Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ६५—पुन्हा मंदिराचे शुद्धीकरण

    मत्तय २१:१२-१६, २३-४६; मार्क ११:१५-१९, २७-३३; १२:१-१२; लूक १९:४५-४८; २०:१-१९.

    सेवाकार्याच्या प्रारंभी मंदिरामध्ये भ्रष्ट व्यापारधंदा करून मंदिर विटाळणाऱ्यांना येशूने हाकलून लावले होते; आणि त्याच्या कडक व देवाला शोभेल अशा वागणुकीने कारस्थानी व्यापाऱ्यांना दरारा बसला होता. त्याच्या कार्याच्या अखेरीस पुन्हा तो मंदिराकडे आला आणि पूर्वीसारखेच ते वाईट रीतीने वापरून भ्रष्ट केले होते असे त्याने पाहिले. त्याची अवस्था आता पूर्वीपेक्षा फारच वाईट झाली होती. मंदिराच्या बाहेरचे आवार जणू काय जनावरांचा अड्डा झाला होता. जनावरांचे ओरडणे आणि खुर्याचा खणखणीत आवाज, रागावलेल्या व्यापाऱ्यांच्या बाचाबाची आणि त्यामध्ये लोकांचे बोलणे हे सर्व पवित्र ठिकाणी गोंधळात चालले होते. मोठ्या हद्यावर असलेल्या मंदिरातील अधिकाऱ्यांचा क्रयविक्रय आणि पैशाचा विनिमय चालला होता. नफा मिळविण्याच्या लोभामध्ये ते अगदी दंग गुंग होऊन गेले होते आणि देवाच्या दृष्टीने ते लुटारूपेक्षा बरे दिसत नव्हते.DAMar 511.1

    याजक व अधिकारी यांना करावयाच्या कामाचे गांभिर्य कळलेले नव्हते. प्रत्येक वल्हांडण सण आणि मंडपाचा सण या दिवशी हजारो जनावरांची कत्तल करण्यात येत होती आणि त्यांचे रक्त गोळा करून याजक ते वेदीवर ओतीत असे. रक्तार्पणाविषयी यहूदी लोक परिचीत होते परंतु पापामुळे जनावरांचे रक्त सांडणे भाग पडले हे सत्य ते अगदी विसरून गेले होते. जगासाठी देवपुत्राचे रक्त सांडण्यात येणार याचे ते प्रतिरूप आहे आणि त्या बलीद्वारे लोकांचे लक्ष वधस्तंभावर खिळिलेल्या उद्धारकाकडे वेधण्यात येणार होते याचे त्यांना आकलन झाले नाही.DAMar 511.2

    येशूने त्या निरापधी यज्ञबलीकडे पाहून म्हटले की, यहूदी लोकांनी हा विधि रक्तपाताचा व क्रूरपणाचा देखावा करून सोडिला आहे. जणू काय मनापासून न केलेल्या सेवेद्वारे देवाचा मान महिमा होईल ह्या समजुतीने पापाबद्दल नम्रतेने पश्चात्ताप करण्याच्याऐवजी जनावरांच्या यज्ञबलीत मोठी वाढ केली होती. स्वार्थ व अभिलाषा यांच्याद्वारे याजक व अधिकारी यांनी आपली मने कठोर केली होती. देवाच्या कोकऱ्याकडे बोट दाखविणाऱ्या प्रतीकाचा वापर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला. अशा रीतीने यज्ञ विधीचे पावित्र्य लोकांच्या मनात नष्ट होत चालले होते. येशूचा राग भडकला होता; लवकरच जगाच्या पापासाठी सांडण्यात येणाऱ्या रक्ताची किंमत सतत वाहाणाऱ्या जनावरांच्या रक्तासारखी, याजक व अधिकारी यांना वाटणार नाही हे त्याला समजले. DAMar 511.3

    ह्या परिपाठाच्या विरुद्ध ख्रिस्ताने संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते. शमुवेलाने म्हटले, “परमेश्वराचा शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे.’ यहूद्यांची धर्मभ्रष्टता भाकीताच्या दृष्टांतात पाहिल्यावर यशयाने सदोमा व गमोराचे अधिकारी या नात्याने यहूद्यांना प्रतिपादिले: “सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका; गमोऱ्याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबलि माझ्या काय कामाचे? मेंढराचे होम, पुष्ट वासरांची वपा यानी माझी अति तृप्ति झाली आहे; बैल व कोकरे व बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडविता, हे तुम्हास सांगितले कोणी?’ “आपणास धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्माचे दूष्टपण दूर करा; दुष्पपणा करण्याचे सोडून द्या; चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा; जुलम्याला ताळ्यावर आणा; अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या.” १ शमुवेल १५:२२; यशया १:१०-१२, १६, १७.DAMar 512.1

    हे भाकीत स्वतः त्यानेच केले होते आणि आता शेवटचा इशाराही पुन्हा त्यानेच दिला. भाकीत पूर्ण होण्यासाठी लोकांनी येशूला इस्राएलाचा राजा म्हटले. त्याने त्यांचा हा सत्कार मान्य केला आणि राज्यपद स्वीकारले. ह्या अधिकाराने त्याने कृती केली पाहिजे. भ्रष्ट याजकीय पद सुधारण्याचे त्याचे प्रयत्न निरर्थक ठरणार हे त्याला माहीत होते; तरीपण ते काम केले पाहिजे. अविश्वासू लोकांना त्याच्या दिव्य कार्याची साक्ष दिली पाहिजे.DAMar 512.2

    मंदिराच्या विटाळलेल्या आवाराकडे ख्रिस्ताने पुन्हा दृष्टीक्षेप केला. सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले. स्वर्गीय राजाच्या वैभवाने त्यांच्यासमोर उभे राहिलेल्याकडे याजक व अधिकारी, पुरूशी व हेल्लेणी यांनी चकीत होऊन धाकाने पाहिले. पूर्वी केव्हाही प्रदर्शित न केलेले वैभव आणि माननीयता यांनी विभूषित केलेल्या ख्रिस्ताचे देवत्त्व अचानक चमकले. त्याच्या जवळ उभे राहिलेले फार मागे लोकसमुदायापर्यंत खेचले गेले. काही शिष्य सोडून उद्धारक एकटाच उभा होता. सर्व आवाज बंद झाला होता. गंभीर शांतता असह्य झाली होती. ख्रिस्ताने प्रभावी भाषण केले आणि लोकांना प्रचंड वादळाप्रमाणे हालवून सोडिले: “त्याने म्हटले, माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील असे लिहिले आहे; परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहा.’ त्याचा आवाज सर्व मंदिरात तुतारीप्रमाणे निनादला. त्याच्या चेहऱ्यावरील असंतोषाची छटा नाश करणाऱ्या अग्नीप्रमाणे दिसत होती. अधिकाराने त्याने सांगितले, “ही येथून काढून घ्या.” योहान २:१६.DAMar 512.3

    तीन वर्षापूर्वी येशूच्या हुकूमामुळे मंदिराच्या अधिकाऱ्यांना खाली मान घालून पळता जमीन थोडी झाली होती, त्यावेळेपासून स्वतःच्या भीतीबद्दल आणि साध्या नम्र एका माणसाच्या हुकुमाचे पालन केल्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटत होते. अप्रतिष्ठित शरणागतीची पुनरावृत्ति होणे अशक्य आहे असे त्यांना वाटले. तथापि पूर्वीपेक्षा यावेळेस ते फार भयभीत झाले होते आणि पळ काढण्यास त्यानी फारच घाई केली. त्याच्या अधिकाराविषयी कोणी प्रश्न विचारिला नाही. आपली गुरेढोरे यांना हाकलून याजक व व्यापारी यांनी तेथून लगबगीने पाऊल काढिला. DAMar 513.1

    मंदिराकडून जात असताना रोग बरे करणाऱ्या विषयी विचारपूस करणारा मोठा घोळका त्यांना रस्त्यावर भेटला. पळून जाणाऱ्या लोकांनी सांगितलेली वार्ता ऐकूण त्यातील काही लोक परत फिरले. जो सामर्थ्यवान व ज्याचा चेहरा पाहून याजक व अधिकारी यांनी पळ काढिला त्याला जाऊन भेटण्यास त्यांना भीती वाटली. परंतु त्यांची केवळ आशा असलेल्याला भेटण्यास उत्सुक असलेल्या बहुसंख्य लोकांनी गर्दीतून वाट काढली. मंदिर सोडून मोठा लोकसमुदाय पळून गेला परंतु अनेकजन तेथेच थांबले. नवीन आलेले त्यांना मिळाले. पुन्हा मंदिराचे आवार दुखणेकऱ्यांनी व मरणाच्या पायरीवर असलेल्यांनी भरून गेले आणि पुन्हा येशूने त्यांची काळजी घेतली.DAMar 513.2

    काही काळानंतर याजक व अधिकारी यांनी पुन्हा मंदिराकडे परत जाण्याचे धाडस केले. घबराट कमी झाल्यावर येशूचे पुढचे पाऊल कोणते असणार हे जाणून घेण्यास ते फार उत्सुक होते. दाविदाच्या गादीवर त्याने विराजमान व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती. ते शांतपणे मंदिराकडे गेले आणि पुरुष, स्त्रिया व मुले देवाची स्तुति करताना त्यांनी ऐकिले. आत प्रवेश केल्यावर नवलपूर्ण दृश्य पाहून ते थबकून गेले, निश्चल झाले. आजारी बरे झालेले, आंधळ्यांना दृष्टी आलेली, बहिन्यांची श्रवणशक्ती पूर्ववत झालेली आणि पांगळे आनंदाने उड्या मारताना त्यांनी पाहिले. आनंदाने जल्लोष करण्यात मुले पुढाकार घेत होती. येशूने त्यांचे दुखणे बरे केले होते; त्याने त्यांना कवटाळून अलिंगन दिले होते, प्रेमाने त्यांच्या चुंबनांचा स्वीकार केला होता आणि लोकांना प्रवचन करीत असता काहीजन त्याच्या उराशी टेकून गेले होते. आता हर्षाने मुले त्याची स्तुति स्त्रोत्रे गात होती. आदल्या दिवसाचे होसान्नाचे गायन त्यांनी पुन्हा गाईले आणि उद्धारकासमोर त्यांनी झाडाच्या डहाळ्या हर्षाने हालविल्या. त्यांच्या उद्धाराचा प्रतिध्वनी मंदिरामधून निनादून गेलाः “परमेश्वराच्या नामाने येणाऱ्याचा धन्यवाद होवो!” “पाहा, तुझा राजा तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे!” स्तोत्र ११८:२६; जखऱ्या ९:९. “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!”DAMar 513.3

