Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ४७—येशूची लोकसेवा

    मत्तय १७:९-२१; मार्क ९:९-२९; लूक ९:३७-४५.

    संपूर्ण रात्र डोंगरावर घालविल्यानंतर, सूर्योदय होत असता, येशू व त्याचे शिष्य खाली सपाटीला आले. विचारमग्न झालेले शिष्य अतिशय आश्चर्यचकीत व मुग्ध झाले होते. पेत्राच्या तोंडूनसुद्धा एकही शब्द बाहेर पडत नव्हता. जे ठिकाण स्वर्गीय प्रकाशाने झळाळून गेले होते, ज्या ठिकाणी देवाच्या पुत्राने त्याचे दैदिप्यमान गौरव प्रदर्शित केले होते तेथेच ते आनदाने रममान होऊ शकले असते, परंतु दूर दूरवरून येशूच्या शोधार्थ आलेल्या लोकांची त्यांना सेवा करावयाची होती.DAMar 373.1

    मागे राहिलेल्या, परंतु येशू परत आल्याचे माहीत असलेल्या शिष्यांनी त्या ठिकाणी आणलेला मोठा लोकसमुदाय डोंगर पायथ्याशी जमा झाला होता. लोकसमुदायाच्या जवळ आल्यानंतर येशूने त्याच्या सोबतीच्या तीन शिष्यांना, “मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून उठेल तोपर्यंत हा साक्षात्कार झाल्याचे कोणाला सांगू नका,’ अशी आज्ञा केली. शिष्यांना प्रगट केलेला साक्षात्कार, सर्वत्र प्रसिद्ध न करता, त्यांनी त्यावर मनन करावयाचे होते. लोकसमुदायामध्ये ते प्रसिद्ध करणे म्हणजे तो थट्टेचा व उपहासाचा विषय झाला असता. इतर नऊ शिष्यांना येशू मरणातून उठेपर्यंत त्या प्रसंगाविषयी काहीच समजू शकले नसते. कोणता दुर्धर प्रसंग त्याच्या समोर उभा ठाकला होता याविषयी ख्रिस्ताने सांगितले असतानासुद्धा त्याच्या मर्जीतील तीन शिष्यांनासुद्धा त्याचे पूर्णपणे आकलन झाले नव्हते. मेलेल्यातून पुनः उठणे म्हणजे काय याविषयी ते आपसांत विचार करू लागले. तरीसुद्धा त्यांनी येशूकडे कोणतेही स्पष्टीकरण मागितले नाही. भविष्यकाळाविषयीच्या त्याच्या शब्दामुळे ते अतिशय दुःखी झाले होते.DAMar 373.2

    डोंगर पायथ्याशी उभे असलेल्या लोकांना जेव्हा येशू दिसला, तेव्हा ते त्याचे स्वागत करण्यासाठी मोठ्या आदबीने व आनंदाने त्याच्याकडे धावत गेले. तरीसुद्धा ते गोंधळले होते हे त्याच्या चाणाक्ष नजरेला दिसले होते. त्याचे शिष्य खिन्न झालेले दिसत होते. आलीकडे घडलेल्या घटनेने त्यांची घोर निराशा झाली होती.DAMar 373.3

