Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

युगानुयुगांची आशा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २५—शब्बाथ

    उत्पत्तीच्या समयी शब्बाथ पवित्र करण्यात आला. मनुष्यासाठी तो अधिकृत करण्यात आला असून त्याचा प्रारंभ, “त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला” त्यावेळी झाला. ईयोब ३८:७. शांती सर्व जगावर पसरली होती; पृथ्वीचा स्वर्गाशी सुंदर मिलाफ झाला होता. “आपण निर्माण केलेले सर्व बहुत चांगले आहे असे देवाने पाहिले;” आणि समाप्त केलेले काम पाहून हर्षभरीत होऊन त्याने विश्रांति घेतली. उत्पत्ति १:३१.DAMar 234.1

    शब्बाथ दिवशी देवाने विसावा घेतला म्हणून “देवाने त्याला आशीर्वाद दिला व पवित्र ठरविला,” - पवित्र कार्यासाठी राखून ठेविला. विसाव्याचा दिवस म्हणून त्याने तो आदामाला दिला. तो उत्पत्तीचे स्मारक होता म्हणून तो देवाचे सामर्थ्य व प्रेम यांचे प्रतीक होता. शास्त्रवचन सांगते, “आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे.” “त्याचे अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्तिकालापासून स्पष्ट दिसत आहेत.” उत्पत्ति २:३; स्तोत्र १११:४; रोम १:२०.DAMar 234.2

    सर्व काही देवपुत्राद्वारे निर्माण करण्यात आले होते. “प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता... सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले नाही असे काहीच राहिले नाही.” योहान १:१-३. शब्बाथ उत्पत्ति कार्याचे स्मारक असल्यामुळे ते ख्रिस्ताचे प्रेम व सामर्थ्य यांचे प्रतीक आहे.DAMar 234.3

    शब्बाथामुळे आमचे लक्ष सृष्टीसौंदर्याकडे वेधले जाते, आणि निर्माणकर्त्याशी आमचा निकटचा संबध येतो. पक्षांची मंजूळ गाणी, वृक्षांचा उसाशासारखा आवाज, समुद्राचा गलबला यांच्यामध्येसुद्धा शातं वातावरणात एदेन बागेत आदामाशी बोललेली वाणी आजसुद्धा ऐकू शकतो. निसर्गातील त्याचे सामर्थ्य पाहात असताना आम्हाला स्वास्थ लाभते कारण ज्या शब्दाने सर्व काही निर्माण केले ते आत्म्याला जीवनाची वार्ता सांगते. “कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.” २ करिंथ. ४:६.DAMar 234.4

    ह्या विचाराने खालील गीताला स्फूर्ति मिळाली, -
    “तू, हे परमेश्वरा, आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे;
    तुझ्या हातच्या कृत्याचा मी जयजयकार करितो.
    हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत!
    तुझे विचार फार गहन आहेत.’
    DAMar 235.1

    स्तोत्र. ९२:४, ५.

    यशया संदेष्ट्याच्याद्वारे पवित्र आत्मा जाहीर करितोः “तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल?... तुम्हास कळत नाही काय? तुम्हास ऐकू येत नाही काय? प्रारंभापासून तुम्हाला हे कळविले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हास समजले नाही काय? हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे; तिच्यावरील रहिवाशी टोळासमान आहेत; तो आकाश मलमलीप्रमाणे पसरितो, राहाण्यासाठी तंबू ताणितात तसे तो ताणितो... मी कोणाशी तूल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभु म्हणतो. आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वांना नावानी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधिश आहे; म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही. हे याकोबा, असे का म्हणतोस, हे इस्राएला, असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टी आढ झाला आहे? तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंत पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धि अगम्य आहे. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपूल बल देतो.’ “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो; मी तुझे सहाय्यही करीतो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने सावरितो.” “पृथ्वीच्या सर्व सीमांनो, मजकडे वळा, उद्धार पावा; कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे.” हा संदेश निसर्गामध्ये लिहिण्यात आलेला आहे आणि शब्बाथाच्याद्वारे त्याचे स्मरण झाले पाहिजे. प्रभूने इस्राएलास शब्बाथ पवित्रपणे पाळण्यास सांगितले तेव्हा त्याने म्हटले, “ते तुम्हांमध्ये व मजमध्ये चिन्ह होतील व तुम्हास समजेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे.’ यशया ४०:१८-२९; ४१:१०; ४५:२२; यहज्केल २०:२०.DAMar 235.2

