Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ५१—जीवन प्रकाश

    योहान ८:१२-५९; ९.

    “पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”DAMar 406.1

    मंडपाच्या सणाच्यावेळी येशू मंदिराच्या अंगणात असतांना त्याने ते उद्गार काढिले. अंगणाच्या मध्यभागी मोठ्या दीपस्तंभाला आधार देण्यासाठी दोन खूट होते. सायंकाळचा यज्ञविधि झाल्यावर सगळे दीप लावण्यात आले होते आणि त्यांचा प्रकाश यरुशलेमवर पडला होता. हा विधि अरण्यामध्ये इस्राएल लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रकाशस्तंभाचा स्मरणोत्सव होता आणि मशीहाच्या आगमनाची ग्वाहीही देणारा होता. सायंकाळच्या वेळी जेव्हा सर्व दिवे लावण्यात येत तेव्हा अंगण खुलून दिसत असे. त्यावेळी लेवी गाण्याच्या सुरात प्रार्थना गुणगुणत असताना वृद्ध उतार वयातले लोक, मंदिरातील याजक आणि अधिकारी वाद्यसंगीताच्या तालावर नाच करण्यात रमत होते.DAMar 406.2

    यरुशलेमाच्या रोशनाईद्वारे मशीहा इस्राएल लोकावर आपला प्रकाश पाडील अशी आशा व्यक्त करीत होते. परंतु येशूच्या दृष्टीने त्यामध्ये अधिक अर्थ होता. मंदिरातील तेजस्वी बत्त्या लावल्यावर सभोवतालचे सर्व प्रकाशमान होत होते तसेच आध्यात्मिक प्रकाशाचा उगम जो ख्रिस्त जगातील अंधार आपल्या प्रकाशाने नाहिसा करीत होता. तथापि ही संज्ञा किंवा संकेत अपूर्ण होता. स्वतःच्या हाताने अंतराळात जो महान प्रकाश उभारिला तो त्याच्या कार्याच्या वैभवाचे खरे दर्शक होता.DAMar 406.3

    ती प्रातःकाळ होती; सूर्य नुकताच जैतूनाच्या डोंगरावर उदय पावला होता आणि त्याच्या किरणांनी टोलेजंग हवेलीतील संगमरवरी पाषाण आणि मंदिराच्या भीतीतील सोने चकाकत होते. येशूने त्याच्याकडे बोट करून म्हटले, “मी जगाचा प्रकाश आहे.”DAMar 406.4

    ज्यांनी त्याचे हे वचन ऐकले होते त्यांनी फार दिवसांनी त्याचा पुनरुच्चार केला व म्हटले, “त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रहण केले नाही.’ “जगात येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करणारा हा खरा प्रकाश होता.’ योहान १:४, ५, ९. येशूने स्वर्गात आरोहन झाल्यावर फार दिवसांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पेत्राने ख्रिस्ताने वापरलेल्या चिन्हाचे स्मरण करून दिले; “शिवाय अधिक निश्चिय असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते अंधाऱ्या जागी प्रकाश पाडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंत:करणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.” २ पेत्र १:१९.DAMar 406.5

    लोकांना देव प्रगट होत असताना त्याच्या उपस्थितीची खूण प्रकाश ही नेहमीच राहिली आहे. प्रारंभी उत्पत्तीच्यावेळी अंधारातून प्रकाश चमकला. इस्राएलाच्या मोठ्या समुदायाला मार्गदर्शन करीत असता दिवसा मेघस्तंभाभोवती व रात्री अग्निस्तंभाभोवती प्रकाश चमकत होता. सीनाय पर्वतावर प्रभूभोवती भव्य तेज प्रकाशाच्या ज्वालाचा झोत दिसत होता. मंडपातील दयासनावर प्रकाश चमकत होता. समर्पणाच्या प्रसंगी शलमोनाचे मंदिर प्रकाशाने भरून गेले होते. देवदूतांनी मेषपाळांच्याकडे उद्धाराचा शुभसंदेश आणिला तेव्हा बेथहेलमच्या टेकडीवर प्रकाश चमकला.DAMar 407.1

    देव प्रकाश आहे, आणि ख्रिस्ताने जेव्हा घोषीत केले की “मी जगाचा प्रकाश आहे” तेव्हा पित्याशी असलेली एकात्मता आणि मानवप्राण्याशी असलेले सख्य त्याने व्यक्त केले. प्रारंभीच त्याने “अंधारातून उजेड प्रकाशित केला.” २ करिंथ. ४:६. सूर्य, चंद्र व तारे यांना त्याच्यापासून प्रकाश मिळतो. चिन्हे, द्योतक व भाकीत यांच्याद्वारे इस्राएल लोकावर तो आध्यात्मिक प्रकाश पाडीत होता. केवळ यहूदी राष्ट्रालाच प्रकाश दिला नव्हता. जसे सूर्यकिरण पृथ्वीच्या कोनाकोपऱ्यात शिरतात तसेच धार्मिकतेच्या सूर्याचा प्रकाश प्रत्येक आत्म्यावर प्रकाशितो. DAMar 407.2