    - जेव्हा सर्व लोक डोंगर पायथ्याशी मार्ग प्रतीक्षा करीत होते, तेव्हा एक पिता, त्याच्या मुलाला पिळून काढणाऱ्या मुक्या भूतापासून त्याची मुक्तता करून घेण्यासाठी त्याच्याकडे आला होता. जेव्हा येशूने बारा शिष्यांना सुवार्ता सांगण्यासाठी गालील प्रांतात पाठविले होते, तेव्हा त्याने, अशुद्ध आत्मे काढण्याचा त्यांना अधिकार दिला होता. जेव्हा ते खंबीर आत्मविश्वासाने कार्य करीत होते तेव्हा दुष्ट आत्मे त्यांचा शब्द ऐकत होते. त्या वेळीसुद्धा त्या मुलाला पिळून काढणाऱ्या पिशाच्याला, सोडून जाण्याची येशूच्या नावाने त्यांनी आज्ञा केली; परंतु त्या दुष्टात्म्याने त्याच्या सामर्थ्याच्या नव्या प्रगटीकरणाने त्यांची केवळ कुचेष्टाच केली. आपल्या अपयशाचे कारण सांगण्यास असमर्थ असलेल्या शिष्यांना वाटले की ते त्यांच्या गुरूची व त्यांची अप्रतिष्ठा करीत होते. त्या समुदायात हजर असलेल्या शास्त्री लोकांनी त्यांचा (शिष्यांचा) मानभंग करण्यासाठी या संधीचा पुरेपुर फायदा घेतला. ते व त्यांचा गुरू हे ठग होते असे सिद्ध करण्यासाठी ते शिष्यांवर प्रश्नांचा भडीमार करू लागले. शास्त्री लोकांनी मोठ्या विजयी भावनेने जाहीर केले की ह्या दुष्टात्म्यावर येशू स्वतः आणि शिष्य विजयी होऊ शकले नाहीत. लोकही शास्त्री लोकांच्या बाजूला कलले होते आणि लोकांमध्ये तिरस्काराची व उपहासाची भावना पसरली होती.DAMar 374.1

    परंतु एकाएकी दोषारोप करणे थांबले. येशू व त्याचे शिष्य जवळ येताना दिसले, आणि त्यांच्या भावनेत तत्काळ फरक पडल्यामुळे लोक येशूला भेटण्यासाठी परत फिरले. रात्रभर स्वर्गीय वैभवाशी साधलेल्या सुसंबंधाच्या छटा, येशूच्या व त्याच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. पाहणाऱ्यांना आश्चर्यचकित करणारा तेजोवलय त्यांच्या चेहऱ्यावर चकाकत होता. शास्त्री लोकांनी भयाने काढता पाय घेतला, तर लोकसमुदायाने येशूचे स्वागत केले.DAMar 374.2

    झालेल्या सर्व प्रकारच्या साक्षीदाराप्रमाणे तारणारा स्वतःच त्या वितंडवादात पडला, आणि शास्त्री लोकांवर आपली नजर रोखून त्यांना प्रश्न केला, “तुम्ही याजशी काय संवाद करिता?”DAMar 374.3

    परंतु आतापावेतो निघणारा उर्मटपणाचा व अविचाराचा आवाज आता अगदीच बंद झाला होता. सर्व लोकांत मंत्रमुग्ध शांतता पसरली होती. याच वेळी एक दुःखी व कष्टी पिता पुढे आला आणि येशूच्या चरणावर लोटांगण घालून, आपली दुःखमय व निराशमय गोष्ट त्याच्या कानावर घालू लागला.DAMar 374.4

    तो म्हणाला, “हे गुरू, मी आपणाकडे आपल्या मुलाला घेऊन आलो याला मुका आत्मा लागला आहे. याला जेथे कोठे तो धरितो तेथे आपटतो, ... त्याला काढावे म्हणून मी आपल्या शिष्यांस सांगितले, परंतु त्यांना त्याला काढता येईना.”DAMar 374.5

    येशूने सभोवतीच्या विस्मय चकीत झालेल्या लोकांवर, निष्कारण दोष देणाऱ्या शास्त्री लोकावर, आणि गोंधळलेल्या शिष्यावर आपली नजर फिरविली. त्याने सर्वांच्या मनांतला अविश्वास वाचला; आणि अगदी दुःखमय आवाजात तो म्हणाला, “हे अश्रद्धावान व विपरीत पीढी, मी कोठवर तुम्हांबरोबर राहूं व तुमचे सोसूं?” आणि मग त्या दुःखी पित्याला तो म्हणाला, “तूं आपल्या पुत्राला इकडे आण.”DAMar 374.6

    मुलाला येशूकडे आणण्यात आले, येशूने ज्या क्षणी त्याच्यावर आपली नजर टाकली त्याच क्षणी भूताने त्याला भूमिवर आपटले व पिळवटून टाकले. तो जमिनीवर गडगडा लोळून, चमत्कारिक चित्कार काढीत वातावरण हेलावून टाकू लागला.DAMar 375.1

    पुन्हा एकवार जीवनाचा अधिपती व अंधकाराचा सत्ताधिश रणागंणांत समोरा समोर उभे टाकले होते, ख्रिस्त, दीनांस सुवार्ता सांगण्यास, ... धरून नेलेल्याची सुटका... करावयास (लूक ४:१८), तर सैतान त्याच्या बंदिस्तांना त्याच्या ताब्यात ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होता. देवाचे देवदूत व दुष्टाचे (सैतानाचे) अदृष्य अगणित दूत ही लढाई पाहण्यासाठी जवळ येत होते. येशूने सैतानाला त्याच्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी काही काळासाठी मुभा दिली, यासाठी की पुढे करण्यात येणाऱ्या मुक्तीचे पाहणाऱ्यांना आकलन व्हावे.DAMar 375.2

    आशा व भय याने तळमळणाऱ्या त्या पित्याकडे तो लोकसमुदाय श्वास रोखून पाहत होता. येशूने पित्याला विचारले, “असे याला होऊन किती काळ झाला?” पित्याने त्याला होणाऱ्या त्रासाची अनेक वर्षांची गोष्ट सांगितली आणि आता सहन करणे जसे काय त्याला शक्य होणार नव्हते म्हणून तो दुःखाच्या आवेगाने म्हणाला, “आपल्याने काही करवेल तर आम्हावर करुणा करून आम्हाला साहाय्य करा.” “आपल्याने काही करवेल तर!” यावेळी सुद्धा पित्याने ख्रिस्ताच्या शक्तिविषयी शंका व्यक्त केली.DAMar 375.3

    त्यावर येशूने उत्तर दिले, “विश्वास धरणाऱ्याला सर्व काही साध्य आहे.” ख्रिस्ताच्या शक्तीला काहीच कमतरता नाही. मुलाची भुताच्या तावडीतून सुटणे न सुटणे हे पित्याच्या विश्वासावर अवलंबून होते. डोळ्यातून अश्रू ढाळीत मुलाचा पिता ख्रिस्ताच्या कृपेवर अवलंबून राहून म्हणाला, “मी विश्वास धरितो; माझा अविश्वास काढून टाकण्यास मला साहाय्य करा.”DAMar 375.4

    नंतर येशू त्या भूतग्रस्ताकडे वळून म्हणाला, “अरे मुक्याबहिऱ्या आत्म्या, याच्यांतून निघ व पुनः कधी याच्यात शिरू नको.” असे म्हणताच तो मोठ्याने आक्रोश करूं लागला, तडफडू लागला. भूत त्याच्यातून निघून जात असतांना जसे काय त्याला पिळून काढीत होते. नंतर तो मुलगा हालचाल न करता तसाच पडून राहिला, जवळ जवळ मृतवत. लोक म्हणाले “तो मेला.’ परंतु येशूने त्याच्या हाताला धरून त्याला उठविले आणि शरीराने व मनाने पूर्णपणे खडखडीत बरे केले व त्याच्या पित्याच्या स्वाधीन केले. पिता-पुत्राने त्या मुक्तिदात्याची स्तुती केली. “हा देवाचा प्रताप पाहून सर्व लोक विस्मित झाले,” आणि पराभूत झालेले व अपमानीत झालेले शास्त्री दुर्मुखले होऊन निघून गेले.DAMar 375.5

    “आपल्याने काही करवेल तर आम्हावर करुणा करून आम्हाला साहाय्य करा.” पापाच्या ओझ्याखाली दबलेले किती तरी लोक अगदी अशीच विनंती करीत असतात, आणि अशी विनंती करणाऱ्या सर्वांना कृपाळू दयाळू उद्धारक उत्तर देतो की “विश्वास धरणाऱ्याला सर्व काही साध्य आहे.’ विश्वासच स्वर्गाबरोबर आपला संबंध जोडतो. सैतानाच्या बळकट सत्तेबरोबर झुंजण्यास आणि प्रत्येक प्रबळ मोहाला प्रतिकार करण्यास देव ख्रिस्ताद्वारे सामर्थ्य देतो. परंतु अनेक लोकांना वाटते की ते विश्वासात कमजोर आहेत त्यामुळे ते ख्रिस्तापासून दूर राहातात. अशा सर्व लोकांनी स्वतःला त्यांच्या दयाळू तारणाऱ्याच्या स्वाधीन करून द्यावे, त्यांनी स्वतःकडे नव्हे, तर ख्रिस्ताकडे पाहावे. ज्याने रोग्यांना बरे केले, भूते लागलेल्याची भूते काढिली, तोच महासमर्थ तारणारा आजही आपल्यात आहे. देवाच्या शब्दाद्वारे विश्वास निर्माण होतो. आणि म्हणून “जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही.” योहान ६:३७. देवाच्या या आश्वासनाचा मनापासून स्वीकार करा. “मी विश्वास धरितो, माझा अविश्वास काढून टाकण्यास मला साहाय्य करा” असे अश्रू ढाळीत म्हणा. असे कराल तर तुम्ही कधीच नाश पावू शकणार नाही.DAMar 376.1

    थोडक्याच अवधीत मर्जीतल्या (आवडत्या) शिष्यांनी मोठेपणाचा व मानभंगाचा अतिरेक पाहिला. मनुष्य स्वभावाचा दैवी स्वभावात व सैतानाच्या भ्रष्ट स्वभावात बदल करण्यात आला होता हे त्यांनी पाहिले. येशू ज्या पर्वतावर दूताबरोबर बोलला होता आणि ज्या पर्वतावर तो देवाचा पुत्र आहे असे देवाच्या वाणीने घोषणा केली, त्या पर्वतावरून तो अत्यंत दुःखदायक व भयंकर देखावा व कोणतेही मानवी सामर्थ्य सुटका करू शकले नसते अशा शारीरिक वेदनामुळे झटके देऊन कडकडून दात खाणाऱ्या विद्रुप चेहऱ्याच्या मुलाला भेटण्यासाठी खाली उतरत होता हे त्यानी पाहिले. जो, आश्चर्यचकीत झालेल्या त्याच्या शिष्यासमोर काही तासापूर्वी वैभवाने उभा राहिला होता तोच तारणारा जमिनीवर गडगडा लोळणाऱ्या सैतानाच्या तावडीतील आत्म्याला वर उचलण्यासाठी खाली जमिनीपर्यंत लवला आणि त्याला शारीरिक मानसिकरित्या खडखडीत बरे करून, त्याच्या पित्याच्या व कुटुंबियांच्या स्वाधीन केले.DAMar 376.2

    तो तारणाचा एक वस्तुपाठ होता, - जो देवाच्या स्वरूपाचा पित्याच्या गौरवापासून, पतित झालेल्या मानवाच्या तारणासाठी खाली आला. त्याद्वारे शिष्यांच्या सेवाकार्याचे स्वरूपही दाखवण्यात आले आहे. आध्यात्मिक प्रकाशाचा प्रसार करण्याच्या वेळी ख्रिस्ती सेवकांचे जीवन ख्रिस्ताच्या सहवासात केवळ डोंगराच्या शिखरावर घालवावयाचे नाही. खाली पठारावर त्यांच्यासाठी काम आहे. सैतानाने बंदिस्त केलेले लोक त्यांची सुटका होण्यासाठी विश्वासपूर्ण शब्द व प्रार्थना यांची मार्ग प्रतीक्षा करीत आहेत. DAMar 376.3

    नऊ शिष्य अद्यापही त्यांच्या स्वतःच्या अपयशाच्या कटु अनुभवाविषयी विचार करीत होते; आणि जेव्हा येशू पुन्हा त्यांच्यात आला तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “आमच्याने त्याला का काढवले नाही?’ येशूने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या अल्पविश्वासामुळे; कारण मी तुम्हास खचीत सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा अविश्वास असेल तर या डोंगराला येथून तिकडे सर, असे तुम्ही म्हटल्यास तो सरेल; तुम्हाला काही असाध्य होणार नाही. तरी पण प्रार्थना व उपास यावांचून असल्या जातीचे भूत निघत नाही.’ ख्रिस्ताच्या कळकळीच्या सहानुभूतीपासून त्यांना दूर ठेवणारा त्यांचा अविश्वास आणि त्यांच्यावर सोपविलेल्या पवित्र कार्याविषयी त्यांनी दाखविलेला निष्काळजीपणा यामुळे ते सैतानी सत्तेबरोबर संघर्ष करण्यात अयशस्वी ठरले होते.DAMar 376.4

    ख्रिस्ताच्या मरणाचा निर्देश करणाऱ्या त्याच्या वक्तव्यामुळे दुःख व निराशा निर्माण झाली होती. येशूबरोबर डोंगरावर जाण्याच्या तीन शिष्यांच्या निवडीमुळे नऊ शिष्यामध्ये द्वेषभावना भडकली होती. प्रार्थना व मनन याद्वारे ख्रिस्ताच्या बोलण्यावरील त्यांचा विश्वास बळकट करण्याचे सोडून ते त्यांची निराशा व वैयक्तिक गा-हाणी यावरच लक्ष केंद्रित करीत होते. ह्या दुष्ट भावनेच्या, परिस्थितीत त्यांनी सैतानाबरोबर द्वंद्व करण्याची कामगिरी हाती घेतली होती.DAMar 377.1

    अशा प्रकारच्या संघर्षात भाग घेताना त्यांनी वेगळ्या वृत्तीने कार्य केले पाहिजे. प्रार्थना, उपास, व अंतःकरणाची नम्रता याद्वारे त्यांनी त्यांचा विश्वास बळकट केला पाहिजे. त्यांनी स्वहित (स्वार्थ) सोडून दिला पाहिजे, आणि देवाचा आत्मा व सामर्थ्य यांनी भारले गेले पाहिजे. मनापासून, चिकाटीने, देवावर पूर्णपणे विसंबून राहण्यास मार्गदर्शन करणाऱ्या विश्वासाने केलेली विनंती आणि त्याच्या कार्यासाठी पूर्णतः केलेले समर्पणच केवळ, राजे व सत्ताधिश, या जगातील दुष्ट अधिकारी व उच्च स्थानावरील दुष्टात्मे यांच्या विरुद्ध लढाई करण्यास पवित्र आत्म्याची मदत लाभेल.DAMar 377.2

    येशू म्हणाला, “जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर या डोंगराला येथून तिकडे सर, असे तुम्ही म्हटल्यास तो सरेल.’ जरी मोहरीचा दाणा अतिशय बारीक असला तरी, ते जीवन तत्त्व विराट वृक्षाची वाढ करते तेच त्याच्यातही असते. जेव्हा मोहरीचा दाणा भूमीत पेरला जातो. तेव्हा तो लहानसा दाणा त्याच्या पोषणासाठी देवाने दिलेल्या प्रत्येक घटकाचा उपयोग करतो आणि त्यावर भराभर कणखरपणे वाढतो. जर तुमचाही विश्वास तसाच असेल, तर तुम्हीसुद्धा देवाच्या वचनाचा व त्याने निवडलेल्या सर्व साहाय्यक गोष्टींचा उपयोग कराल, तर अशाने तुम्ही तुमचा विश्वास भक्कम कराल, आणि तुमच्या मदतीसाठी तुम्ही स्वर्गीय सामर्थ्य मिळवाल. सैतानाने तुमच्या मार्गावर उभारलेले निश्चल डोंगरासारखे दुस्तर अडथळे तुमच्या विश्वासपूर्ण विनंतीमुळे नाहीसे होतील. “तुम्हाला काही असाध्य होणार नाही.”DAMar 377.3