    ह्या आनंदित व कोणतीही आडकाठी नसलेल्या मुलांचा आवाज मंदिराच्या अधिकाऱ्यांना दुवर्तन, अपराध वाटला. असल्या प्रदर्शनाला आळा घालण्याचा त्यांनी निर्धार केला. मंदिरात प्रवेश करून आनंदाने जल्लोष केल्याने मंदिर विटाळले आहे असे त्यांनी लोकांना सांगितले. त्यांच्या बोलण्याचा काही परिणाम लोकावर झाला नाही म्हणून अधिकाऱ्यांनी ख्रिस्ताकडे गा-हाणे नेले आणि म्हटले: “ही काय म्हणतात हे तुम्ही ऐकता काय? येशूने त्यांस म्हटले, हो; बाळके व तान्ही मुले यांच्या मुखातून तू स्तुति पूर्ण करविली हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?’ भाकीतात सांगण्यात आले आहे की ख्रिस्ताचा राजा म्हणून घोषणा केली पाहिजे आणि ते शब्द पूर्ण झाले पाहिजे. त्याचे वैभव जाहीर करण्यास इस्राएलातील अधिकारी व याजक यांनी नकार दिला आणि त्याची साक्ष देण्यासाठी देवाने मुलांना प्रेरणा दिली. मुलांनी आपला आवाज उठविला नसता तर मंदिरातील स्तंभांनी उद्धारकाची स्तुति केली असती.DAMar 514.1

    परूशी एकदम गोंधळून जाऊन व्यग्र झाले होते. ज्याला ते भयभीत करू शकत नव्हते त्याचे वर्चस्व तेथे होते. मंदिराचा संरक्षक असल्याची भूमिका ख्रिस्ताने घेतली होती. पूर्वी असा राजाधिकार त्याने शीरावर कधी घेतला नव्हता. त्याच्या शब्दात व कार्यात पूर्वी असे सामर्थ्य कधी दिसले नव्हते. यरुशलेमभर त्याने अद्भुत कार्य केले होते, परंतु इतक्या गांभीर्याचे व मनावर चांगला परिणाम करणारे पूर्वी केव्हाही नव्हते. ज्या लोकांनी त्याचे अचाट कार्य पाहिले होते त्यांच्यासमोर वैर दाखविण्यास याजक व अधिकारी धजले नाहीत. त्याच्या उत्तराने त्यांना राग आला आणि ते घोटाळ्यात पडले तरी त्या दिवशी यापेक्षा अधिक काही करू शकले नाहीत. DAMar 514.2

    दुसऱ्या दिवशी सकाळी येशूने काय करावे ह्यावर धर्मसभा विचार करू लागली. तीन वर्षापूर्वी तो मशिहा असल्याच्या खुणेची मागणी केली होती. त्यावेळेपासून सबंध देशभर त्याने जोरदार काम केले होते. त्याने आजाऱ्यांना बरे केले, आश्चर्यकारकरित्या हजारोंना जेवण दिले, लाटेवर चालला आणि खवळलेल्या समुद्राला शांत राहाण्यास सांगितले. त्याने लोकांची मने जाणली, भूते काढिली आणि मृतास जीवदान दिले. तो मशिहा असलेला पुरावा अधिकाऱ्यांच्या समोर होता. त्याच्या अधिकारपदाच्या चिन्हाची मागणी न करण्याचे त्यांनी ठरविले. परंतु त्याच्यापासून कबुली किंवा जाहीर विधानाची अपेक्षा केली आणि त्याच्यामुळे त्याला दोषी ठरविण्यात आले असते.DAMar 514.3

    मंदिरात प्रवचन करण्याच्या ठिकाणी ते गेले आणि त्याला प्रश्न विचारिले: “तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करिता? व तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? हा अधिकार देवापासून आहे असे त्याने म्हणावे अशी त्यांची अपेक्षा होती. असले विधान नाकारण्याचा त्यांनी इरादा केला होता. परंतु येशूने ह्या प्रश्नाचे उत्तर न देता त्यांना दुसऱ्या विषयावर एक प्रश्न विचारिला. आणि ह्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले तर तो त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल असे ख्रिस्ताने म्हटले. त्याने विचारिले, “योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गातून किंवा मनुष्यातून?’DAMar 514.4

    ते आता मोठ्या पेचात, कचाट्यात पडलेले दिसून आले आणि त्यातून कोणताही वितंडवाद किंवा युक्तीवाद त्यांना सोडवू शकत नव्हता हेही त्यांना समजले. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता असे म्हटले तर त्यांची विसंगती नजरेसमोर येईल. ख्रिस्त म्हणेल, मग तुम्ही त्याजवर का विश्वास ठेविला नाही? योहानाने ख्रिस्ताविषयी साक्ष दिली, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा!” योहान १:२९. याजकांनी योहानाच्या साक्षीवर विश्वास ठेविला असता तर ख्रिस्त मशिहा आहे हे ते कसे नाकारू शकतील? योहानाचे कार्य मनुष्यातून होते असे म्हणावे तर त्यांच्यावर संतापाचा डोंब उसळेल. कारण योहान संदेष्टा होता असा लोकांचा विश्वास होता. DAMar 515.1

