Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ७—बाळपण

    लूक २:३९, ४०.

    येशूचे बाळपण आणि तारुण्य डोंगराळ प्रदेशातील एका लहानशा खेड्यात गेले. त्याच्या हजेरीने सन्मानीत न झालेले असे ठिकाण ह्या पृथ्वीवर नव्हतेच. अतिथी म्हणून त्याचा पाहुणचार करण्यात राजवाड्यांना अत्यानंद झाला असता. परंतु श्रीमंताची दारे, राजघराण्यातील दरबार आणि प्रख्यात विद्वतेचे आसन यांना बाजूला सारून त्याने आपले घर तुच्छ लेखलेल्या अप्रसिद्ध नासरेथ या ठिकाणी केले. त्याच्या जीवनाचा आरंभीचा काळ अर्थबोधक व अद्भुत होताः “तो बालक वाढीस लागला आणि ज्ञानाने पूर्ण होत असता बलवान झाला; त्याजवर देवाची कृपा होती.” पित्याच्या मुखप्रकाशात येशू “ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला.’ लूक २:५२. वयाच्या मानाने त्याचे मन, विवेक आणि शहाणपण या बाबतीत अतिशय कार्यक्षम, उत्साही आणि तिक्ष्ण होते. तथापि त्याचा स्वभाव निर्मळ आणि प्रमाणबद्ध होता. बालपणाच्या निसर्ग नियमाला अनुसरून त्याचे मन आणि शरीर हळूहळू वृद्धि पावू लागले. DAMar 44.1

    बालपणात येशूने आपल्या स्वभावात विशेष लावण्य दर्शविले. दुसऱ्याला हातभार लावण्यास तो नेहमी तत्पर असे. त्याने दर्शविलेल्या सहिष्णुतेमुळे कशानेही त्याचा शांतताभंग होत नसे आणि खरेपणामुळे प्रामाणिकपणाला केव्हाही तिलांजली देण्यात येत नसे. खऱ्या अर्थाने खडकाप्रमाणे स्थिर असलेल्या त्याच्या जीवनाद्वारे निस्वार्थी सौजन्याची मोहकता प्रगट झाली.DAMar 44.2

    येशूच्या आईने अगदी जीव लावून त्याच्या विविध शक्तीचा विकास होताना पाहिले आणि त्याच्या स्वभावावर त्याच्या पूर्णतेचा ठसा उमटताना निरक्षिले. आनंदाने तिने त्याच्या तेजस्वी व ग्रहणक्षम मनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. पित्याप्रमाणेच तो देव आहे असे घोषीत करणाऱ्या मुलाच्या विकासामध्ये स्वर्गीय माध्यमाशी सहकार्य करण्यास पवित्र आत्म्याच्याद्वारे तिला शहाणपण लाभले.DAMar 44.3

    प्राचीन काळापासून तरुणांच्या शिक्षणाच्या बाबतीत इस्राएलातील श्रद्धावंत अधिक काळजी घेत. त्याच्या आज्ञामध्ये प्रगट केल्याप्रमाणे आणि इस्राएलाच्या इतिहासात दर्शविल्याप्रमाणे त्याचा सात्त्विकपणा आणि मोठेपणा यांच्याविषयी बाळपणापासून मुलांना शिक्षण देण्याचे प्रभूने सांगितले होते. गीत, प्रार्थना आणि शास्त्रवचनातील धडे कोवळ्या मनाला साजेसे होतील असे समजावून दिले. देवाच्या आज्ञा त्याच्या स्वभावाचे प्रकटीकरण आहे हे मातापित्यांनी मुलांच्या मनावर ठसवायचे होते. तसेच आज्ञातील तत्त्वांचा अंतःकरणात स्वीकार केल्यावर देवाची प्रतिमा त्यांच्या मनावर आणि अंतर्यामावर उमटली जावी असे शिक्षण द्यायचे होते. बहुतांशी तोंडी शिक्षण होते; परंतु तरुण इब्री लिखाण वाचायला शिकले; आणि जुना कराराचे चर्मपत्रावरील लेख अध्ययनासाठी उपलब्ध होते.DAMar 44.4

    ख्रिस्ताच्या काळात ज्या शहरात किंवा गावात तरुणांच्यासाठी धार्मिक शिक्षणाची व्यवस्था केली नाही ते देवाच्या शापाखाली आले अशी समजूत होती. तथापि शिक्षण केवळ औपचारिक होते. शास्त्रवचनाची जागा रूढी आणि प्रथा यांनी घेतली. खरे शिक्षण तरुणांना देवाचा शोध करण्यास प्रेरीत करील. “ते देवाचा शोध करतील, म्हणजे चाचपडत, चाचपडत त्याला कसे तरी मिळवून घेतील.’ प्रेषित १७:२७. परंतु यहूदी शिक्षकांनी विधि संस्कारावर भर दिला. विद्यार्थ्यांची मने निरुपयोगी शिक्षणाने भरून गेली आणि त्याला वरील दरबारातील विद्यालयात मान्यता मिळणार नव्हती. वैयक्तिकरित्या देवाच्या वचनाचा स्वीकार करून आलेल्या अनुभवाला शैक्षणिक व्यवस्था पद्धतीत स्थान नव्हते. बाह्यात्कारी केलेल्या घोकंपट्टीतच तल्लीन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निवांत वेळी देवाशी हितगूज करण्यास वेळ नव्हता. त्यांच्या अंतःकरणाशी बोलणारी त्याची वाणी ऐकली नाही. ज्ञानशोधाच्या धांदावण्यात ते ज्ञानाच्या उगमापासून दुरावले. देवाच्या सेवेतील महत्त्वाच्या आवश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष केले. नियमातील तत्त्वे दुर्बोध झाली. श्रेष्ठ दर्जाचे समजलेले शिक्षण खऱ्या विकासाच्या प्रगतीत मोठे अडखळण होते. धार्मिक गुरूच्या नेतृत्वाखाली विद्यार्जन करीत असताना तरुणाच्या शक्ती दडपून गेल्या होत्या. त्यांची मने लहान आणि संकुचित झाली होती. DAMar 45.1

    मंदिरातील शाळेतील शिक्षण येशूला मिळाले नाही. त्याची माता प्रथम मानवी शिक्षकीण होती. तिच्या शिकवणीद्वारे आणि संदेष्ट्यांच्या गुंडाळीद्वारे त्याला स्वर्गातील गोष्टीविषयी ज्ञान झाले. इस्राएलासाठी मोशेला जे त्याने सांगितले होते तेच त्याला आता मातेच्या मांडीवर बसून ग्रहण करावे लागले. बालपणापासून तारुण्यात प्रवेश केल्यावर धर्मगुरूंच्या शाळांचा त्याने शोध केला नाही. अशा ठिकाणातले शिक्षण त्याला घ्यायचे नव्हते कारण देव त्याचा अध्यापक होता.DAMar 45.2

    उद्धारकाच्या सेवाकार्यात प्रश्न विचारण्यात आला होता, “शिकल्यावाचून याला विद्या कशी आली?” योहान ७:१५. ह्या वरून असा अर्थ निघत नाही की येशूला वाचता येत नव्हते. त्याने धर्मगुरूंचे शिक्षण घेतले नाही केवळ हेच त्याद्वारे दर्शविले जाते. आमच्याप्रमाणे त्याने जरी शिक्षण घेतले तरी त्याच्या शास्त्रवचनाच्या ज्ञानावरून दिसून येते की लहानपणी त्याने देवाच्या वचनाचा अभ्यास अगदी मनापासून केला होता. तसेच त्याच्यासमोर देवाने निर्माण केलेली सृष्टी उघडी होती. आपण निर्माण केलेल्या हस्तकृतीतील पृथ्वी, आकाश आणि समुद्र यांच्यातून निरनिराळ्या धड्यांचा त्याने अभ्यास केला. जगातील निषिद्ध गोष्टी सोडून निसर्गातून अफाट शास्त्रीय विज्ञान त्याने संपादन केले. रोपटे, प्राणी व मनुष्य यांच्या जीवनांचा त्याने अभ्यास केला. त्याच्या आयुष्याच्या प्रारंभापासून त्याने महत्त्वपूर्ण एक उद्देश सतत डोळ्यापुढे ठेविला. दुसऱ्यांना आशीर्वाद होण्यासाठी (दुसऱ्यांच्या कल्याणासाठी) तो जगला. ह्यासाठी त्याला निसर्गाची फार मदत झाली. रोपटे आणि प्राणी यांच्या जीवनावर सखोल अध्ययन करीत असताना त्याच्या डोक्यात नवीन विचार आले, नवीन मार्ग आकस्मात सुचले. दृश्य उदाहरणावरून देवाचे प्रत्यक्ष उत्तर देण्यास तो सतत प्रयत्न करीत होता. कार्याच्या वेळी सत्याचे विविद्ध धडे शिकविण्यासाठी वापरलेल्या दाखल्यावरून दिसून येते की निसर्गाच्या प्रभावाशी तो किती समरस होता आणि सभोवतालच्या गोष्टीपासून त्याने आध्यात्मिक शिकवण कशी गोळा केली.DAMar 45.3

    कारणमीमांसाचे आकलन करून घेत असतांना देवाचे वचन आणि त्याचे कार्य यांचा खुलासा येशूला करण्यात आला होता हे अर्थसूचक आहे. स्वर्गीय गण त्याचे सेवक होते आणि पवित्र विचारांचे संवर्धन आणि हितगुज हे त्याचे होते. प्रारंभापासूनच आत्मिकतेच्या कृपेत आणि सत्याच्या ज्ञानात तो सतत वाढत होता.DAMar 46.1

    ख्रिस्ताप्रमाणेच प्रत्येक मूल ज्ञान संवर्धन करू शकते. त्याच्या वचनाद्वारे स्वर्गीय पित्याची ओळख करून घेत असताना दिव्यदूत आम्हासन्निद्ध येतील, आमची मने बलवान होतील, आणि आमचा स्वभाव उत्कर्ष पावून सुसंस्कृत होईल. आमच्या उद्धारकासारखे आम्ही बनू. निसर्गातील सौंदर्य आणि भव्य व उदात यांचे निरिक्षण करीत असताना देवावरील आमचे प्रेम वृद्धिंगत होईल. त्याच्या कार्याद्वारे अनंतकालिक देवाचा संबंध आल्यावर मनांत जरी भीती निर्माण होते तरी अंतःकरण चैतन्याने भरून जाते. प्रार्थनेद्वारे मानसिक आणि नैतिक शक्तीचा विकास होतो आणि आध्यात्मिक गोष्टीवरील विचारांची वृद्धि करीत असताना आध्यात्मिक शक्ती बळकट होते.DAMar 46.2

    येशूचे जीवन देवाशी मिलाफ पावणारे होते. लहान असताना बाळासारखे तो बोलत असे व बाळासारखे त्याचे विचार असत; परंतु त्याच्या ठायी असलेल्या देवप्रतिमेला कोणत्याही पापाने कलंकीत केले नव्हते. तथापि मोहापासून त्याला राखून ठेवण्यात आले नव्हते. नासरेथचे नागरिक दुष्टाईबद्दल प्रसिद्ध होते. नथनेलने विचारलेल्या प्रश्नावरून त्यांना किती हीन समजण्यात आले होते ते समजून येईल, “नासरेथातून काही उत्तम निघेल काय?” योहान १:१६. त्याच्या गुणांची कसोटी करण्यात येईल अशा परिस्थितीत येशू होता. त्याचे चारित्र्य हनन होऊ नये म्हणून तो सतत सावधगीरीने राहात होता. आम्हाला तोंड द्यावे लागणारे सर्व झगडे त्याच्यावर येणार होते, त्यामुळे बाळपणात, तारुण्यात आणि प्रौढावस्थेत तो आमचा नमुना राहाणार होता.DAMar 46.3

    नासरेथ येथील बालकावर विजय मिळविण्याच्या प्रयत्नात सैतान सतावलेला नव्हता. प्रारंभापासून येशूच्या संरक्षणास स्वर्गीय दिव्यदूत होते, तथापि त्याच्या आयुष्यभर त्याला अंधकार शक्तीशी झुंजावे लागले. पृथ्वीवर एकच जीवन कलंकविरहित राहावे हे अंधकाराच्या अधिपतीला गोंधळात टाकणारे व चीड आणणारे होते. येशूला मोह जाळ्यात पाडण्यासाठी त्याने सर्व साधने कामी लावून जीवाचे रान केले. उद्धारकावर आलेल्या मोहाच्या तीव्र झगड्यात पवित्र व सात्त्विक जीवन जगण्याची अपेक्षा मानवाच्या कोणत्याही मुलाकडून कधीही करण्यात येणार नाही.DAMar 47.1

    येशूचे आईबाप गरीब होते, आणि त्यांचा उदरनिर्वाह दररोजच्या कष्टावर अवलंबून होता. गरीबी, स्वनाकार आणि हालअपेष्टा त्याला परीचित होता. हा अनुभव त्याचे संरक्षण होते. त्याच्या कष्टाळू जीवनात मोहाला आमंत्रित करणारे आळशी क्षण नव्हते. भ्रष्ट मैत्रीला मार्ग मोकळा करणारा वायफळ हेतुशून्य वेळ नव्हता. आतापर्यंत शक्य तो त्याने भुरळ घालणाऱ्याचा दरवाजा बंद करून टाकला. फायदा असो की सुख समाधान असो, शाबासकी असो किंवा खरडपट्टी असो यातील काहीही त्याला दुष्ट कृत्य करण्यास प्रवृत करू शकले नाही. दुष्टाईची हेरणी करण्यास तो कर्तबगार आणि विरोध करण्यास बळकट होता.DAMar 47.2

    ह्या पृथ्वीवर आयुष्य घालविणाऱ्यामध्ये केवळ ख्रिस्तच निष्पापी होता; नासरेथ येथील दुष्ट नागरिकामध्ये सुमारे तीस वर्षे त्याने काढिली. दोषरहित जीवन जगण्यासाठी स्थळ, दौलत आणि समृद्धी आवश्यक आहे असे म्हणणाऱ्यांना ही सत्य बाब एक धमकी आहे. पावित्र्य आणि खंबीरपणा यांच्यामध्ये प्रगती करण्यास मोह, दारिद्र आणि संकटे आणि प्रतिकूल परिस्थिती, याद्वारे शिस्त बाणण्यासाठी लागणारा कडकपणा हवा आहे.DAMar 47.3

    येशूने शेतकऱ्याच्या घरात दिवस काढिले आणि विश्वासाने आणि आनंदाने घरातील जबाबदारी पार पाडिली. स्वर्गामध्ये तो सेनापती होता आणि त्याची आज्ञा मानण्यात दूतांना आनंद वाटत होता; परंतु आता तो खुषीने नोकर झाला होता आणि प्रेमळ, आज्ञाधारक पुत्र होता. तो धंदा शिकला, आणि योसेफाबरोबर सुताराच्या दुकानात स्वतःच्या हाताने काम करीत असे. साध्या कष्टकऱ्याच्या पोषाखामध्ये त्या लहान गावातील रस्त्यावरून तो कामाला ये जा करीत असे. कष्ट हलके करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी त्याने दैवी शक्तीचा वापर केला नाही.DAMar 47.4

    लहानपणी आणि तारुण्यात येशूने काम केल्यामुळे त्याची मानसिक आणि शारीरिक वाढ झाली. त्याने आपले शारीरिक बळ बेपर्वाइने वापरले नाही तर आरोग्य साभाळून त्याचा वापर केला आणि प्रत्येक काम चांगले पार पाडिले. काम करण्याच्या साधनांचा वापर करण्यात तो उणा पडणार नाही ह्याची खबरदारी घेत होता. त्याचा स्वभाव जसा परिपूर्ण होता तसेच कामकरी म्हणूनही तो निष्णात होता. आपण कष्टाळू असले पाहिजे आणि आमचे काम तंतोतंत बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन पक्के झाले पाहिजे हे त्याने स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले. कारण असले कष्ट आदरणीय आहे. व्यायामाद्वारे हात काम करण्यास बळकट होतात आणि जीवनातील ओझे वाहाण्यास समर्थ करितात. त्याद्वारे शारीरिक शक्तीची वाढ होते आणि मनाच्या निसर्गदत्त शक्तीची कार्यक्षमता वाढते. स्वतःचा फायदा होईल आणि दुसऱ्याचे कल्याण होईल असे करण्यासाठी सर्वांनी काहीतरी निवडावे. देवाने काम आशीर्वादासाठी दिले आहे, आणि केवळ मेहनती कामगारांना जीवनातील आनंद आणि खरे वैभव सापडते. घरकामातील जबाबदारी आनंदाने पार पाडतात व मातापित्यांचे ओझे हलके करतात अशा मुलांना आणि तरुणांना देवाच्या मान्यतेची हमी लाभते. अशी मुले घरातून बाहेर पडतील आणि समाजात उपयुक्त घटक म्हणून वावरतील.DAMar 47.5

    पृथ्वीवरील आयुष्यभरात येशू उत्सुक, आस्थेवाईक आणि स्थिर कामकरी होता. त्याची अपेक्षा मोठी होती म्हणून त्याची धडपडही मोठी होती. कामाला सुरूवात केल्यावर त्याने म्हटले, “मला ज्याने पाठविले त्याची कार्ये दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत; रात्र येणार आहे, तिच्यात कोणाच्याने कार्य करवणार नाही.’ योहान ९:४. त्याचे अनुयायी समजणारे कामात जसा चुकारपणा करितात तसे येशूने आपली जबाबदारी पार पाडण्यात किंवा काळजी वाहाण्यात टाळाटाळ केली नाही. अकार्यक्षम आणि अशक्त असल्यामुळे पुष्कळजन शिस्तीने पालन करण्याचे टाळतात. त्यांच्याठायी महत्त्वाचे आणि सुस्वभावी गुण असतील परंतु कठीण प्रसंगाला तोंड देण्यास किंवा अडथळ्याचा परिहार करण्यास ते दुबळे व कुचकामाचे ठरतात. ख्रिस्तामध्ये प्रगट झालेली विश्वसनीयता आणि उत्साह आणि स्वभावाचा भक्कमपणा व सामर्थ्य आम्हामध्ये विकास पावली पाहिजेत. ज्या शिस्तपालनाने त्याने ते संपादन केले त्याच शिस्तपालनाने आम्ही ते संपादन केले पाहिजेत. त्याला मिळालेली कृपा आमच्यासाठी आहे.DAMar 48.1

    आम्हाबरोबर राहात असताना आमचा उद्धारक गरीबीचा भागीदार झाला. अनुभवाने त्यांचे कष्ट आणि हाल त्याला ज्ञात होते, आणि त्या नम्र कष्टकऱ्यांना उत्तेजन देऊन त्यांचे तो सांत्वन करीत असे. त्याच्या जीवनाच्या शिकवणीची ज्यांना सर्वसाधारण कल्पना आहे ते कदापीही लोकांमध्ये भेदभाव करणार नाहीत, म्हणजे लायकीच्या गरीब मनुष्यापेक्षा श्रीमंताचा मानसन्मान करणार नाहीत.DAMar 48.2

    येशू आपले काम आनंदाने आणि कुशलतेने करीत होता. गृहजीवनामध्ये आणि कामामध्ये बायबलचा धर्म आणण्यास सहिष्णुता आणि आध्यात्मिकता यांची फार गरज आहे. त्याद्वारे जगातील व्यवसायाचा ताण सोसणे आणि त्याबरोबर देवाच्या गौरवावर लक्ष केंद्रित करणे शक्य होते. अशा वेळी खिस्त सहाय्य करीत होता. जगातील गोष्टीपेक्षा स्वर्गातील गोष्टीकडे तो अधिक लक्ष देत असे. स्तुतीस्तोत्रे आणि दिव्य गीते गाऊन तो अंतःकरणातला आनंद वारंवार व्यक्त करीत असे. अशा प्रकारची उपकारस्मरणाची आणि स्तुतीची गाणी नासरेथ येथील नागरिक वारंवार ऐकत असत. गायनाद्वारे स्वर्गाशी त्याचा सख्यसंबंध आला. कामाने थकवा आल्याचे त्याचे सोबती जेव्हा सांगत असे तेव्हां त्यांच्या मंजूळ गीतांनी ते उल्हासित होत असे. त्याच्या स्तुतीस्तोत्राने दुष्ट दूत हाकलले जात होते आणि धूपाच्या सुगंधाने सर्व ठिकाण दरवळून जात असे. श्रोतेजनांची मने पृथ्वीवरून हद्दपार करून स्वर्गीय गृहाकडे आकर्षली जात होती.DAMar 48.3

    जगासाठी सदयतेचा निर्झर येशू होता; नासरेथमध्ये एकांतवासात पडलेल्यांच्याकडे त्याच्या जीवनातून सहानुभूती आणि करुणेचा प्रवाह वाहात गेला. वृद्ध, दुःखीत, पापाने भारवलेले, आनंदाने बागडणारी मुले, बागेतील लहानसहान प्राणी, आझे वाहणारे प्राणी, - ह्या सर्वांना त्याच्या सहवासाबद्दल, (हजेरीबद्दल) अत्यानंद झाला. ज्याच्या वचन सामर्थ्याने जगांना आधार दिला तो जखमी पक्ष्याला आराम देण्यासाठी नम्र होणार होता. सेवा करून घेण्यालायक त्याच्या दृष्टीतून कोणी निसटला नाही.DAMar 49.1

    ज्ञानाने आणि शरीराने वाढत असता येशू देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. सर्वांना सहानुभूती दाखविण्यास समर्थ आहे असे समजून सर्वांची सहानुभूती त्याने मिळविली. त्याच्याभोवती आशा आणि धैर्य यांचे वातावरण असल्याने तो सर्व कुटुंबामध्ये आशीर्वाद झाला. शब्बाथ दिवशी मंदिरामध्ये वारंवार त्याला संदेष्ट्याचे वचन वाचण्यास सांगण्यात येत होते त्यामुळे परिचयाच्या वचनातून नवा प्रकाश आलेला पाहून श्रोतृवर्गाची अंतःकरणे कंप पावत होती.DAMar 49.2

    तथापि येशूने भपका टाळला. नासरेथ येथील वास्तव्यात त्याने आपल्या आश्चर्यकारक शक्तीचे प्रदर्शन कधी केले नाही. उच्चपद, दर्जा किंवा हुद्दा ह्याचा हव्यास त्याने धरिला नाही. त्याचे साधेसुदे निवांत जीवन आणि शास्त्रवचनामध्ये सुद्धा त्याच्या प्रारंभीच्या जीवनावर मुग्धता पाळली त्याद्वारे महत्त्वाचा धडा शिकविला आहे. मुलाचे जितके जास्त शांत आणि साधे जीवन, - कृत्रिम भावना चेतविणाऱ्या गोष्टीपासून जितके अधिक अलिप्त आणि निसर्गाशी अधिक समरस - तितके शारीरिक आणि मानसिक उत्साहासाठी व आध्यात्मिक शक्तीसाठी अधिक पोषक आहे.DAMar 49.3

    येशू आमचा नमुना आहे. पुष्कळजन त्याच्या सार्वजनिक सेवाकार्याच्या कालावधीवर अधिक गोडी दाखवून चिंतन करितात त्याचसोबत त्याच्या प्रारंभीच्या जीवनातील शिकवणीकडे कानाडोळा करितात. परंतु त्याच्या गृह जीवनात तो सर्व मुलांचा आणि तरुणाचा नमुना, आदर्श आहे. उद्धारकाने नम्रतेने, अभिमान सोडून गरीबीचे जीवन काढिले, अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही देवाशी कसे एकनिष्ठ राहू शकतो हा धडा त्याने शिकविला. जीवनातील साध्या गोष्टीमध्ये देवाला संतोष व सन्मान देऊन त्याचे गौरव करण्यासाठी तो जगला. दररोजची भाकरी मिळण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या कारागिराचे जीवन त्याने वेचले. लोकसमुदायासाठी चमत्कार करण्यासारखेच देवाचे कार्य त्याने सुताराच्या दुकानात काम करून केले. विश्वासूपणा आणि आज्ञाकितपणा या बाबतीत ख्रिस्ताचे अनुकरण करणाऱ्या प्रत्येक तरुणाने पवित्र आत्म्याच्याद्वारे पित्याने ख्रिस्ताविषयी काढलेले उद्गार हक्काने मागावे, “पाहा, हा माझा सेवक, याली मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला याजविषयी माझा जीव संतुष्ट आहे.” यशया ४२:१.DAMar 49.4