवाच्या इच्छेप्रमाणे करितो, जो देवाने आखून दिलेल्या मार्गाने चालतो तो ठेच लागून पडत नाही. मार्गदर्शन करणारा देवाचा आत्मा जो प्रकाश त्याला त्याच्या कर्तव्याची आकलनशक्ती देतो आणि त्याचे काम संपेपर्यंत त्याला योग्य मार्गाने चालवितो. “परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते कारण त्याच्या ठायी उजेड नसतो.’ देवाचे पाचारण नसताना स्वतः निवडलेल्या मार्गाने चालणारा ठोकर खाऊन पडेल. त्याच्यासाठी दिवस रात्र बनलेला असतो आणि कोठेही असला तर तो सुरक्षित नाही. DAMar 460.1

    “हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजारस झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो.” “आपला मित्र लाजारस झोपला आहे.’ हे शब्द किती हृदयद्रावक आहेत! त्यामध्ये किती सहानुभूती आहे! यरुशलेमाला जाण्याने त्यांच्या प्रभूवर येणाऱ्या अरिष्टाचा विचार करण्यात गुंतल्यामुळे बेथानी येथील शोकग्रस्त झालेल्या कुटुंबाचा शिष्यांना जवळ जवळ विसर पडला होता. परंतु ख्रिस्ताला नव्हता. शिष्य ओशाळून गेले. आलेल्या निरोपाला ख्रिस्ताने त्वरित उत्तर दिले नाही म्हणून त्यांची निराशा झाली होती. त्याचे, लाजारस व त्याच्या बहिणी यांच्यावर त्यांना वाटले त्याप्रमाणे प्रेम नाही अशी त्यांची विचारसरणी झाली होती, नाहीतर तो जासूदाबरोबर त्वरित गेला असता. परंतु “आपला मित्र लाजारस झोपला आहे” ह्या उद्गाराने त्यांच्या मनात यथार्थ मनोभावना जागृत झाली. व्यथित मित्राला ख्रिस्त विसरला नाही अशी त्यांची खात्री झाली होती.DAMar 460.2

    ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी, त्याला झोप लागली असली तर तो बरा होईल. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेपासून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले.” ख्रिस्त आपल्या भक्तांना सांगतो की मरण ही झोप आहे. त्यांचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवाच्याठायी लपलेले आहे, आणि शेवटचा करणा वाजेपर्यंत मेलेले त्याच्याठायी झोप घेतील.DAMar 460.3

    “ह्यास्तव येशूने त्यांना उघड सांगितले की, लाजारस मेला आहे; आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा; तरी आपण त्याच्याकडे जाऊ.” तो यहूदाला गेला तर त्याच्या प्रभूला मरणाला सामोरे जावे लागणार हे थोमाने पाहिले; परंतु मनाला धीर देऊन आपल्या इतर बंधूना म्हणाला, “आपणही ह्याच्याबरोबर मरावयास जाऊ.” ख्रिस्ताविषयी असलेला यहयांचा मत्सर त्याला माहीत होता. त्याचे मरण आटोक्यात ठेवण्याचा त्यांचा उद्देश होता, परंतु हा त्यांचा हेतू साध्य झाला नव्हता कारण त्याला नेमून दिलेली वेळ अजून शिल्लक होती. ह्या अवधीत स्वर्गीय देवदूत त्याचे संरक्षण करीत होते. धर्मपुढारी येशूला धरून त्याला देहदंडाची शिक्षा देण्याचा कट ज्या यहूदा प्रांतात करीत होते तेथे सुद्धा त्याचे बरेवाईट होणार नव्हते.DAMar 460.4