    सिनाय पवर्तावर दहा आज्ञा दिल्या होत्या त्यामध्ये शब्बाथ अंतर्भूत होता, परंतु तो विश्रामदिन आहे असे पहिल्यांदाच उघड करण्यात आले नव्हते. इस्राएल लोकांना त्याचे ज्ञान अगोदरच होते. आतापर्यंतच्या प्रवासात त्यांनी शब्बाथ पाळिला होता. तो भ्रष्ट केल्यावर प्रभूने त्यांना दोष दिला होता, आणि त्याने म्हटले, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर अमान्य होणार? निर्गम १६:२८.DAMar 235.3

    इस्राएलासाठीच शब्बाथ नव्हता तर सर्व जगासाठी होता. एदेन बागेत मनुष्याला ज्ञात करून दिला, आणि दहा आज्ञेतील इतर आज्ञाप्रमाणे तो अखंड बंधनकारक होता. त्या आज्ञेतील चौथ्या आज्ञेविषयी ख्रिस्ताने म्हटले, “आकाश व पृथ्वी नाहातशी होतपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावाचून नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदु नाहीसा होणार नाही.” आकाश व पृथ्वी अस्तित्वात आहे तोपर्यंत शब्बाथ निर्माणकर्त्याच्या सामर्थ्याचे प्रतीक म्हणून राहाणार. पृथ्वीवर पुन्हा एदेन फुलेल तेव्हा पृथ्वीवरील सर्वजन देवाच्या पवित्र विश्राम दिनाचा सन्मान करतील. “असे होईल की एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत” नवीन पृथ्वीवरील नागरिक, “मजपुढे भजनपूजन करण्यास वर येतील, असे परमेश्वर म्हणतो.’ मत्तय ५:१८; यशया ६६:२३.DAMar 236.1

    यहूदी लोकांना देण्यात आलेल्या विधि नियमामध्ये शब्बाथाच्या नियमाने ते सभोवतालच्या राष्ट्रामध्ये वेगळे दिसत होते. त्याचे पालन केल्याने ते त्याचे भक्त होतात असे देवाचे धोरण होते. मूर्तीपूजापासून विभक्त होणे व सत्य देवाशी जडून जाणे यांची ती खूण होती. शब्बाथ पवित्रपणे पाळण्यासाठी प्रथम ते पवित्र झाले पाहिजेत. विश्वासाच्याद्वारे ख्रिस्ताच्या धार्मिकतेचे ते भागीदार बनले पाहिजेत. “शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ” ही आज्ञा दिली तेव्हा प्रभूने हेही म्हटले, “तुम्ही माझे पवित्र लोक व्हाल.” निर्गम २०:८; २२:३१. केवळ अशा प्रकारे शब्बाथ इस्राएल लोकांना देवाचे उपासक म्हणून वेगळे करितो. DAMar 236.2

