Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ८६—जा सर्व राष्ट्रांना शिकवा

    मत्तय २८:१६-२०.

    स्वर्गीय सिंहासनारूढ होण्याच्या थोडेच अगोदर ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सनद देऊन म्हटले, “स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे; ह्यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिकवा.’ “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.” मार्क १६:१५. वारंवार शब्दांचा पुनरुच्चार करण्यात आला होता तेणेकरून शिष्यांना त्याचा अर्थबोध व्हावा. पृथ्वीवरील सकल रहिवाशांवर, मग तो श्रेष्ठ असो किंवा नीच असो, राव किंवा रंक असो, स्वर्गीय प्रकाश तेजस्वीतेने चमकणारा होता. जगाच्या उद्धारकार्यामध्ये शिष्य उद्धारकाचे सहकामदार बनणार होते.DAMar 707.1

    माडीवरच्या खोलीत एकत्र जमल्यावर ख्रिस्ताने ही कामगिरी बाराजणावर टाकिली होती; परंतु आता ही जबाबदारी पुष्कळावर टाकण्यात येणार होती. गालीली प्रांतातील डोंगरावर एक सभा घेण्यात आली आणि त्यासाठी सर्व आमंत्रित एकत्र जमले होते. मरणाच्या अगोदर ह्या सभेचे नियोजन, स्थळ आणि वेळ स्वतः ख्रिस्ताने आयोजीत केली होती. कबरेजवळील दूताने गालीलमध्ये भेटण्याच्या आश्वासनाचे शिष्यांना स्मरण करून दिले होते. वल्हांडण सणाच्या सप्ताहाच्या वेळी जमा झालेल्या श्रद्धावंतापुढे त्या आश्वासनाचा पुनरुच्चार करण्यात आला होता आणि त्यांच्याद्वारे प्रभूच्या मरणावर शोक करणाऱ्या, एकाकी, उद्विग्न व्यक्तीला ते पोहोंचले होते. ह्या सभेविषयी त्यांची उत्सुकता शिगेला पोहंचली होती. यहूदी लोकांचा संशय टाळण्यासाठी ते चारी बाजूने निरनिराळ्या आडवाटेने सभेच्या ठिकाणी पोहचले. ख्रिस्ताविषयीची बातमी ऐकून ते त्यावर मनापासून खल करीत तेथे आले.DAMar 707.2

    ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ज्यांनी ख्रिस्ताला पाहिले होते त्यांच्याकडून जे शिकता येईल ते शिकण्यासाठी उत्सुक असलेले सुमारे पाचशे श्रद्धावंत नेमलेल्या वेळी डोंगराच्या बाजूला लहान लहान गटागटांनी एकत्र जमले होते. शिष्यांनी प्रत्येक गटाला भेटून येशूविषयी जे पाहिले आणि ऐकिले होते ते सर्व त्यांना सांगितले आणि येशूने शिष्यांना जसे शास्त्रवचनाद्वारे स्पष्टीकरण करून दिले तसे त्यांनी त्यांना समजाऊन सांगितले. थोमाला त्याच्या अविश्वासाची गोष्ट आठवली आणि त्याच्या संशयाचे निरसन कसे करण्यात आले हे त्याने कथन केले. आकस्मात येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला. तो कोठून व कसा आला ह्याचे ज्ञान कोणालाच नव्हते. तेथे उपस्थित असलेल्यांनी त्याला पूर्वी केव्हा पाहिले नव्हते; परंतु त्याच्या हातापायातील वधस्तंभाच्या खूणा त्यांनी पाहिल्या; त्याची मुद्रा देवाची होती आणि ती पाहिल्यावर त्यांनी त्याची आराधना केली.DAMar 707.3

    परंतु काहींना त्याचा संशय आला. हे असे नित्याचेच असणार. कित्येकांना विश्वास ठेवणे फार कठीण जाते आणि ते संशयाच्या बाजूला राहातात. अविश्वासामुळे त्यांचे भारी नुकसान होते.DAMar 708.1

    पुनरुत्थानानंतर येशूने श्रद्धावंताची घेतलेली ही पहिलीच मुलाखत होती. त्याने त्यांना म्हटले, “स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे.” तो बोलण्याअगोदर शिष्यांनी त्याची आराधना केली होती. मरणानंतर त्याच्या मुखातून निघालेल्या ह्या सामर्थ्ययुक्त वाणीने त्यांच्या भावना हर्षाने उचंबळून आल्या. तो आता पुनरुत्थित उद्धारक होता. आजाऱ्यांना बरे करणे व दुष्ट शक्तींना बंधनात ठेवणे त्यामध्ये वापरलेली त्याची शक्ती अनेकांनी पाहिली होती. यरुशलेममध्ये त्याचे राज्य संस्थापित करण्यासाठी, विरोधकांना दाबून ठेवण्यासाठी व निसर्गातील शक्तीवर मात करण्यासाठी त्याच्याठायी सामर्थ्य होते असा त्यांचा विश्वास होता. त्याने खवळलेला समुद्र शांत केला होता; मोठमोठ्या लाटावर तो चालला होता; मृतास त्याने जीवदान दिले होते. आता त्याने घोषीत केले की “सर्व अधिकार” त्याला देण्यात आला होता. त्याच्या ह्या वक्तव्याने श्रोतेजनांची मने भौतिक व क्षणिक गोष्टीवरून स्वर्गीय व निरंतरच्या गोष्टीकडे वळविली होती. ती माननियता व वैभव यांच्या सर्वश्रेष्ठ संकल्पनेकडे उंचावली होती.DAMar 708.2