    “लाजारस मेला आहे; आणि मी तेथे नव्हतो म्हणून... मला आनंद वाटतो.’ हे ख्रिस्ताचे विधान ऐकून शिष्यांना आश्चर्य वाटले. अशा वेळेस दुःखी मित्राच्या गृहापासून दूर राहाणे उद्धारकाने स्वतःच्या मर्जीने केले होते काय? सहाजिकरित्या मरीया, मार्था व मरणास टेकलेला लाजारस तेथे एकटेच होते. परंतु खऱ्या अर्थाने ते एकटेच नव्हते. ख्रिस्ताने संपूर्ण दृश्य पाहिले होते आणि लाजारसाच्या मृत्यूनंतर कष्टी झालेल्या बहिणींना त्याच्या कृपेने सावरले होते. भाऊ मृत्यूशी झगडत असताना होणारे हाल पाहून त्यांचे फाटलेले अंतःकरण ख्रिस्ताने पाहिले. “लाजारस मेला आहे’ हे उद्गार काढितांना त्याला अपरिमित दुःख झाले होते. बेथानीमधील प्रियकरांचाच तो विचार करीत नव्हता तर शिष्यांना शिक्षण देण्याची जबाबदारीही त्याच्यापुढे होती. पित्याचा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा यासाठी ते सर्व जगाला प्रतिनिधी होते. त्यांच्यासाठी त्याने लाजारसाला मरू दिले. त्याच्या आजारातून त्याने त्याला बरे केले असते तर त्याच्या दिव्य शीलस्वभावाच्या समर्थनार्थ जो पुरावा चमत्काराद्वारे पुढे सादर करण्यात येणार होता तो चमत्कार झाला नसता.DAMar 461.1

    लाजारसाच्या आजाराच्या समयी ख्रिस्त त्याच्या खोलीत असता तर तो मेला नसता; कारण सैतानाचा काही हक्क त्याच्यावर चालला नसता. जीवन देणाऱ्याच्या उपस्थितीत मरणाचे वर्चस्व लाजारसावर असमर्थ ठरले असते. म्हणून ख्रिस्त ह्यापासून दूर राहिला. त्याने शत्रूची सत्ता चालू दिली. लाजारसाला त्याने मरू दिले आणि त्याला कबरेत पुरताना त्याच्या बहिणीना पाहू दिले. बंधूचा मृत चेहरा पाहाताना त्यांच्या उद्धारकावरील विश्वासाची तीव्र कसोटी होईल हे ख्रिस्ताला माहीत होते. सध्या ज्या कसोटीतून ते जात आहेत त्याद्वारे त्यांचा विश्वास दृढ होऊन अधिक प्रकाशमान होईल हेही त्याला ज्ञात होते. ज्या तीव्र दुःखातून ते गेले ते सगळे त्याने सोसले. येण्यास विलंब केला म्हणून त्याचे त्यांच्यावर कमी प्रेम होते असे नाही; परंतु त्यांच्यासाठी, लाजारसासाठी, स्वतःसाठी, आणि शिष्यांच्यासाठी विजय मिळवावयाचा होता हे त्याला माहीत होते. DAMar 461.2

    “तुमच्यासाठी,’ “म्हणजे तुम्ही विश्वास ठेवावा यासाठी.” देवाच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करणाऱ्यांना दिव्य सहाय्य अगदी नजीक असते तेव्हाच ते अति नाउमेद झालेले असतात. त्यांच्या मार्गातील गत कठीण प्रसंगाकडे कृतज्ञतेने ते पाहातील. “भक्तिमान लोकांस परिक्षेतून कसे सोडवावे हे प्रभूला कळते.” २ पेत्र २:९. प्रत्येक मोहातून आणि प्रत्येक कसोटीतून त्यांना तो पार करून त्यांचा विश्वास दृढ करील व त्यांना गाढ अनुभव देईल.DAMar 461.3

    लाजारसाकडे येण्यास विलंब करण्यामध्ये त्याचा स्वीकार न केलेल्यांच्यासाठी दयावंत हेतू होता. अविश्वासू, ताट मानेच्या हट्टी लोकांना, लाजारसाला मेलेल्यातून उठविल्याद्वारे, तो पुनरुत्थान व जीवन असल्याचा आणखी एक पुरावा देऊ शकत होता. गोरगरीब, इस्राएलातील हरवलेली मेंढरे आणि इतर सगळे लोक यांच्याबद्दल आशा सोडण्यास तो नाखूष होता. त्यांच्या असहिष्णुतेमुळे त्याच्या अंतःकरणाला वेदना होत होत्या. तो पुनर्स्थापना करणारा, केवळ तोच जीवन व अमरत्व यांच्यावर प्रकाश पाडू शकणारा आहे असा पुरावा त्याला द्यावयाचा होता. ह्या पुराव्याला याजक लोक विपरीत अर्थ लावू शकत नव्हते. ह्या करणास्तव बेथानीला जाण्यास त्याने विलंब केला. लाजरसला मरणातून उठविण्याचा चमत्कार एक कळस होता आणि त्याचे कार्य आणि तो दैवी असल्याच्या त्याच्या प्रतिपादनावर देवाचा शिक्का मोर्तब करण्यासाठी होता.DAMar 462.1

    बेथानीच्या मार्गावर त्याच्या परिपाठाप्रमाणे येशूने गरजू व आजारी यांची सेवा केली. शहरात पोहचल्याची वार्ता सांगण्यासाठी त्याने एक जासूद त्या बहिणीकडे पाठविला. ख्रिस्ताने ताबडतोब घरात प्रवेश केला नाही परंतु बाजूला शांत ठिकाणी तो थांबला मित्र किंवा नातेवाईक वारल्यानंतर जो बाह्य देखावा यहूदी लोक अनुसरत होते तो येशूच्या विचारसरणीत बसत नव्हता. भाडोत्री शोक करणाऱ्यांचा आक्रोश, विलाप त्याने ऐकिला आणि ह्या गोंधळात त्या बहिणीना भेटण्याची त्याची इच्छा नव्हती. शोक करणाऱ्यामध्ये त्या कुटुंबाचे काही नातेवाईक होते आणि त्यांच्यापैकी काहीजन यरुशलेमात मोठ्या हुद्यावर होते. त्यात काहीजन ख्रिस्ताचे कट्टर शत्रू होते. ख्रिस्ताला त्यांचा उद्देश ठाऊक होता म्हणून त्वरित त्याने स्वतःची ओळख करून दिली नव्हती.DAMar 462.2

    मार्थाकडे अगदी गुप्तपणे निरोप पाठविला, खोलीतील कोणी ऐकिला नव्हता. दुःखाने व्याकूळ झाल्यामुळे मरीयेने ते शब्द ऐकिले नव्हते. ताबडतोब उठून मार्था प्रभूला भेटण्यासाठी बाहेर गेली. परंतु ती लाजारसाच्या कबरेकडे गेली असे समजून मरीया दुःखी होऊन शांत बसली, काही आरडाओरड केली नाही.DAMar 462.3

    येशूला भेटण्यासाठी मार्था धावत गेली. ती विरोधी विचाराने खळबळून गेली होती. त्याच्या मुखावर तिने नेहमीचे प्रेम व मायाळूपणा पाहिला. त्याच्यावरील तिची श्रद्धा किंचितही कमी झालेली नव्हती, परंतु येशूचे ज्याच्यावर प्रेम होते त्या आपल्या प्रिय भावाचा ती विचार करीत होती. ह्याच्या अगोदर ख्रिस्त आला नाही म्हणून अति दुःखी होऊन आणि आतासुद्धा त्यांचे समाधान करण्यासाठी तो काहीतरी करील ह्या आशेने ती म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.’ शोक करणाऱ्यांच्या प्रचंड गोंधळात त्या बहिणींनी पुन्हा पुन्हा ते उद्गार काढिले.DAMar 462.4

    येशूने मानवी व दिव्य करुणेने तिच्या दुःखी आणि थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. भूतकाळाचा पाडा वाचण्याची मार्थाची इच्छा नव्हती; “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता,” फक्त हे करुणाजनक शब्द तिने काढिले. परंतु प्रेमळ मुखाकडे पाहून ती पुढे म्हणाली, “तरी आताही जे काही देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे.”DAMar 463.1

    येशूने “तुझा भाऊ उठेल,’ ह्या शब्दाने तिला उत्तेजन दिले. त्याच्या ह्या उत्तराने परिस्थितीत ताबडतोब बद्दल होण्याची आशा निर्माण करण्याचा त्याचा इरादा नव्हता. तिच्या भावाला ताबडतोब जीवदान लाभण्याचा विचार घेऊन तो धार्मिकांच्या पुनरुत्थानाला लागू केला. लाजारसाच्या पुनरुत्थानामध्ये सर्व मृत धार्मिकांच्या पुनरुत्थानाची प्रतिज्ञा आहे आणि हे उद्धारकाच्या सामर्थ्याने सिद्धीस जाईल याची खात्री आहे हे तिला समजावे म्हणून त्याने हे केले.DAMar 463.2

    मार्थाने उत्तर दिले, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.”DAMar 463.3

    तिच्या विश्वासाला इष्ट वळण देण्यासाठी त्याने म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे.’ ख्रिस्ताच्याठायी मूळचे, उसने न घेतलेले आणि वंचित न झालेले जीवन आहे. “ज्याला तो पूत्र आहे त्याला जीवन आहे.” १ योहान ५:१२. ख्रिस्ताचे देवत्व भक्तांच्या अनंत जीवनाची खात्री आहे. येशूने म्हटले, “जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय?” ह्या ठिकाणी ख्रिस्ताची दृष्टी त्याच्या द्वितियागमनावर होती. नंतर धार्मिक मृत अविनाशी असे उठविले जातील आणि जीवंत धार्मिक स्वर्गात वर घेतले जातील. त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही. मरणातून लाजारसाला वर काढण्याचा चमत्कार धार्मिक मृतांचे पुनरुत्थान यांचे दर्शक आहे. त्याच्या उक्तीने व कृतीने तो पुनरुत्थानाचा जनक आहे असे त्याने घोषित केले. लवकरच वधस्तंभावर मरण पावणारा त्याच्या हातात मरणाच्या किल्ल्या होत्या, तो मरणावर विजय मिळविणारा आणि अनंतकालिक जीवन देणारा अधिशक्ती होता. DAMar 463.4

    “याचा तू विश्वास धरितेस काय?” ह्या उद्धारकाच्या प्रश्नाला मार्थाने उत्तर दिले, “होय प्रभूजी; जो जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपण आहा असा विश्वास मी धरिला आहे.” ख्रिस्ताने काढिलेल्या उद्गाराचा संपूर्णपणे तिला अर्थबोध झाला नव्हता, परंतु त्याच्या देवत्वावर आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास तो समर्थ आहे ह्यावर तिने विश्वास प्रगट केला.DAMar 463.5

    “असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया इला गुप्तपणे बोलावून म्हणाली, गुरूजी आले आहेत, ते तुला बोलावीत आहेत.” तिने हा निरोप अगदी गुप्तपणे तिला दिला, कारण याजक व अधिकारी त्याला अटक करण्याची संधि पाहात होते. शोक करणाऱ्यांच्या आक्रोशामुळे तिचे हे शब्द कोणी ऐकिले नव्हते.DAMar 464.1