    तीव्र उत्सुकतेने लोकसमुदाय निर्णयाची अपेक्षा करीत होता. योहानाच्या कार्याचा स्वीकार करीत असल्याचे याजकांनी सांगितल्याचे त्यांना माहीत होते आणि तो देवापासून होता हे त्यांनी मान्य करावे अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु गुप्तपणे सर्वांनी विचार करून याजकांनी त्यात न पडण्याचे ठरविले. बहाणा करून त्यांनी म्हटले, “आम्हाला ठाऊक नाही.” ख्रिस्ताने म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने हे करितो हे मी ही तुम्हास सांगत नाही.”DAMar 515.2

    शास्त्री, याजक व अधिकारी सर्वजण शांत बसले. निराश होऊन, खाली मान घालून तेथे ते उभे राहिले आणि ख्रिस्ताला आणखी काही प्रश्न विचारिले नाही. त्यांच्या अनिर्णय वृत्तीने व भीत्रेपणाने लोकांचा त्यांच्यावरील आदर कमी झाला आणि ह्या अहंकारी, ढोंगी माणसांची पिच्छेहाट झालेली पाहून त्यांची करमणूक झाली.DAMar 515.3

    ख्रिस्ताची उक्ती व कृती सर्व बाबतीत महत्त्वाची होती आणि त्याचा पगडा त्याचे मरण व पुनरुत्थान यानंतर अधिक पडणार होता. त्याने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा करणाऱ्यापैकी शेवटी अनेकजण त्याचे शिष्य होणार होते. त्या घडामोडीच्या दिवशी ते प्रथमतः त्याच्या वक्तव्यामुळे त्याच्याकडे आकृष्ट झाले होते. मंदिरातील दृश्य त्यांच्या मनातून केव्हाही पुसून टाकिले जाणार नव्हते. त्यांच्या विचारात येशूचे बोल आणि प्रमुख याजकाचे बोल यातील मोठी तफावत तुलनेने दिसत होती. मंदिरातील प्रतिष्ठित मुख्य याजक दिमाखाने भारी किंमतीच्या पोषाखात नटलेला होता. त्याच्या मस्तकावर चमकणारा मुगुट होता. त्याची वर्तणूक राजाला शोभेल अशी भव्य होती, त्याचे केस व लांब दाढी वयोमानाने पांढरी दिसत होती. पाहाणाऱ्याला त्याचे स्वरूप दराऱ्याचे वाटत होते. ह्या श्रेष्ठ व्यक्तीसमोर स्वर्गातील राजा थाटमाट न करिता उभा होता. त्याचा पेहराव प्रवासाने मलीन झालेला होता, त्याचा चेहरा निस्तेज असून त्यावर दुःखाची छटा होती; तथापि परोपकारबुद्धी आणि सभ्यपणा ही त्याच्याठायी दिसत होती व ते अहंकारी, आत्मविश्वासी आणि मुख्य याजकाच्या रागीष्ट स्वभावाशी तुलनात्मक दृष्ट्या मोठी तफावत दाखवीत होते. मंदिरातील येशची उक्ती व कृती ज्यांनी पाहिली त्यांच्यातील अनेकांनी त्याला देवाचा संदेष्टा म्हणून स्वीकारले. जसा येशूचा लौकिक वाढत गेला तसा याजकांचा येशूवरील द्वेष वाढत गेला. त्याच्यावर टाकलेल्या जाळ्यातून तो कसा निसटला हे एक त्याच्या देवपणाचा नवीन पुरावा आहे हे समजल्यावर त्यांची तळपायाची आग मस्तकाला पोहचली. DAMar 515.4

    आपल्या स्पर्धेमध्ये विरोधकांचा पाणउतारा करण्याची येशूची धारणा नव्हती. विरोधकांना अति बिकट परिस्थितीत अडकल्याचे पाहून त्याला आनंद होत नसे. त्यांना उत्तम बोध देऊन धडा शिकवायचा होता. शत्रूनी त्याच्यासाठी पसरलेल्या जाळ्यात ते स्वतःच अडकून पडून जायबंदी झाल्याची क्रिया त्याने होऊ दिली. योहानाच्या बाप्तिस्म्यासंबंधी मुद्दाम दाखविलेल्या अज्ञानपणामुळे त्याला बोलण्याची आणि खरी वस्तुस्थिति मांडण्याची संधि मिळाली. त्याद्वारे पूर्वी दिलेल्या इशाऱ्याबरोबर हा एक इशारा देण्यात आला.DAMar 516.1

    त्याने म्हटले, “तुम्हास काय वाटते ते सांगा बरे? एका मनुष्याला दोन पुत्र होते; तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर; त्याने उत्तर दिले, मी नाही जात; तरी काही वेळाने त्याला पस्तावा होऊन तो गेला. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले; त्याने उत्तर दिले, जातो महाराज; पण गेला नाही. या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले?’DAMar 516.2

    ह्या आकस्मिक प्रश्नाने श्रोतेजन चकीत झाले आणि विचारात पडले. हा दाखला सविस्तरपणे त्यांनी ऐकिला आणि ताबडतोब उत्तर दिले “पहिल्याने.” दृष्टी त्यांच्यावर खिळून, गांभीर्याने व कडक शब्दात येशूने म्हटले, “जकातदार व कसबिणी तुमच्यापुढे देवाच्या राज्यात जातात. कारण योहान धर्म मार्गाने तुम्हाकडे आला आणि तुम्ही त्याचा विश्वास धरिला नाही; जकातदार व कसबिणी यांनी विश्वास धरिला; तर हे पाहून तुम्ही त्याचा विश्वास धरावा असा मागूनही पश्चात्ताप केला नाही.”DAMar 516.3