    जसे यहूदी लोक देवापासून बहकून गेले, आणि ख्रिस्ताची धार्मिकता विश्वासाने स्वतःची करण्यात अपयशी झाले तसे शब्बाथाचे महत्त्व त्यांच्या दृष्टीने कमी झाले. सैतान स्वतःची प्रतिष्ठा वाढवून ख्रिस्तापासून लोकांना दूर करण्याचा प्रयत्न करीत होता, तो शब्बाथाचा विपर्यास करण्याचा खटाटोप करीत होता कारण ते ख्रिस्त सामर्थ्याचे चिन्ह आहे. देवाच्या विश्रामदिनाभोवती असह्य तापदायक आवश्यक गोष्टी लादून सैतानाची इच्छा यहूदी पुढाऱ्यांनी साध्य केली. ख्रिस्ताच्या काळात शब्बाथाचा विपर्यास एवढा करण्यात आला की त्याच्या पालनाद्वारे स्वर्गीय प्रेमळ पित्याच्या स्वभावाऐवजी आपमतलबी आणि लहरी, जुलमी माणसाच्या स्वभावाचे परावर्तन झाले. वास्तविकरित्या धर्मगुरू देवाचे प्रतिनिधीत्व करीत होते आणि मनुष्याला पाळता येत नव्हते असे नियम ते देत होते. देव जुलमी आहे अशी त्यांनी लोकांची समजूत करून दिली आणि त्याच्या इच्छेप्रमाणे शब्बाथाचे पालन करणे कठीण असल्यामुळे त्यांची अंतःकरणे कठीण होऊन निर्दय झाली. हा गैरसमज दूर करण्याचे काम ख्रिस्ताचे होते. जरी धर्मगुरू त्याच्याशी निर्दय शत्रूत्वाने वागत होते तरी त्यांनी लादलेल्या मागणीशी त्याने अनुरूपता दर्शविली नाही आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे शब्बाथ पालन केले.DAMar 236.3

    एका शब्बाथी भक्ती आटोपून येशू व त्याचे शिष्य परत येत असताना ते एका शेतातून जात होते. येशूने आपले काम फार उशीरापर्यंत केले होते आणि शिष्यांनी कणसे मोडून हातात चोळून त्यांचे दाणे ते खाऊ लागले. इतर दुसऱ्या कोणत्याही दिवशी ह्या कृत्याने गडबड उडाली नसती कारण द्राक्षाच्या मळ्यात जाणे व मनमुराद द्राक्ष खाणे किंवा उभ्या पिकातून कणसे तोडून खाणे गैर नव्हते. अनुवाद २३:२४, २५ पाहा. परंतु शब्बाथ दिवशी हे कृत्य करणे म्हणजे पावित्र्य नष्ट करणे होय. कणसे गोळा करणे म्हणजे कापणी आणि हातात चोळणे म्हणजे धान्याची मळणी करणे असे समजले जात होते. धर्मगुरूंच्या मते हा दुहेरी गुन्हा होता.DAMar 236.4

    हेरगिरी करणाऱ्यांनी लगेचच येशूजवळ कागाळी केली आणि म्हटले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत.” DAMar 237.1

    बेथसदा या ठिकाणी शब्बाथ मोडल्याबद्दल आरोप केल्यावर आपल्या समर्थनार्थ त्याने देवाशी असलेले पुत्राचे नाते सादर केले आणि पित्याशीच एकमताने तो काम करितो असे जाहीर केले. आता त्याच्या शिष्यावर दोषारोप करण्यात आला होता. दोष देणाऱ्यांना त्याने जुना करारातील उदाहरणे व देवाच्या सेवेत असणाऱ्यांची शब्बाथ दिवसांची कृती सादर केली.DAMar 237.2

    शास्त्रवचनाच्या ज्ञानात पारंगत असल्याबद्दल यहूदी पुढाऱ्यांना शिक्षकांना फार अभिमान वाटत होता आणि उद्धारकाने दिलेल्या उत्तरात शास्त्रवचनाविषयी अज्ञानी असल्याबद्दल त्यांना दोष देण्यात आला होता. त्याने म्हटले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यास भूक लागली तेव्हा त्याने काय केले, तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या... हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” आणखी तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी झाला आहे. मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही.” “याजक मंदिरात शब्बाथ दिवशी शब्बाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? तरीपण मी तुम्हास सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे.” “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचाही धनी आहे.’ लूक ६:३, ४; मार्क २:२७, २८; मत्तय १२:५, ६.DAMar 237.3

    भूक शमविण्यासाठी पवित्र कार्यासाठी राखून ठेवलेल्या भाकरी खाणे दावीदाला योग्य होते तर शब्बाथ दिवशी शिष्यांनी कणसे मोडून खाण्याने आपली गरज भागविली यात वाईट काय होते? मंदिरातील याजक इतर दिवसापेक्षा शब्बाथ दिवशी मोठी कामे करीत होते. प्रापंचिक जगात ती कामे निषिद्ध मानली होती; परंतु याजकांची कामे देवाच्या सेवेतील होती. ख्रिस्ताच्या उद्धारकार्याचे दर्शक म्हणून ते ती कामे करीत होते, आणि त्यांचे काम शब्बाथाच्या उद्देशाला समर्थक होते. परंतु आता ख्रिस्त स्वतः आलेला होता. येशूचे काम करताना शिष्य देवाच्या सेवेत गुंतले होते आणि ते काम पार पाडण्यासाठी जे आवश्यक होते ते शब्बाथ दिवशी करणे इष्ट होते.DAMar 237.4

    देवाच्या सेवेला प्रथम स्थान दिले पाहिजे असे ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना व शत्रूना शिक्षण दिले. ह्या जगातील देवाच्या कार्याचा उद्देश मानवाचा उद्धार करणे आहे; म्हणून हे साध्य करण्यासाठी शब्बाथ दिवशी करावयास लागणाऱ्या गोष्टी शब्बाथाच्या आज्ञेशी अनुकूल आहेत. त्यानंतर आपल्या विचाराचे समर्थ करण्यासाठी येशूने घोषीत केले, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभु आहे.” - म्हणजे सर्व प्रश्न व सर्व नियम यांचा अधिपती आहे. ज्या नियमाविषयी शिष्यांना दोषी ठरविण्यात आले त्यांचेच ह्या न्यायाधिशाने समर्थन केले आणि शिष्यांनाही दोषमुक्त केले.DAMar 237.5

    विरोधकांना धमकी देऊन ही बाब येशूने समाप्त केली नाही. त्यांच्या आंधळेपणामुळे त्यांनी शब्बाथाचा उद्देश चुकीचा घेतला असे त्याने म्हटले, “मला दया पाहिजे, यज्ञ नको ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोष्यांस दोष लाविला नसता.” असे त्याने जाहीर केले. मत्तय १२:७. देवाच्या खऱ्या श्रद्धावंताची गुणवत्ता ज्या हळव्या प्रेमामध्ये व सत्यशील प्रामाणिकपणामध्ये गुंफलेली आहे ती त्यांच्या निर्जीव विधीसंस्काराने साध्य होत नव्हती.DAMar 238.1

    प्रत्यक्ष यज्ञाद्वारे काही मूल्य साध्य होत नाही हे ख्रिस्ताने पुन्हा निक्षूण सांगितले. ते केवळ साधन होते आणि साध्य नव्हते. त्यांचा उद्देश लोकांना ख्रिस्ताकडे जाण्याची वाट दाखविणारा होता आणि त्यामुळे देवाशी सलगी करण्याचा होता. प्रेमप्रेरित सेवा देवाला मान्य आहे. जेव्हा हीची कमतरता असते तेव्हा केवळ विधिसंस्कार त्याला गुन्हा वाटतो. हीच बाब शब्बाथाची आहे. मानवाला देवाच्या सान्निध्यात आणण्यासाठी त्याची प्रतिस्थापना केली होती. परंतु कंटाळवाण्या संस्काराने मन गढून जाते तेव्हा शब्बाथाचा उद्देश निष्फळ ठरतो. केवळ वरकरणी शब्बाथ पालन चेष्टा, उपहास आहे.DAMar 238.2

    एका शब्बाथ दिवशी तो सभास्थानात गेला असतांना तेथे त्याने वाळलेल्या हाताचा एक माणूस पाहिला. आता तो काय करितो हे पाहाण्यासाठी परूशी लोक फार उत्सुक होते. शब्बाथ दिवशी बरे केल्यावर त्याला स्वैरवर्तनी म्हणतील हे येशूला माहीत होते. परंतु शब्बाथाला अडखळण असलेली पारंपारिक परिपाठाची भींत तोडून टाकण्यास त्याने हयगय केली नाही. हात वाळलेल्या माणसाला म्हटले, उठ मध्ये उभा राहा. मग तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जीव घेणे ह्यातून कोणते सशास्त्र आहे?” संधी असताना सत्कार्य करण्यास अपयशी ठरणे म्हणजे कुकर्म करणे होय; जीव वाचविण्यास हेळसांड करणे म्हणजे हत्त्या करणे होय असे नीतिवचन यहूदी लोकात प्रसृत होते. अशा प्रकारे त्यांनी उभारलेल्या पायावरच येशूने धर्मगुरूंना तोंड दिले. “पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे ख्रिन्न होऊन त्या सर्वाकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, हात लांब कर; त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.” मार्क ३:४, ५.DAMar 238.3

    “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” असा प्रश्न विचारल्यावर येशूने उत्तर दिले “तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की, ज्याचे एकच मेंढरू असून ते शब्बाथ दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? तर मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे! ह्यास्तव शब्बाथ दिवशी सत्कृत्ये करणे योग्य आहे.” मत्तय १२:१०-१२.DAMar 238.4

    त्रासात पडेल ह्या भीतीने लोकसमुदायाच्यासमोर ख्रिस्ताला प्रत्युत्तर करण्यास हे हेर धजले नाहीत. त्याने सत्य सांगितले होते हे त्यांना कळले होते. परंपरागत आचाराचे उलंघन करण्याऐवजी त्या मनुष्याला पीडा भोगण्यास ते मोकळे सोडत असे, परंतु त्याच वेळी दुर्लक्ष केल्यावर मालकाचे नुकसान होईल म्हणून पशूना दुःख, यातना यापासून मुक्त करीत असे. अशा प्रकारे देवाच्या प्रतिमेचा असलेला मनुष्य याच्यापेक्षा मुक्या प्राण्याची अधिक काळजी घेतली होती. ह्या उदाहरणावरून खोट्या धर्मांची कार्यपद्धत स्पष्ट होते. देवापेक्षा माणसाला श्रेष्ठ बनविण्याच्या विचारात त्याचे मूळ आहे परंतु त्याचा परिणाम पशूपेक्षा मनुष्याला निकृष्टावस्थेत लोटण्यात होतो. देवाच्या सार्वभौमत्वाविरूद्ध लढा देणारा प्रत्येक धर्म निर्माण करण्याच्या वेळी मनुष्याला दिलेले गौरव फसवून हिरावून घेण्यात येते, आणि तेच गौरव ख्रिस्तामध्ये त्याला पुन्हा देण्यात येते. मनुष्यांच्या गरजा, त्यांच्या यातना व त्यांचे हक्क यांच्याविषयी बेदरकार राहा असे शिक्षण प्रत्येक खोटा धर्म देतो. ख्रिस्त रुधिराने विकत घेतलेली मानवता म्हणून सुवार्ता तिचे भारी मूल्य करिते, आणि मनुष्याच्या गरजा आणि अनर्थ, अरिष्टे याबद्दल कळकळीची सहानुभूती दर्शविते. प्रभु म्हणतो, “मी पुरुषाला उत्कृष्ट सोन्याहून दुर्मिळ करीन, मानवाला ओफारीच्या शुद्ध सोन्याहून दुर्मिळ करीन.’ यशया १३:१२.DAMar 239.1

    शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जीव घेणे ह्यातून कोणते सशास्त्र आहे? येशूने हा प्रश्न परूश्यांना विचारून त्यांच्या दुष्ट उद्देशाला धैर्याने प्रतिबंध केला. तो लोकांचा जीव वाचवून त्यांना आनंद देण्यात गुंतला असताना ते तीव्र द्वेषाने त्याचा जीव घेण्याच्या पाठी लागले होते. त्याच्या कृतीप्रमाणे दुःखणाईतांना बरे करणे किंवा त्यांच्या योजनेप्रमाणे शब्बाथ दिवशी जीव घेणे यातून कोणते बरे? देवाच्या पवित्र दिवशी अंतःकरणात खुनी वृत्ती बाळगणे किंवा सदयतेच्या कृतीने सर्व लोकांवर प्रेम करणे धार्मिकतेचे आहे?DAMar 239.2

    हात वाळलेल्या माणसास बरे करून येशूने यहूदी लोकांची पद्धत दोषी ठरविली आणि देवाने दिलेल्या चौथ्या आज्ञेचे समर्थन केले. त्याने प्रतिपादिले, “शब्बाथ दिवशी सत्कर्मे करणे योग्य आहे.’ यहूद्यांची अडखळणे दूर करून ख्रिस्ताने शब्बाथाचा मान राखिला आणि त्याच्याविरूद्ध तक्रार करणारे शब्बाथाची अवहेलना करीत होते.DAMar 239.3

    ख्रिस्ताने आज्ञा रद्द केल्या असा ज्यांचा विश्वास आहे ते त्याने शब्बाथाची पायमल्ली केली आणि तसेच करण्यास शिष्यांना प्रोत्साहन दिले अशी शिकवण देतात. दोष दाखविणाऱ्या यहूद्याप्रमाणे त्यांची स्थिती आहे. ह्यामध्ये त्यांची भूमिका ख्रिस्ताच्या साक्षीविरूद्ध आहे. त्याने म्हटले, “मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहातो.’ योहान १५:१०. उद्धारकाने तसेच त्याच्या अनुयायांनी शब्बाथाची आज्ञा मोडली नाही. ख्रिस्त नियमशास्त्राचा जीवंत प्रतिनिधी होता. पवित्र आज्ञा मोडल्याचे त्याच्या जीवनात आढळत नाही. त्याला दोष देण्यासाठी खटाटोप करणाऱ्या राष्ट्राकडे पाहिल्यावर आव्हान न देता तो म्हणू शकतो, “तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवितो?” योहान ८:४६.DAMar 239.4

    आद्यपुरुष आणि संदेष्टे यांनी शिकविलेले रद्द करण्यासाठी उद्धारक आला नाही; कारण त्यांच्याद्वारेच तो बोलला होता. देवाचे सर्व सत्यवचन त्याच्यापासून आले. परंतु ही अमूल्य रत्ने चूकीच्या संदर्भात ठेवली होती. चूकीचे समर्थन करण्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या प्रकाशाचा उपयोग करण्यात आला होता. त्यांना चुकीच्या संदर्भातून काढून सत्याच्या भूमिकेत त्यांचा अंतर्भाव व्हावा ही देवाची मनिषा होती. हे कार्य केवळ दिव्य हस्ताने साध्य होऊ शकते. त्याचा चूकीशी संबंध असल्याकारणाने, देव व मानव यांच्या शत्रूच्या कारणासाठी सत्याचा उपयोग होत आहे. ज्या स्थळी देवाचे गौरव होईल व मानवाचा उद्धार होईल त्या ठिकाणी ते ठेवण्यासाठी ख्रिस्त आला आहे. DAMar 240.1

    येशूने म्हटले, “शब्बाथ मनुष्यासाठी केला आणि मनुष्य शब्बाथासाठी नाही.” देवाने स्थापन केलेले विधि नियम मानवाच्या कल्याणासाठी आहेत. “सर्व काही तुम्हाकरिता आहे.” “पौल असो, अपल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्व काही तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहा आणि ख्रिस्त देवाचा आहे.” २ करिंथ. ४:१५; १ करिंथ. ३:२२, २३. शब्बाथ अंतर्भूत असलेल्या दहा आज्ञा देवाने मानवाला कृपाप्रसाद म्हणून दिल्या. मोशेने म्हटले, “परमेश्वराने हे सर्व विधि पाळण्याची आपल्याला आज्ञा दिली, ती यासाठी की आपण आपला देव परमेश्वर याचे भय बाळगावे; अशाने आपले निरंतरचे कल्याण होईल आणि तो आपणास जीवंत राखील.” अनुवाद ६:२४. स्तोत्रकाद्वारे इस्राएलासाठी संदेश देण्यात आला होता, “हर्षाने परमेश्वराची सेवा करा; गायन करीत त्याजपुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा; त्यानेच आम्हास उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहो, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो, त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा.” स्तोत्र १००:२-४. प्रभु म्हणतो, “जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात... त्यांस मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यास हर्षित करीन.’ यशया ५६:६, ७.DAMar 240.2

    “ह्यास्तव मनुष्याचा पुत्र शब्बाथाचाही प्रभु आहे.’ हे शब्द प्रबोधनपर व मनाला समाधान देणारे आहेत. कारण शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, तो प्रभूचा दिवस आहे. तो ख्रिस्ताच्या मालकीचा आहे. कारण “सर्व काही त्याच्या द्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले नाही असे काहीच नाही.’ योहान १:३. ज्याअर्थी सर्व काही त्याच्याद्वारे झाले त्याअर्थी शब्बाथही त्यानेच केला. उत्पत्तीकार्याचे स्मारक म्हणून त्याने तो राखून ठेविला होता. त्याद्वारे तो निर्माणकर्ता आणि पवित्र करणारा असे दर्शविले जाते. स्वर्गात व पृथ्वीवर ज्याने सर्वकाही निर्माण केले, आणि ज्याच्याद्वारे सर्वकाही स्थिर राहाते, तो मंडळीचा शीर-प्रमुख आहे आणि त्याच्या सामर्थ्याने आमचा देवाशी समेट झाला आहे. इस्राएलाविषयी बोलताना त्याने म्हटले, “त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यास आपले शब्बाथही दिले; ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यास पवित्र केले असे त्यास समजावे.’ यहज्केल २०:१२. ह्यावरून आम्हाला पवित्र करणाऱ्या ख्रिस्ताच्या सामर्थ्याचे शब्बाथ हे चिन्ह आहे. ज्यांना ख्रिस्त पवित्र करितो त्या सर्वांच्यासाठी ते देण्यात आले आहे. पवित्र करण्याच्या सामर्थ्याचे चिन्ह म्हणून ख्रिस्ताद्वारे देवाच्या इस्राएल लोकांचा एक भाग बनणाऱ्या सर्व लोकासाठी शब्बाथ देण्यात आला आहे.DAMar 240.3

    प्रभु म्हणतो, “तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील; ... तर तू परमेश्वराच्या ठायी हर्ष पावशील.’ यशया ५८:१३, १४. उत्पत्तीकार्याच्या व उद्धारकार्याच्या सामर्थ्याचे चिन्ह शब्बाथ आहे असा स्वीकार करणाऱ्याला तो आनंददिन होईल. त्यामध्ये ख्रिस्त असलेला पाहून ते त्याच्यामध्ये आनंद करितात. शब्बाथाद्वारे त्यांना उत्पत्तीकार्याचे दर्शन होते आणि उद्धारकार्यातील त्याच्या महान सामर्थ्याचा पुरावा मिळतो. त्याद्वारे एदेनमध्ये हरपलेल्या शांतीचे स्मरण होते, त्या सोबत उद्धारकर्त्याद्वारे पुन्हा प्रस्थापित होणाऱ्या किंवा लाभणाऱ्या शांतीची सुवार्ता लाभते. निसर्गामधील प्रत्येक वस्तू त्याच्या आमंत्रणाचा पुनरुच्चार करिते, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हास विसावा देईन.’ मत्तय ११:२८.DAMar 241.1