    हे ऐकताच मरीया ताबडतोब उठली आणि आतुरतेने खोलीबाहेर पडली. विलाप करण्यासाठी ती कबरेकडे गेली आहे असे समजून शोक करणारे तिच्या मागे गेले. ख्रिस्त होता तेथे पोहंचल्यावर त्याच्या चरणाजवळ तिने गुडघे टेकले आणि कंप पावणाऱ्या ओठातून उद्गारली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.’ आक्रोश करणाऱ्यांचा आवाज तिला त्रासदायक झाला होता आणि येशूचे दोन शब्द निवांतात ऐकण्यास ती फार उत्सुक होती. परंतु ख्रिस्ताविषयी काहींच्या मनात हेवा व मत्सर घर करून बसला होता हे तिला माहीत होते म्हणून आपले दुःख व्यक्त करण्याचे ती टाळीत होती.DAMar 464.2

    “येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहृद्याला रडताना पाहून आत्म्यात कळवळला व विव्हळ झाला.” तेथे जमलेल्या सगळ्यांचे मन त्याने जाणले. त्यातील बहुतेक रडणाऱ्यांचा केवळ बहाणा होते हे त्याने ओळखिले. जमावामधील काहीजन ढोंगी दुःख व्यक्त करणारे लवकरच चमत्कार करणाऱ्याचा व ज्याच्यावर हा चमत्कार केला त्याचा वध करण्याचा ते कट करतील. त्यांचे ढोंगी दुःखाचे आवरण ख्रिस्ताने फाडून टाकिले असते परंतु हा सात्त्विक संताप त्याने आवरिला. त्याने सत्यवचन उद्गारले असते परंतु तो बोलला नाही कारण त्याच्या चरणाजवळ दुःख व्यक्त करीत प्रिय व्यक्ती होती आणि तिची त्याच्यावर खरी श्रद्धा होती.DAMar 464.3

    त्याने विचारिले, “तुम्ही त्याला कोठे ठेविले आहे?” “ते त्याला म्हणाले, प्रभूजी, येऊन पाहा.” सर्व मिळून ते कबरेकडे गेले. ते फार हृदयद्रावक दृश्य होते. लाजारसावर फार प्रेम होते आणि त्याच्या बहिणी हंबरडा फोडून दुःख करीत होत्या आणि मित्रमंडळी आपले अश्रूत्यांच्यात मिसळत होती. मानवी दुःखाच्या यातना, मित्रांचा विलाप ह्या दृश्यात जगाचा उद्धारक उभे होता, “येशू रडला.’ जरी तो देवपुत्र होता तरी त्याने मानवी देह धारण केला होता आणि मानवी दु:ख भावनेने तो कळवळला. दुःख पाहून त्याचे दयाळू करुणामय अंतःकरण सहानुभूतीने जागृत झाले. रडणाऱ्याबरोबर तो रडतो आणि आनंद करणाऱ्याबरोबर तो आनंद करितो. DAMar 464.4

    मरीया व मार्था यांना दाखविलेल्या मानवी सहानुभूतीमुळे येशू रडला नाही. पृथ्वीपासून अंतराळ जसे उंच आहे तसे त्याच्या अश्रूत मानवी दुःख भरलेले होते. ख्रिस्त लाजारसासाठी रडला नाही; कारण तो त्याला थोड्याच वेळात कबरेतून बाहेर बोलावणार होता. तो रडला कारण आता लाजारससाठी विलाप करणाऱ्यापैकी अनेकजन जो पुनरुत्थान व जीवन होता त्याच्या मरणाची योजना आखीत होते. परंतु येशूच्या अणूंचा अर्थ लावण्यात यहूदी लोक कसे असमर्थ होते हे समजत नव्हते! काहीजण पुढे असलेल्या दृश्यापेक्षा रडण्यास दुसरे काही कारण असल्याचे पाहू शकले नाहीत म्हणून म्हणाले, “पाहा, ह्याचे त्याच्यावर किती प्रेम होते!” दुसरे काही संशयाचे बी हजर असलेल्यांच्या अंत:करणात पेरण्याचा प्रयत्न करीत होते. ते उपहास करून म्हणाले, “ज्याने अंधळ्यांचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती काय?” लाजारसाला वाचविण्याचे ख्रिस्ताच्या सामर्थ्यात होते तर त्याने त्याला मरू का दिले? DAMar 464.5