    ख्रिस्ताच्या प्रश्नाला बरोबर उत्तर दिल्याशिवाय याजक व अधिकारी यांना गत्यंतर नव्हते. अशा रीतीने त्यांचे मत पहिल्याच्या बाजूने होते. परूशी लोकांनी ज्यांचा तिरस्कार व द्वेष केला त्या जकातदार लोकांचा तो दर्शक होता. सामान्यपणे जकातदार नीतीला सोडून वागणारे होते. देवाच्या नियमाचा भंग करणारे ते होते. ते कृतघ्न व अधार्मिक होते. द्राक्षमळ्यात जाऊन काम करण्यास सांगितल्यावर त्यांनी ते तिरस्काराने नाकारले. परंतु योहानाने येऊन पश्चात्ताप व बाप्तिस्मा या विषयीचा संदेश दिल्यावर जकातदारांनी त्याचा संदेश स्वीकारिला आणि बाप्तिस्मा घेतला.DAMar 516.4

    दुसरा मुलगा यहूदी राष्ट्रातील प्रतिष्ठित पुढाऱ्यांचे दर्शक होता. काही परूश्यांनी पश्चात्ताप केला व योहानाचा बाप्तिस्मा घेतला. परंतु तो देवापासून आला हे मान्य करायला पुढारी तयार नव्हते. त्याचा इशारा व दोषारोप याद्वारे त्यांच्यात सुधारणा झाली नाही. “त्यांनी त्यांच्यासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.” लूक ७:३०. त्यांनी तो संदेश तिरस्काराने झिडकारला. दुसऱ्या मुलाला बोलाविल्यावर “जातो महाराज” असे म्हणाला परंतु गेला नाही त्याप्रमाणेच याजक व अधिकारी आज्ञापालन करतो म्हणून उघड सांगतात परंतु कृतीने आज्ञाभंग करितात. त्यांनी धार्मिकतेचा आव आणिला आणि देवाचे नियम पाळण्याची विधाने केली परंतु खऱ्या अर्थाने खोटे आज्ञापालन केले. अश्रद्धाळू, म्हणून परूश्यांनी जकातदारांना शाप दिला परंतु त्यांनी श्रद्धेने आणि कृतीने दाखविले की, ज्यांना मोठा प्रकाश मिळाला परंतु त्या प्रकाशाप्रमाणे त्यांची कृती नसलेल्या त्या ढोंगी लोकांच्या आधी देवाच्या राज्यात जात आहेत.DAMar 517.1

    हे सूक्ष्म, भेदक सत्य याला याजक व अधिकारी पाठिंबा देण्यास तयार नव्हते; ते शांत राहिले. त्याच्याविरुद्ध वापरण्यात येईल असे येशू काहीतरी बोलेल असे त्यांना वाटले होते. परंतु अजून त्यांना अधिक सहन करायचे होते.DAMar 517.2

    ख्रिस्ताने म्हटले “आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता, त्याने द्राक्षमळा लाविला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणिले व माळा बांधिला; आणि तो माळ्यांस सोपवून तो परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले उत्पन्न घेण्याकरिता आपल्या दासांस माळ्यांकडे पाठविले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांस धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारिले, व कोणाला दगडमार केला. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठविले; त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी, ते आपल्या पुत्राचा मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या पुत्रास त्यांजकडे पाठविले. परंतु माळी पुत्राला पाहून आपसात म्हणाले, हा वारीस आहे; चला आपण याला जिवे मारू व याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील?”DAMar 517.3

    तेथे हजर असलेल्या सर्वांना हा संदेश दिला; परंतु याजक आणि अधिकारी यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हटले, “तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांना नाश करील, आणि जे माळी हंगामी त्याला उत्पन्न देतील अशा दुसऱ्याकडे तो द्राक्षमळा सोपून देईल.” हा दाखला कोणाला लागू होता ह्याची कल्पना बोलणाऱ्यांना प्रथम आली नव्हती, परंतु आता त्यांना समजून आले की त्यांनी स्वतःचाच दोष जाहीर केला होता. दृष्टांतातील कोणी एक गृहस्थ देवाचे दर्शक होता, द्राक्षमळा यहूदी राष्ट्राचे दर्शक, कुंपण देवाच्या नियमाचे दर्शक, व त्यांचे संरक्षक होता. माळा मंदिराचे चिन्ह होते. द्राक्षमळ्याच्या प्रभूने त्याच्या उन्नतीसाठी सर्व काही केले होते. तो म्हणतो, “माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले?” यशया ५:४. देवाने इस्राएलाची काळजी घेण्यासाठी केलेले अथक श्रमाचे हे दर्शक आहे. द्राक्षमळ्यातील फळांचे उत्पन्न माळ्यांना मालकाला द्यायचे होते त्याप्रमाणेच देवाच्या लोकांनी त्यांनाच मिळालेल्या संधीप्रमाणे त्याचा सन्मान करायचा होता. मालकाने पाठवून दिलेल्या दासांना माळ्यांनी जसे मारून टाकिले तसेच पश्चात्तापाचा संदेश देण्यासाठी देवाने पाठविलेल्या संदेष्ट्यांचा वध यहूदी लोकांनी केला, एकामागून एक अशा संदेशवाहकांचा वध करण्यात आला. आतापर्यंत दृष्टांतातील स्पष्टीकरणाला विरोध झाला नाही. द्राक्षमळ्याच्या मालकाने शेवटी आपला एकुलता पुत्र पाठविला आणि ह्या आज्ञाभंग करणाऱ्या दासांनी त्याला धरून जिवे मारिले हे सांगितल्यावर नजीक असलेल्या विधिलिखित येशूच्या मरणाचे स्पष्ट चित्र याजक व अधिकारी यांनी पाहिले. पित्याने शेवटी विनवणी करण्यासाठी त्याला पाठविले होते आणि त्याला ठार मारण्याची योजना ते अगोदरच आखीत होते. कृतघ्न माळ्यांना त्यांच्या अपराधाबद्दल जी शिक्षा दर्शविली ती जे ख्रिस्ताचा वध करतील त्यांच्या नाशाचे दर्शक असल्याचे दाखविले आहे.DAMar 517.4

