Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ३१—डोंगरावरले प्रवचन

    मत्तय ५, ६, ७.

    ख्रिस्त क्वचितच केवळ आपल्या शिष्यांनाच त्याने वचन ऐकण्यासाठी एकत्र जमवीत असे. जीवनाच्या मार्गाचे ज्ञान असणारेच त्याचे श्रोतेजन नव्हते. अज्ञानी व चूक करणाऱ्यांच्या मोठ्या समुदायाला संदेश देण्याचा त्याचा निर्धार होता. जेथे जेथे चुकीची मते त्याला दिसली तेथे तेथे त्याने सत्याचे पाठ दिले. तोच स्वतः सत्य होता, आशीर्वाद देण्यासाठी कंबर कसून हात पुढे करून उभे होता, आणि त्याच्याकडे येणाऱ्यांना तो त्यांचे भले करण्यासाठी इशाऱ्याचे, विनवणीचे आणि उत्तेजनाचे उद्गार त्यांच्या कानी पाडीत होता. DAMar 250.1

    डोंगरावरील प्रवचन जरी मुख्यतः शिष्यांच्यासाठी होते तरी त्यांतील शिकवण अमाप लोकसमुदायासाठी होती. शिष्यांना दीक्षा दिल्यानंतर त्याने त्यांना समुद्रकिनारी नेले. अगदी प्रातःकाळी लोक तेथे जमू लागले. गालीली नगरातील नेहमीचे लोक सोडून यहूदा व यरुशलेमवरूनही लोक आले होते. एवढेच नाही तर इदोम व यार्देनेच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सिदोन ह्यांच्या आसपासचा प्रांत, आणि भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील शहरातून मोठा समुदाय त्याचे श्रवण करण्यास आला होता. “त्याने केलेल्या मोठ्या कार्याविषयी ऐकून त्याचे ऐकावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास लोक आले होते... त्याच्यातून सामर्थ्य निघून त्याने सर्वास निरोगी केले.’ मार्क ३:८; लूक ६:१७-१९. DAMar 250.2

    त्या निमुळत्या किनाऱ्यावर उभे राहायालासुद्धा पुरेशी जागा नव्हती आणि लोकांना बरोबर ऐकू येत नव्हते म्हणून येशूने त्याना पुन्हा डोंगराकडे नेले. मोठ्या समुदायाला बसण्यास त्याने प्रशांत सपाट जागा पाहिली. तो स्वतः खाली गवतावर बसला आणि शिष्य व मोठा समुदायही खाली बसला.DAMar 250.3

    शिष्य नेहमी येशूच्या जवळ बसत असत. जरी लोक त्याच्या नजीक येण्याचा खटाटोप करीत असे तरी शिष्यांनी आपली जवळची जागा सोडली नाही. त्याच्या शिकवणीतील कोणताच भाग त्यांच्या कानावेगळा होऊ नये म्हणून ते नेहमीच त्याला बिलगून बसत असत व एकाग्रचिताने ऐकत असे. सत्य समजून घेण्यास ते अति उत्सुक होते, कारण त्यांना त्याचा प्रसार सर्व देशात सर्व युगात करावयाचा होता.DAMar 250.4

    नेहमीपेक्षा त्यांच्याकडून अधिक अपेक्षा केली जाईल ह्या समजुतीने ते आपल्या गुरूजीशी अगदी सलगी करून राहात होते. लवकरच राज्य प्रस्थापित करण्यात येणार आहे असा त्यांचा विश्वास होता आणि सकाळच्या घटनेवरून त्यांची पक्की खात्री झाली की त्याविषयीची घोषणा लवकरच होईल. मोठ्या समुदायाचीसुद्धा तीच अपेक्षा होती आणि ते त्यांच्या उत्सुकतेवरून स्पष्ट दिसत होते. लोक टेकडीवरील हिरव्यागार गवताळ जागेवर बसून दिव्य शिक्षकाच्या प्रवचनाची वाट पाहात असतांना भावी वैभवाचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. रोमी लोकावर आपले साम्राज्य प्रस्थापीत करून जगातील महान साम्राज्यातील मोठी धनदौलत व वैभव हस्तगत करावे ह्या विचारांनी भरलेले शास्त्री व परूशी तेथे होते. भिकारड्या खोपट्या, कष्टाचे व अर्धपोटी जीवन आणि गरजेच्या गोष्टींची वाण जाऊन सुबता व निवासासाठी हवेली लाभेल ह्या विचाराने ग्रस्त झालेले गरीब शेतकरी व कोळी लोक यांना खात्रीचे शब्द कानी पडावे असे वाटत होते. दिवसा ओबडधोबड वापरण्यात येणारे वस्त्र व रात्रीची घोंगडी यांच्याऐवजी ख्रिस्त त्यांना त्याच्या विजेत्यांचा भारी किंमती पेहराव देईल अशी त्यांची आशा होती. सर्व राष्ट्रापुढे प्रभूने निवडलेल्या इस्राएल लोकांचा सन्मान होईल आणि यरुशलेम विश्वव्यापी साम्राजाची प्रमुख नगरी बनेल ह्या विचारांनी सर्वांची अंतःकरणे हर्षाने उचंबळून गेली होती.DAMar 251.1

    जगांतील मोठेपणाची आशा धरलेल्यांची ख्रिस्ताने निराशा केली. डोंगरावरील प्रवचनाद्वारे चुकीच्या, खोट्या शिक्षणाद्वारे आलेल्या विचारसरणीचे खंडन करून श्रोतेजनांना त्याच्या राज्याविषयी व त्याच्या स्वतःच्या शीलस्वभावाविषयी खरी कल्पना देण्याचा त्याने प्रयत्न केला. तथापि लोकांच्या चुकावर त्याने प्रत्यक्ष हल्ला केला नाही. पापामुळे जगात आलेली विपत्ति, दुःख त्याने पाहिले तथापि त्यांच्यासमोर त्यांच्या आपत्तीचे चित्र त्याने रंगवून सांगितले नाही. त्यांना निरंतरचे कल्याणदायी होईल असे शिक्षण त्याने दिले. देवाच्या राज्याविषयी त्यांच्या विचारसरणीवर वादविवाद करीत बसण्याऐवजी त्यामध्ये प्रवेश करण्याच्या अट्टी त्याने त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्याविषयी स्वतः निर्णय घेण्यास त्याना मोकळे सोडले. त्याच्यामागे जाणाऱ्यांना जे सत्य त्याने सांगितले त्याचे महत्त्व आताही तितकेच आहे. त्यांच्याप्रमाणेच आजही आम्हाला देवाच्या राज्याची पायाभूत तत्त्वे शिकली पाहिजेत.DAMar 251.2

    डोंगरावरील प्रवचनात ख्रिस्ताने उद्गारलेले पहिलेच शब्द कृपाप्रसादाचे होते. जे आत्म्याने दीन व ज्यांना उद्धाराची गरज आहे ते धन्य आहेत असे त्याने म्हटले. शुभसंदेश गोरगरीबांना दिला पाहिजे. जे गबर आहेत आणि त्यांना कशाचीही गरज नाही असे म्हणणाऱ्या घमेंडखोरांना नाही तर विनम्र भग्नहृदयी मनुष्यांना सुवार्ता प्रगट करण्यात आली आहे. जे आत्म्याचे दीन आहेत त्यांना केवळ झरा खुला आहे.DAMar 251.3

    गर्वीष्ठ अंतःकरण तारण प्राप्त करून घेण्यास धडपडते; परंतु आमचा स्वर्गासाठी हक्क आणि त्यासाठी आमची पात्रता ही दोन्हीही ख्रिस्ताच्या धार्मिकतेत आढळतात. जोपर्यंत मनुष्य स्वतःची दुर्बलता मान्य करीत नाही आणि स्वावलंबी वृत्ती निपटून टाकीत नाही, आणि देवाच्या वर्चस्वाला वश होत नाही तोपर्यंत त्याच्या उद्धारासाठी देव काही करू शकत नाही. त्या नंतरच देवाची देणगी त्याला लाभेल. गरजू व्यक्तीपासून तो काहीही मागे ठेवीत नाही. ज्याच्यामध्ये सकल पूर्णता वास करिते त्याचा ख्रिस्ताशी अनिबंध संबंध येतो. “कारण उच्च, परम थोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करितो, ज्याचे नाम पवित्र प्रभु आहे, तो असे म्हणतोः मी उच्च व पवित्र स्थानी बसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्रजनांच्या आत्म्याचे मी संजीवन करितो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करितो.” यशया ५७:१५.DAMar 252.1

    “जे शोक करितात ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल.” ह्या वचनाद्वारे पापाचा अपराध निपटून काढण्यासाठी शोक करण्यात सामर्थ्य आहे असे शिक्षण ख्रिस्त देत नाही. बहाणा करणे किंवा ऐच्छिक विनम्रता यांना तो मान्यता देत नाही. त्याने उल्लेखिलेल्या शोकामध्ये विषण्णता, खिन्नता आणि विलाप यांचा समावेश नाही. पापाबद्दल जेव्हा आम्हाला दुःख होते तेव्हा देवाची मुले होण्याचा प्रसंग लाभला म्हणून आम्ही आनंद केला पाहिजे.DAMar 252.2

    आमच्या पापाच्या कटु, अप्रिय परिणामाबद्दल आम्हाला खेद होतो; परंतु हा पश्चात्ताप नव्हे. पापासाठी खरा खेद पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे होतो. अंतःकरणाच्या अकृतज्ञ कृतीने उद्धारकाची उपेक्षा होऊन त्याचे मन दुखविले जाते आणि अनुतप्त अंतःकरणाने त्याला वधस्तंभाच्या चरणी आणले जाते हे पवित्र आत्मा प्रगट करितो. प्रत्येक पापी कृतीने ख्रिस्ताला नवीन इजा होते आणि ज्याला आम्ही भोसकले त्याला आमच्या पापाने दुःख वेदना दिल्याबद्दल आम्ही शोक करितो. अशा शोकाने आम्ही पापाचा त्याग करू.DAMar 252.3

    जगाच्या दृष्टीने असा खेद दुर्बलता समजला जाईल, परंतु ती अभंग श्रृखलाने अनुतापी व सनातन देव यांना घट्ट बाधणारी शक्ती आहे. पापाच्याद्वारे आणि अंतःकरणाच्या निष्ठुरतेमुळे हरवलेल्या चांगुलपणाचे देवाचे दूत त्या व्यक्तीच्या जीवनात पुनर्जीवन करीतात. अनुतप्त नेत्रातून ढाळलेले अश्रूपावित्र्याच्या सूर्यप्रकाशा अगोदर पडलेले पावसाचे थेंब आहेत. हा खेद व्यक्तीच्या अंतःकरणातील जीवंत झऱ्याच्या हर्षाची ललकारी करितो. “तू आपला देव परमेश्वर याच्या विरूद्ध केलेल्या पापाचा दोष आपल्या पदरी घे;” “मी तुजकडे रागाने पाहाणार नाही, कारण मी कृपाळू आहे असे परमेश्वर म्हणतो.’ यिर्मया ३:१३, १२. “सीयोनातील शोकग्रस्तास राखेच्याऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांस शोकाच्या ऐवजी हर्षरूपी तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्याऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे,’ असे त्याने नेमून दिले आहे. यशया ६१:३.DAMar 252.4

    दुःखात आणि कठीण प्रसंगी शोक करणाऱ्यासाठी समाधानाचे शब्द आहेत. पापाचा अनावार लाड करण्यापेक्षा मानहानी आणि आपत्तीच्या वेदनांनी निर्माण झालेला कडवटपणा बरा. आपत्तीद्वारे देव आमच्या स्वभावातील सतावणारा कलंक आमच्या निदर्शनास आणून देतो आणि त्याच्या कृपेने आम्ही तो कलंक पुसून काढू शकतो. आमच्या संबंधातील अज्ञात प्रकरणे आमच्यापुढे उघडी करण्यात आली आहेत आणि देवाचा सल्ला व दोषारोप आम्ही स्वीकारण्यामध्ये आमची परीक्षा आहे. परीक्षा होत असताना आम्ही चिडू नये व कुरकूर करू नये. आम्ही बंडाळी करू नये किंवा चिंता करीत बसू नये. देवासमोर आम्ही विनम्र झाले पाहिजे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्याला देवाचे मार्ग अंधूक, अस्पष्ट असतात. मानवी स्वभावाला ते अंधूक व निरूत्साही दिसतात. परंतु देवाचे मार्ग दयेचे आहेत आणि त्यांचा शेवट उद्धार आहे. अरण्यात असताना एलीया काय करीत होता हे त्याला समजत नव्हते, त्याने म्हटले आता जगणे पुरे आणि मरण आले तर बरे अशी त्याने प्रार्थना केली. कृपाळू देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही. एलीयाला अजून महान कार्य करायचे होते; आणि त्याच्या कार्याची समाप्ती झाल्यावर त्याचा नैराशेत व अरण्यातील निर्जनस्थानात नाश होणार नव्हता. मरणाच्या धुळीत त्याला खाली जायाचे नव्हते परंतु वैभवाने दिव्य रथातून स्वर्गीय राजासनाकडे वर उड्डाण करावयाचे होते.DAMar 253.1

    दुःखीताच्यासाठी देवाचे वचन हे आहे, “मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकाग्रस्तांचे समाधान करीन.” “मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन, मी त्यांचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन.’ यशया ५७:१८; यिर्मया ३१:१३.DAMar 253.2

    “जे सौम्य ते धन्य.’ ख्रिस्तामध्ये लुप्तप्राय असलेल्या सौम्यतेने पुढे येणाऱ्या संकटाना तोंड देताना ती संकटे कमी झालेली दिसतील. आपल्या प्रभूची नम्रता आपण धारण केल्यावर आमच्या दररोजच्या जीवनात येणाऱ्या किरकोळ, बारीक गोष्टी, तिरस्कारयुक्त नकार, छळ, उपद्रव यांचा आपणावर दुष्परिणाम होणार नाही याची खबरदारी घेऊ आणि त्यामुळे आमच्या आनंदावर खिन्नतेची छटा पडणार नाही. ख्रिस्ती व्यक्तीच्या उमद्या स्वभावाची साक्ष म्हणजे आत्मनिग्रह होय. ज्याला गैरवागणूक किंवा क्रूर वागणूक मिळते तो शांत व श्रद्धाळू राहात नाही तेव्हा तो त्याच्या जीवनात त्याचा (देवाचा) परिपूर्ण शीलस्वभाव व्यक्त करण्यास तो देवाचा हक्क लुबाडून घेतो. अंतःकरणाच्या विनम्रतेने ख्रिस्ताच्या अनुयायांना विजय मिळतो; स्वर्गीय दरबाराशी त्याचा सख्यसंबंध असल्याची ती खूण आहे. DAMar 253.3

    “परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो.’ स्तोत्र. १३८:६. ख्रिस्ताची विनम्र आणि सौम्य वृत्ती प्रगट करणाऱ्यांना देव मायेने वागवितो. जग त्याच्याकडे तिरस्काराने पाहील, परंतु देवाच्या दृष्टीने ते मोलाचे आहेत. ज्ञानी, प्रतिष्ठीत व परोपकारी कामात दंग असलेले, उत्साही, कष्टाळू एवढ्यानाचे स्वर्गाचे पारपत्रक मिळेल असे नाही. ख्रिस्ताच्या शाश्वत समक्षतेची याचना करणारे, आत्म्याचे दीन, अंतःकरणाचे विनम्र, देवाच्या आज्ञाप्रमाणे करणे ह्या जीवनातील महत्वाकाक्षा असलेल्याना मुबलक प्रवेश मिळेल. ज्यांनी आपली वस्त्रे धुतली आहेत आणि कोकराच्या रुधिरात शुभ्र केली आहेत त्यांच्यामध्ये त्यांची गणना होईल. “यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करितात; आणि राजासनावर बसलेला त्याजवर आपला मंडप करील.’ प्रगटी. ७:१५.DAMar 253.4

    “जे धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले ते धन्य.” आपण अपात्र, नालायक आहोत त्या मनस्थितीमुळे आम्हाला धार्मिकतेची भूक व तहान लागेल आणि ह्या बाबतीत निराशा होणार नाही. आपल्या अंतर्यामात ख्रिस्ताला स्थान देणाऱ्यांना त्याच्या प्रेमाची जाणीव होईल. देवाचा शीलस्वभाव अंगिकार करणारे संतोष पावतील, तृप्त होतील. ख्रिस्तावर मन केंद्रित करणाऱ्यांना देवाच्या पवित्र आत्म्याचे सहाय्य सतत लाभते. ख्रिस्ताच्या गोष्टी त्यांना तो दाखवितो. आपली नेत्रे ख्रिस्तावर स्थिरावल्यावर त्याच्या प्रतीमेशी आम्ही अनुरूप झाल्याशिवाय पवित्र आत्म्याचे कार्य थांबत नाही. प्रेम पावित्र्याने व्यक्ती प्रगल्भ होईल, उच्च कार्यप्राप्तीसाठी, स्वर्गीय गोष्टीतील ज्ञान संपादण्यासाठी क्षमता वृद्धिंगत होईल. त्यात काही उणे पडणार नाही. “जे धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.’DAMar 254.1

    जे दयाळू, त्यांच्यावर दया होईल, आणि अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहातील. प्रत्येक अमंगळ विचाराने आत्मा भ्रष्ट होतो, नैतिक मनस्थिती बिघडते, आणि पवित्र आत्म्याने मनावर पडलेला संस्कार पुसून काढण्याची नैसर्गिक प्रवृत्ती होते. त्याने आध्यत्मिक दृष्टी अंधुक होते त्यामुळे मनुष्याना देवाचे दर्शन होत नाही. अनुतप्त पाप्याची देव क्षमा करितो, परंतु आत्मा खराब होतो. आध्यात्मिक सत्य स्पष्ट समजण्यासाठी अशुद्ध आचार, विचार आणि उक्ती यांचा त्याग केला पाहिजे.DAMar 254.2

    विषयासक्त अशुद्धता आणि विधीसंस्काराने होणारी भ्रष्टता यांना मना करणाऱ्या ख्रिस्ताच्या वचनाचा त्याग यहूद्यानी जोरदाररित्या केला. स्वार्थाने देवाचे दर्शन होत नाही. हे सगळे सोडून दिल्याशिवाय जो देव प्रेमस्वरूप आहे त्याचे ज्ञान आम्हाला होत नाही. केवळ निस्वार्थी अंतःकरण, विनम्र व विश्वसनीय प्रवृत्ती परमेश्वराला “दयाळू व कनवाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर’ असा पाहील. निर्गम ३४:६. DAMar 254.3

    “शांती करणारे ते धन्य.’ ख्रिस्ताच्या शांतीचा प्रसव सत्यातून होतो. ते देवाशी सुसंगत आहे. देवाच्या नियमाशी जगाचे वैर आहे; पाप्यांचे वैर त्यांच्या निर्माणकर्त्याशी आहे; आणि परिणामी त्यांचे परस्पर वैर आहे. परंतु स्तोत्रकर्ता घोषीत करितो की, “तुझे शास्त्र प्रिय मानणाऱ्यांस फार शांती असते. त्यास कशाचाही अडखळा नाही.’ स्तोत्र. ११९:१६५. मानव शांतीचे उत्पादन करू करत नाही. व्यक्ती किंवा समाज यांच्या शुद्धीकरणासाठी आणि उन्नतीसाठी आखलेल्या मानवी योजनेने शांती उत्पन्न होणार नाही, कारण ते अंतःकरणाला पोहचू शकत नाहीत. केवळ ख्रिस्ताच्या कृपेनेच शांतीचा उपज होऊन ती चिरस्थायी होईल. ती अंतःकरणात रुजल्यावर कलह व झगडे, फाटाफूट यांना प्रोत्साहन देणाऱ्या मनोविकाराची हकालपट्टी होईल. “काटेऱ्यांच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल;” आणि जीवनातील ओसाड अरण्य, वाळवंट “उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.’ यशया ५५:१३; ३५:१.DAMar 254.4

    ह्या प्रवचनाने लोकसमुदाय आश्चर्यचकित झाला कारण परूशी लोकांचे नीतिबोध व उदाहरण कित्ता यांच्यात फार तफावत होती. ह्या जगातील दौलत प्राप्त करून घेणे व मनुष्यांची किर्ती आणि सन्मान साध्य करून घेणे ह्यात धन्यता आहे असा लोकांचा समज होता. “धर्मगुरू” असे संबोधून घेणे व ज्ञानी आणि धार्मिक अशी वाखाणणी करून घेऊन लोकांच्या समोर वावरणे फार सुखावह वाटत असे. हा सुखसौख्याचा मुकुट मानला गेला होता. परंतु लोकसमुदायासमोर येशूने जाहीर केले की अशा मनुष्यांना हाच जगिक लाभ आणि सन्मान मिळतो. खात्रीपूर्वक त्याने हे उद्गार काढिले आणि त्याच्या वचनात विश्वास पटविणारी शक्ती होती. लोक स्तब्ध झाले होते, त्यांच्यात भीती निर्माण झाली होती. संशयाने ते परस्पराकडे पाहू लागले. ह्या मनुष्याची शिकवण जर खरी आहे तर त्याच्यातून कोणाचा उद्धार होईल? ह्या असामान्य शिक्षकाला देवाच्या आत्म्याने प्रेरित केले आहे आणि त्याने व्यक्त केलेला अभिप्राय दैवी होता अशी अनेकांची खात्री झाली होती.DAMar 255.1

    खऱ्या सुखप्राप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत आणि ते कसे साध्य करून घेता येते ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण केल्यानंतर येशूने ह्यामधील त्यांच्या शिष्यांचे कर्तव्य दाखवून दिले कारण त्यांना देवाने निवडलेले शिक्षक म्हणून इतरांना धार्मिकतेच्या आणि अनंतकालीक जीवनाच्या मार्गात मार्गदर्शन करायचे होते. त्याला माहीत होते की त्यांच्या कार्यात निराशा, नाउमेद, येऊन निश्चयपूर्वक विरोध होईल आणि त्यांची नालस्ती करून त्यांची साक्ष झिडकारण्यात येईल. त्यांच्या कार्यसिद्धीसाठी त्यांना छळ, कारावास, नालस्ती, बेअब्रू आणि मरण यांना सामोरे जावयाचे होते, आणि त्याने पुढे म्हटले:DAMar 255.2

    “धार्मिकतेकरिता ज्याचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हाविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; तुम्हापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.” DAMar 255.3

    जग पापावर प्रेम करते आणि धार्मिकतेचा द्वेष करते आणि ह्या कारणामुळे येशूशी त्याचे वैर आहे. त्याच्या अपरिमीत प्रेमाचा नाकार करणाऱ्याला ख्रिस्ती धर्म शांतता भंग करणारा वाटतो. ख्रिस्ताच्या प्रकाशाने त्यांची पापे उघडी होतात आणि सुधारणा होण्याची गरज व्यक्त करण्यात येते. पवित्र आत्म्याच्या प्रभावाला वश होणाऱ्यांच्या मनात स्वतःशीच संग्राम सुरू होतो आणि पापाशी चिकटून राहाणारे सत्याशी व त्याच्या प्रतिनिधीशी झगडा करितात.DAMar 255.4

    अशा रीतीने झगड्याला सुरूवात होते आणि ख्रिस्ताच्या अनुयायांना त्रासदायक लोक म्हणून दोष देण्यात येतो. परंतु देवाशी असलेली त्यांची संगत सोबत ह्यामुळे जग त्यांच्याकडे वैरभावाने पाहाते. ख्रिस्ताबद्दल त्यांना दोष देण्यात येतो. जगातील उमद्या स्वभावाच्या व्यक्तीने जी वाट पायाखाली घातली त्या वाटेने ते चालत आहेत. दुःखी अंतःकरणाने नव्हे तर उल्हासाने त्यांनी छळाला तोंड दिले पाहिजे. प्रत्येक कसोटी त्यांच्या सुधारण्यासाठी देवाचे साधन आहे, त्याद्वारे ते देवाचे सहकामदार म्हणून लायक होतात. धार्मिकतेसाठी चाललेल्या लढ्यात प्रत्येक संघर्षाला स्थान आहे, आणि त्याद्वारे अखेरच्या विजयात प्रत्येक संघर्ष आनंदाचा भाग उचलेल. हा विचार मनात ठेवल्यास त्यांचा विश्वास आणि धीर यांची कसोटी होत असताना भीती वाटून ते टाळण्याऐवजी आनंदाने, हर्षाने त्याला तोंड द्यावे. जगाशी असलेले आपले कर्तव्य पार पाडीत असताना, आणि देवाची मान्यता मिळविण्याची इच्छा करून त्याच्या सेवकांनी मनुष्याची भीती किंवा पसंती न मानता प्रत्येक कर्तव्य सिद्धीस नेले पाहिजे.DAMar 256.1

    येशूने म्हटले, “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा.” छळ टाळण्यासाठी जगातून पळून जाऊ नका. तुमचा निवास लोकामध्येच असला पाहिजे, त्याद्वारे दैवी प्रेमाची रुचि मिठासारखी होऊन जग भ्रष्टतेपासून वाचले जाईल.DAMar 256.2

    पवित्र आत्म्याच्या प्रभावाला प्रतिसाद देणाऱ्यांच्याद्वारे देवाचा कृपाप्रसाद वाहातो, पसरतो. देवाची सेवा करणाऱ्यांना ह्या पृथ्वीतून काढून घेतले, आणि त्याच्या आत्म्याने मनुष्यातून माघारी घेतली तर हे जग नाशाप्रत जाऊन निर्जन होईल. सैतानाच्या साम्राज्याचे ते फळ होईल. ज्या देवाच्या लोकांचा त्यांनी तिरस्कार करून गांजवणूक केली त्यांच्या ह्या जगातील उपस्थितीमुळे दुष्ट लोकांना आशीर्वाद लाभला आहे. ही गोष्ट दुष्ट लोकांना कदाचित माहीत नसेल. परंतु ते जर केवळ नामधारी ख्रिस्ती आहेत तर खारटपणा गेलेल्या मिठासारखे ते आहेत. ह्या जगात सात्त्वीकतेसाठी त्याचा प्रभाव नाही. देवाविषयी विपर्यस्त प्रतिनिधीत्व केल्याने ते अंश्रद्धावंतापेक्षा दुष्ट बनतात.DAMar 256.3

    “तुम्ही जगाचा प्रकाश आहा.” तारणाचा फायदा केवळ त्यांच्या राष्ट्रासाठीच व्हावा असे यहूद्यांना वाटत होते; परंतु तारण हे सूर्यप्रकाशासारखे आहे असे येशूने दाखविले. बायबलचा धर्म ग्रंथाच्या मलपृष्ठात किंवा चर्चच्या भीतीत मर्यादीत नाही. आपल्या लाभासाठी प्रसंगानुसार कधीमधी त्याला बाहेर काढायचा आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या त्याला बाजूला ठेवायचा असे व्हायला नको. दररोजचे जीवन त्याद्वारे शुचिर्भूत झाले पाहिजे, प्रत्येक उद्योगधंद्यातील व्यवहारामध्ये आणि सगळ्या सामाजीक संबंधामध्ये तो व्यक्त केला पाहिजे.DAMar 256.4

    खऱ्या शीलस्वभावाला आकार बाहेरून येत नाही तर आतून येते. धार्मिकतेची दिशा दुसऱ्याला दाखवायची आहे तर धार्मिकतेची तत्त्वे प्रथम आमच्या अंतःकरणात जतन करून ठेविली पाहिजेत. आमची श्रद्धा धर्माची तात्त्विक भूमिका जाहीर करील, परंतु आमच्या व्यावहारीक धर्मनिष्ठेद्वारे सत्य वचन पुढे करण्यात येते. सुसंगत जीवन पद्धत, पवित्र संभाषण, अढळ प्रामाणिकपणा, उत्साही, कार्यक्षम, परोपकारबुद्धी, ईश्वरनिष्ठा ह्या माध्यामाद्वारे जगाला प्रकाश देण्यात येतो. DAMar 257.1

    येशूने नियमाविषयी खुलासेवार माहिती दिली नाही, परंतु हक्काने करावयाच्या आवश्यक गोष्टी त्याने रद्द केल्या हा समज त्याने श्रोतेजनांना दिला नाही. त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी मिळालेला प्रत्येक शब्द पकडण्यास हेर तयार आहेत हे त्याला माहीत होते. श्रोत्यामधील अनेकांच्या मनात त्याच्याविषयी दुराग्रह आहे आणि मोशेद्वारे त्यांना मिळालेला धर्म आणि विधि, नियम यांच्यावरील त्यांची श्रद्धा डळमळीत होण्यासाठी त्याने आपल्या प्रवचनात काही उद्गार काढिले नाहीत हे त्याला माहीत होते. नैतिक नियम व विधि नियम हे दोन्हीही ख्रिस्ताने स्वतः दिले आहेत. स्वतःच्या शिकवणीवरील त्यांचा विश्वास उध्वस्त करण्यासाठी तो आला नव्हता. नियमशास्त्र व संदेष्टे यांच्याविषयी त्याला आदर असल्यामुळे यहूद्यांच्या अंगात मुरलेला सांप्रदाय, परंपरा यांची भींत तोडण्याचा त्याने प्रयत्न केला. नियमाला लावलेला चुकीचा अर्थ त्याने बाजूला ठेवला त्याचवेळी हिब्रू लोकांना दिलेल्या सत्यापासून दूर राहाण्यास शिष्यांना मार्गदर्शन करण्याचा त्याने प्रयत्न केला.DAMar 257.2

    त्यांच्या इच्छेप्रमाणे नियमाचे आज्ञापालन करण्यात परूश्यांना अभिमान वाटत होता; तथापि दररोजच्या व्यवहारात त्यांच्या तत्त्वाविषयी त्यांना अपुरे ज्ञान होते आणि त्यामुळे उद्धारकाचे प्रवचन त्यांना पाखंडी मत वाटले. ज्याच्याखाली सत्य झाकून टाकिले होते ती घाण त्याने झाडून टाकिल्यावर त्याना वाटले की तो सत्यसुद्धा झटकून टाकितो की काय. नियमाचे त्याला काही गांभिर्य वाटत नाही असे ते एकमेकात कुजबुजू लागले. त्याने त्यांची मने ओळखली आणि त्यांना उत्तर देऊन म्हटले: DAMar 257.3

    “नियमशास्त्र व संदिष्टशास्त्र ही रद्द करावयास मी आलो असे समजू नका; रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलो आहे.” येथे येशू परूश्यांच्या दोषांचे खंडन करितो, निराकरण करितो. नियमशास्त्राचे जगापुढे समर्थन करणे हे त्याचे कार्य होते. देवाच्या नियमात बदल केला असता किंवा तो रद्द केला असता तर आमच्या पापाचा परिणाम ख्रिस्ताला सोसण्याची काही आवश्यकता नव्हती. नियमशास्त्राचे मनुष्याशी असलेले नाते स्पष्ट करून सांगण्यास आणि स्वतःच्या आज्ञापालनाद्वारे त्याची तत्त्वे उदाहरणाने प्रगट करण्यास तो आला. DAMar 257.4

    देवाचे मानवावर प्रेम आहे म्हणून त्याने आपले पवित्र नियमशास्त्र दिले. आज्ञाभंगाच्या परिणामापासून आम्हाला सुरक्षीत ठेवण्यासाठी त्याने धार्मिकतेची तत्त्वे प्रगट केली. नियम देवाच्या विचाराचे प्रगटीकरण आहे; ख्रिस्ताला अंतर्यामात अंगिकारल्यास तो आमचा विचार बनतो. तो आम्हाला स्वाभाविक इच्छा, आकांक्षा, कल आणि पापात पाडणारे मोह याच्यापासून वर उचलतो, उन्नती करितो. आम्ही सुखी राहावे ही देवाची इच्छा. त्याच्या आज्ञा पाळून आम्ही सुखमय, आनंदी जीवन जगावे म्हणून त्याने आम्हाला त्याचे नियम दिले. येशूच्या जन्माच्यावेळी जेव्हा दुतांनी गाईले -DAMar 257.5

    “ऊर्ध्वलोकी दैवाला गौरव, DAMar 258.1

    आणि पृथ्वीवर मनुष्यात शांतीDAMar 258.2

    त्याजवर त्याचा प्रसाद झाला आहे.” (लूक २:१४), DAMar 258.3

    तेव्हा ते नियमाची तत्त्वे घोषीत करीत होते. धर्मशास्त्राची महती व थोरवी वाढविण्यासाठी तो जगात आला.DAMar 258.4

    सिनाय पर्वतावरून आज्ञा दिल्या तेव्हा देवाने मानवाला त्याच्या शीलस्वभावाच्या पावित्र्याचा समज दिला, आणि त्याच्याशी तुलना करून त्यांनी स्वतःचा पापी स्वभाव समजून घ्यावा. त्यानी पापाची खात्री करून घेण्यासाठी आणि त्यांना उद्धारकाची गरज आहे हे प्रगट करण्यासाठी नियम दिले होते. त्याच्या तत्त्वाचा पवित्र आत्म्याद्वारे अंतःकरणाशी संबंध आल्यावर हे शक्य होईल. हे काम अजून करायचे आहे. नियमाची तत्त्वे ख्रिस्ताच्या जीवनात स्पष्ट करण्यात आली आहेत; आणि जरी पवित्र आत्मा अंतःकरणाला स्पर्श करितो, ख्रिस्ताचा प्रकाश मनुष्याला शुद्ध करणाऱ्या त्याच्या रुधिराची आणि नीतिमान ठरविणाऱ्या त्याच्या धार्मिकतेची आवश्यकता असल्याचे प्रगट करितो, तरी आम्हाला ख्रिस्ताकडे आणणारे साधन नियम आहे, आणि आम्ही विश्वासाने नीतिमान होतो. “परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनर्जीवन करिते.” स्तोत्र. १९:७.DAMar 258.5

    येशूने म्हटले, “आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावाचून नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंद नाहीसा होणार नाही.’ वर आकाशात सूर्य प्रकाशतो, ह्या भक्कम पृथ्वीवर तुम्ही निवास करिता, ही देवाचे नियम न बदलणारे व अनंतकालीक आहेत यांची साक्ष देणारे देवाचे साक्षीदार आहेत. जरी ते निघून गेले तरी दिव्य नियम टिकून राहातील. “नियमशास्त्राचा एक फाटा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे हे सोपे आहे.’ लूक १६:१७. येशू देवाचा कोकरा आहे हे दर्शविणारी रचनाबद्ध पद्धत त्याच्या मरणाच्यावेळी रद्द होणार होती; परंतु दहा आज्ञातील नियम देवाच्या सिंहासनासारखे न बदलणारे आहेत.DAMar 258.6

    ज्याअर्थी “देवाचे नियमशास्त्र पूर्ण आहे,” त्याअर्थी त्यापासून केलेली प्रत्येक तफावत वाईट दुष्ट असली पाहिजे. देवाच्या आज्ञाचे पालन न करणारे दुसऱ्यांनाही आज्ञाभंग करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल ख्रिस्ताने त्याना दोषी ठरविले. उद्धारकाचे आज्ञाधारक जीवन आज्ञांचे समर्थन करिते. त्याद्वारे मनुष्य आज्ञा पाळू शकतो हे सिद्ध होते, आणि आज्ञापालनाद्वारे उत्कृष्ट शीलसंवर्धन होते. त्याच्या प्रमाणे आज्ञापालन करणारे जाहीर करीतात की, “आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे.’ रोम ७:१२. उलटपक्षी आज्ञाभंग करणारे आज्ञा अन्यायी आहेत आणि त्या पाळू शकत नाही ह्या सैतानाच्या आरोपाला दुजोरा देतात. अशा रीतीने ते प्रतिपक्षाला, शत्रूला अनुमोदन देतात आणि देवाची अवहेलना करितात. देवाच्या नियमाविरूद्ध प्रथम बंड करणाऱ्या दुष्टाची ते प्रजा आहे. अशांना स्वर्गात प्रवेश दिल्याने तेथे पुन्हा बेबनाव व बंडाळी होऊन विश्वाचे कल्याण धोक्यात येईल. जाणून बुजून देवाच्या नियमाचा अवमान करणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही.DAMar 258.7

    धर्मगुरूंनी त्यांची धार्मिकता स्वर्गाला जाण्याचे पारपत्र असल्याचे समजले होते; परंतु ते पुरेसे आणि पात्र-लायक नाही असे येशूने विदित केले. बाह्यात्कारी विधिसंस्कार आणि तत्त्वावर आधारलेले सत्याचे ज्ञान (प्रत्यक्ष कृतीवर नव्हे) ही परूश्य-प्रेरित धार्मिकता आहे. स्वतःच्या हिंमतीवर आज्ञापालन करून धर्मगुरू स्वतःला पवित्र सात्विक समजत असत; परंतु त्यांच्या कृतीत धर्मापासून धार्मिकतेला निराळे केले होते. विधिसंस्कार पाळण्यात ते जरी अगदी कडक होते तरी त्यांचे जीवन अनीतीचे, दुर्व्यसनी आणि हिणकस होते. त्यांच्या समजल्या गेलेल्या धार्मिकतेने स्वर्गाच्या राज्यात प्रवेश केव्हाही होणार नाही.DAMar 259.1

    सत्याला निवळ रूकार देणे (अनुमति) यामध्ये धार्मिकता सामावलेली आहे अशी विचारसरणी ख्रिस्ताच्या काळात मोठी फसवणूक होती. मनुष्याच्या जीवनातील अनुभवावरून, तत्त्वावर आधारलेले सत्याचे ज्ञान उद्धारकार्यात कमी पडते हे सिद्ध करण्यात आले आहे. त्याद्वारे धार्मिकतेची फलनिष्पति होत नाही. विद्यालयात अध्ययन केलेला ईश्वरविषयक सत्य ज्ञानाचा उपासक याच्या ठायी सहसा जीवनात व्यक्त केलेल्या विश्वसनीय सत्याविषयी द्वेषबुद्धी असते. फाजील धर्माभिमान्यांच्या क्रूर गुन्हेगारीने इतिहासातील प्रकरणे काळोखाने भरली आहेत. आब्राहामाचे वंशज असल्याचे परूशी घोषीत करतात आणि त्यांना देवाचा सल्ला मिळालेला आहे अशी फुशारकी मारतात. तथापि त्यामुळे आपमतलबीपणा, तीव्र मत्सर, घातकीपणा, लोभ आणि निकृष्ट ढोंगीपणा यापासून त्यांना संरक्षण लाभले नाही. सर्व जगात ते महान धर्मनेते आहेत असे त्यांना वाटत होते परंतु त्यांच्या सनातन मतवादी वृत्तीने वैभवी प्रभूला वधस्तंभावर खिळिले.DAMar 259.2

    सद्याही तोच धोका आहे. काही ईश्वरविषयक अल्पसे ज्ञान संपादन केल्यावर ते स्वतःला ख्रिस्ती समजतात, परंतु ती सत्यवचने त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणिली नाहीत. त्याच्यावर त्यांची श्रद्धा नव्हती पवित्रिकरणामुळे सामर्थ्य आणि कृपा मिळते ती त्यांना लाभली नाही. मनुष्य सत्यावर विश्वास असल्याचे सांगतील; परंतु त्याद्वारे ते जर खरा कळवळा असणारा, कृपाळू, सहनशील, सात्वीक, स्वर्गीय विचारसरणीचे बनत नाहीत तर ते शापीत होतात आणि त्यांच्याद्वारे ते जगाला शापीत करतात.DAMar 259.3

    प्रगट केलेल्या देवाच्या इच्छेला अंतःकरण आणि जीवन याच्याद्वारे बळकटी आणणे, किंवा समर्थन करणे ही ख्रिस्ताने शिकविलेली धार्मिकता आहे. देवावर विश्वास ठेवून त्याच्याशी अति महत्त्वाचा आणि आवश्यक संबंध प्रस्थापित केल्याने पापी मनुष्य धार्मिक बनू शकतात. त्यानंतर खऱ्या देवभक्तीने विचार भारदस्त होऊन जीवित उदात्त होईल. बाह्यात्कारी धर्म ख्रिस्ती व्यक्तीच्या अंतरीय पावित्र्याशी जुळून येईल, जम बसेल. देवाच्या सेवेत आवश्यक असलेले विधि ढोंगी परूश्याच्या विधीसारखे अर्थहीन राहाणार नाहीत.DAMar 260.1

    येशू आज्ञा अलग अलग घेऊन त्यावर सविस्तर विवरण करून सखोल अर्थ सांगतो. आज्ञातील एकादी मात्रा काढून टाकण्याऐवजी त्यातील तत्त्वे किती दूर पोहंचणारी, अर्थपूर्ण असल्याचे दाखवितो, आणि बाह्यात्कारी देखावा केलेले यहूद्यांचे आज्ञापालन तो उघड करितो व त्यांची चूक दाखवितो. वाईट विचाराने आणि विषयासक्त दृष्टीने देवाची आज्ञा मोडली जाते हे त्याने जाहीर केले. अन्यायाशी सामील झाल्याने आज्ञा मोडली जाते आणि त्याद्वारे स्वतःची नैतिक पातळी खालावली जाते. खूनाचा उपज प्रथम मनात होतो. मनात मत्सर, द्वेष बुद्धी बाळगणारा खून करणाऱ्याच्या वाटेवरून चालतो, आणि त्याचे दान, देणगी देवाला तिरस्कारणीय आहे.DAMar 260.2

    यहूद्यांनी सूडबुद्धीच्या भावनेची मशागत केली. रोमी लोकाविषयी असलेल्या मत्सराबद्दल त्यांनी उघडपणे तीव्र दोषारोप केला आणि दुष्टाचे गुणगौरव करून त्याला खूष केले. अशाप्रकारे भयंकर कृत्ये करण्यासाठी ते स्वतः प्रशिक्षण घेत होते. असंस्कृत लोकांना धार्मिकतेचे, धर्मनिष्ठतेचे धडे देण्यास परूश्यांच्या धार्मिक जीवनात काहीच नव्हते. त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याविरुद्ध उठून त्यांच्या चुकीबद्दल सूड घेण्याच्या विचाराने स्वतःची फसवणूक करून घेऊ नका असे येशूने त्यांना सांगितले होते.DAMar 260.3

    ख्रिस्ताच्या अनुयायांच्या बाबतीत सुद्धा अन्यायाच्या गोष्टी पाहिल्यावर संताप येणे समर्थनीय आहे हे खरे आहे. जेव्हा देवाचा अपमान करण्यात येतो, त्याच्या सेवेची अप्रतिष्ठा होते, निरापराध्याला अत्यंत निष्ठुरतेने आणि अन्यायाने वागविण्यात येते ते सर्व पाहिल्यावर सात्त्वीक संतापाने मन खवळून जाते. संवेदनाक्षम नैतिक आचारातून प्रसव पावलेला संताप पाप नाही. परंतु लहान सहान चिथावणीने संताप व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य घेतात ते सैतानाच्या प्रवेशासाठी आपले अंतःकरण खुले ठेवतात. शत्रूत्व आणि अंतःकरणाचा कडवटपणा काढून टाकिला पाहिजे त्यानंतरच आम्ही स्वर्गाशी जुळते घेऊ.DAMar 260.4

    उद्धारक यापेक्षा अधिक सांगतो. तो म्हणतो, “यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता, आपण आपल्या भावाचे अपराधी आहो असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.” अनेकजन धार्मिक कार्यात फार आवेशी आहेत, परंतु भावाभावातील असलेले मतभेद त्यांनी मिटवून समेट करावा. त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यानी एकोपा करावा अशी देवाची अपेक्षा आहे. ते हे करीपर्यंत तो त्यांची सेवा मान्य करीत नाही. ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य येथे स्पष्टपणे दाखविण्यात आले आहे.DAMar 260.5

    देव सगळ्यावर आपला कृपाप्रसादाचा वर्षाव करितो. “तो वाईटावर आणि चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि धार्मिकावर व अधार्मिकावरही पाऊस पाडितो.” “तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे.’ लूक ६:३५. त्याच्यासमान आम्ही व्हावे म्हणून तो आम्हाला पाचारण करितो. त्याने म्हटले, “जे तुम्हास शाप देतात त्यांस आशीर्वाद द्या. जे तुमची निर्भर्त्सना करितात त्याच्यासाठी प्रार्थना करा; म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हाल.” नियमशास्त्राची ही मूलतत्त्वे आहेत आणि ते जीवनाचे झरे आहेत.DAMar 261.1

    मानवी अत्युच्च विचारसणीपेक्षा वरचढ व्हावे हा नमुनेदार आदर्श देवाने आपल्या लोकांपुढे ठेवलेला आहे. “यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा.” हा आदेश अभिवचन आहे. सैतानी सत्तेतून आमची पूर्ण मुक्तता करणे यावर तारणाची योजना गंभीर विचार करिते. ख्रिस्त नेहमीच अनुतापी व्यक्तीला पापापासून वेगळे करितो. सैतानी कृत्य उध्वस्त करण्यासाठी ख्रिस्ताचे आगमन झाले आहे आणि अनुतापी व्यक्तीला पापावर मात करण्यासाठी पवित्र आत्म्याचे सहाय्य देण्याची तरतूद त्याने करून ठेवली आहे.DAMar 261.2

    एका चुकीच्या कृतीबद्दल भुरळ पाडण्यास वारण्यात आलेले साधन निमित्त होते असे म्हणू नये. ख्रिस्ताचे अनुयायी त्यांच्या स्वभावातील उणीवतेसाठी निमित्त सांगतात तेव्हा सैतान हर्षाने जयघोष करितो. ही निमित्ते पापात पडण्यास कारणीभूत होतात. पाप करण्यास कोणतेच निमित्त देता येत नाही. पवित्र, गोड स्वभाव, ख्रिस्तासम जीवन देवाच्या प्रत्येक अनुतापी, श्रद्धावंत पुत्राला सुसाध्य आहे.DAMar 261.3

    आदर्श, नमुनेदार ख्रिस्ती स्वभाव ख्रिस्तासारखा आहे. मानवपुत्र आपल्या आयुष्यात जसा पूर्ण होता तसेच त्याच्या अनुयायांनी-भक्तांनी त्याच्या आयुष्यात पूर्ण झाले पाहिजे. येशू सर्व बाबतीत त्याच्या बांधवाप्रमाणे होता. आमच्याप्रमाणे तो देही होता. त्याला भूक, तहान लागत होती, तो थकत होता. अन्नाने त्याचे पोषण होत होते आणि झोपेने त्याला तरतरी वाटत होती. मनुष्याच्या वाट्याला आलेले सर्व त्याने अनुभविले; तथापि तो निष्कलंक देवपुत्र होता. तो देही असून देव होता. त्याचा शीलस्वभाव आमचा असला पाहिजे. त्याच्यावर निष्ठा असणाऱ्याविषयी प्रभु म्हणतो, “मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.’ २ करिंथ. ६:१६.DAMar 261.4

    ख्रिस्त याकोबाने पाहिलेले शिडी आहे, ती पृथ्वीवर ठेवली असून तिचा वरचा शेंडा स्वर्गातील दरवाजाला, वैभवाच्या उंबरठ्याला टेकला होता. पृथ्वीवर टेकण्यास ती शिडी एका पायरीने कमी भरली असती तर आमचा निश्चित नाश झाला असता. परंतु आम्ही असलेल्या ठिकाणी ख्रिस्त दाखल होतो, पोहंचतो. त्याने आमचा स्वभाव घेतला व विजयी झाला अशासाठी की आम्ही त्याचा स्वभाव धारण करून विजयी व्हावे. “पापमय देहासारख्या देहाने” त्याला बनविले (रोम ८:३), आणि तो निष्पापी जीवन जगला. सद्या तो आपल्या देवत्वाने स्वर्गीय सिंहासनाला घट्ट धरितो आणि त्याच वेळी तो आपल्या मानवतेने आम्हाला भिडतो. त्याच्यावरील विश्वासाने देवाच्या शीलस्वभावाच्या वैभवापर्यंत पोहचण्यास तो आम्हाला आदेश देतो. म्हणून आमचा “स्वर्गीय पिता जसा पूर्ण आहे” तसे आम्ही पूर्व व्हावे काय.DAMar 261.5

    धार्मिकतेमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत हे सांगून त्यांचा उगम देव आहे हे ख्रिस्ताने दाखविले होते. आता तो प्रत्यक्ष व्यवहारातील कर्तव्याकडे वळतो. दानधर्म करणे, प्रार्थना, उपवास यांच्याविषयी तो म्हणतो, स्वतःकडे आकर्षीत करून घेण्यासाठी किंवा स्वतःची स्तुती करण्यासाठी काहीही करू नये. प्रामाणिकपणे मनापासून सोसीक गरीबाच्या कल्याणासाठी दानधर्म करा. प्रार्थनेत देवाशी तुम्ही हितगुज करा, मनातल्या गोष्टी बोला. उपावस करिताना ढोंग्यासारखे खालीमान घालून म्लानमुख होऊ नका आणि स्वतःचाच विचार करू नका. परुश्यांचे अंतःकरण ओसाड आणि नापीक आहे आणि त्यामध्ये दिव्य जीवनाचे बी उगवू शकत नाही. जो देवाला बिनधोका शरण जातो तोच त्याची मनापासून स्वीकारणीय सेवा करील. देवाशी जोडीदारी करून काम केल्याने मानवामध्ये त्याचा स्वभाव प्रगट करण्यात येतो. DAMar 262.1

    मनापासून केलेल्या सेवेचे प्रतिफळ मोठे आहे. “तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.’ ख्रिस्त कृपाछत्राखाली कंठलेल्या जीवनाद्वारे शीलसंवर्धन होते. मूळच्या लावण्यपूर्ण जीवनाची पुनर्स्थापना होण्यास सुरूवात होते. ख्रिस्ताच्या शीलस्वभावातील स्वाभाविक गुणधर्म देण्यात येतात आणि दिव्य प्रतिमा चमकायला लागते. देवाच्या समवेत चालणाऱ्या आणि कार्य करणाऱ्या स्त्री-पुरुषाच्या चेहऱ्यावर दिव्य शांतीची छटा दिसते. स्वर्गीय वातावरण त्यांच्यासभोवती वेष्टिलेले आहे. ह्या वक्तींच्या जीवनात देवाच्या साम्राज्याला सुरूवात झाली आहे. त्यांच्या जीवनात ख्रिस्ताचा आनंद येतो, परव्यक्तीला कृपाप्रसाद झाल्याचा आनंद त्यांना लाभतो. प्रभूच्या उपयुक्ततेसाठी त्यांचा स्वीकार केल्याचा मान मिळाल्याबद्दल आणि त्याचे काम करण्यास त्याच्यावर विश्वास दर्शविल्याबद्दल त्यांना धन्यता वाटते.DAMar 262.2

    “कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही.” दुभागलेल्या अंतःकरणाने आम्ही देवाची सेवा करू शकत नाही. बायबलचा धर्म इतर बळातील हे एक नैतिक बळ नाही; त्याचा प्रभाव, बळ सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याने दुसऱ्यांना वेढून नियंत्रित केले आहे. जाड्याभरड्या कापडावर किंवा किंतानावर इकडे तिकडे शिंपडलेला तो रंग नव्हे; परंतु जणू काय ते किंतान रंगात संपूर्णपणे भिजवून प्रत्येक धागा रंगविल्याप्रमाणे संपूर्ण जीवन त्याने वेढिले पाहिजे.DAMar 262.3

    “ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमान होईल. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल.’ देवाचा प्रकाश मिळण्यासाठी उद्देशाचे पावित्र्य आणि स्थैर्य, खंबीरपणा ह्या अटी आहेत. सत्याचे ज्ञान करून घेण्याची इच्छा असलेल्याने त्याने प्रगट केलेले सर्व स्वीकारण्यास तयारी दाखविली पाहिजे. तो चूकाशी तडजोड करू शकत नाही. सत्याच्या बाबतीत द्विधा मनःस्थिती राखून हेलकावे खाणे म्हणजे चुकीचा अंधार आणि सैतानी भ्रांतीचा स्वीकार करणे होय.DAMar 263.1

    जगिक धोरण आणि धार्मिकतेची मुलभूत तत्त्वे इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे एकजीव होऊ शकत नाहीत. सनातन परमेश्वराने ह्या दोहोमध्ये स्पष्ट जाड रेखा मारून फरक दाखविला आहे. मध्यरात्र आणि दुपार यांच्यामध्ये जसा फरक आहे तसा ख्रिस्त आणि सैतान यांच्या सारखेपणातील फरक स्पष्ट आहे. ख्रिस्तामध्ये निवास करणारेच केवळ त्याचे सहकामगार आहेत. जरी एकच पाप हृदयात जतन करून ठेविले किंवा एकच चूकीची संवय जीवनात राखून ठेविली तर सर्व शरीर दूषित होते. तो मनुष्य अधर्माचा हस्तक बनतो. DAMar 263.2

    ज्यानी देवाची सेवा करण्याचे निवडिले आहे त्यांनी त्याच्या आस्थेत निचिंत राहिले पाहिजे. आकाशात भ्रमण करणाऱ्या पक्ष्याकडे, शेतातील फुलाकडे पाहाण्यास ख्रिस्ताने सांगितले. ती देवाची उत्पत्ति आहे असे त्याने श्रोतेजनाला म्हटले. “तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही?” मत्तय ६:२६. तपकिरी रंगाची लहानशी चिमणी पाहा, देव तिची काळजी वाहतो. रानातील भूकमळे, जमिनीवर पसरलेले गवत पाहा, ह्या सर्वांची काळजी स्वर्गीय पिता घेतो. महान कलाकाराने भूकमळाच्या आकर्षक सौंदर्यामध्ये इतकी गोडी घेतली की शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारिखा सजला नव्हता, देवाच्या प्रतिमेत निर्माण केलेला मनुष्य याची देव किती काळजी घेईल. त्याच्या पुत्र व कन्यांनी त्याचा शीलस्वभाव प्रगट करावा अशी त्याची अपेक्षा आहे. सूर्यप्रकाश किरणाने फुलाचे विविध रंग मनोरम व मोहक बनतात त्याप्रमाणेच देव व्यक्तीला आपल्या स्वभावाच्या सौंदर्याने सुशोभीत करितो.DAMar 263.3

    प्रीती, शांती आणि धार्मिकता यांचे वास्तव्य असलेल्या ख्रिस्ताच्या साम्राज्याची जे निवड करितात आणि इतर सर्व गोष्टीमध्ये त्याला वरचढ स्थान देतात त्यांचा संबंध स्वर्गाशी येतो आणि ह्या जगात आवश्यक असलेला सर्व कृपाप्रसाद त्यांना लाभतो. देवाच्या महान ग्रंथामध्ये आम्हा प्रत्येकासाठी एक पान राखून ठेविले आहे. त्या पानावर आमच्या जीवनाचा सविस्तर इतिहास लिहिला आहे; आमच्या डोक्याच्या केसाची गणतीही करण्यात आली आहे. देवाच्या लोकांचा त्याला केव्हाही विसर पडत नाही.DAMar 263.4

    “यास्तव उद्याची काळजी करू नका.” मत्तय ६:३४. प्रतिदिनी आम्ही ख्रिस्ताला अनुसरले पाहिजे. उद्यासाठी देव मदतीचा हात पुढे करीत नाही. त्यांचा गोंधळ उडू नये म्हणून त्यांच्या जीवनयात्रेसाठी आपल्या लोकांना तो एकाच वेळी सगळी माहिती देत नाही. त्यांची आठवण ठेवण्याची व कार्य करण्याची क्षमता आहे त्याप्रमाणे तो त्यांना सांगतो. चालू निकडीच्या प्रसंगासाठी तो त्यांना शक्ती व शहाणपणा देतो. आज “जो कोणी ज्ञानाने उणा असेल त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वास दातृत्वाने देतो.” याकोब १:५.DAMar 263.5

    “तुमच्या न्याय होऊ नये म्हणून न्याय करू नका.” दुसऱ्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहो असे समजून दुसऱ्याचा न्याय करीत बसू नका. दुसऱ्याच्या मनातील हेतूचे कारण तुम्हाला माहीत नसल्यामुळे दुसऱ्याचा न्याय करण्यास तुम्ही कार्यक्षम नाही. त्याच्यावर टीका करण्याने तुम्ही स्वतःला दोषी ठरविता, कारण तुम्ही बंधूना दोष देणाऱ्या सैतानाचे सहकारी बनता. प्रभु म्हणतो, “तुम्ही विश्वासात आहा किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा.” हे आमचे कर्तव्य आहे. “जर आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता.’ २ करिंथ. १३:५; १ करिंथ. ११:३१.DAMar 264.1

    प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते. जर फळ बेचव व टाकाऊ आहे तर ते झाड वाईट आहे. ज्या प्रकारची आम्ही फळे देतो त्यावरून आमच्या अंतःकरणाची परिस्थिती आणि आमच्या स्वभावाचा उत्कृष्टपणा कळून येतो. सत्कृत्याने तारण साध्य केव्हाही होत नाही परंतु तो प्रेमाने कार्यरत झालेल्या विश्वासाचा पुरावा आहे आणि त्याद्वारे आत्म्याचे शुद्धिकरण होते. जरी आमच्या चांगलेपणाबद्दल शाश्वत पारितोषीक देण्यात येत नाही तरी ख्रिस्त कृपेने ज्या प्रमाणात कार्य केले आहे त्या प्रमाणात ते असेल.DAMar 264.2

    अशाप्रकारे ख्रिस्ताने आपल्या राज्याची पायाभूत तत्त्वे सादर करून ती जीवनाचे प्रमाण असल्याचे दर्शविले. त्याचा मनावर परिणाम होण्यासाठी उदाहरणे देऊन तो ते विशद करितो. माझी वचने ऐकणे पुरेसे नाही असे तो म्हणतो. आज्ञापालनाद्वारे त्यांना तुमच्या स्वभावाचा मूळ पाया बनविले पाहिजे. स्वार्थ घसरणारी (बदलणारी) वाळू आहे. मानवी तात्त्विक कल्पना आणि शोध यांच्यावर तुम्ही बांधणी केली तर तुमचे घर ढासळेल. मोहपाशाचा भ्रमण करणारा गतिमान वारा, दुःख संकटाचे वादळ यांच्याद्वारे ते उध्वस्त होऊन जाईल. परंतु तुम्हाला दिलेली तत्त्वे टिकून राहातील. माझा अंगिकार करा; माझ्या वचनावर बांधणी करा.DAMar 264.3

    “ह्यास्तव जो प्रत्येकजण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोणाएका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधिले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.” मत्तय ७:२४, २५.DAMar 264.4