    परूशी आणि सदूकी यांचे त्याच्याविरुद्ध असलेले वैमनश्य ख्रिस्ताने भविष्यवाद्याच्या दृष्टीतून पाहिले. त्याचा घात करण्याचे त्यांचे पूर्वसंकल्प त्याला ठाऊक होते. आता बाह्यदृष्ट्या सहानुभूती व्यक्त करणारे लवकरच ते आशेचे द्वार आणि देवाच्या नगरीचा दरवाजा स्वतःच बंद करून घेतील. येशूचा अपमान व वधस्तंभावरील मरण यांच्यानंतर यरुशलेम शहराचा नाश आणि त्यावेळेस मृतासाठी कोणी शोक करणार नाही ही घटना लवकरच घडणार होती. यरुशलेम नगरीवर वाईट कृत्याबद्दल मोबदला येणार हे दृश्य येशूच्या समोर स्पष्ट होते. रोमी सैन्यांनी यरुशलेमाला दिलेला वेढा त्याने पाहिला. आता विलाप करणाऱ्यातील अनेकजन शहराला दिलेल्या वेढ्यात मृत्यूमुखी पडतील आणि त्यांच्या मरणात त्यांना कसलीच आशा नसणार. DAMar 465.1

    त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या ह्या दृश्यामुळेच ख्रिस्त रडला नाही तर त्याच्या मनावर युगांतील दुःखाच्या ओझ्याचे दडपण होते. देवाच्या नियमाचा भंग केल्याचा भयंकर परिणाम त्याने पाहिला. जगाच्या इतिहासात हाबेलाच्या मरणापासून चांगले आणि वाईट यांच्यामधला झगडा सतत वाढत आहे. आगामी काळाकडे नजर फेकल्यावर त्याला माणसाच्या आयुष्यात दुःख व आपत्ति, अश्रु आणि मरण भरलेले दिसले. प्रत्येक युगातील आणि प्रत्येक देशातील मानवी कुटुंबातील दुःख व्यथा पाहून त्याचे अंतःकरण भेदून निघाले. पापी वंशाच्या अनर्थांचे ओझे त्याच्यावर भारी होते आणि त्या सगळ्यांचे दुःखपरिहार करण्यासाठी त्याच्या अणूंचा झरा फुटून वाहात होता.DAMar 465.2

    “येशू पुन्हा दुःखाने कण्हत कबरेकडे आला.” लाजारसाला खडकाच्या गुहेत ठेवण्यात आले होते आणि तिच्या तोंडावर मोठी धोंड ठेवलेली होती. ख्रिस्ताने म्हटले, “धोंड काढा.” त्याला फक्त मृताला पाहायाचे होते असे समजून मार्था म्हणाली, त्याला पुरून चार दिवस झाले आहेत आणि आता त्याला दुर्गंधी येत असेल. लाजारसाला उठविण्याच्या अगोदर हे विधान केले असल्यामुळे ख्रिस्ताच्या शत्रूना ह्यामध्ये फसवणुकीचा प्रकार आहे असे म्हणण्यास जागा राहिली नव्हती. देवाच्या सामर्थ्याचे अद्भुतजन्य प्रदर्शन करण्यात आले होते आणि त्या संदर्भात पूर्वी परूश्यांनी खोटी विधाने प्रसारित केली होती. याईराच्या कन्येला मरणातून ख्रिस्ताने उठविले होते तेव्हा तो म्हणाला, “मूल मेले नाही, झोपेत आहे.” मार्क ५:३९. थोड्या दिवसाची ती आजारी होती आणि मरणानंतर तिला ताबडतोब जीवदान दिले होते त्यावेळेस परूशी म्हणाले की मूल मेले नव्हते; ख्रिस्ताने स्वतः म्हटले होते की ती झोपेत होती. ख्रिस्त आजार बरे करू शकत नाही, त्याच्या चमत्कारासंबंधी काळेबेरे आहे असा समज करून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु ह्यामध्ये लाजारस मेला नाही असे कोणीही म्हणू शकत नव्हते.DAMar 465.3

    प्रभु कार्य करीत असताना त्याला विरोध करण्यास सैतान कोणाला तरी प्रेरणा देतो. ख्रिस्ताने म्हटले, “धोंड काढा.” माझ्या कार्यासाठी शक्य तो मार्ग तयार करा. परंतु मार्थाचा स्पष्ट, असंदिग्ध आणि महत्वाकांक्षी स्वभाव ठासून सांगत होता. दुर्गंधी येत असलेले शरीर बाहेर काढण्यास ती राजी नव्हती. ख्रिस्ताचे वचन ऐकण्यास मानवी अंतःकरण मंद आहे आणि त्याच्या आश्वासनाचा खरा अर्थ मार्थाच्या विश्वासाला कळला नव्हता.DAMar 466.1

    ख्रिस्ताने मार्थाला धमकाविले परंतु त्याचे शब्द फार प्रेमळ होते. “येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहाशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?’ माझ्या सामर्थ्याविषयी तू शंका का करितेस? माझ्या मागणीला विरोध का करितेस? मी तुला बोललो आहे. तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहाशील. स्वाभाविक अशक्यता सर्वशक्तिमान देवाच्या कार्याला अडखळण होऊ शकत नाही. संशयखोरवृत्ती आणि अविश्वास ही नम्रता नव्हे, ख्रिस्ताच्या वचनावरील बिनतक्रार श्रद्धा ही खरी नम्रता, खरी शरणागति आहे.DAMar 466.2

    “धोंडा काढा.’ धोंडा काढण्यास ख्रिस्ताने हुकूम दिला असता आणि त्याची आज्ञा मानली असती. त्याच्या बाजूला हजर असलेल्या देवदूतांना हे करण्यास सांगितले असते. त्याच्या हुकुमाप्रमाणे अदृश्य हातांनी तो धोंडा बाजूला सारिला असता. परंतु तो धोंडा मानवी हातांनी बाजूला सारायचा होता. मानवतेने देवत्वाला सहकार्य करायचे आहे हे ख्रिस्ताला दाखवायचे होते. जे काम मानवीशक्ती करू शकते ते करण्यास दैवी शक्तीला पाचारण करण्यास येत नाही. मनुष्याच्या मदतीचा देव अव्हेर करीत नाही. तो त्याला सामर्थ्यावान बनवितो, त्याला दिलेल्या सामर्थ्याचा व क्षमतेचा वापर करिताना तो सहकार्य देतो.DAMar 466.3

    हुकूम पाळण्यात आला. धोंडा बाजूला सारिला गेला. सर्व काही उघडपणे मुद्दाम केले होते. ह्यात काही फसवणूक करण्यात येत नाही हे पाहाण्याची सगळ्यांना संधि दिली होती. दगडाच्या गुहेत लाजारसाचा थंड आणि शांत मृत देह पडला होता. रडणाऱ्यांचा आक्रोश बंद झाला. आश्चर्यचकीत आणि अपेक्षा करणारा घोळका कबरेच्या सभोवती काय घडणार हे पाहाण्यासाठी थांबला होता.DAMar 466.4

    कबरेसमोर शांतपणे ख्रिस्त उभे राहातो. सर्व उपस्थित पावित्र्याच्या वर्चस्वाखाली होते. ख्रिस्त कबरेजवळ जातो. येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानितो.” थोड्याच दिवसापूर्वी ईश्वर निंदा केली म्हणून त्याच्या शत्रूनी त्याला दोष दिला होता आणि तो स्वतःला देवपुत्र म्हणतो म्हणून त्याला दगडमार करण्यासाठी त्यांनी हात उगारिले होते. सैतानाच्या सामर्थ्याने तो चमत्कार करितो असा त्याच्यावर आरोप केला होता. परंतु येथे देवाला तो पिता म्हणून संबोधितो आणि पूर्ण श्रद्धेने आपण देवपुत्र असल्याचे प्रतिपादितो.DAMar 466.5

    त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये ख्रिस्त पित्याशी सहकार्य करीत होता. स्वतंत्रपणे तो काम करीत आहे असे थोडेसुद्धा त्याने दाखविले नव्हते; श्रद्धा आणि प्रार्थना यांच्याद्वारे त्याने चमत्कार केले. पित्याशी असलेला त्याचा नातेसंबंध सर्वांना समजावा अशी ख्रिस्ताची इच्छा होती. त्याने म्हटले, “हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानितो. मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी बोललो; ह्यासाठी की, तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा.” ख्रिस्त आणि देवपिता यांच्यामधील जे निकटचे नाते आहे त्याचा खात्रीदायक पुरावा शिष्यांना आणि लोकांना येथे द्यावयाचा होता. ख्रिस्ताचे प्रतिपादन फसवणूक नाही हे त्यांना दाखवायचे होते. DAMar 467.1

    “असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजारस, बाहेर ये.’ त्याची वाणी स्पष्ट व भेदक असून मृताच्या कानांत शिरणारी होती. तो बोलत असताना मानवतेमधून देवत्व चमकत होते. देवाच्या वैभवाने प्रकाशमान झालेल्या त्याच्या मुद्रेत लोक त्याच्या सामर्थ्याचे दर्शन घेत होते. गुहेच्या तोंडावर सगळ्यांची दृष्टी खिळली होती. थोडासा झालेला आवाज ऐकण्यास प्रत्येक कान टवकारलेला होता. ख्रिस्ताच्या देवत्वाची कसोटी पाहाण्यासाठी सर्वजण अतिशय कुतुहलाने थांबले होते. तो देवपुत्र आहे ह्याच्या समर्थनार्थ किंवा निरंतरची आशा सोडून देण्यासाठी ते वाट पाहात होते.DAMar 467.2

    शांत कबरेमध्ये हालचाल होत होती आणि जो मृत झालेला होता तो कबरेच्या दारात उभा राहिला. त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधिलेले असल्याकारणाने त्याच्या हालचालीला प्रतिबंध होत होता आणि आचंबा करणाऱ्या प्रेक्षकांना ख्रिस्ताने म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.” मनुष्यांनी देवाशी सहकार्य करायचे आहे हे पुन्हा येथे दाखविण्यात आले आहे. मनुष्याने मनुष्यासाठी काम केले पाहिजे. लाजारसाला मुक्त करण्यात आले आणि तो सर्वासमोर उभे राहातो, आजाराने क्षीण, निस्तेज, झालेला असा नाही तर धट्टाकटा ताकदवान, भरज्वानीतला, प्रौढ. त्याच्या डोळ्यामध्ये बुद्धीचातुर्याचे तेज आणि त्याच्या उद्धारकावरील प्रेम दिसत होते. वंदन करण्यासाठी तो येशूच्या चरणावर पडतो.DAMar 467.3

    प्रेक्षक प्रथम आश्चर्याने स्तब्ध झाले होते. त्यानंतर आभार प्रदर्शनाचा आणि हर्षाचा अवर्णनिय देखावा होता. बहिणीना त्यांचा जीवंत भाऊ देवाचे मोल्यवान दान म्हणून परत मिळाला आणि आनदाऱ्यांनी त्यांनी उद्धारकाचे आभार मानिले. हे पुनर्मीलन झाल्याबद्दल भाऊ, बहिणी आणि मित्रमंडळी आनंद करीत असताना येशू तेथून निघून गेला. जीवनदात्याचा ते शोध करीत असतांना त्यांना तो मिळाला नाही.DAMar 467.4