Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ७६—यहूदा

    जे जीवन देवाने सन्मानीत केले असते अशा जीवनाचा शेवट दुःखी झाला असा जीवन इतिहास यहूदाने पुढे मांडला. यरुशलेमाच्या शेवटच्या प्रवासाच्या अगोदर यहूदा जर मृत्यू पावला असता तर त्याचा अंतर्भाव बारामध्ये करण्यास तो पात्र ठरला असता आणि त्याची उणीव निष्कर्षाने भासली असती. शतकानुशतके त्याच्याविरुद्ध राहिलेला तीव्र वीट व तिटकारा याच्याऐवजी त्याच्या जीवनाच्या शेवटी प्रगट केलेला गुणधर्म राहिला असता. परंतु विशिष्ट उद्देश्यासाठी त्याचा हा स्वभाव जगापुढे उघड मांडण्यात आला होता. त्याच्याप्रमाणे विश्वासघात करून शत्रूच्या ताब्यात देणाऱ्या सर्वांच्यासाठी तो इशारा होता.DAMar 621.1

    वल्हांडण सणाच्या थोडे दिवस अगोदर येशूला धरून याजकांच्या हाती देण्याच्या कराराचे नवीकरण यहूदाने केले होते. त्यानंतर ध्यान व प्रार्थना करण्याच्या एका स्थळी येशूला नेण्याचे ठरविले होते. शिमोनाच्या घरच्या मेजवानीनंतर करार केलेल्या कृतीवर पूर्ण विचार करून परावर्तित करण्यास यहूदाला संधि होती परंतु त्याच्या उद्देश्यात बदल झाला नाही. तीस रुपयासगुलामाच्या किमतीस गौरवी प्रभूला अप्रतिष्ठेसाठी आणि मृत्युसाठी त्याने विकले.DAMar 621.2

    यहूदाला स्वभवताच पैशाची लालूच होती. परंतु असे निष्कृष्ठतेचे कर्म नेहमीच करण्यासारखा तो एवढा आचारभ्रष्ट नव्हता. द्रव्यलोभाची दुष्ट भावना त्याने मनात बाळगली व शेवटी त्याने त्याच्या जीवनाचा कबजा घेतला. द्रव्यलोभाचे वर्चस्व ख्रिस्तप्रेमावर विराजमान झाले. एका दुष्ट कृत्याला बळी पडून त्याने सैतानाला वाहून दिले आणि परिणामी पापांत त्याची खोल अधोगती झाली.DAMar 621.3

    घोळकाच्या घोळका ख्रिस्तामागे लागला होता तेव्हा यहदा शिष्यांत सामील झाला होता. मंदिरामध्ये, समुद्र किनारी आणि डोंगरावर केलेल्या प्रवचनामुळे त्यांची अंतःकरणे प्रवृत झाली होती, भावना जागृत झाल्या होत्या. आजारी, लंगडे पांगळे, अंधळे शहरातून व खेड्यापाड्यातून ख्रिस्ताच्या मागे जमा झालेले यहूदाने पाहिले. मरणाच्या पायरीवर असलेल्यांना त्याच्या चरणी आणून ठेवलेले त्याने पाहिले. आजाऱ्यांना बरे करणे, भुते काढणे, मृतास उठविणे ही उद्धारकाची महान कार्य त्याने प्रत्यक्ष पाहिली. ख्रिस्ताचे सामर्थ्य त्याने स्वतःच्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवले. आतापर्यंत जे ऐकण्यात आले त्यामध्ये ख्रिस्ताची शिकवण उत्कृष्ट होती ही त्याने ओळखली होती. ह्या महान शिक्षकावर त्याचे प्रेम-श्रद्धा होती आणि त्याच्या सहवासात राहावे असे त्याला वाटले. आपल्या जीवनात व स्वभावात परिवर्तन व्हावे अशी त्याची दाट इच्छा होती. ख्रिस्ताच्या निकटच्या संबंधाने त्याचा अनुभव घेण्याची त्याने आशा बाळगली. उद्धारकाने यहूदाला झिडकारले नाही किंवा मागे हटवले नाही. बारा जणात त्याला स्थान दिले. उपदेशकाचे काम करण्यासाठी त्याच्यावर त्याने विश्वास ठेविला. आजाऱ्यांना बरे करणे व भुते काढण्याचे सामर्थ्य त्याने त्याला दिले. परंतु सर्वस्वी त्याने ख्रिस्ताला वाहून दिले नव्हते. ऐहिक महत्वाकांक्षा किंवा द्रव्यलोभ त्याने सोडला नव्हता. ख्रिस्ताचा सेवक हे पद त्याने स्वीकारले परंतु दैवी साच्यात तो अजून बसला नव्हता. स्वतःच्या मताप्रमाणे व निर्णयाप्रमाणे वागू शकतो असे त्याला वाटले आणि टीका करणे व दोष देणे हा स्वभाव त्याने संपादिला.DAMar 621.4

    शिष्यांमध्ये त्याला चांगला मान होता व त्यांच्यावर त्याचे चांगले वजन होते. स्वतःच्या लायकीविषयी त्याला प्रतिष्ठा वाटत होती आणि पात्रता व निर्णय या बाबतीत तो आपल्या सोबत्यांना हलक्या दर्जाचे समजत होता. परिस्थिती जाणून तिचा फायदा ते घेऊ शकले नाहीत असे त्याला वाटले. असली अदूरदर्शी माणसे पुढारी म्हणून राहिल्यास चर्चची केव्हाही प्रगती होणार नाही. पेत्र उतावीळ होता; आणि साधकबाधक विचार न करता तो हालचाल करी. ख्रिस्ताच्या मुखातून पडलेला सत्याचा प्रत्येक शब्द योहान ग्रहण करीत होता परंतु तो पैशाच्या व्यवहारात फार कमी होता असे यहूदा समजत होता. मत्तयाला सर्व बाबतीत बिनचूक राहाण्याचे शिक्षण मिळाले होते. तो प्रामाणिक होता, तो ख्रिस्ताच्या वचनावर सतत मनन करीत असेDAMar 622.1

    आणि त्यात तो इतका मग्न असे की त्याच्या हातून दूरदर्शीपणाचे व्यवहार करून घेण्यास त्याच्यावर अवलंबून राहू शकत नव्हता असे यहूदाला वाटले. अशा प्रकारे सर्व शिष्यांची यहूदाने गोळा बेरीज केली, आणि स्वतःची फुशारकी मारून म्हटले की, व्यवस्थापक या नात्याने त्याची कर्तबगारी उपयोगात आणली नाही तर चर्च गोंधळात पडून अडचणीत येईल. यहूदाला स्वतःच्या कर्तबगारीचा फार अभिमान होता आणि त्याच्यावर कोणी मात करू शकत नव्हते असे त्याला वाटले. स्वतःच्या मते तो कार्यासाठी प्रतिष्ठा होता म्हणून तो नेहमी स्वतःच प्रतिनिधीत्व करीत होता.DAMar 622.2

    यहूदा आपल्या स्वतःच्या स्वभावाविषयी अंध झाला होता आणि त्याला त्यासाठी संधी मिळून तो त्यामध्ये सुधारणा करून घेईल अशा ठिकाणी ख्रिस्ताने त्याला ठेविले होते. खजीनदार या नात्याने शिष्यांच्या गरजा भागविण्याची व अनाथाची देखरेख करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली होती. माडीवरच्या खोलीत असताना येशूने त्याला म्हटले, “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक” (योहान १३:२७). त्यावर शिष्यांना वाटले की येशूने त्याला सांगितले की त्यांना ज्याची गरज आहे ते लवकर खरेदी कर आणि त्यातील काही गरीबांना देऊन टाक. दुसऱ्यांची सेवा करण्याद्वारे यहूदाच्या ठायी निस्वार्थी वृत्ती निर्माण झाली असेल. परंतु दररोज येशूच्या मुखातून निघणारे सत्याचे धडे त्याच्या कानावर पडत होते आणि त्याचे निस्वार्थी जीवन नेहमी त्याच्या डोळ्यासमोर होते तरी सुद्धा यहूदाच्या जीवनात लोभवृत्ती बळावली. हातात पडलेला पैसा त्याला सतत मोहपाश झाला. ख्रिस्तासाठी थोडेसे जरी काम केले किंवा धार्मिक कार्यासाठी थोडा वेळ घालविला तर त्यासाठी तो त्या अपुऱ्या धनातून आपला भाग काढून घेत असे. त्याच्या दृष्टीने ही सबब त्याच्या कृतीचे समर्थन करीत होती; पण देवाच्या दृष्टीने तो चोर होता.DAMar 622.3

    ख्रिस्ताने वारंवार काढलेले विधान-त्याचे राज्य ह्या जगाचे नाही ह्याने त्याच्या मनाला दुःख होत होते. त्याने आखलेल्या दिशाप्रमाणे येशूने काम करावे अशी त्याची अपेक्षा होती. तुरुंगातून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सुटका करण्याचे त्याने योजीले होते. परंतु पाहा, योहानाचा शिरच्छेद होणार होता. येशू योहानाच्या मरणाबद्दल सूड घेण्याऐवजी व आपला राजाला शोभणारा हक्क अधिकार गाजविण्याऐवजी शिष्यांना घेऊन ग्रामीण भागात गेला. यहूदाला जोराचा झगडा करायचा होता, कुरापत काढायची होती. यहूदाला वाटले की त्यांचा (शिष्यांचा) बेत अंमलात आणण्यास येशूने अडथळा आणिला नाहीतर त्याचे कार्य भरभराट पावेल. यहूदी पुढाऱ्यांचे वैमनश्य अधिकच वाढत आहे हे त्याने पाहिले आणि स्वर्गातील चिन्हाची मागणी त्यांनी येशूजवळ केल्यावर त्याने ते आव्हान दुर्लक्षिले हेही त्याने पाहिले. अश्रद्धा ह्याकडे त्याचे विचार झुकले आणि शत्रूने बंडवृत्ती आणि वाद, संशय यांचे विचार त्याच्या मनात घातले. नाउमेद असलेल्या गोष्टीवर येशू का भर देत आहे? स्वतः व त्याचे शिष्य यांची कसोटी होऊन त्यांना छळ सोसावा लागणार यावर येशूने का भाकीत केले? नवीन राज्यात उच्च पद मिळविण्यासाठी येशच्या कार्याला यहदा पाठिंबा दर्शवीत होता. त्याच्या आशेची निराशा होईल काय? येशू देवपुत्र नाही याबद्दल यहूदाचे मत निश्चत नव्हते. परंतु त्याच्या महान कार्याविषयी तो प्रश्न विचारत होता, त्याला स्पष्टीकरण पाहिजे होते. DAMar 623.1

    उद्धारकाची अशी शिकवण असूनही येशू यरुलेमात राजा या नात्याने राज्य करील ही कल्पना यहूदा पुढे मांडीत राहिला होता. पाच हजारांना भोजन देण्याच्या समयी त्याने हा विचार पुढे आणिला. ह्या प्रसंगी गोरगरीब भुकेलेल्या समुदायाला जेवण वाढण्यात यहूदाने भाग घेतला होता. स्वतःच्या सामर्थ्याने दुसऱ्यांचा फायदा करून देण्याची संधी त्याने ह्यामध्ये पाहिली. देवाची सेवा करण्यात मनाचे समाधान होते हे त्याला भासले. लोकसमुदायातील आजारी व दुःखी यांना ख्रिस्ताकडे आणण्यात त्याने मदत केली. उद्धारकाने आजार बरा केल्यावर आनंद, उल्हास, दुःख परिहार माणसांच्या मनाला कसा होतो हे त्याने पाहिले. परंतु त्याच्या स्वतःच्या स्वार्थी हेतुने तो अंधळा झाला होता. भाकरीच्या चमत्कारामुळे निर्माण झालेल्या खळबळीचा व उत्सुकतेचा फायदा घेण्यात यहूदा पहिला होता. ख्रिस्ताला जबरदस्तीने राजा करण्यास त्याने पुढाकार घेतला होता. त्याच्या अशा भारी उच्च होत्या. त्याची निराशा भारी कडवट होती.DAMar 623.2

    जीवनी भाकरीवर ख्रिस्ताने दिलेले प्रवचन यहूदाच्या जीवनातील महत्त्वाचा क्षणपरिवर्तनाचा क्षण होता. “तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही.’ योहान ६:५३. हे बोल त्याच्या कानी पडले. येथे ख्रिस्त जगीक गोष्टीविषयी नाही तर आध्यात्मिक गोष्टीविषयी बोलत होता असे त्याने पाहिले. तो फार दूरदर्शी आहे असे तो स्वतःला समजत होता. त्यावरून तो म्हणाला, येशूला काही मानसन्मान राहाणार नाही आणि आपल्या शिष्यांना तो उच्च पद देऊ शकणार नाही असे त्याला दिसते. ख्रिस्ताशी जवळीक करण्याऐवजी त्याच्यापासून दूर राहाण्याचे त्याने ठरविले. तो जागृत राहील. आणि तो जागृत राहिला.DAMar 624.1

    त्यावेळेपासून तो शंका व्यक्त करू लागला त्यामुळे शिष्य गोंधळात पडले. तो वादविवाद करून गैर मार्गदर्शन करू लागला. ख्रिस्ताच्या वक्तव्याविरुद्ध परूशी व शास्त्री यांनी केलेला वादविवाद तो उकरून काढू लागला. लहान मोठ्या अडचणी, मनस्ताप व विरोध, सुवार्ता कार्यातील संभाव्य माघार व अडथळे हे सर्व सत्य वचनाविरुद्धचे पुरावे होते असे यहूदाने सांगितले. ख्रिस्त सादर करीत आहे त्या सत्याशी कसलाही संबंध नसलेली वचने तो सादर करीत होता. वचनात अंतर्भूत असलेल्या अर्थापासून ही वचने अगदीच वेगळी होती त्यामुळे शिष्य अधिकच गोंधळात पडले आणि त्यांची अधिक निराशा झाली. हे सर्व यहूदाने केले होते आणि हे करीत असताना त्याच्या सद्सद्विवेकाशी तो प्रामाणिक होता असे त्याने भासविले. त्याच्या बोलावर खात्री होण्यासाठी शिष्य ख्रिस्ताचे वचन शोधीत असताना यहूदा त्यांना अति सूक्ष्म रीतीने निराळ्याच मार्गाने नेत असे. धार्मिक वृत्तीने आणि चतुराईने ख्रिस्ताने सादर केलेल्या अर्थाशिवाय तो भिन्न अर्थाने सत्य वचन सादर करीत होता. त्याच्या सूचना नेहमी खळबळजनक असून ऐहिक लौकिकासाठी महत्त्वाकांक्षी होत्या त्यामुळे शिष्यांना महत्त्वाच्या मुद्यापासून दूर ठेवण्यात येत होते. त्यामध्ये अति श्रेष्ठ कोणते असले पाहिजे ह्यावर तंटा होता आणि तो यहूदाने मांडला होता.DAMar 624.2

    येशूने श्रीमंत तरुणापुढे शिष्यत्वाच्या अटी मांडल्यावर यहूदाला आनंद वाटला नाही. त्याला वाटले त्यात चुकी करण्यात आली होती. त्याला वाटले की अशा श्रीमंत तरुणाला श्रद्धावंतात सामील करून घेतले तर त्याद्वारे ख्रिस्ताच्या कार्याला पुष्टी मिळाली असती. जर यहूदाचा सल्लागार म्हणून स्वीकार केला तर ह्या लहानशा चर्चच्या प्रगतीसाठी त्याने पुष्कळ योजना सुचविल्या असत्या. त्याची तत्त्वे आणि पद्धति ख्रिस्ताच्या भिन्न असली असती परंतु ह्या बाबतीत तो ख्रिस्तापेक्षा स्वतःला शहाणा समजत होता. शिष्यांना सांगितलेल्या प्रत्येक बाबीत यहूदा काही अंशी मनापासून संमत नव्हता. त्याच्या दबावाखाली असमाधानाचे खमीर आपले कार्य जलदरित्या करू लागले. ह्या सगळ्यामध्ये खरा हात कोणाचा होता हे शिष्यांना समजले नाही परंतु सैतान आपले गुण आपले विचार यहूदाला देत होता आणि त्याद्वारे इतर शिष्यावर तो दबाव आणित होता हे येशूने ओळखले. विश्वासघात करण्याच्या एक वर्ष अगोदर ख्रिस्ताने सांगितले, “तुम्हा बारा जणास मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हातील एकजण सैतान आहे.” योहान ६:७०.DAMar 624.3

    तरी सुद्धा यहूदाने उघड विरोध केला नाही किंवा उद्धारकाने दिलेल्या पाठावर प्रश्न विचारिले नाहीत. शिमोनाच्या घरात मेजवानी झाली तोवर त्याने उघड कुरकूर केली नाही. जेव्हा मरीयाने येशूच्या चरणाला तेलाभ्यंग केला तेव्हा यहूदाने आपला लोभी स्वभाव प्रगट केला. येशूने त्याच्यावर दोषारोप केल्यावर त्याच्या द्वेषाचे, कडवटपणाचे पित्त खवळले. जखमी झालेला अहंकार आणि सूडबुद्धी यांच्यामुळे अटकाव नाहीसा झाला, आणि आतापर्यंत लाडवलेल्या लोभाने त्याच्यावर कबजा घेतला. पापाशी खेळण्यास चिकटून राहाणाऱ्या प्रत्येकाचा हा अनुभव असणार. नीतिभ्रष्टतेच्या गोष्टींना आळा घातला नाही आणि सैतानाच्या मोहावर मात केली नाही तर त्याच्या इच्छेप्रमाणे व्यक्तीला बंदिस्त करण्यात येते.DAMar 625.1

    परंतु यहूदा अजून संपूर्णपणे कठोर बनला नव्हता. जरी दोन वेळा उद्धारकाचा विश्वासघात करण्याची प्रतिज्ञा केली होती तरी पश्चात्तापासाठी अजून त्याला संधी होती. वल्हांडण सणाचे पालन करीत असताना विश्वासघातक्याचा उद्देश प्रगट करून येशूने त्याचे देवत्व सिद्ध केले. यहूदाचा समावेश शिष्यांची सेवा करण्यात केला होता परंतु प्रेमाची अखेरची विनवणी त्याने दुर्लक्षली. त्यानंतर यहूदाचे भवितव्य ठरविण्यात आले होते आणि जे पाय येशूने धुतले होते ते द्रोही कामात गुंतले गेले.DAMar 625.2

    यहूदाने बुद्धीवाद करून म्हटले की, जर ख्रिस्ताला वधस्तंभावर लटकावयाचे आहे तर ती घटना घडलीच पाहिजे. त्याच्या विश्वासघातकी कृतीने त्यात काही फरक पडणार नाही. जर ख्रिस्त मरणार नव्हता तर मुक्त होण्यासाठी त्याने स्वतःवरच दडपण आणले पाहिजे होते. कोणत्याही परिस्थितीत विश्वासघाताच्या ह्या कृतीत यहूदाचा काही फायदा होणार होता. आपल्या प्रभूचा विश्वासघात करण्यात जो व्यवहार केला होता तो अगदी हुषारीचा होता असे त्याला वाटले.DAMar 625.3

    ख्रिस्त स्वतःला कैद करू देईल असा विश्वास यहूदाचा नव्हता. त्याला धडा शिकविण्यासाठी त्याने त्याचा विश्वासघात केला होता. यापुढे त्याचा मान राखून उद्धारकाने त्याला वागणूक द्यावी अशी त्याची धारणा होती. परंतु तो ख्रिस्ताला मृत्युसाठी देत आहे हे यहदाला समजले नव्हते. उद्धारकाने दाखल्याद्वारे दिलेल्या शिक्षणाने व उदाहरणाने वारंवार शास्त्री व परूशी यांच्यावर परिणाम होत होते! कितीतरी वेळा त्यांनी स्वतःला दोषी ठरविले! सत्य त्यांच्यापुढे मांडल्यावर त्यांचा क्रोध अनावर होत होता आणि त्याला धोंडमार करण्यास ते उठत होते; परंतु वारंवार तो त्याच्यापासून निसटून जात असे. कितीतरी वेळा तो निसटून गेला आहे म्हणून तो स्वतःला पकडू देणार नाही असे यहूदाला वाटले.DAMar 625.4

    ही बाब कसाला लावण्याचा विचार यहूदाने केला. ख्रिस्त जर मशीहा होता आणि लोकासाठी त्याने एवढे केले होते तर ते त्याला पाठिंबा देऊन त्याला राजा घोषीत करतील. ह्यामुळे जे अनिश्चित आहेत त्यांची कायमची खात्री होईल. दाविदाच्या सिंहासनावर राजाला विराजमान केल्याबद्दल यहदाला सर्व श्रेय मिळाले असते. ह्या कृतीमुळे नवीन राज्यात ख्रिस्ताच्या लगत प्रथम स्थान त्याला लाभले असते.DAMar 626.1

    खोट्या शिष्याने येशूचा विश्वासघात केला. बागेत जमावाच्या पुढाऱ्याला जेव्हा त्याने म्हटले, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा” (मत्तय २६:४८) तेव्हा ख्रिस्त त्यांच्या हातातून निसटून जाईल असा त्याचा पूर्ण विश्वास होता. त्यानंतर त्यांनी जर त्याला दोष दिला असता तर त्यांना तो म्हणणार होता की त्याला धरा म्हणून मी सांगितले नाही काय?DAMar 626.2

    ख्रिस्ताच्या मारेकऱ्यांनी येशूला धरून त्याला घट्ट बांधताना यहदाने पाहिले. उद्धारकाला धरून घेऊन जाताना पाहून त्याला आचंबा वाटला. चिंतातुर होऊन तो त्याच्या मागून बागेपासून ते यहूदी पुढाऱ्यांच्यापुढे चौकशी होण्याच्या ठिकाणापर्यंत गेला. त्यांच्यासमोर देवपुत्राचा प्रताप दाखवून शत्रूचे सर्व कट व योजना धुळीस मिळवील ह्या आश्चर्याची तो क्षणोक्षणी अपेक्षा करीत होता. परंतु जस जशा घटका निघून गेल्या तस तसे येशूने त्यांचे निंदाजनक अपशब्द सहन केले. ते पाहून ख्रिस्तद्रोही अतिशय भीतीने गांगरून गेला कारण त्याने आपल्या प्रभूला मरणासाठी विकले होते.DAMar 626.3

    चौकशी जशी संपुष्टात येऊ लागली तसे दोषी विवेकाला होत असलेल्या असह्य यातना यहूदा सहन करू शकला नाही. आकस्मात त्या वाड्यात कर्कश आवाज दणाणला आणि सर्वांच्या अंगावर अति भीतीने, धास्तीने रोमांच उभे राहिले: अहो कयफासाब, तो निष्कलंक आहे; त्याला वाचवा! DAMar 626.4

    गोंधळलेल्या जमावातून उंचा पुरा यहूदा पुढे वाट काढीत होता. त्याचा चेहरा दुर्मुखलेला व निस्तेज झाला होता आणि कपाळावर घामाचे मोठे थेंब दिसत होते. न्यायासनाजवळ तो धावला, आणि प्रभूचा द्रोह केल्याची घेतलेली किंमत त्याने मुख्य याजकासमोर फेकली. कयफाचे वस्त्र पकडून येशूला सोडण्यासाठी त्याने गयावया केली आणि प्रतिपादिले की मरणदंडाची शिक्षा होण्यासाठी त्याने असे काही केले नाही. कयफाने रागाने त्याला झटकून टाकिले, परंतु तो गोंधळून गेला होता; आणि काय बोलावे हे त्याला समजले नाही. याजकांची लबाडी चव्हाट्यावर आली, उघडी झाली. प्रभूला धरून देण्यासाठी शिष्याला त्यांनी लाच दिली होती हे स्पष्ट झाले.DAMar 626.5

    यहूदाने पुन्हा म्हटले, “मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे.’ परंतु मुख्य याजक स्वतःचा ताबा सावरून म्हणाला, “त्याचे आम्हास काय? तुझे तूच पाहून घे.’ मत्तय २७:४. याजक यहृदाला त्यांच्या हातातले खेळणे करायला तयार होते परंतु त्यांनी त्याचे आदितत्व (अल्पमहत्त्व) नाकारले. गुन्हा कबूल करून त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला झिडकारून टाकिले.DAMar 627.1

    त्यानंतर यहूदाने येशूचे चरण धरले व तो देवपुत्र आहे हे कबूल केले आणि स्वतःची सुटका करून घेण्यास विनविले. उद्धारकाने त्याची खरडपट्टी काढिली नाही. यहूदाला पश्चात्ताप झाला नव्हता हे त्याला माहीत होते. दोषी, कलंकीत विवेकबुद्धीतून ही कबूली देण्यात आली होती. त्याने निष्कलंक देवपुत्राचा विश्वासघात करून इस्राएलातील पवित्र व्यक्तीचा नाकार केला होता. तथापि येशूने धिक्काराचे किंवा नापसंतीचे उद्गार काढिले नव्हते. दयार्द होऊन त्याने यहूदाकडे पाहिले आणि म्हटले ह्या घटकेसाठी मी जगात आलो. DAMar 627.2

    सभागृहात आश्चर्याची गुणगुण पसरली. ज्याने ख्रिस्ताचा द्रोह केला त्याच्याबद्दल ख्रिस्ताचा सयंम पाहून ते आत्यंतिक आश्चर्य करू लागले. हा मनुष्य मर्त्य मानव नाही अशी त्यांची पुन्हा खात्री झाली. परंतु तो जर देवपुत्र होता तर ह्या बंधनातून स्वतःची सुटका करून घेऊन शत्रूवर मात का करीत नाही हा प्रश्न त्यांच्यापुढे होता.DAMar 627.3

    त्याने केलेली विनंती व्यर्थ गेल्याचे पाहून यहूदा वाड्यातून झपाट्याने निघाला आणि उद्गारला, फार विलंब झाला! फार विलंब झाला! ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेले तो पाहू शकत नाही असे त्याला वाटले आणि निराश होऊन तो बाहेर पडला आणि स्वतःला गळफास लावून घेतला.DAMar 627.4

    त्याच दिवशी काही वेळाने पिलाताच्या वाड्यातून कॅलव्हरीकडे येशूला नेणाऱ्या बंडखोर दुष्ट जमावाचा आरडाओरडा व उपहास टवाळी यांना मध्येच एकाएकी अटकाव झाला. जात असताना वाटेत एका सुकलेल्या झाडाच्या बुंध्याजवळ यहूदाचे शव त्यांनी पाहिले. ते तिकटारा उत्पन्न करणारे दृश्य होते. झाडावर गळफास लावलेला दोर त्याच्या शरीराच्या वजनाने तुटलेला होता. त्याचे शरीर छिन्न विच्छिन्न झाले होते आणि कुत्री त्यावर अधाशासारखे पडली होती. त्याच्या शरीराचा उरलेला भाग ताबडतोब दृष्टीआड करून पुरून टाकला होता. परंतु आता त्या जमावात थट्टा कुचेष्टा कमी झाली होती, दुर्मुखलेले चेहरे अंतर्यामातील विचार प्रगट करीत होते. येशूच्या रक्ताबद्दल जे दोषी होते त्यांच्या अपराधाबद्दल योग्य शिक्षा केव्हाच मिळत आहे असे भासले.DAMar 627.5