    मानवाच्या वतीने त्याने केलेला यज्ञबली परिपूर्ण होता ह्याची घोषणा डोंगरावरील प्रवचनात ख्रिस्ताने केली होती. प्रायश्चित्ताची अट पुरी करण्यात आली होती; ज्या कार्यासाठी तो ह्या पृथ्वीवर आला होता ते साध्य झाले होते. देवदूत, राज्य व सत्ता ह्यांच्याद्वारे सन्मानित होण्यासाठी तो स्वर्गीय सिंहासनाच्या मार्गावर होता. त्याने मध्यस्थीच्या कामाला आरंभ केला. अमर्यादित अधिकाराने त्याने आपल्या शिष्यांना सनद दिली आणि म्हटले, “यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यास शिकवा; आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे.’ मत्तय २८:१९, २०.DAMar 708.3

    सत्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी यहूदी लोकावर टाकण्यात आली होती; परंतु परूशांच्या शिकवणीने सर्व मानवजातीमध्ये त्यांना निवडक लोकाशी संबंध ठेवण्याची वृत्ती असलेले व हटवादी, आंकुचित मनाचे बनविले होते. अधिकारी व याजक यांचा पेहराव, चालीरिती, विधि, परंपरा आणि इतर सर्व काही यामुळे ते जगाचा प्रकाश होण्यास लायक राहिले नव्हते. यहूदी राष्ट्र म्हणजे अखिल जग असे ते समजत असे. परंतु ख्रिस्ताने विश्वास आणि ईश्वराची आराधना यांची घोषणा सर्व जगाला करण्याचे महत्त्वाचे कार्य शिष्यांना दिले होते. त्या घोषणेत ठराविक वर्ण किंवा देश यांचा समावेश केला नव्हता. हा विश्वास सर्व लोक, सर्व राष्ट्रे यांना द्यायचा होता.DAMar 708.4

    शिष्यांना सोडून जाण्याच्या अगोदर त्याच्या राज्याच्या स्वरूपाविषयी ख्रिस्ताने स्पष्ट प्रतिपादन केले होते. त्याविषयी पूर्वी सांगितलेल्याचे त्याने त्यांना स्मरण करून दिले. ह्या जगात तात्पुरते सरकार प्रस्थापित करण्याचा त्याचा उद्देश नाही असे त्याने घोषीत केले. दाविदाच्या सिंहासनावर आरूढ होऊन पृथ्वीवरील राजाप्रमाणे तो राज्यकारभार करणार नव्हता. ज्या अनुभवातून त्याला जावे लागले ते सर्व पिता आणि त्याच्यामध्ये संमत झाले होते हे त्याने शास्त्र उघडून त्यांच्या निदर्शनास आणून दिले. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी ह्या सगळ्याविषयी भाकीत केले होते. त्याने म्हटले, मशीहाच्या नाकाराविषयी केलेले भाकीत पूर्ण झालेले तुम्ही पाहात आहा. मला देण्यात येणारी अपमानास्पद वागणूक व माझे तारण या संबंधी प्रगट केलेल्या सर्वांची खातरजमा करण्यात आली. तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठलो. दक्षतेने शास्त्रशोध करा आणि माझ्याविषयी भाकीतामध्ये जे विदित केले आहे ते तपशीलवार पूर्ण झाल्याचे तुमच्या निदर्शनास येईल.DAMar 709.1

    दिलेले काम यरुशलेमापासून सुरू करण्यास ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले. मानवजातीसाठी दर्शविलेल्या अद्भुत अनुग्रहाची रंगभूमि यरुशलेम होती. त्या ठिकाणी त्याला प्राणांतिक दुःख सोसावे लागले, त्याचा त्याग करण्यात आला आणि त्याला शिक्षापात्र दोषी ठरविण्यात आले. त्याचे जन्म स्थान यहूदा प्रांत होता. मानवतेचा झगा परिधान करून तो त्यांच्यामध्ये राहिला आणि त्यांच्यासमवेत तो असताना स्वर्ग पृथ्वीच्या नजीक आल्याचा भास थोडक्यांना झाला. शिष्यांच्या कामाला आरंभ यरुशलेमापासून झाला पाहिजे.DAMar 709.2

    त्या ठिकाणी ख्रिस्ताला बहुत दुःख सोसावे लागले, त्याने केलेल्या कामाचे गुणग्रहण तेथे झाले नाही म्हणून शिष्यांनी ते ठिकाण सोडून दुसऱ्या खात्रीदायक स्थळाची अपेक्षा केली असती परंतु त्यांनी तसे केले नाही. ज्या भूमीत त्याने सत्याचे बीज पेरले होते तेथेच शिष्यांना मशागत करायची होती त्यामुळे बीजांना अंकुर फुटून व त्यांची चागली वाढ होऊन समृद्धीची सुगी त्यांना लाभणार होती. हे काम करीत असताना यहूद्यांच्या द्वेष मत्सरामुळे शिष्यांना छळाचा अनुभव यायचा होता; परंतु त्याच्या गुरुजीने हे सहन केले होते आणि शिष्यांनी त्यापासून पलायन करायचे नव्हते. उद्धारकाच्या मारेकऱ्यांना क्षमा व दया यांची पहिलीच देणगी द्यायची होती.DAMar 709.3

    यरुशलेममध्ये अनेकजन येशूवर गुप्तरित्या विश्वास ठेवणारे होते आणि अनेकांची अधिकारी व याजक यांच्याद्वारे फसवणूक झाली होती. त्यांनासुद्धा हा शुभ संदेश द्यायचा होता. अनुतप्तदग्ध होण्यास त्यांना निमंत्रण द्यायचे होते. केवळ ख्रिस्ताद्वारे पापविमोचन लाभते हे आश्चर्यकारक सत्य त्यांच्यापुढे स्पष्ट करायचे होते. गेल्या काही सप्तकातील चित्तथरारक घटनांनी सबंध यरुशलेम गडबडून गेले होते म्हणून शुभ संदेशाच्या प्रबोधनाचा त्यांच्यावर खोल गंभीर परिणाम होणार होता.DAMar 710.1

    परंतु काम येथेच थांबायचे नव्हते. ते जगाच्या कोनाकोपऱ्यात जायाचे होते. ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना म्हटले की, जगासाठी केलेल्या माझ्या स्वार्थत्यागी जीवनाचे तुम्ही साक्षीदार आहात. इस्राएलासाठी मी केलेले काम तुम्ही पाहिले आहे. जीवनप्राप्तीसाठी ते माझ्याकडे जरी येणार नाहीत, अधिकारी व याजक यांनी अनुचित वागणूक मला जरी दिली आणि शास्त्रवचनाप्रमाणे जरी माझा त्याग त्यांनी केला तरी देवपुत्राचा स्वीकार करण्यासाठी त्यांना दुसरी संधि देण्यात येईल. पापांगिकार करून माझ्याकडे येणाऱ्यांचा मी मोकळेपणाने स्वीकार करितो हे तुम्ही पाहिले आहे. माझ्याकडे येणाऱ्याला मी कोणत्याही प्रकारे टाकणार नाही. ते देवाशी समेट करतील आणि निरंतरच्या जीवनाचे मानकरी बनतील. माझ्या शिष्यांनो, हा सदयतेचा संदेश तुमच्या स्वाधीन करितो. प्रथमता हा संदेश इस्राएलाला द्यायचा आहे आणि नंतर सर्व राष्ट्र, लोक व भाषा यांना द्यायचा आहे. यहूदी आणि हेल्लेणी यांना हा द्यायचा आहे. सर्व श्रद्धावंताना एका मंडळीत एकत्र करण्यात येईल.DAMar 710.2

    पवित्र आत्म्याच्याद्वारे शिष्यांना अद्भुत सामर्थ्याचे दान लाभणार होते. अद्भुते व चिन्हे यांच्याद्वारे त्यांच्या साक्षीला बळकटी येणार होती. शिष्यांच्याद्वारेच नाही तर संदेशाचा स्वीकार करणारे त्यांच्याद्वारेसुद्धा चमत्कार घडतील. येशूने प्रतिपादिले, “ते माझ्या नामाने भूते काढतील; नव्या नव्या भाषा बोलतील; सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांस बाधणारच नाही; त्यांनी दुखणाईतावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील.” मार्क १६:१७, १८.DAMar 710.3

    त्या काळात वारंवार विष घालण्याचा परिपाठ होता. त्यांच्या महत्त्वकांक्षेच्या आड येणाऱ्यांचा नाश करण्यासाठी ह्या नीच मार्गाचा अवलंब करण्यास नैतिक संकेत न पाळणारे मागे पुढे पाहात नव्हते. अशा प्रकारे त्याच्या शिष्यांचे जीवीत धोक्यात येईल हे येशूला माहीत होते. त्याच्या साक्षीदारांना ठार करणे म्हणजे देवाची सेवा करणे होय असे कित्येकांना वाटत होते. अशा धोक्यात त्याने त्यांना सुरक्षितेचे अभिवचन दिले होते.DAMar 710.4

    येशूने जसे केले तसे त्याच्या शिष्यांनी “लोकातले सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी’ बरे करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त व्हवयाचे होते. त्याच्या नामामध्ये शारीरिक रोग बरे करून व्यक्तीच्या आध्यात्मिक रोगाचे निराकरण झाल्याची साक्ष देण्यात येईल. मत्तय ४:२३; ९:६. आता नव्या निसर्गदत्त देणगीचे आश्वासन देण्यात आले. शिष्यांना इतर राष्ट्रामध्ये संदेश द्यायचा होता आणि इतर भाषा बोलण्यासाठी शिष्यांना सामर्थ्य प्राप्त होणार होते. प्रेषित व त्यांचे सहकारी निरक्षर होते, तथापि पन्नासाव्या दिवशी झालेल्या पवित्र आत्म्याच्या वर्षावाने त्यांचे भाषण, मातृभाषेत किंवा इतर भाषेत, शुद्ध, स्पष्ट, साधे व अचूक होते..DAMar 710.5

    अशा प्रकारे ख्रिस्ताने शिष्यांना कार्य करण्यास सांगितले. कार्याचा पाठपुरावा करण्याची संपूर्ण तजवीज त्याने करून ठेविली आणि त्यामध्ये यश प्राप्ती करून घेण्याची जबाबदारी आपणावर सोपविली. त्याची आज्ञा पाळून आणि त्याच्या संगतीत राहून काम केल्यास त्यांचा अपजय होणार नव्हता. सर्व राष्ट्राकडे जाण्यास त्याने त्यांना सांगितले. पृथ्वीवर वसाहत करणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकाकडे जा आणि माझी उपस्थिती तेथे असेल असे त्याने त्यांना सांगितले. श्रद्धा व विश्वासाने काम करा आणि मी तुम्हापासून केव्हाही दूर होणार नाही.DAMar 711.1

    उद्धारकाने दिलेल्या ह्या महान कार्यात सर्व विश्वासक अंतर्भूत आहेत. जगाच्या अखेरपर्यंतच्या ख्रिस्तावरील विश्वासकांचा त्यामध्ये समावेश आहे. आत्मे जींकण्याचे काम केवळ दिक्षित सेवकांचे आहे असे समजणे घातकी आहे. स्वर्गीय प्रेरणा झालेल्या सर्वावर सवार्तेची जबाबदारी पडते. ख्रिस्त जीवन प्राप्त झालेले सर्वजन आपल्या बांधवांना तारणाचा संदेश देण्यास नेमलेले आहेत. ह्या कार्यासाठी मंडळीची संस्थापना झाली, आणि तिची पवित्र प्रतिज्ञा घेणारे सर्वजन ख्रिस्ताबरोबर सहकामदार असल्याचे वचन देतात.DAMar 711.2

    “आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये.’ प्रगटी. २२:१७. प्रत्येक ऐकणाऱ्याने आमंत्रणाचा पुनरुच्चार करायचा आहे. जीवनातील आमंत्रण कोणतेही असले तरी ख्रिस्तासाठी आत्मे जिंकणे हे त्याचे पहिले कर्तव्य आहे. कदाचित तो जमावापुढे भाषण करू शकणार नाही परंतु तो वैयक्तिक कार्य करू शकतो. प्रभूपासून मिळालेले शिक्षण तो त्यांना देऊ शकतो. ह्या सेवाकार्यात केवळ उपदेश करण्याचा समावेश नाही. दुखणाईतांना आराम देणे, गरजूंना हातभार लावणे, अल्प विश्वासू व निराशाने त्रस्त झालेल्यांना समाधानाचे दोन शब्द बोलणे हे सर्व सेवाकार्यात समाविष्ट आहे. नजीक आणि दूरवर आत्मे अपराधाच्या ओझ्याने दडपून गेले आहेत. कष्ट, हाल, खूप परिश्रम किंवा दारिद्र याद्वारे मानवतेला निकृष्टावस्था प्राप्त होत नाही तर अपराध, दोषीपणा, चूक त्याला कारणीभूत आहे. त्याद्वारे असमाधान व अशांतता निर्माण होते. पापाने त्रस्त झालेल्यांची सेवा त्याच्या सेवकांनी करावी अशी ख्रिस्ताची अपेक्षा होती.DAMar 711.3

    शिष्यांनी स्वतःच्या ठिकाणापासून कार्याला आरंभ करायचा होता. कठीण आणि आशादायक नसलेले ठिकाण वगळायचे नव्हते. ख्रिस्ताचा कामदार जेथे निवास करितो तेथून त्याने कामाला आरंभ करायचा आहे. सहानुभूतीसाठी उत्कंठित असलेले व जीवनी भाकारीसाठी उपासमार होत असलेले आमच्या स्वतःच्या कुटुंबात कोणी तरी असू शकेल. मुलांनी ख्रिस्तासाठी शिकून तयार होण्याची गरज असेल. आपल्या दारात विधर्मी येतात. नजीक असलेले काय विश्वासूपणे करू या. त्यानंतर जितक्या दूर देव आम्हाला घेऊन जाईल तितक्या दूर कार्याचा विस्तार करू या. परिस्थितीने काहींचे काम मर्यादित राहील; परंतु कोठेही असले जर ते काम विश्वासूपणे व परिश्रमाने केले तर त्याचा विस्तार जगाच्या शेवटापर्यंत होईल. ह्या पृथ्वीवर ख्रिस्त असताना त्याचे काम मर्यादित भागात होत होते असे वाटले परंतु सर्व भागातील लोकांनी त्याचा संदेश ऐकिला. देव वारंवार साधे साधन वापरून महान कार्य करून घेतो. त्याच्या कामाचा प्रत्येक घटक कामाच्या दुसऱ्या घटकावर अवलंबून आहे अशी देवाची योजना आहे, म्हणजे एकजुटीने काम करणारे “चाकात चाक’ असे आहे. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेला विनम्र कामदार अदृश्य (तंतुवाद्याच्या) तारेला स्पर्श करील आणि त्याचे कंपन पृथ्वीच्या शेवटापर्यत नाद करीत जाईल आणि त्याचे धन्वीमाधुर्य निरंतर राहील.DAMar 711.4

    परंतु “सर्व जगात जा” ह्या हुकूमाकडे दुर्लक्ष नको. डोळे वर करून “पलिकडचा प्रदेश” पाहा ही वाणी आमच्यासाठी आहे. राष्ट्राराष्ट्रातील कलुषितपणाने दुभागणारी भीत ख्रिस्त चिरफाड करून टाकितो, आणि मानवी कुटुंबातील प्रत्येकाला प्रेम दर्शविण्याचे धडे देतो. त्यांच्या स्वार्थाच्या संकुचित अरुंद गटातून तो मनुष्यांना वर उचलतो; दुभागणाऱ्या प्रांतीय रेषा आणि सामाजिक कृत्रिम तफावत तो दूर करितो. शेजारी व तिन्हाईत, स्नेही व शत्रू यांच्यामध्ये तो फरक करीत नाही. सर्व जग आमचे कार्यक्षेत्र आहे आणि प्रत्येक गरजू व्यक्ती आपला बंधु आहे अशी त्याची आम्हाला शिकवण आहे. DAMar 712.1

    “जा, सर्व राष्ट्रास शिकवा’ असे उद्धारकाने सांगितले तेव्हा त्याने असेही म्हटले, “विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील; ते माझ्या नामाने भूते काढतील; नव्या नव्या भाषा बोलतील; सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांस बाधणारच नाही; त्यांनी दुखणाईतावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील.’ कार्याप्रमाणेच आश्वासनही विस्तारपूर्वक आहे. एकाच व्यक्तीला सर्व दाने देण्यात आली नाहीत. आत्मा “आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.” १ करिंथ. १२:११. प्रभूच्या कार्यासाठी व्यक्तीच्या गरजेप्रमाणे प्रत्येक श्रद्धावंताला आत्म्याची देणगी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रेषितांच्या काळाप्रमाणेच आश्वासन आजही पक्के आणि विश्वसनीय आहे. “विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील.” देवाच्या लोकांना लाभलेला हा विशेषाधिकार आहे आणि विश्वासाची मान्यता प्राप्त झाल्यासारखे विश्वासाची त्यावर पक्कड बसली पाहिजे.DAMar 712.2

    “त्यांनी दुखणाईतावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील.” हे जग महारोग्याचे अफाट स्थळ आहे परंतु रोग्यांना बरे करण्यास आणि सैतानाच्या कचाट्यातून बंदिवानास मुक्त करण्यास ख्रिस्त आला. ख्रिस्त स्वतःच आरोग्य व सामर्थ्याची खाण होता. रोगी, पीडित व भूतग्रस्त यांना त्याने आपले जीवन बहाल केले. बरे होण्यासाठी येणाऱ्या एकाही रोग्यास त्याने माघारी लावले नाही. त्याला माहीत होते की मदतीची याचना करणारे स्वतःमुळेच रोगग्रस्त झाले होते; तरी परंतु त्यांना बरे करण्याचे त्याने नाकारले नाही. ख्रिस्ताचे सद्गुण त्यांच्या जीवनात प्रवेश केल्यावर त्यांना त्यांच्या पापांची खात्री झाली आणि बहुतेक शारीरिक व्याधीप्रमाणेच आध्यात्मिक व्यथेपासून मुक्त झाले. सुवार्तेमध्ये आजसुद्धा तेच सामर्थ्य आहे मग त्याच्यासारखेच फळ आज देखील आम्हाला का दिसत नाही?DAMar 712.3

    दुःख सहन करणाऱ्यांना पाहून ख्रिस्ताला सहानुभूती वाटते. दुष्ट आत्म्याने मानवी शरीर विदारून टाकल्याचे पाहिल्यावर शापाबद्दल ख्रिस्ताच्या मनाला लागते. अंग तापाने फणफणते तेव्हा अति वेदना होतात. पृथ्वीवर असताना रोग्यांना बरे करण्यास जसा तो राजी होता तसाच तो आतासुद्धा आहे. ख्रिस्ताचे सेवक त्याचे प्रतिनिधी, कार्याचे माध्यम आहेत. त्यांच्यातर्फे तो आपली रोग निवारण्याची शक्ती अंमलात आणण्याची इच्छा करितो. DAMar 713.1

    उद्धारकाच्या बरे करण्याच्या पद्धतीमध्ये शिष्यांच्यासाठी शिकण्यास पाठ होते. एका प्रसंगी एका आंधळ्याच्या डोळ्याला चिखल लाविला आणि त्याला सांगितले, “जा शिलोह तळ्यात धू, मग त्याने जाऊन धुतल्यावर तो डोळस होऊन आला.” योहान ९:७. केवळ महान वैद्याच्या सामर्थ्याने रोगी बरा होऊ शकतो; तथापि ख्रिस्ताने येथे निसर्गातील साध्या घटकाचा उपयोग केला होता. त्याने मादक औषदी द्रव्याचा कैवार घेतला नाही तर त्याने साध्या नैसर्गिक उपायांना मान्यता दिली.DAMar 713.2

    रोगातून बरे झालेल्या पुष्कळांना ख्रिस्ताने म्हटले, “तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.’ योहान ५:१४. नैसर्गिक व आध्यात्मिक नियमांचे उल्लंघन केल्याने आजार होतो हे त्याने प्रतिपादिले. निर्माणकर्त्याच्या योजनेप्रमाणे मनुष्याचे जीवन कंठले असते तर जगातील अत्यंत कष्टावस्था उद्भवली नसती.DAMar 713.3

    प्राचीन इस्राएल लोकांचा मार्गदर्शक व शिक्षक ख्रिस्त होता आणि त्याने शिकविले की आरोग्य हे देवाच्या नियमाच्या आज्ञापालनाचे पारितोषिक आहे. पॅलेस्तानमध्ये आजाऱ्याला बरे केलेल्या महान वैद्याने मेघस्तंभातून आपल्या लोकांना त्यांनी काय करावे आणि देव त्यांच्यासाठी काय करील हे सांगितले. त्याने म्हटले, “तू आपला देव परमेश्वर याचे मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधि पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधि मी पाठविल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही; कारण मी तुला व्याधिमुक्त करणारा परमेश्वर आहे.” निर्गम १५:२६. जीवनातील संवयीविषयी इस्राएल लोकांना ख्रिस्ताने स्पष्ट व निश्चित शिक्षण दिले होते आणि म्हटले, “परमेश्वर तुजपासून सर्व प्रकारचे रोग दूर राखील.” अनुवाद ७:१५. ह्या अट्टीचे पालन केल्यावर दिलेल्या अभिवचनाची सत्यता सिद्ध केली. “त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता.” स्तोत्र. १०५:३७.DAMar 713.4

    हे पाठ आम्हासाठी आहेत. आरोग्य संवर्धनासाठी इच्छूकांनी काही अटी पाळल्या पाहिजेत. ह्या अटी कोणत्या आहेत हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. देवाच्या नैसर्गिक किंवा आध्यात्मिक नियमाविषयी अजाण राहिल्याने देवाला संतोष होत नाही. शारीरिक आणि आत्मिक आरोग्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही देवाबरोबर सहकामगार बनले पाहिजे.DAMar 714.1

    प्रकृति सुधारण्यास व आरोग्याची जोपासना करण्यास आम्ही दुसऱ्यांना शिकविले पाहिजे. निसर्गामध्ये देवाने तरतूद करून ठेवलेल्या उपायांचा उपयोग रोग्यासाठी आम्ही केला पाहिजे आणि जीर्णोद्धार करणाऱ्याकडे आम्ही त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. रोगी आणि पीडलेल्यांना आम्ही विश्वासाने ख्रिस्त चरणी लावले पाहिजे. महान वैद्यावर श्रद्धा ठेवण्यास त्यांना शिकविले पाहिजे. त्याच्या आश्वासनावर अवलंबून राहून त्याच्या सामर्थ्याच्या प्रगटीकरणासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. जीर्णोद्धार हा सुवार्तेचा सार आहे आणि आजारी, आशाहीन व व्यथित यांनी त्याच्या शक्तीला चिकटून राहाण्यास आम्ही सांगावे अशी उद्धारकाची इच्छा आहे.DAMar 714.2

    ख्रिस्ताच्या निरोगी करण्याच्या सर्व कार्यात प्रेमाचे सामर्थ्य होते आणि विश्वासाद्वारे त्या प्रेमाचे आम्ही भागीदार झाल्यावरच आम्ही त्याच्या कार्यासाठी साधन बनू शकतो. ख्रिस्ताशी निकटचा संबंध ठेवण्यास निष्काळजीपणा केल्यास जीवन प्राप्त करून देणारा शक्तीवाहक प्रवाह आम्हापासून लोकापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहू शकणार नाही. काही ठिकाणी लोकांच्या अविश्वासामुळे स्वतः उद्धारक महान कार्य करू शकला नाही. अविश्वासाने मंडळी आणि दैवी मदतगार यांच्यामध्ये आडभिंत येते. शाश्वत खरेपणावरील तिची पक्कड ढिली आहे. तिच्या अविश्वासामुळे देवाची निराशा होते आणि त्याचे गौरव लुबाडले जाते.DAMar 714.3

    ख्रिस्ताचे कार्य करीत असतांना त्याच्या उपस्थितीचे वचन मंडळीला देण्यात आले आहे. त्याने म्हटले, जा, सर्व राष्ट्रांना शिकवा; “आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे.” त्याचे जू घेणे सामर्थ्य प्राप्तीतील पहिली शर्थ आहे. प्रभूने दिलेले कार्य परिपूर्ण करण्यामध्ये दाखविलेल्या विश्वासावर मंडळीचे जीवन अवलंबून आहे. ह्या कर्तव्यात हयगय करणे म्हणजे आध्यात्मिक दुर्बलतेला व हासाला आमंत्रण देणे होय. जेथे इतरासाठी कार्यक्षम परिश्रम नाहीत तेथे प्रीती क्षय पावते आणि विश्वास, श्रद्धा अंधुक, मंद बनते.DAMar 714.4

    सुवार्ताकार्यासाठी त्याच्या सेवकांनी मंडळीमध्ये शिक्षकाचे काम करावे अशी ख्रिस्ताची योजना आहे. हरवलेल्यांचा कसा शोध करून त्याचे तारण साध्य करण्यास त्यांनी लोकांना शिक्षण दिले पाहिजे. परंतु हे काम ते करीत आहेत काय? हाय हाय! मृत्युछायेत असलेल्या मंडळीमध्ये जीवनाची ठिणगी चमकण्यासाठी कितीजण परिश्रम करीत आहेत! हरवलेल्या मेंढराचा शोध करणारे, आजारी कोकऱ्यासारखे किती मंडळ्यांची काळजी वाहात आहेत! आणि सतत लाखोंनी ख्रिस्ताविना लोक नाश पावत आहेत!DAMar 714.5

    मानवासाठी दैवी अमाप प्रेम ढवळून निघाले आहे आणि हे महान प्रेम केवळ पृष्ठभागावरील कृतज्ञता असल्याचे पाहून दिव्यदूत कुतुहल करितात. देवाच्या प्रीतीचे मानवाने केलेले उथळ गुणग्रहण पाहून दिव्यदूत आचंबा करितात. मानवाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल स्वर्ग क्रोधाविष्ट होतो. ह्याविषयी ख्रिस्ताला काय वाटते ते तुम्हाला ठाऊक आहे काय? थंडीत आणि बर्फात पडलेल्या मुलाला उचलून त्याचा जीव वाचवता आला असताना त्याला तसेच तेथे मरणासाठी सोडून दिलेले पाहून त्याच्या मातापित्याला काय वाटेल? त्यांना अति दुःख होऊन तिरस्कार आणि संताप येणार नाही काय? संतापाने त्या मारेकऱ्यांना ते दोष देणार नाहीत काय? प्रत्येक मनुष्याची व्यथा देवाच्या मुलाची व्यथा आहे आणि नाश पावणाऱ्या त्यांच्या बांधवाना ते मदतीचा हात देत नाहीत तेव्हा ते देवाचा सात्त्विक क्रोध चिथवितात. हा कोकऱ्याचा संताप आहे. जे ख्रिस्ताची सोबत असल्याचे जाहीर करतात तथापि आपल्या बांधवाच्या गरजेकडे दुर्लक्ष करितात तेव्हा ख्रिस्त महान न्यायाच्या दिवशी घोषीत करील की, “तुम्ही कोठले आहा हे मला माहीत नाही; अहो सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही मजपासून दूर व्हा.’ लूक १३:२७.DAMar 715.1

    शिष्यांना दिलेल्या कामगिरीमध्ये ख्रिस्ताने कार्याच्या रूपरेषेबरोबर संदेशही दिला होता. त्याने म्हटले, “जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यास शिकवा.” ख्रिस्ताने शिकविलेलेच शिष्यांना शिकवायचे होते. त्याचे व्यक्तीशः बोललेले वचन तसेच जुना करारातील सर्व संदेष्टे व शिक्षक यांच्याद्वारे दिलेले शिक्षण यांचा समावेश ह्यामध्ये केला आहे. मानवी शिक्षणाला तेथे जागा नाही. त्यामध्ये सांप्रदाय, परंपरा, मनुष्यांचे सिद्धात, तात्त्विक भूमिका व निर्णय किंवा मंडळीचे कायदे यांना स्थान नाही. ख्रिस्ती मंडळीतील अधिकाऱ्यांनी केलेले नियम दिलेल्या सनदीमध्ये समाविष्ट नाहीत. ख्रिस्ताच्या सेवकांनी ह्यातील काहीच शिकवायचे नाही. त्याच्या मुखातून निघालेल्या वचनाच्या खाणीतून व करणीतून “धर्मशास्त्र व विधि” त्यांनी सर्व जगापुढे मांडायची आहे. ख्रिस्तनाम हे त्यांचे ब्रीद वाक्य, त्यांच्या वैशिष्ट्याची खूण, त्यांच्या एकीकरणाचा दुवा, त्याच्या कृतीचा अधिकार आणि त्याच्या यशाचे उगमस्थान आहे. त्याचे लिखाण नसलेले काहीही त्याच्या राज्यामध्ये मान्य होणार नाही.DAMar 715.2

    निर्जीव सिद्धांत म्हणून नव्हे तर जीवन परिवर्तनासाठी जीवंत शक्ती म्हणून शुभ संदेश दिला पाहिजे. त्याची कृपा पावलेले त्याच्या शक्तीचे साक्षीदार व्हावे अशी देवाची तीव्र इच्छा आहे. त्याला विषाद देणारी ज्यांची वागणूक आहे त्यांचा तो मोकळ्या मनाने स्वीकार करितो. त्यांचा पश्चात्ताप झाल्यानंतर तो त्यांना दैवी आत्मा देतो, श्रद्धेच्या उच्च पातळीवर स्थानपन्न करितो आणि त्याची अफाट दया घोषीत करण्यासाठी त्यांना विश्वासघातकी बेइमानी छावणीमध्ये पाठवितो. त्याच्या कृपेद्वारे त्यांना ख्रिस्तासारखा स्वभाव लाभू शकेल आणि त्याच्या महान प्रेमाच्या खात्रीने त्यांना हर्ष होईल. मानवजातीला पुनरपि पुत्र कन्या म्हणून घोषीत करून त्यांना पूर्व पदावर स्थापन करून त्यांचे पवित्र हक्क बहाल करीपर्यंत त्याचे समाधान होणार नाही ह्याविषयी आम्ही साक्ष द्यावी अशी त्याची उत्कट इच्छा आहे.DAMar 715.3

    ख्रिस्ताच्याठायी मेषपाळाचा मायाळूपणा, मातापित्याची आपुलकी, आणि दयावंत उद्धारकाचा अद्वितीय अनुग्रह आहे. तो त्याचे कृपाप्रसाद आकर्षकरित्या सादर करितो. फक्त ते जाहीर करण्यात त्याला समाधान वाटत नाही; भावना उदिप्त करून संग्रही ठेवण्यासाठी तो ते आकर्षकरित्या पुढे मांडतो. म्हणून त्याच्या दासांना वर्णनातीत देणगीच्या वैभवाची समृद्धी पुढे करायची आहे. केवळ तात्त्विक प्रबोधनाद्वारे काही साध्य होणार नाही, तेथे ख्रिस्ताच्या अद्भुत प्रीतीने अंतःकरणे द्रवून जिंकली जातील. “सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो.” “सीयोनास सुवार्ता सांगणारे, उंच डोंगरावर चढ; यरुशलेमास सुवार्ता सांगणारे, आपला स्वर जोराने उंच कर, कर उंच, भिऊ नको; यहूदाच्या नगरास म्हण, तुमचा देव पाहा... . मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणाऱ्यांस सांभाळून नेईल.’ यशया ४०:१, ९-११. जो “लाखात मोहरा आहे” आणि “सर्वस्वी मनोहर आहे” (गीतरत्न ५:१०, १६) त्याच्याविषयी लोकांना सांगा. फक्त शब्दातच हे सांगता येत नाही. स्वभावात व जीवनात ते परावर्तित होऊ द्या. प्रत्येक शिष्यामध्ये त्याची प्रतिमा चित्रित होण्यासाठी ख्रिस्त बसलेला आहे. “त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे’ म्हणून देवाने त्यांना अगाऊच नेमून टाकिले आहे. रोम. ८:२९. ख्रिस्ताची अत्यंत सहनशील प्रीती, त्याचे पावित्र्य, त्याची सौम्यता, दयाळूपणा आणि सत्यता प्रत्येकाच्या जीवनामध्ये जगापुढे प्रगट केली पाहिजेत.DAMar 716.1

    सुरवातीला शिष्य प्रवचन देऊ लागले. स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी ख्रिस्त प्रगट केला, आणि “त्याजबरोबर असणाऱ्या चिन्हांच्या द्वारा वचन दृढ करीत” प्रभु त्यांच्यासह कार्य करीत होता. मार्क १६:२०. कार्यासाठी हे शिष्य सिद्ध झाले होते. पन्नासाव्या दिवसाच्या अगोदर परस्परातील मतभेद बाजूला ठेवून ते एकत्र जमत होते. ते एकचित झाले होते. त्यांच्यावर कृपाप्रसाद होईल ह्या ख्रिस्ताच्या अभिवचनावर त्यांनी विश्वास ठेवून त्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी स्वतःसाठीच प्रार्थना केली नाही तर लोकांच्या तारणाचे ओझे त्यांच्या मनावर होते. सुवार्ता पृथ्वीच्या कोनाकोपऱ्यात न्यावयाची होती आणि त्यासाठी ख्रिस्ताने दिलेल्या वचनाच्या सामर्थ्याची ते मागणी करीत होते. त्यानंतर पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर झाला आणि हजारोंचे मनपरिवर्तन एका दिवसात झाले होते.DAMar 716.2

    तसेच आजही होऊ शकेल. माणसांच्या तर्कावरील अधिष्ठित सिद्धांताऐवजी देवाचे वचन पुढे मांडू या. ख्रिस्ती लोकांनी परस्परातील कलह, मतभेद बाजूला ठेवून हरवलेल्यांच्या मुक्तीसाठी देवाला वाहून द्यावे. त्यांनी विश्वासाने कृपाप्रसादाची याचना करावी आणि तो त्यांना लाभेल. प्रेषितीय काळामध्ये पवित्र आत्म्याचा झालेला वर्षाव “आगोटीचा पाऊस’ होता आणि त्याचा उद्भव तेजस्वी, अत्युत्तम होता. परंतु “वळवाचा पाऊस’ विपुल, रेलचेल असलेला होईल. योएल २:२३.DAMar 717.1

    देवाला मन, शरीर व आत्मा वाहून देणाऱ्यांना शारीरिक व मानसिक नवीन दान सतत मिळत राहील. स्वर्गातील विपुल भांडारातून त्यांची मागणी पूर्ण होते. ख्रिस्त आपल्या आत्म्यातून त्यांना श्वास आणि स्वजीवनातून जीवन देतो. अंतःकरण व मन यांच्यावर कार्य करण्यासाठी पवित्र आत्मा आपल्या सामर्थ्याची पराकाष्ठा करितो. देवाची कृपा त्यांच्या नैसर्गिक कार्यक्षमतेची वृद्धि व विकास करिते आणि आत्म्याच्या उद्धारकार्यात दैवी स्वभावाचे सहाय्य त्यांना लाभते. ख्रिस्ताला सहकार्य केल्याने ते त्याच्यामध्ये परिपूर्ण होतात आणि त्यांच्या मानवी दुर्बलतेमध्ये अनंत शक्तीचे कार्य करण्यास समर्थ होतात.DAMar 717.2

    उद्धारक त्याची कृपा प्रगट करण्यास आणि अखिल जगावर त्याच्या स्वभावाचा शिक्का मारण्यास उत्सुक आहे. ही त्याची विकत घेतलेली संपत्ति आहे आणि तो मनुष्यांना मुक्त, शुद्ध आणि पवित्र करण्यास इच्छितो. हा उद्देश साध्य करण्यास सैतान जरी अडखळणे आणितो तरी जगासाठी सांडलेल्या रक्ताद्वारे विजय प्राप्त करता येतो आणि त्यामुळे देव व कोंकरा यांचे गौरव होईल. विजय पूर्ण होईपर्यंत ख्रिस्ताचे समाधान होणार नाही आणि “त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फळ पाहून समाधान पावेल.’ यशया ५३:११. त्याच्या कृपेची सुवार्ता पृथ्वीवरील सर्व राष्ट्र ऐकतील; परंतु “त्यांचे वंशजही त्याची सेवा करितील, पुढल्या पिढीच्या लोकास प्रभूविषयी कथन करितील.” स्तोत्र. २२:३०. “राज्य, प्रभूत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा जे पवित्र जन यास देण्यास येतील,” आणि “सागर जसा जलपूर्ण आहे. तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” “ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील.” दानी. ७:२७; यशया ११:९, ५९:१९.DAMar 717.3

    “जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, शुभवृत्त विदित करितो, तारण जाहीर करितो, तुझा देव राज्य करीत आहे असे सीयोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात! ... यरुशलेमाच्या उध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे... परमेश्वराने सर्व राष्ट्रापुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे; सगळ्या दिगंतास आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.” यशया ५२:७-१०.DAMar 717.4