    “जगात येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करणारा खरा प्रकाश होता.’ जगामध्ये महान शिक्षक, विद्वान आणि आश्चर्यकारक संशोधन पाहिले. ज्यांच्या वक्तृत्वाने विचाराला चालना मिळाली आणि ज्ञान भंडार दृष्टीपथात आले; त्यांचा मानव जातीचे मार्गदर्शक व आश्रयदाते म्हणून सन्मान करण्यात आला. परंतु त्यांच्यापेक्षा एक सर्वश्रेष्ठ आहे. “जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.” “देवाला कोणी कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे.” योहान १:१२, १८. जगातील मानवी इतिहासातील महान व्यक्तीचा आढाव घेऊ शकतो; परंतु प्रकाश त्यांच्या अगोदर होता. ज्याप्रमाणे सूर्य प्रकाशाच्या प्रतिबिंबाने चंद्र, तारे व सूर्यमाला प्रकाशित होतात त्याप्रमाणे जगातील विद्वान लोकांच्या शिकवणीमध्ये धार्मिकतेच्या सूर्याचे प्रतिबिंब होते काय? प्रत्येक मोल्यवान विचार, बुद्धिमतेची प्रत्येक झलक जगातील प्रकाशापासून आहे. सांप्रत जगात आम्ही “उच्च शिक्षणाविषयी’ फार ऐकतो. “ज्याच्यामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधि गुप्त आहेत” त्याने दिलेले शिक्षण “उच्च शिक्षण’ आहे. “त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.’ कलस्सै. २:३; योहान १:४. येशूने म्हटले, “जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”DAMar 407.3

    “मी जगाचा प्रकाश आहे’ ह्या उद्गाराद्वारे येशूने स्वतः मशीहा असल्याचे घोषीत केले. आता जेथे मंदिरामध्ये ख्रिस्त शिकवीत होता तेथे वयोवृद्ध शिमोनाने घोषीत केले होते की, “विदेश्यास प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव आहे.” लूक २:३२. सर्व इस्राएल लोकांना परिचित असलेले भाकीत ह्या वचनाद्वारे तो त्याला संबंधीत असल्याचे दाखवीत होता. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने यशया संदेष्ट्याने घोषीत केले, “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या रक्षिलेल्या लोकास परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे यात काही मोठेसे नाही; तर मजकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमितो.” यशया ४९:६. हे भाकीत मशीहाविषयीचे असल्याचे सर्वसाधारणपणे समजले जाते. जेव्हा येशूने “मी जगाचा प्रकाश आहे,’ असे उद्गार काढिले तेव्हा तो आश्वासित आहे असे समजून घेण्यात लोकांनी चुकी केली नाही.DAMar 408.1

    परंतु “तुम्ही कोण आहात?” ह्या प्रश्नाला येशूने उत्तर दिले, “पहिल्यापासून तुम्हाला जे सांगत आलो हेच नाही का?’ योहान ८:२५. त्याच्या मुखाद्वारे जे प्रगट केले होते तेच त्याच्या स्वभावामध्ये प्रगट झाले होते. शिकविलेल्या सत्याचे तो मूर्त स्वरूप होता. त्याने पुढे म्हटले, “मी माझ्या मनचे काही करीत नाही, परंतु माझ्या पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठविले तो मजबरोबर आहे; पित्याने मला एकटे सोडले नाही; कारण त्याला संतोष देणाऱ्या गोष्टी मी सर्वदा करितो.’ तो मशीहा आहे हे सिद्ध करण्याचा त्याने प्रयत्न केला नाही परंतु देवाशी असलेले ऐक्य त्याने दाखविले. देवाच्या प्रेमासाठी त्यांचे मन मोकळे असते तर त्यांनी ख्रिस्ताचा अंगिकार केला असता.DAMar 408.2

    श्रोतेजनातील पुष्कळजन त्याच्याकडे श्रद्धेने आकर्षिले होते. त्यांना त्याने म्हटले, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हास सत्य समजेल व सत्य तुम्हास स्वतंत्र करील.” DAMar 408.3

    ह्या शब्दांनी परूश्यांचे मन दुखले गेले. प्रदीर्घ काळाच्या परकीय जोखंडाचा त्यांना तिरस्कार वाटत होता म्हणून क्रोधाविष्ट होऊन त्यांनी म्हटले, “आम्ही आब्राहामाचे वंशज आहो व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो; तर तुम्ही स्वतंत्र व्हाल असे तुम्ही कसे म्हणता?” द्वेष व आकस याच्या गुलामगिरीत पडलेल्या व सूड बुद्धीने चेतावलेल्या ह्या लोकांकडे येशूने दृष्टीक्षेप केला आणि दुःखीत होऊन म्हटले, “मी खचीत खचीत सांगतो, जो कोणी पाप करितो तो पापाचा दास आहे.” ते तर दुष्टात्म्याच्या बंधनाखाली रखडत होते.DAMar 408.4

    जो देवाला शरण येत नाही त्याच्यावर दुसऱ्या सामर्थ्याचे वर्चस्व येते. त्याला स्वतःचे अस्तित्व राहात नाही. तो स्वातंत्र्याविषयी वाचाळता करतो परंतु तो अगदी क्षुद्र, निंद्य गुलामगिरीखाली असतो. सत्य सौंदर्य पाहाण्यास त्यांना मोकळीक नसते कारण त्यांचे मन सैतानाच्या अधिकाराने बंदिस्त झालेले असते. जरी तो स्वतःच्या न्यायबुद्धीप्रमाणे वागतो अशी बढाई करितो तरी तो अंधाराच्या अधिपतीच्या इच्छेप्रमाणे वागतो. पापाच्या गुलामगिरीचा खोडा तोडून काढण्यासाठी ख्रिस्त आला. “जर पुत्र तुम्हास स्वतंत्र करील तर तुम्ही खरेखरे स्वतंत्र व्हाल.” “ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमपासून मुक्त केले आहे.” रोम. ८:२.DAMar 409.1

    उद्धारकार्यात जुलूम जबरदस्ती नाही. बाह्य शक्तीचा उपयोग करण्यात येत नाही. दिव्य आत्म्याच्या प्रभुत्वाखाली मनुष्याला कोणाची सेवा करायची हे निवडण्यास मोकळीक आहे. ख्रिस्ताला शरण गेल्यावर जो बदल होतो त्यामध्ये उच्च दर्जाचे स्वातंत्र्य लाभते. पापाचे उच्चाटन ही व्यक्तीचीच कृती आहे. सैतानाच्या कबज्यातून स्वतःला मोकळे करून घेण्याची शक्ती आम्हामध्ये नाही हे खरे आहे; परंतु पापमुक्त होण्याची आम्ही इच्छा करितो आणि ते साध्य होण्यासाठी बाह्य सामर्थ्याची मनापासून विनवणी करितो तेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरून जातो, आणि देव इच्छेची कार्यसिद्धी होते.DAMar 409.2

    ख्रिस्ताशी संघटीत झाल्यानंतर मनुष्याला मोकळीक शक्य असते. “सत्य तुम्हास स्वतंत्र करील’ आणि ख्रिस्त सत्य आहे. कमकुवत मनावर पाप विजय मिळविते आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य धोक्यात आणिते. देवाच्या आधीन होणे म्हणजे मनुष्याचे खरे वैभव आणि मोठेपणा यांची प्रतिष्ठापना करणे होय. ज्या दिव्य नियमाला आम्ही आधीन होतो तो “स्वतंत्रेचा नियम” आहे. याकोब. २:१२. DAMar 409.3

    आब्राहामाची मुले असल्याचे परूश्यांनी घोषीत केले आहे. आब्राहामाचे काम करून ही घोषणा सिद्ध केली पाहिजे असे येशूने त्यांना सांगितले. आब्राहामाची खरी मुले आब्राहामाप्रमाणे देवाची आज्ञा पाळतील. देवापासून आलेले सत्य जो सांगत आहे त्याचा ते वध करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. ख्रिस्ताविरुद्ध कट करून हे धर्मगुरू आब्राहामाचे कार्य करीत नव्हते. केवळ अनुवंशिकरित्या आब्राहामाच्या वंशात राहाणे निरर्थक आहे. त्याच्याशी आध्यात्मिक संबंध राखून त्याची वृत्ती संपादन व त्याच्यासारखेच कार्य केल्याशिवाय ते त्याची मुले होऊ शकत नव्हती.DAMar 409.4

    ख्रिस्ती जगतामध्ये प्रेषितीय वारसा हक्काविषयी जो लोकक्षोभ निर्माण झाला आहे तो सोडविण्यास हेत तत्त्व लागू पडते. नाव किंवा वंशावळ ह्याद्वारे नाही तर स्वभावाच्या सारखेपणाने आब्राहामाचे कूळ ओळखण्यात येत होते. त्याचप्रमाणे धर्मोपदेशकाचा अधिकार एकापासून दुसऱ्याला देणे यावर प्रेषितीय वारसा हक्क अवलंबून नाही तर आध्यात्मिक सख्यसंबंधावर आहे. प्रेषितांच्या भक्तीभावाने प्रेरित झालेले जीवन आणि त्यांनी शिकविलेली श्रद्धा व सत्य ही प्रेषितीय वारसा हक्काची खरी साक्ष व पुरावा आहेत. DAMar 409.5

    यहूदी आब्राहामाची मुले असल्याचे येशूने नाकारले. त्याने म्हटले, “तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करिता.” थट्टा करून ते म्हणाले, “आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही; आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे. हे शब्द त्याच्या जन्माच्या संदर्भात होते व त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या विचारात जे होते त्यांच्यासमोर ख्रिस्ताच्या विरोधात ते काढलेले होते. येशूने ह्या खोचक बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो आहे.’DAMar 410.1

    जो लबाड व खूनी होता त्याच्याशी त्यांचा संबंध होता हे त्यांच्या कृतीवरून दिसते. येशूने म्हटले, “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही... मी तुम्हास खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवीत नाही.” योहान ८:४४, ४५. येशूने निःसंदिग्धपणे सत्य सांगितले म्हणून यहूदी पुढाऱ्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. सत्यामुळे ह्या ढोंगी माणसांची मने दुखली गेली. सत्याने चुकीचा युक्तीवाद उघडकीस आणला; त्याने त्यांची शिकवण व आचरण निरुपयोगी ठरविली आणि ते अस्विकारणीय झाले. स्वतःच्या चुका कबूल करून नम्रभाव दर्शविण्याऐवजी ते सत्याकडे दुर्लक्ष करण्यास तयार होते. सत्य ते सत्य जरी होते तरी त्याच्यावर त्यांची निष्ठा नव्हती आणि त्यांना त्याची इच्छा नव्हती.DAMar 410.2

    “तुम्हापैकी कोण मला पापी ठरवितो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही?” तीन वर्षे त्याचे शत्रू दररोज एकसारखे त्याच्या पाठी लागून त्याच्य स्वभावात काही उणीवा शोधण्याचा प्रयत्न करीत होते. सैतान व दुष्टाईशी संगनमत करणारे सर्वजन त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु त्यांना फायदा होईल असे काही त्याच्याजवळ आढळले नाही. दुष्टात्म्याने सुद्धा कबूल केले की, “देवाचा पवित्र तो तूच.” मार्क १:२४. स्वर्गाच्या दृष्टीने येशूने नियमांचे पालन केले. देवदूत, मनुष्य आणि दुरात्मे यांच्यासमोर आव्हान देता येणार नाही असे उद्गार काढिले “त्याला संतोष देणाऱ्या गोष्टी मी सतत करितो.” दुसऱ्याच्या मुखातून हे शब्द निघाले असते तर ते देवनिंदक समजले गेले असते.DAMar 410.3

    ख्रिस्ताच्याठायी त्यांना जरी काही पाप सापडले नाही तरी यहूदी त्याचा स्वीकार करीत नव्हते त्यावरून त्यांचा देवाशी काही संबध नव्हता ते सिद्ध होते. त्याच्या पुत्राच्या संदेशात त्याची (पित्याची) वाणी त्यांनी ओळखली नाही. त्यांना वाटले की ते येशूचा न्याय करीत होते; परंतु त्याचा धिकार करून ते स्वतःचा न्याय करीत होते. येशूने म्हटले, “जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो; तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”DAMar 410.4

    सर्व काळासाठी हा धडा खरा आहे. काही लोकांना शब्दांचा कीस काढण्यास आणि टीका करण्यास आणि देवाच्या वचनावर शंका काढण्यास अत्यानंद होतो. ते कुशाग्रबुद्धी व स्वतंत्र विचारसरणी यांची साक्ष देतात. बायबलचा ते न्याय करीत आहेत असे त्यांना वाटते परंतु खऱ्या अर्थाने ते स्वतःचाच न्याय करितात. ज्याचा परिणाम अनंतकाळचा आहे व जे स्वर्गातून आले आहे त्या सत्याचे गुणग्रहण करण्यास ते असमर्थ आहेत हे दर्शवितात. देवाच्या धार्मिकतेच्या महान पर्वताच्या समक्षतेत त्यांच्या मनोभावनेवर वचक बसली नाही. ते कवडी मोलाची काडी कसपट शोधण्यांत दंग असतात आणि त्याद्वारे मनावर परिणाम होऊन देवाचे महत्त्व समजण्यास असमर्थ बनतात. दिव्य स्पर्शाला प्रतिसाद देणाऱ्यांचे देवाविषयीचे ज्ञान वृद्धिंगत होईल आणि त्याद्वारे शील स्वभाव भारदस्त व सुसंस्कृत होईल. जेव्हा फूल सूर्याकडे तोंड फिरवते तेव्हा सूर्याच्या तेजस्वी किरणाने फुलावर सौंदर्याची झटा येऊन ते फुलून दिसते त्याप्रमाणेच जेव्हा आत्मा धार्मिकतेच्या सूर्याकडे वळतो तेव्हा त्याचा स्वभाव ख्रिस्त कृपेने सुशोभित होतो.DAMar 411.1

    आब्राहामाचा दृष्टिकोन आणि यहूद्यांचा दृष्टिकोन यांच्यामधील तीव्र फरक तुलनात्मकरित्या येशू दाखवीत होताः “तुमचा बाप आब्राहाम माझा दिवस पाहाण्यासाठी उल्लासित झाला; तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला.”DAMar 411.2

    आश्वासित उद्धारकाला पाहाण्याची आब्राहामला फार अपेक्षा होती. मरणाअगोदर महान मशीहाचे दर्शन व्हावे ह्यासाठी त्याने मनापासून प्रार्थना केली, आणि त्याने ख्रिस्ताला पाहिले. अलौकिक प्रकाश त्याला देण्यात आला आणि त्याने ख्रिस्ताचा दिव्य शीलस्वभाव ओळखिला. त्याने त्याचा दिवस पाहिला आणि त्याचे समाधान झाले. पापासाठी केलेल्या दिव्य बलिदानाचे दृश्य त्याने पाहिले. ह्या बलिदानाचा अनुभव त्याच्या जीवनात त्याला आला होता. त्याला आदेश दिला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक घेऊन जा... आणि त्याचे होमार्पण कर.’ उत्पत्ति २२:२. नवसाचा पुत्र, ज्याच्यामध्ये त्याच्या सर्व आशा केंद्रित झाल्या होत्या त्याला त्याने अर्पणासाठी वेदीवर ठेवला होता. देवाच्या आज्ञा मानण्यासाठी हातातील सुरा वर करून उभे राहिला असता स्वर्गातून आलेली वाणी त्याने ऐकिली, ती म्हणाली, “तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको; कारण तू आपल्या पुत्रास, आपल्या एकुलत्या एका पुत्रासही मला अर्पिण्यास मागेपुढे पाहिले नाही, यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला दिसून आले.” उत्पत्ति २२:१२. त्याने ख्रिस्ताचा दिवस पाहावा आणि जगावरील देवाच्या अचाट प्रेमाचा अनुभव घ्यावा ह्यासाठी ही भयंकर कसोटी आब्राहामावर लादली होती. हे प्रेम इतके महान होते की त्या निकृष्ट अवस्थेतील जगाला बाहेर काढण्यासाठी त्याला आपल्या एकुलत्या पुत्राचा बली द्यावा लागला.DAMar 411.3

    मनुष्य प्राण्याला दिलेला महान धडा आब्राहामाने देवापासून शिकला. त्याच्या मरणाअगोदर त्याला ख्रिस्ताचे दर्शन व्हावे अशी केलेली त्याची प्रार्थना ऐकण्यात आली होती. त्याने ख्रिस्ताला पाहिले; मानवप्राणी जे पाहू शकतो त्याने ते पाहिले आणि तो जीवंत राहिला. त्याने केलेल्या सर्वस्वी शरणागतीमुळे दिलेला ख्रिस्ताविषयीचा दृष्टांत तो समजू शकला. निरंतरच्या नाशापासून पाप्यांची सुटका करण्यासाठी देवाला आपला एकुलता पुत्र द्यावा लागला आणि त्याद्वारे देवाने मानवाच्या यज्ञापेक्षा महान यज्ञबली केला हे त्याला दाखविण्यात आले.DAMar 412.1

    आब्राहामच्या अनुभवाद्वारे प्रश्नाचे उत्तर देण्यात आले: “मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबलि, एका वर्षाची वासरे घेऊन त्याजपुढे येऊ काय? हजारो एडके, तेलाच्या दशसहस्त्र नद्या, यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपले पोटचे फळ देऊ काय?’ मीखा ६:६, ७. आब्राहामने काढिलेले उद्गार, “माझ्या बाळा, देव स्वतः होमबलीसाठी कोकरू पाहून देईल.” (उत्पत्ति २२:८), आणि इसहाकाच्याऐवजी होमबलीसाठी देवाने केलेली तरतूद ह्या दोन्ही उदाहरणाने स्पष्ट होते की, कोणी मनुष्य स्वतःसाठी प्रायश्चित करू शकत नाही. कोणत्याही बापाला पापार्पणासाठी आपला पुत्र किंवा कन्या अर्पावयाचा नाही. केवळ देवपुत्र जगाचे पाप वाहू शकतो.DAMar 412.2

    स्वतःच्या दुःख व्यथेद्वारे उद्धारकाच्या यज्ञबली कार्याचा समज आब्राहामला होऊ शकला. परंतु त्यांच्या अहंपणाच्या वृत्तीमुळे इस्राएल लोकांना त्याचा उमज होत नव्हता. आब्राहामाविषयी ख्रिस्ताने काढिलेल्या उद्गाराचा श्रोतेजनावर फार परिणाम झाला नाही. कारणावाचून दोष लावण्यास परूशी लोकांना मात्र हे नवीन निमित्त मिळाले. जणू काय येशू वेडा मनुष्य आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी उपहासाने टोमणा मारिला, “तुम्हाला अजून पन्नास वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही आब्राहामाला पाहिले आहे काय?”DAMar 412.3

    येशूने सभ्यपणाने उत्तर दिले, “आब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.”DAMar 412.4

    प्रचंड लोकसमुदायावर शांतता पसरली. सनातन समक्षता व्यक्त करण्यासाठी मोशेला देवाचे नाम दिले होते ते त्याचे होते असे ख्रिस्ताने सांगितले, इस्राएलाला वचन दिलेला तो स्वयंभू असल्याचे त्याने जाहीर केले, “तुझ्यामधून एकजण निघेल, ... त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादि काळापासून आहे.’ मीखा ५:२.DAMar 412.5

    येशू देवनिंदक आहे असे पुन्हा याजक व धर्मगुरू आरडाओरडा करू लागले. तो देवाशी एक आहे ह्या त्याच्या वक्तव्याने पूर्वी ते त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत होते आणि काही महिन्यांनी त्यांनी स्पष्ट जाहीर केले, “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हाला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषणासाठी. कारण आपण मानव असून स्वतःला देव म्हणविता.’ योहान १०:३३. तो स्वतःला देवपुत्र म्हणून संबोधित होता म्हणून त्याचा नाश करण्याचा त्यांनी घाट घातला होता. याजक व धर्मगुरू यांच्या बाजूला असलेल्या अनेक लोकांनी मारण्यासाठी दगड उचललेले होते. “परंतु येशू त्यांच्यामधून जाऊन मंदिरातून गुप्तपणे निघून गेला.”DAMar 413.1

    प्रकाश अंधारात प्रकाशत होता; परंतु “अंधाराने त्याला ओळखिले नाही.” योहान १:५.DAMar 413.2

    “येशू तिकडून जात असता एक जन्मांध मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरूजी, कोणाच्या पापामुळे हा असा अंधळा जन्मास आला? ह्याच्या घरी ह्याच्या आईबापाच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापाने पाप केले असे नाही, तर ह्याच्याठायी देवाची कार्ये प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला... असे बोलून तो भूमीवर थुकला, थुकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यास लाविला, आणि त्याला म्हटले, जा; शिलोह (म्हणजे पाठविलेला) नावाच्या तळ्यात धू. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला.”DAMar 413.3

    पापाची शिक्षा ह्याच जीवनात देण्यात येते अशी यहुद्यांची सर्वसाधरण विचारसरणी होती. आलेली प्रत्येक पीडा स्वतःच्या पापाची किंवा आईबापाची ती शिक्षा आहे असे गणण्यात येत होते. देवाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने दुःख यातना होतात हे खरे आहे, परंतु ह्या सत्याचा विपर्यास करण्यात आला होता. पाप व त्याचा परिणाम यांचा उत्पादक सैतान असून पापाची शिक्षा म्हणून आजार व मरण देवापासून येतात अशी भ्रामक कल्पना त्याने (सैतानाने) माणसाच्या गळी घातली आहे. ह्यामुळे एकाद्यावर एकादी पीडा किंवा व्यथा येते त्याला महान पापी म्हणून घेण्याचे दुसरे ओझे त्याच्यावर पडते.DAMar 413.4

    अशा प्रकारे येशूचा नाकार करण्याचा यहूद्याचा मार्ग मोकळा झाला होता. “ज्याने आमचे व्याधि आपणावर घेतले, आमचे क्लेश वाहिले,” तरी यहूद्यांनी “त्यास ताडण केलेले, त्यावर प्रहार केलेले व पीडिलेले’ असे लेखिले आणि त्याच्यापासून त्यांनी आपली तोंडे फिरविली. यशया ५३: ४, ३.DAMar 413.5

    हे टाळण्यासाठी देवाने एक पाठ दिला. ईयोबाच्या जीवनचरीत्रावरून दर्शविले आहे की, क्लेश व व्यथा सैतानाकडून येतात आणि दयेचा उद्देश साध्य करण्यासाठी देव ते आपल्या अधिकाराने दूर करितो. परंतु इस्राएल लोकांना हा पाठ समजला नव्हता. ज्या चुकीसाठी देवाने ईयोबाच्या स्नेह्यांना दोष दिला तीच चुकी येशूचा नाकार करून यहूदी लोक करीत होते.DAMar 413.6

    पाप व क्लेश यांच्या संबंधाविषयी यहूद्यांची जी विचारसरणी होती तीच विचारसरणी ख्रिस्ताच्या शिष्यांची होती. येशूने त्यांच्या चुकांची दुरूस्ती करीत असताना त्याने मनुष्याच्या क्लेशाने कारण समजाऊन सांगितले नाही परंतु त्याचा परिणाम काय होईल हे त्याने सांगितले, कारण त्याद्वारे देवाचे कार्य प्रगट व्हावे. “मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” असे त्याने म्हटले. त्यानंतर अंध मनुष्याच्या डोळ्यांना चिखल लावून शिलोह तळ्यात धुण्यासाठी त्याला पाठविले आणि तो डोळस झाला. अशा रीतीने येशूने शिष्यांच्या प्रश्नाला व्यावहारिकरित्या प्रत्यक्ष उत्तर दिले. पाप कोणी केले किंवा कोणी केले नाही ह्यावर खल करण्यासाठी शिष्यांना बोलविण्यात आले नव्हते, परंतु त्या जन्मांधळ्यास डोळस करण्यात कामी आलेली देवाची दया व सामर्थ्य ह्यांच्याविषयी ज्ञान करून घेण्यास बोलाविले होते. चिखलामध्ये किंवा त्या अंधाला ज्या तळ्यात धुण्यासाठी पाठविले होते त्या तळ्यात निरोगी करण्याची शक्ती नव्हती परंतु ख्रिस्तामध्ये ती शक्ती होती.DAMar 414.1

    बरे झालेला पाहून परूश्यांना आश्चर्य वाटले. तथापि द्वेषाने त्यांची तळपायाची आग मस्तकाला पोहंचली; कारण हा चमत्कार शब्बाथ दिवशी केला होता.DAMar 414.2

    त्या तरुणाचे शेजारीपाजारी व परिचित असलेले म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही काय?” त्याच्याकडे साशंक होऊन ते पाहू लागले; कारण त्याने डोळे उघडल्यावर त्याचा चेहरा बदलेला व तेजदार दिसला आणि तो दुसरा मनुष्य असल्यासारखा दिसत होता. ते एकमेकाला विचारू लागले. कित्येक म्हणाले, “तो हाच आहे;” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे.’ परंतु त्या महान आशीर्वादाचा लाभ घेतलेल्याने म्हटले, “मी तोच आहे” आणि प्रश्न सोडविला. त्यानंतर त्याने येशूविषयी व कोणत्या साधनाने त्याला बरे केले ते त्याने सांगितले. त्यावर ते विचारू लागले, “तो कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही.”DAMar 414.3

    त्यानंतर त्याला परूश्यांच्या मंडळापुढे आणिले. त्याला दृष्टी कशी आली याविषयी त्याला पुन्हा विचारिले. “त्याने त्यांना म्हटले, त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला आणि मी जाऊन धुतले व मला दृष्टी आली. ह्यावरून परूश्यांतील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळीत नाही.” येशूला मशीहा म्हणण्याच्या ऐवजी त्याला पापी बनविण्याची परूश्यांनी अपेक्षा केली. त्या अंध मनुष्याला बरे करणारा शब्बाथाचा उत्पादक आहे व शब्बाथ पालनाविषयी त्याला सर्व ज्ञान आहे ह्याविषयी त्यांना कल्पना नव्हती. शब्बाथ पालनाविषयी ते अति उत्साही आहेत असे ते दर्शवीत होते, तथापि त्याच दिवशी खून करण्याची त्यांची योजना होती. परंतु ह्या चमत्कारामुळे अनेकजन भारावून गेले होते आणि अंधाला दृष्टी देणारा मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे ह्याचे उत्तर देण्यासाठी ते म्हणाले, “पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो?”DAMar 414.4

    धर्मगुरू पुन्हा त्या अंध मनुष्याला विचारू लागले; “ज्याने तुझे डोळे उघडले त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? त्याने म्हटले, तो संदेष्टा आहे.’ त्यानंतर परूशी म्हणू लागले की तो आंधळा जन्मला नाही आणि त्याला दृष्टी आली नाही. त्यांनी त्याच्या आईबापाना बोलावून विचारिले, “तुमचा जो मुलगा अंधळा जन्मला असे म्हणता तो हाच काय?’DAMar 415.1

    मनुष्य स्वतः म्हणतो की, तो अंध होत व आता त्याला दृष्टी आली आहे; परूशी साक्षीपुरावा नाकारतील परंतु आपली चूक कबूल करणार नाहीत. त्यांचा दुराग्रह इतका जबरदस्त होता, त्यांची धार्मिकता इतकी विकृत, विपर्यस्त होती.DAMar 415.2

    त्या तरुणाच्या आईबापाना दहशत घालणे ही एक आशा परूश्यांना उरली होती. त्यांनी विचारिले, “आता त्याला दृष्टी कशी आली?” तडजोड करायला आईबापाना भय वाटत होते; कारण असे घोषीत केले होते की, येशूला ख्रिस्त म्हणून कोणी पत्करल्यास त्याला “सभाबहिष्कृत करण्यात येईल;” म्हणजे त्या सभागृहाबाहेर तीस दिवस ठेवण्यात येईल. ह्या अवधीत कोणा मुलाची सुता करण्यात येणार नाही किंवा त्या घरात मेलेल्याबद्दल शोक करता येणार नाही. ही शिक्षा मोठी विपत्ति, मोठे संकट समजले जात होते; आणि त्याद्वारे पश्चात्ताप झाला नाही तर त्याहीपेक्षा तीव्र शिक्षा देण्यात येत असे. आपल्या पत्रावर महान वरदान आल्याबद्दल आईबापाची खात्री झाली होती, तथापि त्यांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो अंधळा जन्मला होता हे आम्हाला ठाऊक आहे; तरी त्याला दृष्टी कशी आली हे आम्हाला ठाऊक नाही; किंवा त्याचे डोळे कोणी उघडिले हेही आम्हाला ठाऊक नाही; त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल.” अशा प्रकारे आपल्यावरील सर्व जबाबदारी त्यांनी पुत्रावर टाकली; कारण ख्रिस्ताला मानण्यास त्यांनी धाडस केले नाही.DAMar 415.3

    परूशी आता कोंडीत पडले होते. त्यांचे प्रश्न विचारणे, आणि दुराग्रह, घडलेल्या उदाहरणातील वस्तुस्थिती मान्य न करणे ह्या गोष्टींनी लोकसमूदायाचे विशेषतः सामान्य माणसांचे डोळे उघडत होते. येशूने आपले चमत्कार वारंवार चव्हाट्यावर केले होते आणि त्याद्वारे लोकांना नेहमी व्याधीपासून आराम लाभत असे. अनेकांच्या मनात प्रश्न होता की, देव अशी अचाट कृत्ये भोंदू व्यक्तीद्वारे करून घेईल काय? कारण येशू भोंदू, तोतया आहे असे परूशी आग्रहाने सांगत होते. दोन्ही बाजूने हा संघर्ष जोर धरत होता.DAMar 415.4

    येशूने केलेल्या कामाची ते जाहीरात करीत होते हे परूश्यांच्या नजरेत आले. केलेला चमत्कार ते नाकारू शकत नव्हते. अंध मनुष्य कृतज्ञापूर्वक आनंद करीत होता; निसर्गातील अद्भुत गोष्टी आणि आकाश व पृथ्वी यांचे सौंदर्य पाहून तो हर्षाने भरला होता. उघडपणे तो आपला अनुभव सांगत होता, परंतु पुन्हा त्याला गप्प करण्याचा ते प्रयत्न करीत होते. ते म्हणाले, “देवाचे गौरव कर; तो मनुष्य पापी आहे हे आम्हाला ठाऊक आहे.” म्हणजे ह्या मनुष्याने तुला दृष्टी दिली असे म्हणू नकोस; देवाने हे सर्व केले आहे.DAMar 416.1

    अंधळ्या मनुष्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक ठाऊक आहे की मी पूर्वी अंधळा होतो व आता मला दिसते.”DAMar 416.2

    त्यानंतर त्यांनी पुन्हा प्रश्न विचारिला, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडिले? त्याची बुद्धीपुरःसर फसवणूक करण्यासाठी पुष्कळशा प्रश्नांनी त्याला गोंधळून टाकण्याचा प्रयत्न केला. सैतान व त्याचे दुरात्मे परूश्यांच्या बाजूने होते आणि ख्रिस्ताच्या प्रभावाला प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी आपली शक्ती आणि कावेबाजपणा मनुष्यांच्या विचाराशी मिळवून घेतला. लोकांच्या मनातील दृढ खात्रीला त्यांनी बोथट केली होती. दृष्टी आलेल्या मनुष्याला धीर देण्यासाठी देवाचे दूतसुद्धा तेथे हजर होते. DAMar 416.3

    दृष्टी आलेल्या अंधळ्या अशिक्षीत मनुष्याशिवाय दुसऱ्याशी व्यवहार करायचा होता ह्याची कल्पना परुश्यांना नव्हती. ज्याच्याशी त्यांचा संघर्ष होता त्याचे त्यांना ज्ञान नव्हते. अंध मनुष्याच्या अंतर्यामात दिव्य प्रकाश चमकला. ढोंगी लोक त्याचे मन बदलण्याचा प्रयत्न करीत असताना धैर्याने आणि मुद्देसूद उत्तर देऊन त्याला ते पाशात टाकू शकत नाही हे दाखविण्यास देवाने त्याला मदत केली. त्याने उत्तर दिले, “आताच मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही ऐकिले नाही; पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ पाहाता काय? तेव्हा त्यांनी त्याची निर्भत्सना करून म्हटले, तू त्याचा शिष्य आहेस; आम्ही मोशाचे शिष्य आहो. देव मोशाबरोबर बोलला आहे हे आम्हास ठाऊक आहे; हा कोठला आहे हे ठाऊक नाही.’DAMar 416.4

    प्रभु येशूला त्या मनुष्याची दिव्य कसोटी समजली आणि त्याने त्याच्यावर अनुग्रह करून त्याला बोलण्यास दिले त्यामुळे तो ख्रिस्ताचा साक्षीदार झाला. त्याने परूश्यांना अशी उत्तरे दिली की प्रश्न विचारणाऱ्यांना ती मर्मभेदक धमाकावणी होती. ते धर्मग्रंथाचे विशदीकरण करणारे, राष्ट्राला धार्मिक बाबीत मार्गदर्शन करणारे असे स्वतःला संबोधित होते; तथापि चमत्कार करणाऱ्याला कोठून सामर्थ्य प्राप्त होते याविषयी आणि त्याचा शीलस्वभाव व त्याचा हक्क यांच्याविषयी ते अजाण होते. त्या मनुष्याने म्हटले, “हेच मोठे आश्चर्य आहे की तो कोठला आहे हे तुम्हास ठाऊक नाही; पण त्याने तर माझे डोळे उघडले. आपल्याला ठाऊक आहे की देव पापीष्ट लोकांचे ऐकत नाही; तर जो कोणी देवभक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. जन्मांधाचे डोळे कोणी उघडिले असे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. हा देवापासून नसता तर ह्याच्याने काही करवले नसते.” DAMar 416.5

    चौकशी करणाऱ्यांना त्यांच्याच भूमिकेवरून त्यांना उत्तर दिले. त्याच्या विचारसरणीला ते प्रत्युत्तर करू शकले नाहीत. त्याच्या मर्मभेदी व निर्धारपूर्वक काढलेल्या तीक्ष्ण शब्दानी परूशी स्तब्ध होऊन आश्चर्यचकित झाले. काहीक्षण तेथे स्तब्धता होती. त्यानंतर क्रोधाविष्ट झालेले याजक व धर्मगुरू यांनी त्याच्या सहवासाने ते जणू काय भ्रष्ट झाले असे समजून आपले झगे सावरले; त्यांनी आपल्या पायावरची धूळ झाडून टाकली आणि त्याच्यावर दोषारोप करून म्हटले, “तू अगदी पापात जन्मलास आणि आम्हास शिकवितोस काय?’ आणि त्यांनी त्याला बहिष्कृत केले. DAMar 417.1

    त्याचे काय केले हे येशूने ऐकिले आणि ताबडतोब त्याला शोधून म्हटले, “तू देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवितोस काय?”DAMar 417.2

    त्या अंध मनुष्याने प्रथमच त्याला दृष्टी देणाऱ्याचा चेहरा पाहिला. सभागृहासमोर त्याने त्याच्या आईबापाचे कष्टी व गोंधळलेले चेहरे पाहिले होते; धर्मगुरूंचे क्रोधाविष्ट चेहरेही पाहिले होते; आता त्याचे नेत्र येशूच्या प्रेमळ व प्रशांत चेहऱ्यावर विश्राम पावले. आधीच दिव्य शक्तीचा तो प्रतिनिधी आहे असे मानल्याबद्दल त्याला भारी किंमत भरावी लागली; आता त्याला श्रेष्ठ प्रगटीकरण झाले होते.DAMar 417.3

    “तू देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवितोस काय?’ उद्धारकाने ह्या विचारलेल्या प्रश्नाला त्या अंध मनुष्याने प्रश्न विचारून उत्तर दिले, “प्रभूजी मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?” येशूने म्हटले, “तू त्याला पाहिले आहे व तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.’ तो मनुष्य त्याच्या चरणी विनम्र झाला व त्याची त्याने आराधना केली. त्याला त्याची केवळ नैसर्गिक दृष्टीच लाभली असे नाही परंतु त्याचे ज्ञानचक्षूही उघडे झाले. ख्रिस्त त्याला प्रगट करण्यात आला आणि देवाने पाठविलेला असा त्याने त्याचा अंगिकार केला.DAMar 417.4

    जवळच काही परूशी घोळक्याने उभे राहिले होते आणि ते दृश्य येशूने पाहिल्यावर त्याची उक्ती व कृत्ती यांच्या प्रकटीकरणातील फरक त्याच्यासमोर उभे राहिला. त्याने म्हटले, “मी न्यायनिवाड्यासाठी या जगात आलो, यासाठी की ज्यास दिसत नाही त्यास दिसावे; आणि ज्यास दिसते त्यांनी अंधळे व्हावे.” अंधळ्यांना दृष्टी देण्यासाठी आणि अंधारात बसलेल्यांना प्रकाश देण्यासाठी ख्रिस्त आला होता. तो जगाचा प्रकाश असल्याचे त्याने घोषीत केले आणि नुकताच केलेला चमत्कार त्याच्या कार्याची साक्ष होता. त्याच्या येण्याच्या वेळेस उद्धारकाला ज्यांनी पाहिले त्यांना त्याच्या दैवी समक्षतेचे अभूतपूर्वपणे प्रगटीकरण झाले होते. देवाविषयीचे ज्ञान अधिक पूर्णपणे प्रगट करण्यात आले होते. परंतु ह्या प्रगटीकरणामध्ये मनुष्यांचा न्यायनिवाडा करण्यात आला. त्यांच्या शीलाची कसोटी करण्यात आली आणि त्यांचे भवितव्य ठरविण्यात आले. DAMar 417.5

    अंधळ्या मनुष्याला दिव्य सामर्थ्याचे प्रगटीकरण झाल्यावर त्याला नैसर्गिक व आध्यात्मिक दृष्टी लाभली, त्यामुळे पुरूशी खोल अंधारात पडले. त्याच्या काही श्रोतेजनाला वाटले की ख्रिस्ताचे शब्द त्यांनाही लागू होते म्हणून त्यांनी विचारणा केली “आम्हीही अंधळे आहो काय?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही अंधळे असता तर तुम्हाला पाप नसते.’ सत्य जाणून घेण्यास देवाने तुम्हासाठी अशक्य केले आहे तर तुमच्या अज्ञानाचा तुमचा दोष नाही. “परंतु आम्हास दिसते असे तुम्ही आता म्हणता.” तुम्हाला आता दिसते असा तुमचा विश्वास आहे परंतु ज्या माध्यमाद्वारे तुम्हाला दृष्टी आली ते तुम्ही नाकरता. स्वतःची गरज जाणणाऱ्याकडे ख्रिस्त अमाप घेऊन आला. परूशी स्वतःला गरज असल्याचे कबूल करीत नव्हते; ख्रिस्ताकडे येण्याचे त्यांनी नाकारिले, त्यामुळे ते अंधच राहिले. ह्या अंधळेपणात त्यांचाच दोष होता. येशूने म्हटले, “तुमचे पाप तसेच राहते.”DAMar 418.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents