Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ५२—दिव्य मेंढपाळ

    योहान १०:१-३०.

    “मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो.” “मी उतम मेंढपाळ आहे; जसा पिता मला व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांस मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरासाठी मी आपला जीव देतो.’DAMar 419.1

    रस्त्यावरील परिचित सोबत्यांच्यामुळे येशूने पुन्हा श्रोत्यांची मने आकृष्ट करून घेतली. आत्म्याच्या प्रभावाची तुलना त्याने थंडगार, ताजेतवाने करण्याऱ्या जलाशी केली. निसर्ग व मानवप्राण्याच्या जीवनाचा उगम प्रकाश आहे आणि तो प्रकाश ख्रिस्त आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याशी त्याचे नाते सुरेख मेंढपाळाप्रमाणे असल्याचे त्याने दर्शविले आहे. त्याच्या श्रोतेजनाला ही उपमा फार परिचित होती आणि ख्रिस्ताचे उद्गार सतत त्याच्याशी निगडीत होते. शिष्य मेंढरे राखणाऱ्या मेंढपाळाकडे पाहात असतांना उद्धारकाने दिलेल्या पाठाचे नेहमी स्मरण करीत होते. प्रत्येक विश्वासू मेंढपाळामध्ये त्यांना ख्रिस्त दिसत असे. ते स्वतःला प्रत्येक असहाय्य व आश्रित कळपात पाहात असे.DAMar 419.2

    हे रूपक यशया संदेष्ट्याने मशीहाच्या कार्याविषयी अगदी सुंदर शब्दात वापरले आहे, “सीयोनास सुवार्ता सांगणारे, उंच डोंगरावर चढ; यरुशलेमास सुवार्ता सांगणारे, आपला स्वर जोराने उंच कर, कर उंच, भिऊ नको; यहूदाच्या नगरास म्हण, तुमचा देव पाहा... मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणाऱ्यांस सांभाळून नेईल.’ यशया ४०:९-११. दाविदाने गाईले, “परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.” स्तोत्र. २३:१. यहज्केलद्वारे पवित्र आत्म्याने विदित केले: “त्याजवर मी एक मेंढपाळ नेमून त्यास चारीन.’ “मी हरवलेल्यास शोधीन, हाकून दिलेल्यास परत आणीन, घायाळास पट्टी बांधीन, रोग्यास बळ देईन; त्यास मी यथान्याय चारीन.” “मी क्षेमवचन देऊन त्याजबरोबर शांतीचा करार करीन.” “ते यापुढे विधर्मी राष्ट्रांस भक्ष्य होणार नाहीत... तर ते निर्भय वसतील, कोणी त्यास भीती घालणार नाहीत.” यहेज्केल ३४:२३, १६, २५, २८.DAMar 419.3

    ख्रिस्ताने ही भाकीते स्वतःला लागू केली आणि त्याने स्वतःचा स्वभाव व इस्राएलातील पुढारी यांचा स्वभाव यांच्यातील तुलनात्मक फरक दाखविला. ख्रिस्ताच्या सामर्थ्याची साक्ष देत होता म्हणून परूश्यांनी तूर्तच एकाला त्यांच्यातून हाकलून दिले होते. त्यांनी त्याचा संबंध तोडला परंतु खरा मेंढपाळ त्याला आपल्याकडे आकर्पूण घेत होता. त्यांच्यावर सोपविलेल्या कामगिरीविषयी ते अजाण होते आणि कळपाच्या मेंढपाळावर टाकलेल्या निष्ठेला अपात्र होते हे ते त्याद्वारे दर्शवीत होते. चांगला मेंढपाळ आणि ते स्वतः यांच्यामधील फरक येशूने त्याच्यापुढे ठेवला आणि प्रभूच्या कळपाचा तो खरा रखवालदार आहे हे दर्शविले. हे करण्याअगोदर त्याने दुसरे रूपक घेऊन भाष्य केले.DAMar 420.1

    त्याने म्हटले, “जो मेंढवाड्यात दाराने आत न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढरांचा राखणारा आहे.” हे उद्गार त्यांच्याविरुद्ध काढण्यात आले होते हे परूश्यांना समजले नाही. त्यावर मनापासून विचार करीत असताना येशूने त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले, “मी दार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल; तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावा या हेतूने येतो; मी आलो आहे तो त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.”DAMar 420.2

    देवाच्या कळपाचे द्वार ख्रिस्त आहे. प्राचीन काळापासून त्याच्या सर्व मुलांना ह्या दाराद्वारे आत प्रवेश मिळाला आहे. अलंकारिक भाषेत, खूण, निशाणी यांच्यामध्ये, संदेष्ट्यांनी प्रगट केलेल्या भाकीतामध्ये, शिष्यांना दिलेल्या पाठात, आणि मनुष्यासाठी केलेल्या चमत्कारात त्यांनी येशूला “जगाचे पाप हरण करणारा, देवाचा कोकरा” असा पाहिला (योहान १:२९) आणि त्याच्याद्वारे त्यांना त्याच्या कृपेच्या कळपात प्रवेश मिळाला. जगाच्या विश्वासाच्या संदर्भात अनेकजन वस्तु किंवा कर्म सादर करतात; देवाची शांती व नीतिमान प्राप्त करून घेण्यासाठी व त्याच्या काळपात प्रवेश मिळविण्यासाठी विधि संस्काराची योजना करण्यात आली आहे. परंतु द्वार फक्त ख्रिस्त आहे, आणि ख्रिस्ताची जागा घेण्यासाठी मध्येच जे उपस्थित केले आहे त्याद्वारे आणि इतर मार्गाने कळपात प्रवेश करणारे ते चोर व लुटारू आहेत.DAMar 420.3

    परूश्यांनी द्वारातून प्रवेश केला नव्हता. ख्रिस्ताला सोडून ते दुसरीकडून चढून आत घुसले होते आणि ते खऱ्या मेंढपाळाचे काम करीत नव्हते. याजक, अधिकारी, शास्त्री आणि परूशी यांनी हिरवीगार कुरणे आणि जीवनी पाण्याचे झरे उध्वस्त करून टाकिली. फसव्या मेंढपाळांचे वर्णन करण्यात आले आहे: “तुम्ही निर्बलास बलवान करीत नाही, रोग्यास बरे करीत नाही, घायाळाचे घाय बांधीत नाही, घालवून दिलेल्यास परत आणीत नाही, हरवलेल्यास शोधीत नाही; तर तुम्ही त्याजवर सक्तीने व कडकपणे सत्ता चालविता.’ यहज्केल. ३४:४.DAMar 420.4

    सर्व युगामध्ये लोकांच्या गरजा भागविण्यासाठी तत्वज्ञानी व अध्यापक जगामध्ये विविध सिद्धान्त सादर करीत आहेत. हरएक विधर्मी राष्ट्रात त्याचे शिक्षक व धार्मिक व्यवस्थापन आहे आणि उद्धारासाठी ख्रिस्ताशिवाय इतर साधने ते सादर करीत आहेत. त्याद्वारे लोकांची दृष्टी पित्यापासून दुसरीकडे वळवीत होते आणि ज्याने त्यांच्यावर कृपाप्रसाद केला त्याच्या भीतीने त्यांची अंतःकरणे ते भयभीत करीत होते. उत्पत्तीद्वारे व उद्धारकार्याद्वारे जे आम्ही त्याचे आहोत त्या देवाला लुबाडण्याचा त्यांचा कल होता. हे खोटे शिक्षक मनुष्यांनाही लुबाडतात. कोट्यावधी मनुष्यप्राणी खोट्या धर्मांनी गुलामगिरीच्या भीतीने, मंद अनास्थाने बंदिस्त झाले आहेत. ते जनावरासारखे कष्ट करीत आहेत, येथे त्यांना कसला आनंद, आशा किंवा प्रेरणा राहिली नाही. त्यांच्यासमोर केवळ येथून पुढे काय होईल याची मंद धास्ती आहे. केवळ देवकृपेचा शुभसंदेश त्यांच्या आत्म्याची उन्नती करील. देवपुत्रामध्ये प्रगट केलेल्या देवाच्या प्रेमावर चिंतन व मनन केल्याने त्याचे अंतःकरण चैतन्य पावेल आणि आत्मा सबळ होईल. दुसऱ्या कशानेही हे शक्य होणार नाही. मनुष्यामध्ये देवाची प्रतिमा पुनर्स्थापित करण्यासाठी ख्रिस्त आला; आणि ख्रिस्तापासून मनुष्यांना दूर हाकलून देणारा खऱ्या प्रगतीच्या उगमापासून त्यांना दूर सारत आहे. जीवनाची आशा, उद्देश आणि वैभव यांच्यापासून तो त्यांना वंचित ठेवीत आहे. तो चोर व लुटारू आहे.DAMar 420.5

    “जो दाराने आत जातो तो मेंढराचा राखणारा आहे.’ ख्रिस्त मेंढपाळही आहे आणि दारही आहे. तो स्वतःच आत जातो. स्वतःच्या यज्ञबलीद्वारे तो मेंढराचा मेंढपाळ बनतो. “त्याला द्वारपाल दार उघडितो; मेंढरे त्याची वाणी ऐकतात; तो आपल्या मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यास बाहेर नेतो. आपली सर्व मेंढरे बाहेर काढिल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात.”DAMar 421.1

    सर्व प्राण्यामध्ये मेंढरू अगदी असहाय्य व बुजरे आहे, आणि पूर्वेकडील मेंढपाळांना त्यांची काळजी वाहाणे फार जिकरीचे व अविश्रांतीचे, कष्टाचे आहे. आताप्रमाणेच प्राचीन काळी गावकूसाच्या बाहेर सुरक्षतेची हमी नसे. पेंढारी किंवा सरहद्दीवरील लुटारूंच्या टोळ्या आणि डोंगरात लपून बसलेले पशू भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडून कळपावर हल्ला करीत असे. स्वतःचा जीव धोक्यात घालून मेंढपाळ राखण करीत असे. हाराणाच्या कुरणात लाबानाची मेंढरे याकोबाने राखली होती, त्याच्या कष्टदायक कामाचे वर्णन करताना त्याने म्हटले, “दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा यांनी मी जर्जर होई; माझ्या डोळ्याची झोप उडे, अशी माझी दशा होती.” उत्पत्ति ३१:४०. बापाची मेंढरे राखीत असताना तरुण दाविदाने एकट्यानेच सिंह व अस्वल यांच्याशी सामना करून चोरलेल्या कोकराची सुटका केली. DAMar 421.2

    खडकाळ टेकड्यावर, जंगलात जगली पशूमधून आणि नदीकाठच्या हिरव्यागार कुरणातून मेंढपाळ आपली मेंढरे घेऊन जातो; तो रात्रीच्या समयी डोंगरावर चोर लुटारूपासून सुरक्षीत ठेवण्यासाठी डोळ्यात तेले घालून पहारा करितो आणि आजारी किंवा दुबळ्यांची काळजी वाहाताना त्याचे जीवन त्यांच्यासारखेच बनते. ज्यांची तो काळजी वाहातो त्यांच्याशी तो एकजीव होतो. कळप कितीही मोठा असला तरी मेंढपाळ प्रत्येक मेंढरू नावाने ओळखतो. प्रत्येकाला नाव दिलेले असते आणि मेंढपाळाच्या हाकेप्रमाणे प्रत्येक मेंढरू प्रतिसाद देते.DAMar 421.3

    पृथ्वीवरील मेंढपाळ आपली मेंढरे जशी ओळखतो तसेच दिव्य मेंढपाळ सर्व जगभर पसरलेला आपला कळप ओळखतो. “तुम्ही माझी मेंढरे, माझ्या चरणीतला कळप आहा; तुम्ही मानव आणि मी तुमचा देव आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.’ येशूने म्हटले, “मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे; तू माझा आहेस.” “मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे.” यहेज्केल. ३४:३१; यशया ४३:१; ४९:१६.DAMar 422.1

    वैयक्तिकरित्या येशू आम्हाला ओळखितो आणि आमच्या कमजोरपणामुळे तो हळहळतो. आम्हा सर्वांना तो नावाने ओळखतो. ज्या गृहात आम्ही राहतो ते गृह आणि गृहातील राहाणारे प्रत्येकजन नावाने ओळखितो. त्याने आपल्या सेवकांना एकाद्या शहरातील ठराविक रस्त्यावरील ठराविक घरात त्याचे मेंढरू शोधण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, दिशा दाखविली आहे.DAMar 422.2

    येशू प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे ओळखितो, जणू काय त्या एकट्यासाठीच त्याने स्वतःचा बळी दिला. प्रत्येकाच्या विपत्तीने त्याच्या अंतःकरणाला स्पर्श होतो, कळवळा वाटतो. मदतीची विनवणी त्याच्या कानी पडते. सर्व मनुष्यांना आकर्षण करून घेण्यासाठी तो आला. “माझ्यामागे या” असे तो आमंत्रण देतो आणि त्याच्याकडे येण्यासाठी त्याचा आत्मा त्यांच्या अंतःकरणावर कार्य करून त्यांना प्रेरीत करितो. अनेकजण त्याचा नाकार करितात. ते कोण आहेत हे येशू जाणतो. त्याची वाणी ऐकून त्याच्या सुरक्षतेखाली येण्यास जे तयार आहेत त्यांनाही तो ओळखतो. तो म्हणतो, “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, आणि मी त्यांना ओळखतो आणि ते माझ्यामागे येतात.’ या भूतलावर दुसरे कोणी नाही असे समजून तो प्रत्येकाची काळजी वाहातो.DAMar 422.3

    “तो आपल्या मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यास बाहेर नेतो... . मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात.” पूर्वेकडील मेंढपाळ मेंढरे हाकत नाही. तंबी देऊन किंवा भीती घालून तो आपले काम करून घेत नाही; परंतु त्यांच्यापुढे जाऊन तो त्यांना हाक मारितो. ते त्याची वाणी ओळखतात आणि हाकेला प्रतिसाद देतात. त्याचप्रमाणे तारणकर्ता मेंढपाळ त्याच्या मेंढराशी वागतो. शास्त्रलेख सांगतो, “मोशे व अहरोन यांच्या हस्ते तू आपले लोक कळपाप्रमाणे नेले.” संदेष्ट्याद्वारे येशूने घोषीत केले, “मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.” त्याचे अनुसरण करण्यास तो कोणावर जबरदस्ती करीत नाही. त्याने म्हटले, “मानवी बंधनांनी व प्रेमरज्जूंनी मी त्यास ओढिले.” स्तोत्र. ७७:२०; यिर्मया ३१:३; होशेय ११:४.DAMar 422.4

    शिक्षेच्या भीताने किंवा अनंतकालिक पारितोषक मिळण्याच्या आशेने शिष्य ख्रिस्ताच्या मागे गेले नाहीत. त्यांनी उद्धारकाच्या अतुल्य प्रेमाचे दर्शन त्याच्या पृथ्वीवरील प्रवास यात्रेत घेतले. हा प्रवास बेथलेहम येथील गोठ्यातून तो कॅलव्हरीच्या वधस्तंभापर्यंत होता. त्याच्या दृश्याने आत्मा आकर्षिला जाऊन तो नम्र होऊन वश होतो. पाहाणाऱ्यांच्या अंतःकरणात प्रेम जागृत होते. ते त्याची वाणी ऐकतात व त्याच्या मागे जातात. DAMar 422.5

    मेंढपाळ मेंढरापुढे चालत जाऊन पुढे येणाऱ्या अरिष्टांशी प्रथम सामना करितो तसेच येशू त्याच्या लोकांच्यासाठी करितो. “आपली सर्व मेंढरे बाहेर काढिल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो.” स्वर्गाचा मार्ग उद्धारकाच्या पाऊल चिन्हांनी पवित्र करण्यात आला आहे. मार्ग खडकाळ व मोठ्या चढाचा असेल परंतु येशूने त्या मार्गाने प्रवास केला आहे; आमचा मार्ग सोपा, सुलभ करण्यासाठी त्याच्या पायाखाली ते निष्ठूर काटे खाली दाबले गेले होते. आम्हास वाहावयास सांगितलेले प्रत्येक ओझे त्याने स्वतः वाहिले आहे.DAMar 423.1

    देवाबरोबर सिंहासनावर बसण्यासाठी जरी तो स्वर्गात गेला होता तरी त्याचा दयाशील स्वभाव कायम होता. आज तेच दयाळू, सहानुभूती दाखविणारे अंतःकरण मानवाच्या सगळ्या व्याधीसाठी उघडे आहे. ज्या हातात खिळे मारण्यात आले होते तेच हात आज ह्या जगातील त्याच्या लोकांना विपुलतेने आशीर्वादित करण्यासाठी पुढे सरकतात. “त्यांचा कधी नाश होणार नाही, आणि कोणी त्यास माझ्या हातातून हिसकून घेणार नाही.’ ज्या आत्म्याने स्वतःला ख्रिस्ताला वाहून दिले आहे तो त्याच्या दृष्टीने जगापेक्षा अधिक मोल्यवान आहे. त्याच्या राज्यात त्याचा उद्धार करण्यासाठी उद्धारक त्या कॅलव्हरीच्या क्लेशातून गेला असता. ज्याच्यासाठी त्याने आपला प्राण दिला त्याला तो केव्हाही वंचित होणार नाही. त्याचे अनुयायी त्याला सोडून जाईपर्यंत तो त्यांना भक्कम धरून राहील.DAMar 423.2

    आमच्या सर्व कसोटीमध्ये तो सतत सहाय्यकर्ता आहे. मोहपाशाशी झगड्यास, पापाशी लढा देण्यास आणि दुःख यातना व कष्टमय ओझ्यांनी चिरडून जाण्यास तो आम्हाला एकटे सोडत नाही. जरी तो आता आमच्या मानवी चक्षूच्या आड आहे तरी श्रद्धावंत कर्ण त्याची वाणी ऐकू शकतात. तो म्हणतो भिऊ नका; मी तुम्हाबरोबर आहे. “मी मेलो होतो तरी पाहा, युगानुयुग जीवंत आहे.’ प्रगटी. १:१८. मी तुमचे क्लेस सोसले आहेत, तुमची धडपड अनुभवली आहे, तुमच्या मोहाला तोंड दिले आहे. तुमचे अश्रू मी पाहिले आहेत; मी अश्रूसुद्धा ढाळले आहेत. तुमचे शोक, आपत्ती मी जाणतो. तुम्ही, एकटेच सोडलेले, त्याग केलेले असे समजून घेऊ नका. ह्या पृथ्वीवर तुमच्या दुःख यातनाला जरी सहानुभूतीचा प्रतिसाद मिळत नाही तरी माझ्यावर दृष्टीक्षेप करा आणि जीवंत राहा. “पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुजवरची दया ढळणार नाही; माझा शांतीचा करार हालणार नाही असे तुजवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो.’ यशया ५४:१०.DAMar 423.3

    मेंढपाळाने आपल्या मेंढरावर कितीही प्रेम केले तरी तो अधिक प्रेम आपल्या पूत्र व कन्या यांच्यावर करितो. येशू आमचा मेंढपाळच आहे असे नाही तर तो आमचा “सनातन पिता” आहे. तो म्हणतो, “जसा पिता मला व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यास मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात.’ योहान १०:१४, १५. अद्भुतजन्य हे विधान! एकुलता एक पुत्र, पित्याच्या कुशीत असलेला, देवाने त्याच्याविषयी म्हटले, “जो पुरुष माझा सोबती’ (जखऱ्या १३:७), सनातन पिता आणि ख्रिस्त यांच्यामधील अगदी जीवलग ओळख ख्रिस्त आणि पृथ्वीवरील त्याचे लोक यांच्या ओळखीचे दर्शक आहे.DAMar 423.4

    आम्ही त्याच्या पित्याची देणगी आहो आणि त्याच्या कार्याचे पारितोषीक आहो म्हणून येशूवर आम्ही प्रीती करितो. तो आपल्या मुलाप्रमाणे आम्हावर प्रीती करितो. वाचक हो, तुम्हावर तो प्रीती करितो. यापेक्षा अधिक श्रेष्ठ, अधिक कल्याणदायी स्वर्गसुद्धा तुम्हाला बहाल करू शकत नाही. म्हणून विश्वास ठेवा.DAMar 424.1

    खोट्या मेंढपाळांनी फसगत केलल्या पृथ्वीवरील सर्व लोकांचा विचार ख्रिस्ताने केला. त्याच्या कुरणातील मेंढरे म्हणून ज्यांना एकत्रीत करायचे ते सर्व भूतलावर लांडग्यामध्ये पसरलेले होते. त्याने म्हटले, “या मेंढवाड्यातली नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणिली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ, असे होईल.” योहान १०:१६.DAMar 424.2

    “मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो, म्हणून पिता मजवर प्रीती करितो.” माझा पिता तुम्हावर प्रीती करितो, तुमच्या उद्धारासाठी मी माझा प्राण दिला म्हणून तो माझ्यावर अधिक प्रीती करितो. माझे जीवन वाहून देऊन तुमचा मोबदला व जामीन झाल्याबद्दल आणि तुमचे अपराध व तुमची जबाबदारी घेतल्याबद्दल मी माझ्या पित्याला प्रीय, आवडता झालो आहे.DAMar 424.3

    “मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो, ... तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे.” मानवी कुटुंबातील व्यक्ती, सभासद या नात्याने तो मरणाधीन मानव होता आणि देव या नात्याने तो जगाला जीवनाचा निर्झर होता. मरणाच्या आगमनाला टक्कर देऊन त्याच्या वर्चस्वाखाली येण्यास त्याने नकार दिला असता; परंतु जीवन व अमरत्व प्रकाशात आणण्यासाठी त्याने स्वखुषीने आपला प्राण दिला. त्याने जगाचे पाप वाहिले, त्याचा शाप सोसला, यज्ञ म्हणून आपला प्राण दिला, अशासाठी की मनुष्य कायमचा मरून जाऊ नये. “खरोखर आमचे व्याधि त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले... खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दष्कर्मामुळे ठेचला गेला; आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली; त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले.” यशया ५३:४-६.DAMar 424.4