    त्यांच्यावर कीव करून येशूने पुढे म्हटले, “जो धोंडा बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला; हे प्रभूकडून झाले, आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? यास्तव मी तुम्हास सांगतो की देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल; व जी प्रजा त्याचे उत्पन्न देईल तिला ते दिला जाईल. जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकील.”DAMar 518.1

    येणाऱ्या मशिहाला उद्देशून हे भाकीत यहूदी लोक वारंवार त्यांच्या मंदिरामध्ये उच्चारतात. यहूदी राष्ट्राची व तारणाच्या योजनेची कोनशिला ख्रिस्त होता. बांधकाम करणारे यहूदी याजक व अधिकारी हा पायाचा दगड आता नाकारीत होते. धोका त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी उद्धारकाने ह्या भाकीताकडे त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या शक्तीप्रमाणे आणि प्रत्येक साधनाने ते लवकरच पार पाडणाऱ्या कृत्याचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न तो करीत होता.DAMar 518.2

    त्याच्या वक्तव्यात दुसरा एक उद्देश होता. “तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील?’ हा प्रश्न विचारून त्यांनी जे उत्तर दिले ते देण्यास त्यांना प्रवृत करण्याची त्याची योजना होती. स्वतःचाच त्यांनी निषेध करावा असा त्याचा बेत होता. त्याने दिलेल्या इशाऱ्याद्वारे अनुतप्तदग्ध होण्यास ते अपयशी ठरल्याने ते त्यांचा नाश पक्का करतील आणि हा नाश त्यांनी स्वतःवर ओढवून घेतला आहे हे त्यांच्या लक्षात यावे अशी त्याची इच्छा होती. हा राष्ट्रीय हक्क त्यांच्यापासून काढून घेण्यात आला यामध्ये देवाचा न्याय प्रगट झाला हे त्यांना समजावे अशी देवाची इच्छा होती. ह्या न्यायाला सुरूवात अगोदरच झाली आहे आणि त्याचा शेवट नगर व मंदिर उध्वस्त होण्यात होईल एवढेच नाही तर राष्ट्राची पांगापांग होईल.DAMar 518.3

    श्रोतजनांनी इशारा ओळखला. स्वतःनेच शिक्षा जाहीर केलेली असताना याजक व अधिकारी यांनी चित्र पूर्ण करण्यासाठी म्हटले, “हा वारीस आहे; चला आपण याला जिवे मारू.” “परंतु त्याच्यावर हात टाकताना त्यांना समुदायाची भीती वाटली,” कारण सर्व सामान्य जनतेचा अभिप्राय येशूच्या बाजूने होता...DAMar 519.1

    नाकारलेल्या दगडाविषयीच्या भाकीताचा उल्लेख करून इस्राएल लोकांच्या इतिहासात घडलेल्या घटनेचा निर्देश केला. पहिले मंदिर बांधिले त्याच्याशी त्याचा संबध होता. ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्यासमयी ते जरी विशेष प्रकारे लागू होते आणि यहूद्यांना ते आकर्षित आव्हान होते तरी त्यामध्ये आमच्यासाठी धडा आहे. जेव्हा शलमोनाने मंदिर बांधिले तेव्हा दगडाच्या खाणीमध्ये भीतीसाठी व पायासाठी प्रचंड दगड तयार केले होते. बांधकाम करण्याच्या ठिकाणी ते आणल्यावर त्यावर कोणतेही हत्यार वापरण्यात आले नाही परंतु कारागिरांना ते ठराविक ठिकाणी व्यवस्थित बसवायचे होते. पायासाठी एक प्रचंड मोठा आणि असाधारण आकाराचा दगड आणिला; परंतु तो बसविण्यासाठी कारागिरांना योग्य जागा न मिळाल्यामुळे तो त्यांच्या कामात अडखळ होता... . नाकारलेला असा तो फार दिवस तेथे पडला होता. परंतु कोनशिला बसविण्याची वेळ आली तेव्हा योग्य आकाराचा, मजबूत आणि मोठ्या वजनाखाली टिकणारा असा दगड शोधण्यात कारागिरांनी फार वेळ घालविला. योग्य निवड करण्यात त्यांच्या हातून चुकी झाली तर सबंध इमारतीची सुरक्षितता धोक्यात येईल. सूर्य प्रकाश, धुके व वादळ यांच्या तडाख्यात ते टिकून राहिले पाहिजे. वेगवेगळ्या वेळी अनेक दगड निवडण्यात आले होते परंतु प्रचंड वजनाखाली त्याचा चुराडा झाला होता. दुसरे पर्यावरणाच्या कसोटीला उतरू शकले नव्हते. परंतु शेवटी बरेच दिवस तेथे पडून राहिलेल्या नाकारलेल्या दगडाकडे लक्ष गेले. त्याच्यावर वारा, वादळ, उन्ह यांचा प्रहार झाला होता परंतु त्याच्यावर थोडासाही परिणाम झाला नव्हता. कारागिराने त्याची बारीक सारीक चौकशी केली आणि सर्व परीक्षेत तो पास केला परंतु एक परीक्षा राहिली होती, ती म्हणजे तीव्र भार वाहाणे. त्यातही तो पसंत केला. बसवायच्या ठिकाणी आणल्यावर तो अगदी बरोबर बसला. भाकीताच्या दृष्टांतात हा दगड ख्रिस्ताचे दर्शक होता. तो म्हणतोःDAMar 519.2

    “तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना; त्याचेच भय व धाक धरा; म्हणजे तो तुम्हास पवित्रस्थान होईल; तथापि इस्राएलाच्या उभय घराण्यात तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळ्याचा खडक आणि यरुशलेमाच्या रहिवाश्यास पाश व सापळा असा होईल.” दृष्टांतातील भाकीतामध्ये पहिल्या आगमनानंतर ख्रिस्ताला दिलेली कसोटीची वागणूक दगडाला दिलेल्या वागणुकीचे दर्शक होते. “ह्यास्तव प्रभु परमेश्वर म्हणतोः पाहा सीयोनात पायाचा दगड बसविणारा मी आहे; विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही.’ यशया ८:१३-१५, २८:१६.DAMar 519.3

    अनंत सुज्ञपणाने देवाने पायासाठी धोंडा निवडिला आणि व्यवस्थित इच्छित ठिकाणी बसविला. त्याने त्याला “विश्वसनीय पाया” म्हटले. अखिल जग त्याच्यावर आपले ओझे व दुखणे लादू शकते आणि तो ते सर्व सहन करू शकतो. सुरक्षितपणे त्याच्यावर बांधकाम ते करू शकतात. ख्रिस्त “कसोटीस उतरलेला’ धोंडा आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची केव्हाही निराशा होणार नाही. प्रत्येक परीक्षेतून तो गेला आहे. आदामाचा व त्याच्या पुढील पिढ्यांचा अपराध त्याने सहन केला, वाहिला आणि दुष्टाईच्या शक्तीवर मात करून तो विजयी झाला. प्रत्येक अनुतप्त पाप्याचे ओझे त्याने वाहिले. अपराधी अंतःकरणाला ख्रिस्तामध्ये दु:खपरिहार लाभला. तो विश्वसनीय-खात्रीचा पाया आहे. जे त्याच्यावर सर्वस्वी विसंबून राहातात ते त्याच्या संपूर्ण सुरक्षितेत विसावा घेतात.DAMar 520.1

    यशयाच्या भाकीतात ख्रिस्ताला पायाचा धोंडा आणि ठेच लागण्याचा धोंडा म्हटले आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेषित पेत्र लिहीत असताना ख्रिस्त कोणासाठी पायाचा धोंडा आणि कोणासाठी ठेच लागण्याचा धोंडा हे स्पष्ट करून दाखवितोः DAMar 520.2

    “प्रभु कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. मनुष्यांनी नाकारिलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडिलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याजवळ आल्याने तुम्हीही आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे, देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्याद्वारे अर्पिण्यासाठी पवित्र याजकगण असे रचिले जात आहा. कारण शास्त्रात असा लेख आहे: पाहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सीयोनात बसवितो; तिच्यावर विश्वास ठेवणारा फजीत होणार नाही. यास्तव तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांस सन्मान मिळणार; जे विश्वासाला अमान्य आहेत त्यास, बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तोच कोनशिला झाला; ते वचनाला अमान्य असल्याने ठेच खातात, त्यासाठी ते नेमिलेही होते.’ १ पेत्र २:३-८.DAMar 520.3

    श्रद्धावंतांना ख्रिस्त विश्वसनीय पाया आहे. ते दगडावर पडतात आणि त्यांचे तुकडे तुकडे होतात. ख्रिस्ताला समर्पित होणे व त्याच्यावर श्रद्धा ठेवणे याचे दर्शक येथे स्पष्ट केले आहे. दगडावर पडणे व तुकडे होणे म्हणजे स्वतःच्या चांगुलपणाची खात्री सोडून देणे आणि बालकासारख्या नम्रतेने ख्रिस्ताकडे जाणे, पापाबद्दल अनुतप्त होणे आणि त्याच्या क्षमाशील प्रीतीवर विश्वास ठेवणे होय. विश्वास व आज्ञापालन यांच्याद्वारे ख्रिस्त या भक्कम पायावर आम्ही बांधू शकतो.DAMar 520.4

    ह्या जीवंत खडकावर यहूदी आणि हेल्लेणी हे दोघेही सारखेच बांधू शकतात. केवळ ह्याच भक्कम पायावर सुरक्षितपणे बांधू शकतो. सर्वांच्यासाठी तो लांबरुंद आहे आणि अखिल जगाचे ओझे व दुःखाचा भार तो वाहू शकतो. जो जीवंत खडक ख्रिस्त याच्याशी संयोग होऊन ह्या भक्कम पायावर जे बांधतात ते जीवंत खडक बनतात. अनेक स्वप्रयत्नांनी स्वतला कोरून, चकचकीत करून सुशोभित करितात; परंतु ते “जिवंत खडक’ बनू शकत नाहीत कारण ख्रिस्ताशी त्यांचा संयोग झालेला नाही. ह्या संयोगाशिवाय कोणाचाही उद्धार होऊ शकत नाही. ख्रिस्ताचे जीवन आम्हामध्ये बसल्याशिवाय मोहाच्या वादळाला तोंड देऊ शकत नाही. आमची अनंतकालिक सुरक्षितता खऱ्या पायावर बांधकाम करण्यावर अवलंबून आहे. कसोटी किंवा चाचणी न केलेल्या पायावर आज मोठा समुदाय बांधकाम करीत आहे. जेव्हा पाऊस पडतो, वादळ येते आणि पूर येतो तेव्हा त्यांची घरे कोसळून जातात कारण मुख्य कोनशिला येशू ख्रिस्त, सनातन खडक याच्यावर ती उभारलेली नसतात.DAMar 521.1

    “वचन न पाळणाऱ्यांना तो ठेच लागण्याचा धोंडा होतो,’ ख्रिस्त अडखळण्याचा खडक आहे. परंतु “बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तोच कोनशिला झाला.’ नाकारलेल्या दगडाप्रमाणे ख्रिस्ताने आपल्या पृथ्वीवरील सेवाकार्यात अपमानास्पद वागणूक व उपेक्षा अनुभवली. “तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधिंशी परिचित असलेला ... त्याला तुच्छ लेखिले आणि आम्ही मानिले नाही.’ यशया ५३:३. परंतु त्याचा आता गौरव होण्याची वेळ जवळ आली होती. मरणातून त्याचे पुनरुत्थान झाल्यावर “पराक्रमाने देवाचा पुत्र ठरलेला” असा त्याचा निर्देश करण्यात येईल. रोम. १:४. त्याच्या द्वितियागमनाच्या समयी स्वर्ग व पृथ्वी यांचा प्रभु असे संबोधण्यात येईल. आता त्याला वधस्तंभावर खिळण्याच्या विचारांत जे होते त्यांना त्याचे वैभव, थोरवी ओळखून येईल. सर्व विश्वासमोर नाकारलेला दगड कोनशिलातील प्रमुख खडक बनेल. DAMar 521.2

    “ज्या कोणावर तो पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकील.’ ज्यांनी ख्रिस्ताचा नाकार केला त्यांना त्यांचे नगर व त्यांचे राष्ट्र नष्ट झालेले पाहाण्याची पाळी आली. त्यांच्या वैभवाचा भुगाभुगा होऊन वाऱ्याने तो सर्वत्र पसरेल. यहुद्यांचा कशाने नाश झाला? ज्या खडकावर त्यांनी बांधिले तो त्यांची सुरक्षितता होता. नाकारलेला देवाचा चांगुलपणा, धिक्कारलेली धार्मिकता व तुच्छ मानलेली करुणा ही नाशाची कारणे होती. लोकांनी देवा विरुद्ध भूमिका घेतली आणि त्यांच्या तारणासाठी जे होणार होते ते त्यांच्या नाशास कारणीभूत झाले. देवाने जीवन प्राप्तीसाठी जे आयोजिले होते ते त्यांच्या मृत्यूस कारण झाले. यहूद्यांनी येशूला वधस्तंभावर खिळिल्याने यरुशलेमाचा नाश झाला. वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताच्या ओझ्याखाली ते ह्या जगात व येणाऱ्या जगात दबले गेले, नाश पावले. देवाची कृपा ज्यांनी अवमानली, धिक्कारली त्यांची स्थिति त्या शेवटल्या महान दिवशी तशीच होईल. त्यावेळेस अडखळणारा खडक ख्रिस्त त्यांना सूड घेणारा पर्वत वाटेल. त्याच्या मुद्रेचे वैभव धार्मिकांना जीवन वाटेल आणि दुष्टांना नष्ट करणारा अग्नि होईल. प्रीतीचा नाकार केला, कृपा झिडकारून दिली त्यामुळे पाप्याचा नाश होईल.DAMar 521.3

    यहूदी लोकांनी देवपुत्राचा धिक्कार केल्याने काय परिणाम होईल हे अनेक उदाहरणे देऊन व वारंवार इशारे देऊन येशूने स्पष्ट केले. प्रत्येक युगामध्ये जे येशूचा उद्धारक म्हणून स्वीकार करीत नाहीत त्या सर्वांच्यासाठी ह्या वचनामध्ये त्याने संदेश दिला आहे. प्रत्येक इशारा त्यांच्यासाठी आहे. भ्रष्ट केलेले मंदिर, आज्ञा मोडणारा मुलगा, ढोंगी माळी, बांधकाम करणारे उद्धट कारागीर यांचा बरहुकूम भाग प्रत्येक पाप्याच्या अनुभवात येतो. पश्चात्ताप केल्याशिवाय त्यांच्यावर येणारा नाश अनिवार्य आहे.DAMar 522.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents