Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ७७—पिलाताच्या न्यायालयात

    मत्तय २७:२, ११-३१; मार्क १५:१-२०; लूक २३:१-२५; योहान १८:१८-४०; १९:१-१६.

    रोमी सुभेदार पिलात याच्या न्यायालयात बंदिवान येशू उभे राहातो. त्याच्या सभोवती रखवालदारांचा पहारा होता आणि न्यायालय प्रेक्षकांनी भरून गेले होते. प्रवेशद्वाराच्या बाहेर धर्मसभेचे न्यायाधीश, याजक, अधिकारी, वडील आणि जमाव होता.DAMar 628.1

    येशूला शिक्षा ठरवल्यानंतर धर्मसभेतील मंडळ सुभेदार पिलात याच्याकडे ती शिक्षा मंजूर करून तिची अंमलबजावणी करून घेण्यासाठी आले होते. ह्या यहूदी अधिकाऱ्यांनी रोमी न्यायालयात प्रवेश केला नाही. त्यांच्या विधीनियमाप्रमाणे प्रवेश केल्यावर ते अशुद्ध होतील, विटाळतील आणि त्यानंतर त्यांना वल्हांडणाच्या सणात भाग घेता आला नसता. त्यांच्या खूनी द्वेषाने त्यांचे अंतःकरण विटाळले होते हे त्यांच्या अंधत्वामुळे, असमंजसपणामुळे त्यांना दिसले नाही. ख्रिस्त वल्हांडणाचा कोंकरा होता हे त्यांना दिसले नाही आणि ज्याअर्थी त्यांनी त्याचा नाकार केला होता त्याअर्थी त्यांना अर्थबोध होत नव्हता.DAMar 628.2

    उद्धारकाला न्यायालयात आणल्यावर पिलाताने त्याच्याकडे करड्या नजरेने पाहिले. रोमी सुभेदाराला त्याच्या शयनगृहातून घाईघाईने बोलावण्यात आले होते आणि काम लवकर उरकून काढण्याचा त्याने निर्धार केला होता. बंदिवानाला कडक रीतीने वागविण्याचे त्याने ठरविले होते. कडक वृत्ती मनात धरून एवढ्या सकाळीच शयनगृहातून बोलावण्याची निकड केली तर परीक्षा घ्यावयाचा माणूस आहे तर कसा हे पाहाण्यासाठी तो त्याच्याकडे वळला. लवकर तपासणी करून त्याला शिक्षा देण्यास यहदी अधिकारी आतूर असलेली ही बडी व्यक्ती असली पाहिजे असे त्याला वाटले होते.DAMar 628.3

    पिलाताने पहारेकऱ्याकडे पाहिले आणि नंतर त्याने आपली दृष्टी ख्रिस्तावर खिळली. आतापर्यंत भिन्न प्रकारच्या लोकांची त्याने तपासणी केली होती परंतु आजतागायत असा चांगुलपणा व उमदेपणा असलेला मनुष्य त्याच्यासमोर आणला नव्हता. त्याच्या मुद्रेवर अपराधाचे कसलेच चिन्ह नव्हते, भीतीची कसलीच भावना नव्हती आणि अवज्ञा करण्याची वृत्ती नव्हती. त्याने शांत आणि उदात मनुष्य पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर गुन्हेगाराची खूण त्याला दिसली नाही तर त्याने स्वर्गाची स्वाक्षरी पाहिली.DAMar 628.4

    ख्रिस्तमुद्रेचा छाप पिलातावर अनुकूल, इष्ट झाला. त्याचा सद्गुण जागृत झाला. येशूविषयी व त्याच्या कार्याविषयी त्याने ऐकिले होते. गालीली संदेष्ट्याने आजार बरे केले, मृतास जीवदान दिले आदिकरून सत्कृत्याविषयी त्याच्या पत्नीने त्याला सांगितले होते. पिलाताच्या मनात त्याचे सगळे चित्र उभे राहिले. वेगवेगळ्या ठिकाणाहून ऐकलेल्या अफवांचेही त्याला स्मरण झाले. बंदिवानाविरुद्ध यहूद्यांचे काय आरोप होते हेही विचारले.DAMar 629.1

    त्याने म्हटले, “हा मनुष्य कोण आहे? त्याला येथे का आणले आहे? त्याच्याविरुद्ध काय आरोप आहेत? यहूदी अस्वस्थ झाले होते. ख्रिस्ताविरुद्धचे आरोप ते सिद्ध करू शकत नव्हते हे जाणून जाहीररित्या त्याची परीक्षा होऊ नये असे त्यांना वाटले. त्यानी म्हटले तो दगलबाजी नासरेथकर येशू आहे.DAMar 629.2

    पिलाताने पुन्हा विचारले, “त्याच्याविरुद्ध तुमचा कोणता आरोप आहे?” याजकांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर मनातील संताप व्यक्त करून म्हटले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते.” धर्मसभेतील सदस्यांनी राष्ट्रातील पहिल्या क्रमांकाच्या प्रतिष्ठित व्यक्तीनी मरणदंडास पात्र असलेल्या माणसाला आपल्यापुढे आणिल्यावर त्याच्याविरुद्ध असलेल्या आरोपाविषयी पृच्छा करण्याची आवश्यकता आहे काय? स्वतःची प्रतिष्ठा पुढे सादर करून पिलातावर छाप पाडण्याचा ते प्रयत्न करीत होते. तसे झाल्यावर इतर प्राथमिक गोष्टी दुर्लक्षून त्यानी सादर केलेल्या शिक्षेला तो मान्यता देईल असे त्यांना वाटले होते. ही शिक्षा मंजूर करून घेण्यास ते फार उत्सुक होते. कारण ख्रिस्ताने केलेली सत्कृत्य लोकांनी प्रत्यक्ष पाहिली होती ते त्यांनी बनविलेल्या गोष्टींच्या विरुद्ध साक्ष देतील याची धास्ती त्यांना होती.DAMar 629.3

    दुबळा व डळमळीत मनाच्या पिलाताद्वारे काही अडथळा न होता ते आपली योजना साध्य करून घेऊ शकतील असे याजकांना वाटले होते. ह्याच्या अगोदर मरणदंडास पात्र नसलेल्यांना मरणदंडाची शिक्षा त्याने मंजूर केली होती. त्याच्या दृष्टीने कैद्याचे जीवन मोलाचे नव्हते. तो अपराधी असो किंवा नसो त्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नसे. पिलात येशूवर मरणदंडाची शिक्षा त्याची प्राथमिक सुनावणी करण्याविना जारी करील असे याजकांना वाटले होते. राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने ही देणगी त्यांनी अपेक्षिली होती.DAMar 629.4

    परंतु बंदिवानामध्ये काही विषेष असल्यामुळे ताबडतोब निर्णय देण्यास पिलात धजला नाही. याजकांच्या हेतू त्याने जाणला. थोड्याच दिवसापूर्वी चार दिवस कबरेत असलेल्या लाजारसाला त्याने उठविले होते त्याचे स्मरण त्याला झाले. मरणदंडाच्या मंजूरीसाठी परीपत्रकावर सही करण्याअगोदर त्याच्यावरील आरोप कोणते आहेत आणि ते आरोप सिद्ध करू शकतो की नाही हे जाणून घेण्याचा त्याने निश्चिय केला.DAMar 629.5

    त्याने म्हटले, तुमचा न्याय-निर्णय पुरेसा आहे तर कैद्याला माझ्याकडे कशाला आणिले? “त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमाप्रमाणे त्याचा न्याय करा.’ त्यावर याजकांनी म्हटले, त्याला अगोदरच शिक्षा ठरविली आहे परंतु ती अमंलात आणण्यासाठी पिलाताची मंजूरी पाहिजे. तुमची शिक्षा कोणती आहे? पिलाताने विचारिले. त्यांनी उत्तर दिले, मरणदंडाची, परंतु कुणालाही आम्ही ठार करणे कायदशीर नाही. आमच्या सांगण्याप्रमाणे ख्रिस्ताचा अपराध घ्या आणि शिक्षा अंमलात आणा असे पिलाताला त्यांनी सांगितले. त्याच्या परिणामाची जबाबदारी घेण्यास ते तयार होते.DAMar 630.1

    पिलात इमानी न्यायाधीश नव्हता; परंतु दुबळा जरी असला तरी आपल्या अधिकाराने त्याने त्यांची विनवणी नाकारली. त्याच्यावरील आरोप मांडल्याशिवाय तो ख्रिस्ताला दोषी ठरवायला तयार नव्हता.DAMar 630.2

    याजक पेचात पडले. आपला ढोंगीपणा अति गुप्तपणे पुढे मांडला पाहिजे असे त्यांना प्रकर्षाने वाटले. धार्मिक मुद्यावर ख्रिस्ताला अटक केली आहे असे दिसू देता कामा नये. हे कारण सादर केले तर त्याचा परिणाम पिलातावर होणार नाही. सर्वसाधारण कायद्याविरुद्ध ख्रिस्ताचे काम चालले होते असे चित्र रंगवल्यावरच त्याला राजकीय गुन्हेगार म्हणून शिक्षा होऊ शकेल. रोमी सरकाराविरुद्ध यहूद्यामध्ये सतत हुल्लडबाजी आणि उठाव चालला होता. ह्या बंडखोरीमुळे रोमी सरकारने त्यांना फार कडकरित्या वागविले होते आणि ते सतत जागृत राहून स्फोटक घटनेस कारणीभूत होणारी प्रत्येक गोष्ट दाबून टाकीत होते.DAMar 630.3

    थोड्याच दिवसापूर्वी ख्रिस्ताला कोंडीत टाकण्यासाठी परूशांनी ख्रिस्ताला प्रश्न विचारला होता, “आपण कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” परंतु ख्रिस्ताने त्यांचा ढोंगीपण उघड केला. हजर असलेल्या रोमी अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्तराने कट करणाऱ्याची हार गेल्याची फजिती पाहिली, “त्याने म्हटले, “तर कैसराचे ते कैसराला भरा.” लूक २०:२२-२५. DAMar 630.4

    त्यांच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्ताने त्यांना शिकविले होते अशी बतावणी करण्याचा त्यानी प्रयत्न केला. शेवटचा उपाय म्हणून त्यांच्या मदतीसाठी खोटे साक्षीदार बोलाविले आणि “ते त्याच्यावर आरोप करू लागले की, हा आमच्या राष्ट्राला फितविताना, कैसराला कर देण्याची मनाई करतांना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हास आढळला.” तीन आरोप आणि प्रत्येक आरोप आधाराशिवाय होता. याजकांना सर्व माहीत होते आणि त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी ते खोटी शपथ घ्यायला तयार होते.DAMar 630.5

    पिलाताने त्यांचा हेतू ओळखला. सरकारच्याविरुद्ध बंदिवानाने कट केला होता ह्यावर त्याचा विश्वास नव्हता. त्याचा नम्र व सौम्य चेहरा त्यांच्या आरोपात बसत नव्हता. यहूदीDAMar 630.6

    पुढाऱ्यांच्या मार्गात अडखळण झाल्यामुळे निरपराधी माणसाचा शेवट लावण्याचा भारी कट आखलेला होता याविषयी पिलाताची खात्री झाली होती. येशूकडे वळून त्याने विचारले “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?’ उद्धारकाने उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.’ हे उद्गार काढीत असताना जसे काय सूर्याचे किरण त्याच्या मुखावर प्रकाशमान होत आहे तसे त्याचा चेहरा प्रकाशीत झाला.DAMar 631.1

    त्याचे उत्तर ऐकल्यावर कयफा व इतर त्याच्याबरोबर होते ते पिलाताला म्हणाले त्याच्यावर केलेला आरोप येशूने कबूल केला. आरडाओरड करून याजक, शास्त्री आणि अधिकारी यांनी त्याला मरणदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली. आरडा ओरड करण्यात जमाव सामील झाला आणि त्यामुळे कानठळ्या बसून गेल्या. पिलात गोंधळून गेला. त्याच्यावर दोष ठेवणाऱ्यांना त्याने काही उत्तर दिले नाही हे पाहून पिलात त्याला म्हणाला, “काय? तू काही उत्तर देत नाहीस? पाहा, ते तुझ्यावर कितीतरी आरोप ठेवीत आहेत. तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही.’DAMar 631.2

    पिलाताच्यामागे उभे राहून कोर्टात सर्वादेखत ख्रिस्ताने शिविगाळ ऐकली; परंतु त्याच्याविरुद्ध केलेल्या खोट्या आरोपावर त्याने चकार शब्द काढिला नव्हता. त्याची सबंध वागणूक त्याच्या निरपराधाचा पुरावा, खात्री देत होता. त्याच्याविरुद्ध सुटलेल्या क्रोधयुक्त लाटेत तो स्तब्ध राहिला. खवळलेल्या समुद्राच्या लाटेप्रमाणे त्याचा क्रोध वर चढ होत होता परंतु त्यांचा स्पर्श त्याला झाला नव्हता. तो शांत राहिला आणि त्याची स्तब्धता सहज, सुरेख व परिणामकारक भाष्य होते. हा बाह्य माणसासाठी चमकणारा आतील प्रकाश होता.DAMar 631.3

    त्याची वर्तणूक पाहून पिलात फार चकित झाला होता. स्वतःचा जीव वाचवायला नको म्हणून हा मनुष्य न्यायालयातील कामकाजाचा व्यवहार मानीत नाही काय? असे त्याने स्वतःला विचारले. सूड घेण्याच्या ऐवजी थट्टा कुचेष्टा नालस्ती तो सहन करीत आहे हे पाहून त्याला वाटले की, याजकांप्रमाणे ख्रिस्त अन्यायी व अधार्मिक नसावा. त्याच्यापासून सत्य काढून घेण्यासाठी आणि जमावाचा गोंधळ टाळण्यासाठी पिलाताने येशूला बाजूला नेले आणि पुन्हा विचारिले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”DAMar 631.4

    प्रत्यक्षरित्या येशूने त्याला उत्तर दिले नाही. पवित्र आत्मा पिलातावर कार्य करीत आहे हे त्याने जाणले आणि त्याला होणारी खात्री मान्य करण्याची संधि त्याने त्याला दिली. येशूने त्याला म्हटले, “आपण स्वतः होऊन ते म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी सांगितले?” दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे हा याजकांचा आरोप होता किंवा ख्रिस्तापासून मिळालेल्या प्रकाशाचा स्वीकार करण्याची मनीषा होती? ह्यातील ख्रिस्ताचा मतितार्थ पिलाताला समजला; परंतु त्याच्यातील अहंकार जागृत झाला. त्याच्या मनाची ठाम खात्री झाल्याचे त्याने मान्य केले नाही. त्याने म्हटले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले; तू काय केलेस?”DAMar 631.5

    पिलाताची सुवर्ण संधि निघून गेली. तथापि आणखी अधिक प्रकाशाविना येशूने त्याला सोडले नाही. पिलाताच्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्षपणे जरी दिले नाही तरी त्याने स्वतःचे कार्य विदित केले. जगीक राज्याच्या सिंहासनारूढ होण्याचा तो प्रयत्न करीत नाही ह्याची समज त्याने पिलाताला दिली.DAMar 632.1

    त्याने म्हटले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझा राज्य येथले नाही. ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”DAMar 632.2

    त्याच्या वचनाचा स्वीकार करणाऱ्यासाठी त्याचे वचन रहस्य उघड करणारी किल्ली आहे असे ख्रिस्ताने प्रतिपादिले. त्याच्याठायी मनावर चांगला परिणाम करणारी शक्ती होती. त्याच्या सत्य राज्याचा विस्तार होण्यामधील हे एक मर्म होते. सत्याचा स्वीकार करून त्याचा योग्य विनियोग केल्याद्वारे जीर्ण झालेल्या स्वभावाचा उद्धार होईल हे पिलाताला समजावे अशी त्याची इच्छा होती.DAMar 632.3

    सत्य जाणून घेण्याची इच्छा पिलाताची होती. त्याचे मन गोंधळून गेले होते. उद्धारकाचे वचन त्याने उत्सुकतेने ग्रहण केले. सत्य काय आहे व ते कसे साध्य करून घ्यावे ह्यासाठी त्याचे अंतःकरण जागृत झाले होते. त्याने विचारिले, “सत्य काय आहे?” त्याच्या उत्तरासाठी तो थांबला नाही. बाहेर गोंधळ उडाला होता आणि त्यासाठी त्याला बाहेर बोलावले होते. ताबडतोब निर्णय घेण्यासाठी याजक गोंगाट करू लागले. बाहेर यहृद्याकडे जाऊन त्याने ठामपणे म्हटले, “ह्याच्याठायी मला काही अपराध दिसत नाही.’DAMar 632.4

    ख्रिस्तावर आरोप करणाऱ्या इस्राएलातील पुढाऱ्यांची लबाडी व विश्वासघातकीपणा यावर ह्या न्यायाधिशाने काढलेले उद्गार ही त्यांना जहरी लागणारी कानउघाडणी होती. पिलाताचे उद्गार ऐकून याजक व वडील यांची निराशा व क्रोध यांना सुमार राहिला नाही. ह्या संधीसाठी फार दिवसापासून कट करून थांबले होते. येशूला मुक्त करण्याची वेळ येत आहे असे समजून त्याचे तुकडे तुकडे करण्यास ते उद्युक्त झाले. मोठ्याने त्याच्यावर ठपका ठेऊन रोमी सरकारपुढे त्याची निर्भर्त्सना करण्याची त्याला धमकी दिली. ख्रिस्ताला दोषी ठेवण्याचे नाकारल्याबद्दल ते त्याच्यावर ठपका ठेवू लागले, आणि त्यांनी येशूला कैसराविरुद्ध उठविल्याचा ते आरोप करू लागले.DAMar 632.5

    क्रोधाविष्ट होऊन लोक ओरडून म्हणाले सर्व राष्ट्रभर राजद्रोहाची छाप येशूने पसरली आहे हे सर्वश्रुत आहे. याजक म्हणाले, “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत साऱ्या यहूदीयात शिक्षण देऊन लोकास चिथविले आहे.”DAMar 633.1

    ह्या वेळेस येशूला दोषी ठरविण्याचा पिलाताचा विचार नव्हता. दुराग्रह व द्वेषबुद्धी यामुळे यहूद्यांनी त्याच्यावर दोषारोप केले होते हे त्याला माहीत होते. त्याचे कर्तव्य त्याला माहीत होते. ख्रिस्ताची ताबडतोब सुटका झाली पाहिजे असे न्यायाची मागणी होती. परंतु लोकांची दुष्ट इच्छा पार पाडण्यास पिलात तयार झाला. ख्रिस्ताला त्यांच्या स्वाधीन करण्यास त्याने नाकारले असते तर प्रचंड गोंगाट व गलबला माजला असता आणि हे त्याला नको होते. ख्रिस्त गालीली प्रांतातला आहे असे त्याला समजल्यावर त्याला हेरोदाकडे पाठविण्याचे त्याने ठरविले कारण त्या प्रांताचा हेरोद अधिकारी होता आणि त्या वेळेस हेरोद यरुशलेमात होता. पिलाताला वाटले अशा रीतीने चौकशी करण्याची जबाबदारी हेरोदावर पडेल. त्याला असे ही वाटले की उभयतामधील पुराणे भांडण मिटविण्याची ही एक नामी संधि आहे आणि ते खरे ठरले. उद्धारकाच्या चौकशीवरून दोघा सभेदारामध्ये मैत्री निर्माण झालीDAMar 633.2

    पिलाताने पुन्हा येशूला शिपायांच्या स्वाधीन केले आणि जमावाची टवाळी आणि नालस्ती होत असता त्याला घाईने हेरोदाच्या न्यायसभेत नेले. “येशूला पाहून हेरोदाला फार आनंद झाला.” त्याच्या अगोदर येशूला तो कधी भेटला नव्हता, परंतु “त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बऱ्याच दिवसापासून त्याची इच्छा होती आणि त्याच्या हातून घडलेला एकादा चमत्कार पाहावयास मिळेल अशी त्याला आशा होती.” बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या रक्ताने ज्याचे हात कलंकीत झाले होते तो हा हेरोद. प्रथम येशूविषयी ऐकल्यावर हेरोद भीतीने घाबरून गेला होता आणि त्याने म्हटले, “ज्याचा शिरच्छेद मी केला तो हा योहान आहे. तो मरणातून उठला आहे.’ तरीपण येशला पाहाण्यास हेरोद फार उत्सुक होता. ह्या संदेष्ट्याचा जीव वाचविण्याची संधि होती आणि मोठ्या तबकातून रक्ताने माखलेले शीर आणल्याचे दृश्य मनांतून कायमचे काढून टाकावे असे राजाला वाटले. त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याची त्याने अपेक्षा केली आणि ख्रिस्ताच्या सुटकेची त्याला आशा दिल्यावर त्याला सांगितलेले करण्यास तो तयार झाला पाहिजे असे त्याला वाटले.DAMar 633.3

    ख्रिस्ताबरोबर याजक आणि वडील यांचा मोठा घोळका हेरोदाकडे गेला. ख्रिस्ताला आत नेल्यावर हे सर्व पदाधिकारी उद्दीपित होऊन बोलू लागले आणि त्याच्याविरुद्ध केलेल्या आरोपाबद्दल तगादा करू लागले. परंतु हेरोदाने तिकडे जास्त लक्ष दिले नाही. ख्रिस्ताला प्रश्न विचारण्याची संधि मिळावी म्हणून सर्वांना शात राहाण्यास त्याने हुकूम दिला. ख्रिस्ताच्या बेड्या काढण्यास त्याने त्यांना सांगितले, तसेच येशूला वाईट वागणूक दिल्याबद्दल त्याने त्याच्या शत्रूला बजाविले. दयार्द्र होऊन जगाच्या उद्धारकाचा शांत चेहरा पाहिल्यावर त्याला फक्त सुज्ञपणा व पावित्र्य दिसले. मत्सर व आकस-द्वेष यामुळे ख्रिस्तावर दोषारोप केला होता हे पाहून त्याला व पिलाताला समाधान वाटले.DAMar 633.4

    हेरोदाने ख्रिस्ताला बरेच प्रश्न विचारिले परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. राजाच्या हुकूमावरून लंगडे पांगळे व जर्जर आंत बोलाविले आणि त्याच्यामध्ये चमत्कार करून आपले म्हणणे सिद्ध करण्यास ख्रिस्ताला हकूम दिला. हेरोदाने म्हटले तू आजाऱ्यांना बरे करू शकतोस असे लोकांचे म्हणणे आहे. तुझी सर्वत्र पसरलेली कीर्ती खोटी ठरणार नाही हे पाहाण्यास मी उत्सुक आहे. येशूने काही उत्तर दिले नाही आणि हेरोद त्याच्या पाठी लागला होता. तो म्हणाला दुसऱ्यांच्यासाठी चमत्कार करणार नाहीस तर तुझ्या कल्याणासाठी कर. त्यामुळे तुझा फायदा होईल. परंतु ख्रिस्ताने ऐकले व पाहिले नसल्यासारखे केले. देवपुत्राने मानवी स्वभाव धारण केला होता. आलेल्या सारख्याच परिस्थितीत मानव जसा वागेल तसेच त्याला वागले पाहिजे होते. म्हणून वेदना व अपमान यापासून स्वतःला आराम मिळण्यासाठी तो चमत्कार करणार नव्हता.DAMar 634.1

    ख्रिस्ताने हेरोदासमोर जर चमत्कार केला तर त्याची सुटका केली जाईल असे आश्वासन हेरोदाने दिले होते. ख्रिस्तावर आरोप करणाऱ्यांनी त्याचे मोठे चमत्कार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते. कबरेतून मृतास बाहेर पडण्यास सांगणारी त्याची अधिकारसंपन्न वाणी त्यांनी ऐकली होती. तो कदाचित चमत्कार करील म्हणून ते घाबरून गेले होते. त्याच्या सामर्थ्याचे प्रात्यक्षिक पाहाण्यास त्यांना फार भीती वाटत होती. तशा प्रकटीकरणाने त्यांची योजना धूळीस मिळेल आणि कदाचित त्यामध्ये स्वतःच्या जीवनाची किंमत मोजावी लागली असती. चिंतातुर होऊन याजक व अधिकारी यांनी आपली मागणी पुढे मांडली. आवाज उठवून ते म्हणाले तो द्रोही, ईश्वरनिंदक आहे. तो आपले चमत्कार सैतानाचा मांडलिक बालजबूब याच्याद्वारे करतो असे ते ओरडले. काहीजण एक म्हणत होते तर काहीजण दुसरे म्हणत होते अशाने सर्व सभागृहात गोंधळ दिसत होता.DAMar 634.2

    बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर मागीतले त्यावेळी हेरोद भीतीने थरकाप झाला होता परंतु आता त्याचा विवेक कमी संवेदक होता. भयंकर कृत्याबद्दल काही काळ त्याचे मन त्याला बोचत होते परंतु व्यभिचारी, बेताल जीवनाने त्याच्या नैतिक जीवनाची अधोगति झाली होती. आता त्याचे मन फार कठोर झाले होते. त्याने येशूला धमकी देऊन म्हटले, “त्याला सोडण्याचा किंवा वधस्तंभी खिळण्याचा अधिकार मला आहे.’ परंतु त्याचे म्हणणे ऐकल्याचे कसलेच चिन्ह येशूने दाखविले नव्हते.DAMar 634.3

    बेकार जिज्ञासाला खतपाणी घालण्याचे ह्या जगातले काम येशूचे नव्हते. भग्न हृदयाला बरे करण्यास तो आला होता. पापग्रस्त अंतःकरण झालेल्याला बरे करायला सांगितले असते तर तो शांत राहिला नसता. परंतु अमंगळ चरणाखाली सत्याचा चुराडा करणाऱ्यांच्यासाठी त्याच्याजवळ शब्द नव्हते.DAMar 634.4

    ख्रिस्ताने काढलेले उद्गार कदाचित हेरोद राज्याच्या अंतःकरणाला झोंबले असते. त्याच्या जीवनातील त्याची अनैतिक जीवन पद्धत सामोरे आणून त्याला घाबरून सोडले असते. परंतु ख्रिस्ताची स्तब्धता त्याला अति कडक धमकी होती. महान संदेष्ट्यांनी हेरोदाला सत्य संदेश दिला होता तो त्याने धिक्कारिला. तो असा संदेश स्वीकारणार नव्हता. स्वर्गातील परात्पराजवळ त्याच्यासाठी काही संदेश नव्हता. मानवाच्या दुःख शोकासाठी ज्याचे कान सतत उघडे होते ते कान हेरोदाचा हुकूम ऐकण्यास तयार नव्हते. अनुतप्त पाप्याकडे दयार्द्र अतःकरणाने व पापक्षमा वृत्तीने पाहाण्यास जे नेत्र सदैव तयार होते ते हेरोदाकडे पाहाण्यास तयार नव्हते. ज्या ओठातून महत्त्वाचे सत्य पापी आणि पददलीत लोकापुढे मृदु आवाजात विनंतीवजा प्रगट केले, ते ओठ ज्याला उद्धारकाची गरज नव्हती त्या गर्विष्ठ मगरूर राजासाठी बंद ठेवले होते. DAMar 635.1

    हेरोदाचा चेहरा क्रोधाने काळवंडला. जमावाकडे वळून त्याने म्हटले येशू भोंदू फसव्या आहे. नंतर ख्रिस्ताकडे वळून त्याने म्हटले, तू केलेल्या प्रतिपादनावर काही पुरावा देणार नाहीस तर मी तुला शिपायांच्या आणि लोकांच्या ताब्यात देईन. ते तुला बोलावयास लावतील. तू जर भोंदू फसव्या आहेस तर त्यांच्या हातून होणाऱ्या वधास तू पात्र आहेस; तू जर देवपुत्र आहेस तर चमत्कार करून तुझा जीव वाचीव.DAMar 635.2

    हे शब्द ऐकून संपताच लोकांचा घोळका ख्रिस्ताकडे धावला. जंगली पशप्रमाणे घोळका त्यांच्या भक्ष्यावर धावला. इकडे तिकडे त्यांनी ख्रिस्ताची ओढाताण केली आणि देवपुत्राची मानहानी करण्यात हेरोद सामील झाला होता. रोमी शिपाई मध्ये पडून खवळलेल्या घोळक्याला सावरले नसते तर उद्धारकाला त्यांनी छिन्नविच्छिन्न करून टाकले असते.DAMar 635.3

    “हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून त्याच्या अंगावर झगझगीत वस्त्रे घातली.” रोमी शिपाई ह्या गैर वर्तणुकीत सामील झाले. हेरोद व यहूदी अधिकारी यांच्या प्रोत्साहनाने ह्या भ्रष्ट आणि दुष्ट शिपायांनी उद्धारकावर हल्ला चढविला. तथापि त्याची दिव्य सहनशीलता ढळली नाही.DAMar 635.4

    ख्रिस्ताचा छळ करणारे स्वतःच्या जीवनावरून त्याच्या स्वभावाचे प्रमाण-माप ठरवीत होते. त्यांच्याप्रमाणेच तो अधम, नीच आहे असे त्यांनी ठरविले होते. ह्या सर्व देखाव्याच्या पार्श्वभूमीत दुसरे दृश्य मध्येच आगतुंकपणे आले. हे दृश्य एके दिवशी सर्व वैभवाने ते पाहतील. ख्रिस्ताच्यासमोर काहींचा घबराट होत होता. काही उद्धट घोळका त्याची कुचेष्टा करून त्यांच्यासमोर मान तुकवीत होते व त्याच कारणासाठी पुढे आलेले काहीजण भीतीने मागे फिरले व शांत झाले. हेरोदाला दोषी ठरविण्यात आले होते. पापाने कठीण झालेल्या हृदयावर अखेरचे दयापूर्ण प्रकाशाचे किरण त्याच्यावर चमकत होते. तो काही साधा मनुष्य नाही असे त्याला वाटले. कारण मानवतेमध्ये देवत्व एकदम लखलखाटले. मारेकरी, व्यभिचारी आणि कृचेष्टा करणारे यांनी ख्रिस्ताला गराडा घातला होता त्याच समयी देवाला सिंहासनावर असलेला पाहात आहे असे हेरोदाला वाटले.DAMar 635.5

    कठीण मनाचा जरी असला तरी हेरोद ख्रिस्ताला दोषी ठरवू शकला नाही. ह्या भयंकर जबाबदारीतून मोकळा होण्यासाठी त्याने येशूला रोमी न्यायसभेकडे परत पाठविले.DAMar 636.1

    पिलाताची निराशा होऊन तो असंतोषी झाला. बंदिवानाला घेऊन यहूदी परतल्यावर त्याचे काय करायचे म्हणून त्याने त्यांना अधिर होऊन विचारिले. त्याने त्यांना आठवण करून देऊन म्हटले की मी येशूची अगोदच चौकशी केली आहे आणि त्याच्यात मला काही दोष आढळला नाही. त्याच्याविरुद्ध तुम्ही तक्रार केली होती परंतु त्यातील एकही तुम्ही सिद्ध केली नव्हती. तो गालीली म्हणून येशूला हेरोदाकडे पाठविला होता परंतु त्यालाही मरणदंडाच्या शिक्षेस पात्र असे काही आढळले नव्हते. “म्हणून याला फटके मारून सोडून देतो.’ पिलात म्हणाला.DAMar 636.2

    या ठिकाणी पिलाताने आपला दुबळेपणा दर्शविला. येशू निष्पापी आहे असे तो म्हणत होता आणि त्याच वेळी त्याच्यावर दोषारोप करणाऱ्यांचे समाधान करण्यासाठी त्याला फटके मारण्यास तो तयार झाला. घोळक्याबरोबर समेट करण्यासाठी तो न्याय व तत्त्व यांच्यावर पाणी सोडण्यास तयार होतो. ह्यामुळे तो पेचात पडला. मनाची द्विधावृत्ती पाहून बंदिवानाच्या जीवासाठी जमाव अधिक गलबला गोंगाट करू लागला. निर्दोष सापडलेल्या मनुष्याला शिक्षा न देण्याचे पिलाताने प्रथमच निश्चयाने सांगितले असते तर विवेकाची टोचणी व दोष यांच्यात जन्मभर सापडणाऱ्या प्राणघातकी शृंखलाचे त्याने तुकडे केले असते. खऱ्यासाठी केलेला मनाचा निश्चय त्याने तडीस नेला असता तर यहूद्यांनी त्याच्यावर जबरदस्ती केली नसती. ख्रिस्ताचा वध झाला असता परंतु त्याचा दोष त्याच्या माथी पडला नसता. परंतु सद्सद्विवेक बुद्धीची पायमल्ली करण्यात पिलाताने वेळोवेळी पाऊल उचलले होते. चौकशीत समता व न्याय यापासून तो फरफटत दूर गेला आणि आता तो याजक व अधिकारी याच्या कचाट्यात अगदी असहाय्य अशा सापडला. त्याचा धरसोडपणा व मनाची द्विधावृत्ती त्याच्या नाशास कारणीभूत झाली.DAMar 636.3

    आतासुद्धा पिलाताला अंधत्वाने चालायचे नव्हते. जी गोष्ट तो करण्याच्या विचारात होता त्याविषयी देवाच्या संदेशाने त्याला इशारा दिला होता. ख्रिस्ताच्या प्रार्थनेच्या उत्तरादाखल पिलाताच्या पत्नीला दिव्यदूताने भेट दिली आणि स्वप्नात तिने उद्धारकाचे दर्शन घेतले आणि त्याच्याबरोबर बोलणे केले. पिलाताची पत्नी यहूदी नव्हती परंतु स्वप्नात तिने येशूचे दर्शन घेतले तेव्हा त्याच्या स्वभावाविषयी किंवा कार्याविषयी कसलाही संदेह तिच्या मनात आला नव्हता. तो देवपुत्र होता अशी तिची खात्री होती. न्यायसभेत त्याची चौकशी होत असल्याचे तिने पाहिले. बंदिवानाप्रमाणे त्याचे हात घट्ट बांधलेले तिने पाहिले. हेरोद व त्याचे शिपाई भयंकर कृत्ये करताना तिने पाहिले. याजक व अधिकारी द्वेष मत्सर यांनी भरून त्याच्यावर गोंगाटात दोषारोप करताना तिने ऐकले. “आम्हाला कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे तो मेलाच पाहिजे.” हे उद्गार तिने ऐकले. “ह्याच्यामध्ये मला काही दोष आढळत नाही’ असे म्हणून पिलाताने येशूला फटके मारण्यास देताना तिने पाहिले. पिलाताने घोषीत केलेली शिक्षा तिने ऐकली आणि नंतर ख्रिस्ताला मारेकऱ्याच्या स्वाधीन करताना तिने पाहिले. कॅलव्हरीवर वधस्तंभ उभारलेला तिने पाहिला. पृथ्वी गडद अंधकाराने आच्छादिली होती हे तिने पाहिले आणि रहस्यमय वाणी “पूर्ण झाले आहे’ ही तिने ऐकिली. दुसरा देखावा तिच्या डोळ्यासमोर उभे राहिला. येशूशुभ्र ढगावर बसलेला आणि त्याचवेळी पृथ्वी अवकाशात गुंडाळलेली आणि मारेकरी त्याच्या गौरवी समक्षतेपासून पळून गेलेले तिने पाहिले. भयानक आक्रोशाने ती जागे झाली आणि लगेचच तिने पिलाताला इशाऱ्याचे पत्र पाहिले.DAMar 636.4

    काय करावे याविषयी पिलात गोंधळात असताना जमावातून खबऱ्या पुढे सरसावला आणि पत्नीचे पत्र त्याला दिले. ते असे होतेःDAMar 637.1

    “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे फार यातना झाल्या.”DAMar 637.2

    पिलाताचा चेहरा निस्तेज झाला. विसंगतीच्या भावनामुळे तो गोंधळून गेला होता. कृती करण्याला विलंब होत असलेला पाहून याजक व अधिकारी लोकांची मने चेतवून देत होते. कृती करण्यास पिलाताला भाग पाडिले. त्यांच्यामध्ये असलेल्या प्रथेची त्याला आठवण झाली. कदाचित त्याच्याद्वारे ख्रिस्ताची सुटका करून घेता येईल असे त्याला वाटले. ह्या सणाच्या वेळी लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची प्रथा होती. ही मूर्तिपूजक लोकांची होती. त्यामध्ये काही तथ्य नव्हते परंतु यहूद्यांनी त्याला फार महत्त्व दिले होते. मरणदंडाची शिक्षा झालेला बरब्बा नामक बंदिवान ह्यावेळी रोमी अधिकाऱ्यांच्या ताब्यात होता. तो मशीहा आहे असे म्हणत होता. जगाची नवीन घडण प्रस्थापित करण्याचा त्याला अधिकार आहे असे तो घोषीत करीत होता. चोरी करून जे तो मिळवील ते त्याचे आहे असे त्या सैतानाच्या चुकीच्या भ्रांतीने वाटत होते. सैतानाच्या सहाय्यकाद्वारे पुष्कळ अद्भुत गोष्टी त्याने केल्या होत्या. पुष्कळ लोक त्याच्यामागे अनुयायी म्हणून चालले होते आणि रोमी सरकारच्याविरुद्ध उठाव करण्यास त्याने लोकांना फितविले होते. धर्माच्या नावाखाली तो कट्टर खलनायक होता आणि बंडाळी व क्रूर कृत्य करण्यात तो रमला होता. हा मनुष्य आणि निष्पापी उद्धारक या दोहोतून एकजण निवडण्यास संधि देण्याद्वारे लोकांची न्यायबुद्धी तो जागृत करीत आहे असे पिलाताला वाटले. याजक व अधिकारी यांच्याविरुद्ध येशूसाठी सहानुभूती संपादन करण्याची त्याने आशा केली. जमावाकडे वळून अगदी कळकळीने म्हटले. “दोघापैकी तुमच्यासाठी मी कोणाला सोडू? बरब्बा किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?’DAMar 637.3

    जमावाचा जंगली पशूप्रमाणे आवाज आला, “आमच्यासाठी बरब्बाला सोडा!” आक्रोश एकसारखा वाढू लागला, बरब्बा! बरब्बा! त्याने विचारलेला प्रश्न लोकांना समजला नाही म्हणून पिलाताने पुन्हा विचारिले, “तुमच्याकरिता मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय” परंतु ते पुन्हा ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा आणि आमच्याकरिता बरब्बाला सोडा!” पिलाताने विचारिले, “ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करू?’ खवळलेला जमाव पुन्हा पिशाचासारखा ओरडू लागला. पिशाच्यांनी संचार केलेल्या जमावाने धुडगुस घातला आणि म्हटले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.”DAMar 638.1

    पिलात कष्टी झाला. असे घडेल असे त्याला वाटले नव्हते. त्याच्यावर लादण्यात येणारे लाजीरवाणे व क्रूर मरण यापासून निष्कलंक मनुष्याची सुटका करण्यास ते कचरला. लोकांचा आवाज शांत झाल्यावर लोकाकडे वळून त्याने म्हटले, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” परंतु प्रकरण फार वाढीस लागले होते, तेथे विचार विनिमयाचा प्रश्नच उरला नव्हता. ख्रिस्ताचा निरापराधीपणाचा पुरावा पाहाण्यात त्यांना रस नव्हता तर त्याला दोषी ठरविण्यात होता.DAMar 638.2

    अजून पिलात त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. “तिसऱ्यांदा त्याने त्यांना म्हटले, का बरे? त्याने काय वाईट केले आहे? त्याने मरणदंड भोगण्यासारिखे काही केलेले नाही. मी ह्याला फटके मारून सोडून देतो.” सोडून देतो हे शब्द त्यांच्या कानी पडल्याबरोबर लोकांचा उन्माद दसपटीने वाढला. ते मोठमोठ्याने ओरडू लागले, “ह्याला वधस्तंभी खिळा, वधस्तंभी खिळा.’ भावनांचा उद्रेक, खळबळ इतकी वाढली की पिलाताच्या निर्णयाची मागणी करण्यात आली.DAMar 638.3

    थकलेला, दमलेला, मूर्च्छित झालेला, फटके मारलेला, जखमांनी भरलेला अशा स्वरूपात येशूला जमावाच्या समोरून नेण्यात आले. “मग शिपायांनी त्याला प्रयटोर्यमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलाविली. त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढविले आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याला घातला, आणि ते मुजरा करून त्याला म्हणू लागले, हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो... ते त्याच्यावर थुकले आणि गुडघे टेकून त्याला नमन केले.” अधून मधून कोणी दुष्ट त्याच्या हातात दिलेले वेत घेऊन त्याच्या कपाळावरील मुकुटावर मारीत असे त्यामुळे काटे त्याच्या कपाळात घुसून रक्ताचे थेंब त्याच्या तोंडावर व दाढीवर ओघळत होते. हे स्वर्गानो, आश्चर्य करा! आणि हे पृथ्वी, चकित हो! जुलूमशहा, छळणारा व गांजलेला पाहा. जगाच्या उद्धारकाला वेडापिसा झालेल्या घोळक्याने सर्व बाजूंनी वेढा घातला आहे. थट्टा मस्करी देवनिंदात्मक असभ्यता शपथेत मिसळून गेली आहे. असंवेदनाक्षम जमाव त्याचे जन्म ठिकाण व गरीबीचे जीवन यावर टीका करीत आहे. तो देवपुत्र आहे त्याने केलेल्या ह्या विधानाची ते टर उडवीत आहेत आणि अभद्र टोमणे व उपहासाचे खोचक बोलणे तोंडोतोंडी निघत राहिले.DAMar 638.4

    उद्धारकाची मानहानी करण्यात सैतानाने जमावाला प्रोत्साहन दिले होते. सूड, बदला घेण्यासाठी त्याला चेतविण्याचा तो प्रयत्न करीत होता किंवा स्वतःची सुटका करण्यासाठी त्याला उद्युक्त करण्याचा त्याचा खटाटोप होता. त्याद्वारे तारणाची योजना हाणून पाडण्याचा त्याचा इरादा होता. त्याच्या मानवी जीवनावरील एक डाग, कठोर परीक्षेतील एक पाडाव, ह्याद्वारे देवाचा कोकरा मानवाच्या उद्धारकार्यासाठी लागणाऱ्या यज्ञात कमी पडला असता. परंतु मदतीसाठी स्वर्गीय सैन्य अधिकाराने जो बोलवू शकतो - आपल्या दिव्य वैभवाच्या तेजाने जमावाला भयभीत करू शकतो-त्याने त्यांची निर्दय कुचेष्टा करणारी व निंद्य कृत्ये निमूटपणे सहन केली. DAMar 639.1

    त्याचे देवत्व सिद्ध करण्यासाठी ख्रिस्ताच्या शत्रूने चमत्कार करण्याची मागणी केली. त्यांनी मागणी केली त्यापेक्षा भरीव पुरावे त्यांच्याजवळ होते. त्यांची निष्ठुरता व छळ माणुसकीला न शोभणाऱ्या सैतानी थराला गेला तशी येशूची सौम्यता आणि सहिष्णुता माणुसकीला धरून राहिली व त्याचे देवाशी असलेले नाते सिद्ध झाले. त्याची मानखंडना त्याच्या उच्चस्थानाचे प्रतीक होते. प्राणांतिक दुःखाचे रक्ताचे थेंब कपाळावरून तोंडावर व दाढीवर पडत होते. ते त्याचा प्रमुख याजक म्हणून “हर्षरूपी तेलाचा अभिषेक” (इब्री १:९) यांचे प्रतीक होते.DAMar 639.2

    उद्धारकाची विविध प्रकारे नालस्ती व मानखंडना केली तरी त्याच्या मुखातून तक्रारीचा एक शब्दही बाहेर पडला नाही सैतानाचा क्रोध भडकला. जरी त्याने मानवी स्वभाव धारण केला होता तरी देवाला शोभेल असा संकटात शांत राहाण्याच्या धैर्याने त्याला उचलून धरले होते आणि तो पित्याच्या इच्छेपासून कोणत्याही स्वरूपात दुरावला नव्हता. DAMar 639.3

    येशूला फटके मारण्यास व थट्टा करण्यास पिलाताने दिले तेव्हा जमावाची सहानुभूती त्याच्या बाजूने होईल असे त्याला वाटले होते. ही शिक्षा पुरेशी आहे असे ते म्हणतील असे त्याला भासले. याजकांची द्वेषबुद्धीसुद्धा ह्याद्वारे समाधान पावेल असे त्याला वाटले. निरापराधी म्हणून घोषीत केलेल्या मनुष्याला अशा प्रकारची शिक्षा देणे ह्यात दुबळेपणा आहे असे यहूद्यांनी पाहिले. बंदिवानाला मुक्त करण्याचा प्रयत्न पिलात करीत आहे हे त्यांना समजले आणि त्याला मुक्त न करण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला. आमचे समाधान करण्यासाठी पिलाताने त्याला फटके मारिले, आणि आम्ही जर जोर केला तर आमचा उद्देश निश्चित साध्य होईल असे त्यांना वाटले.DAMar 639.4

    बरब्बाला कोर्टात आणण्यास पिलाताने सांगितले. त्यानंतर त्याने दोन्ही बंदिवानाना सर्वापुढे आणिले. उद्धारकाला उद्देशून त्याने गंभीर आवाजात म्हटले, “ह्या मनुष्याकडे पाहा! मी ह्याला तुमच्या पुढे सादर करीत आहे अशासाठी की त्याच्यामध्ये मला काही दोष सापडला नाही हे तुम्हाला समजावे.”DAMar 640.1

    तेथे देवपुत्र उपहासाची वस्त्रे पांघरलेला व डोक्यावर काट्यांचा मुकुट घातलेला उभे होता. कंबरेपर्यंत कपडे नसलेला, पाठीवर फटक्याचे लांबलचक वण असलेला, त्यातून रक्त घळघळा वहात होते. त्याची मुद्रा रक्ताने माखलेली होती आणि त्यावर यातना व शीण थकवा याच्या खुणा दिसत होत्या; परंतु आतासारखी त्याची मुद्रा पूर्वी कधीच अशी सुरेख दिसली नव्हती. शत्रूच्यासमोर उद्धारकाचा चेहरा खराब झाला नव्हता. प्रत्येक भूमिकेत सभ्यता, नम्रता आणि निष्ठूर शत्रूसाठी हळवी करुणा व्यक्त केली होती. त्यामध्ये भेकड दुबळेपणा नव्हता तर अत्यंत सहनशीलतेचे सामर्थ्य व माननीयता सामावलेली होती. त्याच्या बाजूला अगदी विरुद्ध स्वभावाचा बंदिवान उभा होता. वाटेल त्या थराला जाऊ शकणारा मवाली म्हणून बरब्बाची ख्याती होती. हा फरक पाहाणाऱ्या लोकांच्या लक्षात आला. काही प्रेक्षक डोळ्यातून अश्रु ढाळत होते. त्याला पाहून त्याच्याठायी सहानुभूती निर्माण झाली होती. त्याच्या उक्तीप्रमाणे तो होता अशी खात्री याजक व अधिकाऱ्यांचीसुद्धा झाली होती.DAMar 640.2

    ख्रिस्ताला गराडा घातलेले रोमी शिपाई सगळे कठोर अंतःकरणाचे नव्हते. काहीजण तो गुन्हेगार किंवा घातकी स्वभावाचा आहे हे सिद्ध करण्याचा पुरावा त्याच्या चेहऱ्यावर पाहात होते. अधूनमधून ते बरब्बावरही तिरस्काराने नजर टाकीत होते. त्याला समजून घेण्यास त्यांना फार तसदी घेण्याची जरूरी वाटली नाही. पुन्हा ते वळून ख्रिस्ताकडे पाहात असे. दुःख व्यथा भोगणाऱ्या दिव्य व्यक्तीकडे पाहून त्यांना मनापासून कळवळा वाटत होता. ख्रिस्त सर्व यातना शांतपणे सहन करीत होता ह्या दृश्याचा छाप त्यांच्यावर जबरदस्त पडला होता, की त्यांना निर्णय घेतल्याशिवाय तो पुसला जाणार नव्हता. तो निर्णय म्हणजे तो ख्रिस्त आहे हे कबूल करणे किंवा त्याचा धिक्कार करणे आणि त्याद्वारे ते स्वतःचे भवितव्य ठरवीत होते.DAMar 640.3

    कुरकुर न करणारी उद्धारकाची सहनशीलता पाहून पिलाताला फार आश्चर्य वाटले. बरब्बाच्या तुलनेत ह्या मनुष्याचे दृश्य पाहून यहूद्यांच्यामध्ये त्याच्याविषयी सहानुभूती उद्भवेल ह्या विषयी त्याच्या मनात शंका नव्हती. परंतु जगाचा प्रकाश या नात्याने ज्या याजकांचे अज्ञान व चुका त्याने दाखविल्या होत्या त्यांचा फाजील धर्मवेडा द्वेष त्याला उमजला नव्हता. त्यांनी जमावाला क्रोधाविष्ट होण्यास चेतविले आणि पुन्हा याजक, अधिकारी आणि घोळका मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.’ त्यांचा अवाजवी क्रूरपणा पाहून पिलाताचा सर्व संयम नाहीसा झाला आणि तो शेवटी निराशेने ओरडला, “तुम्ही त्याला घ्या आणि वधस्तंभावर खिळा कारण त्याच्यामध्ये मला काही दोष सापडत नाही.”DAMar 640.4

    निष्ठूर दृश्य अवगत असलेला रोमी सुभेदार यातना भोगणाऱ्या बंदिवानाला पाहून त्याच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. तो राजा म्हणून त्याचा अधिकार होता. परंतु याजकानी घोषीत केले, “आम्हाला नियमशास्त्र आहे, आणि त्या नियमाप्रमाणे तो मेला पाहिजे कारण स्वतःला त्याने देवपुत्र म्हटले.”DAMar 641.1

    पिलात चकित झाला. ख्रिस्त आणि त्याचे कार्य याविषयी त्याला खरा अर्थबोध झाला नव्हता; परंतु त्याचा देवावर आणि मानवापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीवर अस्पष्ट विश्वास होता. पूर्वी त्याच्या मनात आलेल्या विचाराने आता निश्चित स्वरूप घेतले होते. जांभळी वस्त्रे परिधान केलेली आणि डोक्यावर काटेरी मुकुट घातलेली ही कोणी दिव्य व्यक्ती नसले ना असा विचार त्याच्यापुढे उभे राहिला.DAMar 641.2

    पुन्हा तो न्यायसभागृहात गेला आणि येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” येशूने त्याला उत्तर दिले नाही. सत्याची साक्ष देण्याच्या आपल्या कार्याविषयी उद्धारकाने पिलाताला अगदी समजावून सांगितले होते. पिलाताने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. जमावाच्या मागणीला बळी पडून तत्त्व व अधिकार यांची खच्ची करून त्याने न्यायधिशाचे उच्च पद भ्रष्ट केले होते. येशूजवळ त्याच्यासाठी अधिक प्रकाश नव्हता. उत्तर देत नाही हे पाहून पिलात तुच्छतेने म्हणालाःDAMar 641.3

    “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभी खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही काय?”DAMar 641.4

    येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मूळीच चालला नसता. ह्यास्तव ज्याने मला आपल्या स्वाधीन केले आहे त्याचे पाप अधिक आहे.”DAMar 641.5

    अति दुःख आणि कष्ट सोसत असलेल्या दयाशील उद्धारकाने वधस्तंभावर खिळण्यास दिलेल्या रोमी सुभेदाराला त्याच्या ह्या कर्तव्यातून मुक्त केले. सर्व जगासाठी आणि सर्व काळासाठी विचारात घ्यावयाचा काय हा देखावा! सर्व पृथ्वीच्या न्यायाधिशाच्या स्वभावावर ह्याद्वारे कोणता प्रकाश पडतो!DAMar 641.6

    “ज्याने मला आपल्या स्वाधीन केले आहे त्याचे पाप अधिक आहे.’ असे येशूने म्हटले. कयफाला उद्देशून येशूने हे उद्गार काढिले होते. कारण प्रमुख याजक या नात्याने त्या सर्व यहूदी राष्ट्राचे त्याने प्रतिनिधित्व केले होते. रोमी अधिकाऱ्यांना बंधनकारक असलेली तत्त्वे त्यांना माहीत होती. ख्रिस्त, त्याची शिकवण आणि चमत्कार यांच्याद्वारे ख्रिस्ताविषयी साक्ष देणारी भाकीते त्यांना माहीत होती. ज्याला मरणदंडाची शिक्षा दिली त्याच्या देवत्वाविषयी यहूदी न्यायधिशांना बिनचूक पुरावा मिळाला होता. त्या ज्ञानानुसार त्यांचा न्याय होईल.DAMar 641.7

    राष्ट्रामध्ये उच्च स्थान पटकावणाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते व मोठा अपराध त्यांच्यावर लादला जातो. पवित्र विश्वासाची ते पायमल्ली करतात किंवा घात करतात. पिलात, हेरोद व रोमी शिपाई तुलनात्मक दृष्ट्या येशूविषयी अज्ञानी होते. त्याला शिवीगाळ करून याजक व अधिकारी यांना आनंदित ठेवायचे असे त्यांना वाटले. यहूदी राष्ट्राला जो विपुल प्रकाश मिळाला होता तो त्यांना मिळाला नव्हता. शिपायांना तो प्रकाश दिला असता तर त्यांनी ख्रिस्ताला इतक्या क्रूरतेने वागविले नसते.DAMar 642.1

    ख्रिस्ताला सोडून देण्याची सूचना पुन्हा पिलाताने केली. “परंतु यहूदी आरडा ओरड करून म्हणाले, आपण ह्याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही.’ अशा प्रकारे ह्या ढोंग्यानी कैसरच्या अधिकाराविषयी जागरूक असल्याचे दाखविले. रोमी साम्राज्याला सर्व विरोध करण्यामध्ये यहूदी कट्टर विरोधक होते. शक्य तो जेथे सुरक्षतेचे होते तेथे ते स्वतःच्या राष्ट्रीय आणि धार्मिक आवश्यक गोष्टी अंमलात आणण्यास जुलूम करीत होते; परंतु निर्दयतेचा उद्देश साध्य करून घेण्यासाठी त्यांनी कैसराच्या अधिकाराला उच्च स्थान दिले. ख्रिस्ताचा नाश घडवून आणण्यासाठी ज्यांचा द्वेष त्यांनी केला अशा विदेशी राष्ट्राशी ते हातमिळवणी करून एकनिष्ठा दाखवीत होते.DAMar 642.2

    ते पुढे म्हणाले, “जो स्वतःला राजा बनिवतो तो कैसराविरुद्ध बोलतो.’ हे पिलाताच्या कमकुवत मुद्याविषयी होते. तो रोमी सरकारच्या डोळ्याखाली होता आणि असली खबर त्याच्या नाशास कारण होईल हे त्याला माहीत होते. यहद्यांना विरोध केला तर त्यांचा राग त्याच्याविरुद्ध वळेल हे त्याला माहीत होते. बदला घेण्यासाठी सर्व काही ते करतील. काही कारणाशिवाय द्वेष करून त्याचा जीव घेण्याचा चिकाटीचा दीर्घ प्रयत्न चाललेला याचे उदाहरण त्याच्यापुढे होते.DAMar 642.3

    पिलात न्यायासनावर बसला आणि पुन्हा येशूला लोकापुढे सादर करून म्हटले, “पाहा, तुमचा राजा!” त्यावर खवळलेला जमाव ओरडला. “त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभी खिळा.’ पिलात सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभी खिळावे काय?” परंतु धर्मभ्रष्ट व निंदा करणाऱ्या ओठातून शब्द बाहेर पडले, “कैसरावाचून आम्हाला कोणी राजा नाही.”DAMar 642.4

    विधर्मी राजा निवडून यहूदी राष्ट्राने ईश्वरसत्ताक राज्यपद्धतीचा त्याग केला. राजा म्हणून त्यांनी देवाचा धिक्कार केला. यापुढे त्यांची मुक्तता करणारा कोणी नव्हता. कैसरावाचून त्यांना दुसरा कोणी राजा नव्हता. ह्याप्रत याजक आणि धर्मशिक्षक यांनी लोकाना आणिले. ह्यामुळे अखेरच्या निर्णयाला ते कारणीभूत झाले. राष्ट्राचे पातक व राष्ट्राचा -हास ह्यासाठी धार्मिक पुढारी जबाबदार होते.DAMar 642.5

    “ह्यावरून आपले काहीच चालत नाही उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, मी ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.” घाबरून आणि स्वतःला दोषी समजून पिलाताने उद्धारकावर नजर फेकली. अफाट लोकसमुदायाच्या सागरामध्ये केवळ ह्याचाच चेहरा प्रसन्न दिसला. त्याच्या शीराभोवती मंद प्रकाश चमकत होता. तो देव आहे असे पिलाताने आपल्या मनात म्हटले. लोकसमुदायाकडे वळून त्याने जाहीर केले मी त्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खिळा. परंतु याजक व अधिकारी, तुम्ही ध्यानात ठेवा तो निर्दोष आहे असे मी घोषीत करितो. त्याने उल्लेखलेला त्याचा पिता, आजच्या निर्णयासाठी तुमचा न्याय करो, माझा नाही. त्यानंतर येशूकडे वळून त्याने म्हटले, तुला मी मुक्त करू शकत नाही म्हणून माझी क्षमा कर; तुझी सुटका करू शकत नाही. पुन्हा येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी त्यांच्या स्वाधीन केले.DAMar 643.1

    पिलात येशूला मुक्त करण्यास फार उत्सुक होता. परंतु ते तो करू शकत नाही हे त्याने पाहिले, तथापि त्याने स्वतःचा मान आणि पद राखून ठेविले. जगिक अधिकार गमावण्याच्या ऐवजी त्याने निष्पापी जीवाचा बळी देण्याचे निवडिले. कष्ट यातना आणि तोटा टाळण्यासाठी कितीजण मूलभूत तत्त्वावर पाणी सोडतात. विवेकबुद्धी आणि कर्तव्य एक मार्ग सुचवितात आणि स्वहित दुसरा मार्ग दाखवितात. प्रस्तुत घटना चुकीच्या मार्गाने चालली होती, आणि जो दुष्टाईशी हात मिळवणी करितो तो अपराधाच्या गडद अंधारात लोटला जातो. पिलात जमावाच्या मागणीला शरण गेला. स्वतःचे स्थान गमावण्याऐवजी त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्यास दिले. एवढी खबरदारी घेऊन सुद्धा ज्या गोष्टीला तो घाबरत होता तीच गोष्ट त्याच्यावर आदळली. त्याचा मानसन्मान त्याच्यापासून काढून घेण्यात आला, त्याला उच्चपदभ्रष्ट करण्यात आले. त्याचा अहंकार दुःखवल्यामुळे वधस्तंभानंतर त्याने आपल्या जीवाचा अंत केला. जे पापाबरोबर हातमिळवणी करितात त्याच्या पदरी दुःख व नाश पडतो. “मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यपथ फुटतात.” नीति. १४:१२.DAMar 643.2

    ख्रिस्ताच्या रक्ताविषयी निर्दोष असल्याचे पिलाताने घोषीत केले तेव्हा कयफाने उर्मटपणे उत्तर दिले, “त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळावर असो.’ याजक व अधिकारी यानी भयानक शब्द उद्गारले आणि त्याचा प्रतिध्वनि जमावाने पशूप्रमाणे आक्रोश करून काढिला. सर्व समुदायाने उत्तर देऊन म्हटले, “त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळावर असो.”DAMar 643.3

    इस्राएल लोकांनी आपली निवड केली. येशूकडे बोट दाखवून ते म्हणाले, “हा माणूस नव्हे तर बरब्बा.” बरब्बा, लुटारू, खूनी, हा सैतानाचा प्रतिनिधी होता. ख्रिस्त देवाचा प्रतिनिधी होता. ख्रिस्ताचा नाकार करण्यात आला; बरब्बाची निवड करण्यात आली. बरब्बा त्यांना पाहिजे होता. ही निवड करण्याद्वारे प्रारंभापासून जो लबाड व खूनी होता त्याचा स्वीकार त्यांनी केला. सैतान त्यांचा पुढारी होता. राष्ट्र या नात्याने ते त्याच्या हुकूमाखाली आले होते. त्याचे काम ते करतील. त्याचा अधिकार ते सहन करतील. ख्रिस्ताच्या जागी बरब्बाची निवड करणाऱ्यांना बरब्बाच्या क्रूरपणाचा ते अनुभव घेतील.DAMar 644.1

    देवाच्या कोंकऱ्यावर प्रहार करून यहूदी ओरडले होते, “त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळावर असो.” ही भयंकर आरोळी देवाच्या सिंहासनापर्यंत पोहचली. स्वतःविषयी काढलेले उद्गार स्वर्गात लिहिण्यात आले होते. ती प्रार्थना ऐकण्यात आली होती. देवपुत्राच्या रक्ताचा कायमचा शाप मुलाबाळावर व त्यांच्या मुलाबाळावर होता.DAMar 644.2

    यरुशलेमाच्या नाशाच्या समयी त्यांना भयंकर अनुभव आला होता. आठराशे वर्षाच्या कालावधीत प्रगट केलेल्या यहूदी राष्ट्राच्या भयंकर परिस्थितीत हे दर्शविले आहे, - वेलीतून काढलेली फांदी वाळून, फलहीन होते व गोळा करून तिला अग्नीत टाकण्यात येते.DAMar 644.3

    त्या महान न्यायाच्या दिवशी त्या प्रार्थनेची परिपूर्ति भयंकररित्या होईल. ख्रिस्त ह्या पृथ्वीवर पुन्हा येईल तेव्हा लोक त्याला पाहातील, त्याच्याभोवती बाजारबुनग्यांनी गर्दी केलेला असा नाही, तर त्याला ते स्वर्गाचा राजा म्हणून पाहातील. ख्रिस्त स्वतःच्या गौरवाने, पित्याच्या गौरवाने आणि पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल. अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्रे देवदूत, सुंदर व विजयी देवपुत्र (देवभिरू) त्याच्याबरोबर जातील. नंतर प्रत्येक डोळा त्याला पाहील आणि ज्यांनी त्याला भोसकिले तेसुद्धा पाहातील. काटेरी मुकुटाऐवजी तो गौरवी मुकुट घालील. किरमिजी रंगाच्या झग्याच्या ऐवजी तो शुभ्र वस्त्रे परिधान करील. “त्याची वस्त्रे इतकी चकचकीत व पांढरी शुभ्र होती की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नाही.” मार्क ९:३. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर नाव लिहिण्यात येईल, “राजांचा राजा, आणि प्रभूचा प्रभु.” प्रगटी. १९:१६. त्याची थट्टा करणारे आणि त्याला फटके मारणारे तेथे हजर असतील. याजक व अधिकारी पुन्हा न्यायसभेतील देखावा पाहातील. प्रत्येक घटना अग्नीच्या अक्षरांनी लिहिलेली त्यांना भासेल. “त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळावर असो” अशी प्रार्थना करणाऱ्यांना त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल. नंतर सर्व जगाला माहीत होईल व समजेल. कष्टी, दुर्बल व मर्त्य लोक कोणाशी का झगडत आहेत हे त्यांना त्यावेळेस समजून येईल. अति दुःखाने व भीतीने ओरडून ते “पर्वतांस व खडकास म्हणतील, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टीपुढून व कोंकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा. कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्यापुढे कोणच्याने टिकाव धरवेल?” प्रगटी. ६:१६, १७.DAMar 644.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents